लिओनार्ड, फ्रिट्झ : ( १२ जुलै १९०९ ते ३० डिसेंबर १९९९ )
फ्रिट्झ लिओनार्ड या जर्मन अभियंत्याचा जन्म जर्मनीतील स्टुटगार्ट या गावी झाला. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण विख्यात स्टुटगार्ट विद्यापीठात केले. नंतर १९३२-३३ मध्ये अमेरिकेतील पर्ड्यू (Purdue) विद्यापीठात अभ्यास केला. नंतर १९३४ साली लिओनार्ड यांनी पॉल डोनाट्झ यांच्याबरोबर जर्मन हायवे ॲडमिनिस्ट्रेशन’ मध्ये कामाला प्रारंभ केला आणि ३ वर्षातच वयाच्या २८ व्या वर्षी ऱ्हाईन नदीवरील कलोन – रोडेन्कर्शेन (Cologne – Rodenkirshen) या मुख्य अवधी (Span, पुलाच्या कमानीचे अंतर) ३७८ मी. असलेल्या पुलावर मुख्य अभियंता म्हणून त्यांची नेमणूक झाली. विशेष म्हणजे त्यानंतर एका वर्षातच १९३८ साली त्यांनी अभियांत्रिकीतील डॉक्टरेट पदवी घेतली आणि लगोलग पुढील वर्षीच त्यांनी स्वतःची सल्लागार अभियंता म्हणून फर्म सुरू केली आणि अँद्रा या अभियंत्यासह यूरोपांतील सर्वांत मोठ्या टांगत्या पुलाचे (Suspension Bridge) अभिकल्प पूर्ण केले. अशा तऱ्हेने कामे करून अखेरीस १९५४ साली त्यांनी अँद्राबरोबर ‘लिओनार्ड, अँद्रा अँड पार्टनर्स’ या नावे कंपनी स्थापन केली.
पुलांच्या अभिकल्पांमध्ये नवनवीन वैविध्यपूर्ण पद्धती आणि प्रणाली यांचा वापर हे लिओनार्डच्या कल्पकबुद्धीचे वैशिष्ट्य होते. उच्च शक्तीच्या काँक्रीटमध्ये उच्चतन्य (High tension) लोखंड वापरून तयार झालेल्या पूर्वप्रतिबलित काँक्रीटमधील मोठ्या अवधींच्या संरचना बांधण्याची पद्धत १९३५-४०च्या सुमारास ख्यातनाम फ़्रेंच अभियंता युजीन फ्रेसिने यांनी कार्यान्वित केली होती. लिओनार्ड यांनी आपल्या कारकिर्दीत याच काँक्रीटच्या संबधात आणखी नवनवीन प्रणाली अंमलात आणल्या. मग त्यात पूर्वप्रतिबलित काँक्रीटच्या मोठया तुळ्या (Girders) त्यांच्या स्थानावर ठेवण्यासाठीच्या योजना असोत किंवा केबल-स्थित पुलांच्या स्थिरकांसाठी (Anchors) स्वित्झर्लंडमधील बीबीआरव्ही (BBRV) या कंपनीबरोबर त्यांनी केलेला सहयोग असो. त्याचप्रमाणे प्रबलित काँक्रीट आणि लोखंड यांच्या संमिश्र रचना, टांगते पूल, केबल-स्थित पूल, निरनिराळ्या आकारांची आणि आकृतीबंधांची तंबूसारखी ताणलेली कमी जाडीची कॉंक्रीटची कवची छते अशा विलक्षण वैविध्यतेच्या संरचनांचे संकल्पन/ अभिकल्प त्यांनी केले. १९६४ साली व्हेनेझुएलामधील ग्वायान येथील कॅरोनी नदीवरील पूर्वप्रतिबलित काँक्रीटच्या ९० मीटर अवधीच्या मोठ्या तुळ्या नदीमध्ये उभारलेल्या खांबांवर ठेवण्यासाठी लिओनार्डने अभिकल्पलेली प्रणाली वाखाणली गेली होती. टांगत्या पुलांची काही उदाहरणे म्हणजे कलोन – रोडेन्करर्खेन येथे १९५२-५४ साली बांधलेला टांगता पूल तो हाच पूल. १९३८-४१ मध्ये लिओनार्ड नव्यानेच अभियंता असतांना त्यांच्याच देखरेखीखाली बांधला गेला होता. युद्धामध्ये नाश झालेल्या या पुलाचे खांब शाबूत राहिले होते. त्याखांबांवरच हा नव्याने अभिकल्पिलेला पूल निर्माण करण्यात आला. लिस्बनमधील १०१३ मीटर अवधीचा पाण्याच्या पृष्ठभागावर ७० मीटर उंचीवर असलेला १९० मीटर उंचीचा २५- दि ॲब्रिल हा रेलरोड पूल.
केबल-स्थित पुलांची कांही उदाहरणे म्हणजे जर्मनीत ड्युसेलडॉर्फ (Dusseldorf) मध्ये बांधलेले अनेक पूल. १९७१-७७ मध्ये बांधलेला झराटे – ब्रुझॉन – लार्गो (Zarate-Bruzon – Largo) हा ३३०मीटर अवधीचा पूल आणि १९७८ मध्ये बांधलेला अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळील २९९ मीटर अवधीचा ७६३ मीटर लांब कोलंबिया नदीवरील ‘एड्हेंडलर’ (Ed-Hendler) या नावाने ओळखला जाणारा पूल, नॉर्वेमधील १३० मीटर उंच आणि १०६६मीटर लांब हायग्लेड पूल (Heigeland) इत्यादी.
तंबूसारख्या ताणल्या गेलेल्या संरचनांमध्ये १९६७ साली माँट्रियलमध्ये आणि १९७२ ला म्यूनिकमध्ये बांधलेले ऑलिंपिकसाठीचे जर्मन पॅव्हिलिअन, १९७३ साली हॅम्बर्गमधील ॲल्स्टर श्विनेम् हॉल (Alster Schuinem Hall), ॲक्वेटीक सेंटर’ येथील १०२ मीटर X ५२ मीटर आकाराचे डबल हायपरबोलीक पॅरॅबोलाईड (Double Hyperbolic Paraboloid) ह्या आकृतीबंधातील तीन टेकूवर उभारलेली ६ सेंटीमीटर जाडीची कॉक्रीटची कवची छते ही उदाहरणे होत.
वरील संरचनांव्यतिरिक्त स्टुटगार्टमध्ये लिओनार्डने बांधलेला टीव्हीचा मनोराही प्रसिद्ध आहे.
टांगते पूल असोत वा केबल-स्थित पूल असोत, त्यांच्यावर वादळी हवामानाचा प्रतिकूल परिणाम अटळ असतो. तेव्हा अशा रचना संपूर्णपणे स्थिर करण्यासाठी वायुगतियानिक (Aeredynamics) या विषयाचे सखोल ज्ञान आवश्यक असते. लिओनार्डने ते प्रदीर्घ अभ्यासातून प्राप्त केले होते.
लिओनार्ड यांनी जरी आपले सर्व आयुष्य संरचनात्मक अभियांत्रिकीमध्ये व्यतीत केले तरी ते करताना त्यांची दृष्टी सौंदर्यशास्त्राकडे (aesthetics) असायची. त्यामुळे आपले अभिकल्प नेहमीच नयनमनोहर असले पाहिजेत असात्यांचा कटाक्ष असायचा. त्याचबरोबर वास्तुविशारद, अभियंता आणि विकासक ज्या प्रकारे निष्काळजीपणे निर्सगाची हानी करतात, त्याविषयी लिओनार्ड अतिशय तळमळीने बोलत.
लिओनार्ड यांनी निरनिराळ्या विषयांवर लेखक म्हणून किंवा सहलेखक म्हणून २२ पुस्तके लिहिली. त्यातील पहिले पुस्तक तर वयाच्या ३० व्या वर्षीच लिहिले. इतर पुस्तकांमध्ये काँक्रीट विषयावरील व्याख्याने – खंड १ ते ६, (‘Vorlesungenuber Massivan’) पूर्वप्रतिबलित काँक्रीट (Spannbeton fur die Praxis), ‘ब्रिजिस – एस्थेटिकस् अँड डिझाइन’ (Bridges – Aesthetics & Design), ब्रुकेन / ब्रिजिस (Brucken / Bridges) इत्यादी.
व्यावसाययिक कामे चालू असतानाच लिओनार्ड यांनी प्राध्यापक या नात्याने स्टुटगार्ट विद्यापीठात ‘प्रबलित काँक्रीट आणि पूर्वप्रतिबलित कॉक्रीट’ या विषयांचे १९५८ ते १९७४या काळात अध्यापन केले. त्यातील १९६७ ते १९६९ या वर्षात त्यांनी विद्यापीठाची रेक्टर म्हणून काम केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्यांना विचार करावयास उद्युक्त करावे आणि त्यांच्यात नवनवीन कल्पना रुजवाव्यात यांवर त्यांचा भर होता.
लिओनार्ड यांना निरनिराळ्या सहा विद्यापीठांची मानद डॉक्टरेट पदव्या मिळाल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांना अनेक ख्यातनाम विद्यापीठांचे मानद सदस्य म्हणून नेमले गेले होते. त्यांना मिळालेल्या अनेक पारितोषिकांमध्ये ‘वेर्नेर फॉन सीमेन्स रिंगचे (Werner von Siemens Ring) माँर्शपदक, एफआयपी (FIP) चे फ्रेसिने पदक, इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्सचे सुवर्ण पदक आणि युनिव्हर्सिटी ऑफ बाथची मानद डॉक्टर ऑफ सायन्स (D. Sc.) ही पदवी. या व्यतिरिक्त फक्त अमेरिकेतून अमेरिकन कॉंक्रीट इन्स्टिट्यूटचे मानद सदस्यत्व, ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे विशिष्ट सेवा पदक, अमेरिकन कन्सल्टिंग इंजिनिअर्सचे इंजिनिअर्स एक्सेलन्स आणि वॉशिंगन स्टेटचे मानद सन्माननीय नागरीकत्व असे अनेक सन्मान मिळाले.
वयाच्या ९० व्या वर्षी मृत्यु येईपर्यत सतत कार्यरत राहून नवनवीन कल्पनांच्या बाबतीत सतत प्रयोगशील असलेला, आपले विद्यार्थी सदैव विचारप्रवण व्हावेत म्हणून अविश्रांत परिश्रम करणारा प्राध्यापक आणि त्याचवेळी पर्यावरण, शास्त्रीय संगीत, निसर्ग, गिर्यारोहण अशा अन्य निरनिराळ्या विषयांमध्ये अतिशय रस असलेला एक विलक्षण अभियंता म्हणून लिओनार्ड यांची कीर्ती जगभर पसरली.
संदर्भ :
- ‘Eminent Structural Engineer’ – Dr. Fritz Leonhardt
- Article by Reiner Saul, Holger S. Suensson & Hans – Peter Andra
- https://alchetron.com/Fritz-Leonhardt
समीक्षक : प्रकाश शं.अंबिके