डेकन, कार्ल क्लाऊस फॉन देर (Decken, Karl Klaus Von Der) ꞉ (८ ऑगस्ट १८३३ – २ ऑक्टोबर १८६५). टांझानियातील किलिमांजारो पर्वतावर चढाईचा प्रयत्न करणारे पहिले यूरोपीय, तसेच पूर्व आफ्रिकेत प्रवास करणारे जर्मन समन्वेषक. डेकन यांचा जन्म जर्मनीतील कोटझेन (ब्रांडनबुर्क) येथील एका खानदानी कुटुंबात झाला. वडील अर्न्स्ट हे जमीनदार होते. आईचे नाव ॲना. डेकन यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दहा वर्षे लष्करामध्ये नोकरी केली. त्यानंतर इ. स. १८६० मध्ये त्यांनी लष्करी सेवेचा राजीनामा देऊन पूर्व आफ्रिकेचा शोध घेण्याचे ठरविले. सर्वप्रथम त्यांनी न्यासा सरोवराच्या आसपासच्या परिसरामध्ये प्रवास केला. आफ्रिकेच्या अंतर्भागात प्रवास करीत असताना त्यांची भेट ब्रिटिश भूशास्त्रज्ञ रिचर्ड थॉर्नटोन यांच्याशी झाली. थॉर्नटोन यांनी डेकन यांना किलिमांजारोच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. डेकन आणि थॉर्नटोन यांनी सर्वेक्षण करून किलिमांजारो पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६,०९६ मीटर असल्याचे सांगितले. डेकन यांनी इ. स. १८६१ मध्ये आखलेली किलिमांजारोची पहिली मोहीम खराब हवामानामुळे अयशस्वी झाली. त्यानंतर इ. स. १८६२ मध्ये त्यांनी दुसरे जर्मन अन्वेषक ओट्टो केरस्टेन यांना बरोबर घेऊन पुन्हा किलिमांजारोची मोहीम आखली. या वेळी ते ४,२६७.२ मिटरपर्यंत वर जाण्यात यशस्वी झाले; परंतु पुन्हा खराब हवामान आणि सामान वाहून नेणाऱ्यांचा असहकारामुळे ही मोहीमदेखील अर्धवट सोडावी लागली. या वेळी मात्र किलिमांजारो हे बर्फाच्छादित असल्याची प्रत्यक्ष निरीक्षणे त्यांनी नोंदविली.

डेकन यांनी इ. स. १८६३ मध्ये आपले लक्ष पूर्व आफ्रिकेच्या संशोधनाकडे वळविले. त्यांनी आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील मादागास्कर तसेच मस्करेन बेटांना भेट दिली. इ. स. १८६४ मध्ये त्यांनी केलेल्या अभ्यासाबद्दल ‘रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी’ने त्यांना भूगोलातील विशेष संशोधनासाठीचे ‘सेवा संरक्षक पदक’ देऊन त्यांचा गौरव केला. इ. स. १८६५ मध्ये डेकन यांनी सोमालियाला भेट दिली. सोमालियातील जुबा नदीच्या खालच्या भागामध्ये पोहोचणारे डेकन हे पहिले यूरोपीयन होते. जुबा नदीतून सर्वेक्षण करीत असताना बरडेराजवळ त्यांचे वेल्फ हे छोटे वाफेचे जहाज अपघातग्रस्त झाले. त्यामुळे डेकन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना सोमालियन लोकांनी पकडले. सोमालियन लोकांनी डेकन आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांची हत्या केली. डेकन यांचे इतर अकरा सहकारी मात्र तेथून झांझीबारला पळून जाण्यात यशस्वी झाले.

डेकन यांच्या मृत्यूनंतर त्यांनी केलेल्या प्रवासाच्या, शोधाच्या नोंदी तसेच त्यांनी वापरलेली उपकरणे इत्यादी सर्व गोष्टी बर्लिन वस्तुसंग्रहालयामध्ये जतन करून ठेवल्या आहेत. डेकन यांच्या कामगिरीबद्दल पूर्व आफ्रिकेतील एका पक्ष्याला ‘फॉन देर डेकन्स हॉर्नबील’ असे नाव देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या सन्मार्थ पूर्व आफ्रिकेतील पर्वतीय प्रदेशातील फुलझाडांपैकी एका स्थानिक लोबेलिया प्रजातीला ‘लोबेलिया डेकनी’ असे नाव देण्यात आले आहे.

समीक्षक ꞉ मा. ल. चौंडे; वसंत चौधरी