सुमेरियन पृथ्वीदेव. तो एन्कीप्रमाणेच सुमेरियन संस्कृतीतील एक प्रमुख देव. सुमेरियन अनुनामक आकाशदेवाचा तो पुत्र असून वायुदेव म्हणूनही त्यास संबोधले जाते. तो ऊर्जा व शक्ती यांचे प्रतीक आहे. तो वायुराज असल्याने हा सर्वकाही देणारा देव जसा आहे, तसा सर्व नष्ट करणारा सुद्धा आहे. एन्लिल हा नाना या चंद्रदेवाचा पिता; तर इश्तार ह्या देवतेचा आजोबा आहे. प्राचीन सुमेरचा तो आद्य देव होय. निनलिल ही त्याची मुख्य सहचारिणी असून ती वायूदेवता आहे. निप्पूर हे त्याचे प्रमुख स्थान आहे.
एन्लिल हा प्राचीन सुमेरियन, अकेडियन, मेसोपोटेमियन देव असल्यामुळे त्याचे नाव हिटाइट यांच्या मृत्तिका-पटलांवर आढळून येते. एन्लिल हा ‘टॅबलेट ऑफ डेस्टिनीज’ (Tablet of Destinies) सुद्धा धारण करणारा होता. एन्लिल, एन्की आणि अनु हे देवांचे त्रिकूट प्रसिद्ध आहे.
एन्लिलची वाणी पवित्र असल्याची मान्यता आहे. त्याला सर्व देवांकडून मानसन्मान प्राप्त झाल्याने तो श्रेष्ठ देव समजला जातो. एका दंतकथेनुसार तो पृथिवीदेवतेच्या कुशीतून जन्माला येण्याऐवजी तिच्या श्वासातून जन्माला आला. शिवाय त्यानेच आपल्या मातापित्याला वेगळे केले, अशी आख्यायिका आहे.
एन्लिल व निनलिल : निनलिल ही त्याची सहचारिणी असून ती वायुदेवता आहे. निप्पूर हे शहर जेव्हा देवांचे निवासस्थान होते, तेव्हा तिथे निनलिलसुद्धा राहत असे. तिच्या आईने तिला एन्लिलच्या प्रेमपाशांविषयी सावध करून नदीकाठी न जाण्याविषयी बजावले होते. मात्र ती एकदा नदीवर स्नानासाठी गेलेली असताना एन्लिलने तिला आपल्या जाळ्यात अडकवून तिला गर्भवती केले आणि नाना या चंद्रदेवाला तिने जन्म दिला आणि या कारणामुळे इतर देवांनी एन्लिलला निप्पूरमध्ये भटकत असताना कैद केले आणि निप्पूरमधून हद्दपार केले व पाताळात जाण्याची शिक्षा दिली. तो जेव्हा पाताळलोकात जायला निघतो, तेव्हा त्याच्या मागे निनलिलसुद्धा निघते. पाताळाच्या प्रवेशद्वारापाशी गेल्यावर एन्लिल तिथल्या द्वारपालाचे रूप घेतो. निनलिल त्याला एन्लिल कुठे असल्याचे विचारते; मात्र तो तिच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही, उलट तिला द्वारपाल रूपातच आपल्या जाळ्यात ओढून घेतो आणि तिच्यापासून त्याला मृत्युदेवता नरगालचा जन्म होतो. पुढे जाऊन एन्लिल पाताळातील नदीजवळ असेलला रक्षक आणि ती नदी पार करवून देणारा नावाडी अशा रूपात तो रूपांतरित होतो आणि त्याला निनलिलपासून अनुक्रमे निनझू (Ninazu) व एनबिलुलू (Enbilulu) हे दोन देव झाले. ही कथा बहुतकरून या देवांना वेगवेगळ्या रूपात रूपांतरण करता येत होते याविषयी भाष्य करणारी असावी, असे काही अभ्यासकांचे मत आहे.
एन्लिल आणि निनुर्था : सुमेरियन काव्य ‘ल्यूगाले’ (Lugale) मध्ये एन्लिलचा उल्लेख येतो. त्याचा पुत्र निनुर्था हा कृषिदेव, युद्धदेव म्हणून फार पूर्वीच्या काळात सुमेरमध्ये प्रसिद्ध होता. अंझूनामक राक्षसी पक्ष्याने ‘टॅबलेट ऑफ डेस्टिनीज’ पळवली. त्याला निनुर्थाने हरवले व ‘टॅबलेट ऑफ डेस्टिनीज’ परत आणली. त्यामुळे बक्षीस म्हणून निनुर्थाला सुमेरियन प्रमुख देवतामंडळात महत्त्वाचे स्थान एन्लिलने दिले.
एन्लिल व महाप्रलय : एन्लिल हा शक्ती व स्वामित्वाचे प्रतीक आहे. एका प्रलय कथेनुसार तो चिरनिद्रेत पहुडलेला असताना मनुष्यांच्या हालचाली, त्यांनी केलेला गोंगाट इत्यादींमुळे तो जागा होतो. प्रचंड चिडून त्याने प्रथम महामारी, दुष्काळ, वंध्यत्व पसरवून मानवांना नष्ट करायचा प्रयत्न केला; पण सुमेरियन कथेनुसार एन्कीमुळे, तर बॅबिलोनियन कथेनुसार इआमुळे मनुष्य वाचत राहिले. मनुष्य एन्की/इआ यांच्या सांगण्यावरून तो रोग किंवा संकटे निर्माण करणाऱ्या देवतांना प्रसन्न करवून घेऊन एन्लिलच्या तावडीतून सुटत राहिले. शेवटी त्याने महाप्रलय आणून त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला; पण एन्कीने एका सज्जन मनुष्याला वाचवून पुन्हा मानवी जीवन प्रस्थापित केले.
संदर्भ :
- Jordan, Michael, Dictionary of gods and goddess, New York, 2005.
- http://www.newworldencyclopedia.org/entry/Enlil
- https://mythology.net/others/gods/enlil/
समीक्षक : शकुंतला गावडे