पाण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अभाव असणाऱ्या ठिकाणी वाढू शकणाऱ्या वनस्पतींना मरुवनस्पती म्हणतात. या वनस्पती खडकाळ जागी, वाळवंटी प्रदेश, मरुस्थळे, समुद्रकिनारे, खाजण तसेच आल्प्स प्रदेश आणि आर्क्टिक प्रदेश अशा ठिकाणी वाढलेल्या दिसून येतात. उपलब्ध झालेले पाणी शोषून घेणे, पाणी साठविणे, पाणी काटकसरीने वापरणे तसेच पाणी शरीराबाहेर न जाऊ देणे यांसाठी मरुवनस्पतींची मुळे, खोड आणि पाने या अवयवांमध्ये अनुकूलन व रूपांतर घडून आलेले असते. ज्या ठिकाणी वर्षातील बराच काळ पाण्याचे दुर्भिक्ष्य असते अशा ठिकाणी एखाद्या वृक्षाच्या सालीवर वाढणाऱ्या शैवाकांनाही पाण्याचा अभाव जाणवतो. त्यामुळे त्यांच्यातही मरुवनस्पतींसारखी लक्षणे आढळतात. मरुवनस्पतींचे सामान्यपणे दोन प्रकार असून त्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
अल्पायुषी मरुवनस्पती : ज्या कालावधीत पाणी उपलब्ध होते, त्या कालावधीत अशा प्रकारच्या मरुवनस्पतींचे जीवनचक्र पूर्ण होते. जेव्हा पाणी उपलब्ध नसते तेव्हा या वनस्पती फक्त बीजुक रूपात किंवा बीजरूपात असतात. उदा., काही गवते, नेचे, ऑर्किडे इत्यादी.
दीर्घायुषी मरुवनस्पती : या वनस्पती एका वृद्धिमोसमापेक्षा जास्त काळ जगतात. त्यांच्या जीवनचक्रामध्ये पाणी उपलब्ध नसणे आणि पाणी उपलब्ध असणे, असे दोन्ही काळ येऊ शकतात. उदा. पाइन, सायकस. त्यांचे मांसल वनस्पती आणि शुष्क वनस्पती असे दोन प्रकार आहेत.
मांसल वनस्पती : या बहुवर्षायू वनस्पती पाणी उपलब्ध असते तेव्हा ते शोषून घेतात आणि मुळे, खोड व पाने यांत साठवून ठेवतात. त्यामुळे त्यांचे अवयव मांसल बनतात. त्यांना रसाळमुळी, रसाळखोडी किंवा रसाळपर्णी अशी नावे आहेत. (१) रसाळमुळी : या वनस्पतींच्या मुळांमध्ये अन्न आणि पाणी साठविलेले असल्यामुळे मुळे मांसल असतात. उदा., आंबुटी, बीट, गाजर, पेलारगोनियम प्रजातीमधील वनस्पती इत्यादी. (२) रसाळखोडी : या वनस्पतींच्या खोडांमध्ये पाणी साठविल्यामुळे खोड फुगीर व मांसल असते. उदा., कॅक्टेसी कुलाच्या एकिनोकॅक्टस प्रजाती, मॅमिलॅरिया प्रजाती, यूफोर्बिया प्रजाती इ.मधील निवडुंग. (३) रसाळपर्णी : या वनस्पतींच्या पानांमध्ये पाणी साठविल्यामुळे पाने रसाळ व जाड असतात. उदा., पानफुटी, कोरफड तसेच कॉटिलेडॉन प्रजाती, एओनियम प्रजाती, सेडम प्रजाती इत्यादी.
शुष्क (रसहीन) वनस्पती : या वनस्पती रसाळ नसतात. मात्र तरीही या वनस्पती पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना तग धरू शकतात किंवा तग धरून राहतात. या वनस्पतींची मुळे जमिनीत खूप खोलवर जातात व पाणी शोषून घेतात. उदा., रुई, लसूणघास, कॅलिगोनम प्रजातीमधील वनस्पती.
मरुवनस्पतींमध्ये बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच उष्णतेपासून बचाव होण्यासाठी अनुकूलन घडून आलेले असते. बाष्पोत्सर्जन मुख्यत्वे पानांतून होत असल्यामुळे मरुवनस्पतींच्या काही जातींमध्ये पाने लहान असतात किंवा त्यांचा पृष्ठभाग कमी आकारमानाचा असतो. काहींच्या पानांच्या पृष्ठभागावर मेण, रेझीन, चूर्णीय कण किंवा लव यांचे आवरण असते. काही मरुवनस्पतींमध्ये पानांच्या खालच्या पृष्ठभागावरची पर्णरंध्रे अरुंद व खोलवर असतात. उदा., पाइन, सायकस. काही मरुवनस्पतींमध्ये पर्णरंध्रे दिवसा बंद राहतात आणि रात्री उघडतात. अशा वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक असलेला कार्बन डायऑक्साइड घेऊन तो साठविला जातो. उदा., पानफुटी.
काही मरुवनस्पतींमध्ये पाने साधी असण्याऐवजी संयुक्त असतात. तसेच पर्णिका लहान असतात. उदा., बाभूळ. काही वनस्पतींमध्ये पानांचे किंवा त्यांच्या काही भागांचे रूपांतरण काट्यांमध्ये झालेले असते. उदा., निवडुंग, बाभूळ. अशा वनस्पतींमध्ये काट्यांमुळे बाष्पोत्सर्जन कमी होते. तसेच चरणाऱ्या प्राण्यांपासून त्यांना संरक्षण मिळते.