मराठेशाहीतील एक पराक्रमी सेनानी. बाळाजी विश्वनाथ (सु. १६६० ? — २ एप्रिल १७२०) यांचा मुलगा व पहिला बाजीराव (कार. १७२०—४०) यांचा धाकटा भाऊ. त्यांच्या जन्माबाबतचा तपशील मिळत नाही. बाजीरावांना पेशवाई मिळाल्यानंतर चिमाजी आप्पा यांना सरदारकी मिळाली. काही वर्षे त्यांनी अंबाजी त्रिंबक पुरंदरे यांच्यासह सातार्यास पेशव्यांचा वकील म्हणून काम केले. तसेच काही वेळा त्यांना मोहिमांवर जावे लागे. त्यांनी केलेल्या पहिल्या मोठ्या मोहिमेत आमझरे येथे झालेल्या लढाईत त्या वेळचा माळव्याचा मोगल सुभेदार गिरिधर बहादुर व त्याचा नातेवाईक दया बहादुर यांना ठार करून सबंध माळवा आपल्या ताब्यात आणला (१७२८) आणि तो शिंदे, होळकर व पवार या तीन सरदारांत वाटूनही टाकला.
त्यानंतर १७२९ मध्ये पावसाळा संपल्यानंतर गुजरात प्रांतात चौथाई वसूल करण्यासाठी म्हणून चिमाजी आप्पा यांची स्वारी झाली. चिमाजी आप्पांच्या पराक्रमामुळे तेथील मोगल सरदार सरबुलंदखानाने शरणागती पतकरून मराठ्यांच्या चौथाई व सरदेशमुखीचे हक्क कबूल केले. त्यानंतर त्यांनी छ. शाहू महाराजांच्या आदेशानुसार कोकणात मराठी राज्यास त्रास देणार्या जंजिरेकर सिद्दी सात याचा बंदोबस्त करण्यासाठी कोकणात स्वारी केली (१७३६). या स्वारीत सिद्दी सात यास ठार केले व कोकणात कायमचा वचक बसविला. यावेळी बाजीराव उत्तरेत होते. ते परत येत असता निजामाने भोपाळजवळ त्यांस अडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चिमाजी आप्पांनी निजामाला दक्षिणेतून येणारी मदत बंद करून जेरीस आणले, तेव्हा तो बाजीरावांस शरण आला.
चिमाजी आप्पा यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे पोर्तुगीज सत्तेविरुद्धची मोहीम आणि वसई हस्तगत करणे, ही होय (१७३७-३९). वसई प्रांतातील पोर्तुगीजांच्या धार्मिक छळाला कंटाळून तेथील जनतेने पेशव्यांकडे रक्षण करण्याची विनंती केली. बाजीराव पेशव्यांनी चिमाजी आप्पांना या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेत मराठ्यांनी सुरुवातीला ठाणे, घोडबंदर, मनोर, पारसिक, अर्नाळा इत्यादी ठाणी जिंकून घेत पोर्तुगीजांना शह दिला. या मोहिमेची जबाबदारी प्रामुख्याने अणजूरकर बंधूंवर होती. काही दिवसांनी चिमाजी आप्पा यांना भोपाळच्या लढाईत निजामाविरुद्ध जावे लागले होते, त्यामुळे वसईची मोहीम अर्धवट राहिली. पुढे पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर १७३७ मध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले. माहीमचे ठाणे घेतल्यानंतर चिमाजी आप्पा पुन्हा एकदा आपल्या फौजेसह वसई प्रांतात दाखल झाले. काही दिवस मुक्काम केल्यानंतर चिमाजी पुण्यास परतले. त्यानंतर १७३८ चा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा थोरले बाजीराव पुण्यात आले, तेव्हा पुन्हा एकदा वसईवर हल्ला करण्याचे ठरवले. यानंतर प्रचंड फौज घेऊन चिमाजी आप्पा हे वसई प्रांतात उतरले. यावेळी त्यांच्यासोबत मल्हारराव होळकर वगैरे सरदार सामील झाले होते. डिसेंबर महिन्यात पोर्तुगीजांचा सेनापती पिड्रो ड मेल हा मारला गेला. यानंतर मराठ्यांनी तारापूरचे ठाणे जिंकून घेतले (१७३९). मराठ्यांनी बाजी रेठेकरसारखा योद्धा गमावला. यानंतर केवळ वसईचे ठाणे घ्यायचे बाकी राहिले होते. ते काही हातात येईना, त्यामुळे चिमाजी आप्पा यांनी सर्व सरदारांना एकत्र बोलावले व सांगितले की, “वसई ताब्यात येत नाही, माझा हेतू वसई घ्यावी असा आहे, तरी तोफ डागून माझे मेलेले शरीर तरी वसई किल्ल्यात पडेल असे करा.” हे वीरश्रीयुक्त बोलणे सर्व सरदारांनी ऐकले आणि वसईवर निकराचा लढा केला. अटीतटीचा संघर्षानंतर शेवटी चिमाजी आप्पांनी वसई जिंकली व पोर्तुगीजांचे तेथील बस्तान पार उखडून टाकले. मराठ्यांना पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला ३४० गावांचा प्रदेश, २० किल्ले, २५ लाखांचा दारूगोळा वगैरे साहित्य मिळाले. तितक्यात बाजीराव वारल्याची खबर चिमाजी आप्पांना मिळाली, त्यामुळे ते लगेच पुण्यात परतले. पुढे सातारा येथे छ. शाहू महाराजांच्या करवी बाजीरावांचा थोरला मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब (कार. १७४०-६१) यांस मुख्य प्रधानपद मिळाले, तसेच वसई येथे केलेल्या पराक्रमामुळे चिमाजी आप्पा यांचा सन्मान करण्यात आला.
पुढे चिमाजी आप्पांनी यांनी दीव दमण प्रांतावर हल्ला करून तेथील उरलेल्या पोर्तुगीज सत्तेचा पराभव केला (१७४०). त्यामुळे पोर्तुगीज फक्त गोव्यापुरतेच मर्यादित राहिले. त्यानंतर नानासाहेब पेशवे यांना घेऊन चिमाजी आप्पा उत्तरेच्या स्वारीवर निघाले. चिमाजी आप्पांना क्षयाचा त्रास होता, त्यात या सर्व दगदगीमुळे त्यांची तब्येत अतिशय बिघडून १७ डिसेंबर १७४० रोजी एदलाबाद येथे त्यांचे निधन झाले. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात त्यांची समाधी आहे.
चिमाजी आप्पा हे काही बाबतींत थोरल्या बाजीराव पेशव्यांपेक्षा श्रेष्ठ तसेच शूर, धोरणी व मनमिळाऊ होते. बाजीरावांच्या अनुपस्थितीत घर आणि खासगी कारभार त्यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळले. वसईच्या किल्ल्यात सापडलेल्या एका फिरंग्याच्या मुलीला त्यांनी सन्मानाने पाठविल्याची हकिकत प्रसिद्ध आहे.
चिमाजी आप्पा यांची पहिली पत्नी रखमाबाई. तिच्यापासून त्यांना सदाशिव नावाचा मुलगा झाला (३ ऑगस्ट १७३०). त्यानंतर काही दिवसांतच रखमाबाईंचे निधन झाले. सदाशिवरावभाऊ यांनी पुढे पानिपतच्या तिसर्या युद्धात पराक्रम गाजविला (१७६१). अन्नपूर्णाबाई ही त्यांची दुसरी पत्नी. तिच्यापासून त्यांना बयाबाई नावाची मुलगी झाली. तिचा विवाह गंगाधर नाईक ओंकार यांच्याशी झाला.
संदर्भ :
- कांबळे, आर. एच. मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी आप्पांचे योगदान, पुणे, २०१६.
- सरदेसाई, गो. स. मराठी रियासत खंड – ३ पुण्यश्लोक शाहू, पेशवा बाळाजी विश्वनाथ, पेशवा बाजीराव, मुंबई, २०१०.
- पुरंदरे, कृ. वा. चिमाजी आप्पा, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९४८.
समीक्षक : गिरीश मांडके
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.