छत्रपती राजाराम महाराज : (२४ फेब्रुवारी १६७० – २ मार्च १७००). छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र आणि मराठेशाहीतील तिसरे छत्रपती. त्यांचा जन्म शिवपत्नी सोयराबाईंच्या पोटी राजगडावर झाला. छ. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ११ मार्च १६८९ रोजी छ. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रसंगामुळे संपूर्ण मराठी स्वराज्य हादरले. अशा कठीण प्रसंगी सारासार बुद्धीने विचार करू शकतील असे काही लोक छ. शिवाजी महाराजांनी अगोदरच मिळवून ठेवले होते. यांमध्ये रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण, प्रल्हाद निराजी, इत्यादींचा समावेश होता. या सर्व मंडळींनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला (१६८९).

मोगलांच्या आक्रमणामुळे राजाराम महाराजांना रायगड सोडून जिंजीला जावे लागले. छ. संभाजी महाराजांच्या पाडावाने औरंगजेबाला आनंद झाला असला तरी, राजाराम महाराजांना कैद न झाल्याची गोष्ट त्याला खटकत होती. त्याने दक्षिणेत उतरून आदिलशाही (१६८६) आणि कुत्बशाहीचा (१६८७) यांचा पाडाव केला. या प्रसंगानंतर तो विजापूराकडे मोगल सैन्याला प्रोत्साहन देण्यासाठी निघून गेला. त्याचा उद्देश असा होता की, उत्तरेतून येणाऱ्या मराठी सैन्याच्या वाटा अडविणे. तेथून पुढे औरंगजेबाने ब्रह्मपुरीला येऊन मराठ्यांचे गडकोट घेण्याची मोहीम सुरू केली.

छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कठीण परिस्थितीत मराठ्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राजाराम महाराज यांच्याकडे आली. यावेळी राजाराम महाराजांचे वय अवघे १९ वर्षे होते. राजाराम महाराज रायगडावरून निघून नोव्हेंबर १६८९ च्या पहिल्या आठवड्यात जिंजीला पोहोचले. तेथे पोहोचल्यावर हडबडून न जाता त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले. मराठ्यांनी जिंजीलाच राजधानी केली. जिंजीला तीन लक्ष होनांचा खजिना होता. तो मराठ्यांनी ताब्यात घेतला. महाराजांनी जिंजीला राजदरबार भरविला. त्यांनी रामचंद्रपंत अमात्यांना ‘हुकमतपन्हाʼ हा किताब दिला. संताजी आणि धनाजी यांची सेनापतीपदी नियुक्ती केली. शंकराजी नारायण, नेमाजी शिंदे, हनुमंतराव घोरपडे अशा विश्वासू माणसांना बरोबर घेऊन त्यांनी जिंजीवरून राज्यकारभारास सुरुवात केली.

जिंजी हा बलाढ्य दुर्ग जिंकून घेण्याची जबाबदारी झुल्फिकारखानावर होती. राजाराम महाराजांना पराभूत करण्यासाठी तो बलाढ्य फौज घेऊन जिंजीला आला आणि किल्ल्याला वेढा दिला. हा वेढा सलग आठ वर्षे चालू होता. राजाराम महाराजांनी झुल्फिकारखानाला अधूनमधून तहाची बोलणी करून झुलवत ठेवले आणि हा वेढा यशस्वीपणे हाताळला. राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली ३०-३५ हजार मराठे सैन्य जमा झाले. हे सैन्य संताजी आणि धनाजी यांच्यामध्ये विभागले गेले आणि पुन्हा मोगलांविरुद्ध लढ्यास सुरुवात झाली. संताजी आणि धनाजी यांनी या वेढ्यात मोगली अधिकाऱ्यांना जेरीस आणले.

मोगल सरदार रुस्तुमखान साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला जिंकण्याच्या प्रयत्नात होता. तेव्हा राजाराम महाराजांनी रुस्तुमखानाकडे कुमक कमी असल्याची संधी ओळखून संताजी आणि धनाजी यांना खानाच्या विरुद्ध पाठविले. मराठ्यांनी खानाचा पराभव केला (२५ जानेवारी १६९०). या लढाईत मराठ्यांना ४००० घोडी मिळाली, तर खानाकडून त्यांनी एक लक्ष होन दंड वसूल केला. रुस्तुमखानावरील विजयामुळे मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला. जीवनमरणाच्या या संघर्षामध्ये मराठ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना पाठबळ देणे हेच मुख्य काम राजाराम महाराजांना करावयाचे होते. छत्रपती म्हणजे प्रजेचा पिता, रक्षणकर्ता या नात्याने त्यांनी हे काम अचूकरीत्या केले. येथून पुढे मराठ्यांच्या लढ्याचे लोकलढ्यात रूपांतर झाले. मराठ्यांनी रौद्र रूप धारण केल्याने पुढे मोगलांची बिकट अवस्था झाली.

औरंगजेबाने आदिलशाही आणि कुत्बशाही संपविल्यानंतर त्याची १६८९ ते १६९१ ही तीन वर्षे विजापूर आणि गोवळकोंडा या प्रदेशाचा ताबा घेण्यात गेली. या कालावधीत मराठ्यांना मोठी संधी निर्माण झाली. गनिमीकाव्याने युद्ध करणारे मराठे नंतर खुल्या मैदानावर लढाया जिंकू लागले. १६९५ पासून औरंगजेबाला मराठ्यांच्या या उग्र रूपाची कल्पना येऊ लागली.

झुल्फिकारखानाने वेढा दिल्यामुळे राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात अडकून पडले होते. जिंजी जिंकण्यासाठी औरंगजेबाने ज्यादाची कुमक, तोफा आणि दारूगोळा पाठवून दिला. जिंजीला वेढा देणाऱ्या झुल्फिकारखानास गोवळकोंड्याचे राज्य मिळविण्याची सुप्त महत्त्वाकांक्षा होती. तो वजीर असदखानाचा मुलगा होता. राजाराम महाराजांनी त्याला गोवळकोंड्याचे राज्य मिळवून देतो, असे सांगत जिंजीच्या वेढ्यात ७-८ वर्षे काढली. जिंजीचा वेढा हे केवळ नाटक आहे, ही गोष्ट सर्वांना माहीत झाली होती. राजाराम महाराजांनी राज्य मिळवून देण्याचे असेच अमिष कामबक्ष याला दाखविले होते. महाराजांनी थेट कामबक्षला पत्र लिहिले आणि त्याला सांगितले की, तुला दिल्लीच्या तख्तावर बसवितो. या अमिषाला बळी पडून कामबक्ष याने असदखान आणि झुल्फिकारखान यांना कैद करण्याची योजना आखली. त्यामुळे मोगल सैन्यात खूप गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याचाच फायदा घेऊन सर्व दिशांनी मराठे मोगलांवर तुटून पडले. महाराष्ट्रापासून ते जिंजी-तंजावरपर्यंत मुघलांना विरोध करू शकेल, असा एकमेव घटक हिंदुस्थानमध्ये शिल्लक राहिला होता, तो म्हणजे मराठे.

औरंगजेब उत्तरेकडील सरदारांकडून पैसे मागत होता, कारण मोगलांच्या सैन्याचे पगार थकले होते. एका वर्षात मोगलांकडील बरेच सैन्य, हत्ती, घोडे, उंट, खेचरे मारली जात होती. २७ वर्षे युद्धजन्य परिस्थितीमुळे १०-२० पैसे एक शेर मिळणारे धान्य १ ते २ रुपये शेर या दराने विकले जात होते. मोगल-मराठा संघर्षाचे हे स्वरूप साधनसामग्री आणि सहनशक्ती यांची परीक्षा होती. सर्व मोगल सैन्य या प्रदीर्घ युद्धाला कंटाळले होते. मोगलांकडे साधनसामग्री प्रचंड होती, तर मराठ्यांकडे अफाट सहनशक्ती होती. शेवटी सहनशक्तीने साधनसामग्रीवर विजय मिळविला. अशा भयंकर परिस्थितीमध्ये मराठा सैनिकांच्या कुटुंबाचे संरक्षण करणे आवश्यक होते. ही जबाबदारी रामचंद्रपंत अमात्यांनी अचूकरीत्या बजाविली. बहुतांश मराठी कुटुंबियांना त्यांनी विशाळगडाच्या परिसरात आणि सह्याद्रीच्या खाली कोकणात सुरक्षित ठेवले. इकडे संताजी आणि धनाजी यांनी मिळून कासीमखान, अलीमर्दानखान, इस्माईलखान, खानजादाखान, हिम्मतखान अशा मोगलांच्या अनेक नामवंत सरदारांचा पराभव करून त्यांना कैद केले. कासीमखान आणि हिम्मतखान हे मोगलांचे प्रथम दर्जाचे सेनानी मारले गेल्यामुळे मोगल सैन्यामध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले.

जिंजीच्या वेढ्यातून राजाराम महाराजांनी स्वतःची योग्य वेळी सुटका करून घेतली आणि ते विशाळगडाला आले. विशाळगडावरून साताऱ्याला आल्यावर त्यांनी भविष्यातील मोहिमांची दिशा ठरविली. वऱ्हाड आणि खानदेशवर हल्ले चढवावयाचे, बुऱ्हानपूरच्या उत्तरेला माळव्यात हल्ले करावयाचे म्हणजे मोगल सैन्य उत्तरेत निघून जाईल, असे नियोजन करण्यात आले; तथापि राजाराम महाराजांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाला. त्यामुळे वर उल्लेखलेली योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. ब्रिटिश लायब्ररी, लंडन येथे मॅकेन्झी संग्रहात रामचंद्रपंत अमात्यांची दोन पत्रे आहेत. ही पत्रे १६९७ सालातील असून त्यातील एक राजाराम महाराजांना, तर दुसरे पत्र प्रल्हाद निराजींना लिहिलेले आहे. वरील योजनेस या पत्रांमधून दुजोरा  मिळतो.

राजाराम महाराजांचे मोठेपण त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमधून दिसून येते. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे सत्तेचे योग्य विकेंद्रीकरण होय. मोगल साम्राज्याचे पतन होण्याचे एक कारण म्हणजे औरंगजेबाच्या हातामध्ये झालेले सत्तेचे अतिकेंद्रीकरण. लोक टिकविण्यासाठी राजाराम महाराजांना नवीन वतने द्यावी लागली. मराठा सेनापतींना ‘हुकुमतपन्हा‘, ‘वजारतमाब’, ‘हिम्मतबहादुर’ असे किताब दिले, सरदारांना सरंजाम दिले, जहागिऱ्या दिल्या. एका परिपक्व आणि कसलेल्या राजाने जे कर्तव्य पार पाडायला हवे होते, ते राजाराम महाराजांनी पार पाडले.

राजाराम महाराजांच्या पत्रावर उमटविलेल्या दोन मुद्रा मिळतात. या दोन्ही मुद्रा संस्कृतमध्ये असून त्यामध्ये पुढील श्लोक आहे :

श्री प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णूविश्ववंदिता

शिवसुनोरिय मुद्रा राजारामस्य राजते

अर्थ : प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी उत्तरोत्तर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण होऊन सकळ विश्वाला वंद्य होणारी शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांची ही मुद्रा लोककल्याणार्थ विराजत आहे.

श्री धर्म प्रद्योतिता शेषवर्ण दाशरथेरिव

राजारामस्य मुद्रेय विश्ववंद्या विराजते

अर्थ : धर्माला उत्तेजन किंवा प्रोत्साहन देणारी दशरथ पुत्र श्रीरामाप्रमाणे संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी राजाराम छत्रपतींची ही मुद्रा शोभत आहे.

संदर्भ :

  • आपटे द. वि.; दिवेकर स. म. शिवचरित्र प्रदीप, पुणे, २०१० (आवृत्ती).
  • पगडी, सेतुमाधवराव, हिंदवी स्वराज्य आणि मोगल, हैदराबाद, २०१० (आवृत्ती).
  • भारत इतिहास संशोधक मंडळ, संपा. शिवचरित्र साहित्य, खंड : १ ते १४, पुणे.
  • वाकसकर, वि. स. संपा. सभासद बखर, पुणे, १९६२.
  • सरकार, सर जदुनाथ, संपा. ईश्वरदास नागरकृत फुतुहात-इ-आलमगिरी, बडोदा, १९९५.
  • सरकार, सर जदुनाथ, ए शॉर्ट हिस्टरी ऑफ औरंगजेब, हैदराबाद, २०११ (आवृत्ती).
  • सरकार, सर जदुनाथ, संपा. साकी मुस्तैदखानकृत मासीर-इ-आलमगिरी, कोलकाता, १९४७.
  • सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, खंड : १ व २, मुंबई, २०१२ (आवृत्ती).

                                                                                                                                                                               समीक्षक : गिरीश मांडके