छत्तीसगढच्या बिलासपूर जिल्ह्यातील एक प्राचीन स्थळ. ते बिलासपूर शहरापासून ३२ किमी. आग्नेय दिशेस वसले आहे. भौगोलिक दृष्ट्या मल्हार मोक्याच्या ठिकाणी स्थित असून ते अर्पा, लीलानगर आणि शिवनाथा या तीन नद्यांनी अनुक्रमे पश्चिम, पूर्व आणि दक्षिणेकडून वेढलेले आहे.
उत्तरेकडील कौशाम्बी कडून येणारा भरहूत-बांधवगड-अमरकंटक हा व्यापारी मार्ग मल्हार मार्गे आग्नेयेकडील पुरी येथे जात होता. हे स्थळ प्राचीन भारताच्या चेदी या जनपद अंतर्गत येत असून दक्षिण-कोसल क्षेत्रातील महत्त्वाचे स्थळ होते. कलचुरी नरेश पृथ्वीदेव द्वितीय याच्या इ. स. ११६३ च्या मल्हार शिलालेखात या स्थळाचा उल्लेख ‘मल्लालʼ या नावाने आढळतो. ११६७ च्या अन्य कलचुरी अभिलेखात या स्थळाला ‘मल्लालपट्टणʼ म्हणून संबोधले आहे. के. डी. बाजपेयी यांच्या मते, मल्लाल या शब्दाची उत्पत्ती पुराणात उल्लेखित मल्लारी या शिवाच्या नावापासून झाली असावी. शिवाने मल्लारी या राक्षसाचा वध करून हे नाव धारण केले होते.
मल्हार हे स्थळ तटबंदीने वेढलेले असून सभोवताल खंदकांची रचना होती. सन १९६०-७० च्या दशकात मल्हार परिसरातील सर्वेक्षणामध्ये मौर्य काळातील खापरे, नाणी, सातवाहन राज्यकर्त्यांचे मुद्रांक आणि मुद्रा, नाणी तसेच गुप्त काळातील मंदिरे, शिल्पे, पुरावशेष आणि मध्ययुगातील पुरावशेष विपुल प्रमाणात मिळाले होते. मल्हार येथून प्राप्त प्राकृत भाषा व मौर्यकालीन ब्राह्मी लिपीतील लेख असलेली प्राचीन विष्णू (हरिहर) प्रतिमा (इ. स. पू. दुसरे शतक) आणि विशाल यक्ष प्रतिमा (इ. स. पहिले शतक) विशेष उल्लेखनीय आहेत. या पुरास्थळाचे महत्त्व ओळखून सागर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागातर्फे सन १९७४-७५ मध्ये के. डी. बाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली मर्यादित स्वरूपाचे उत्खनन करण्यात आले. यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, नागपूर उत्खनन शाखेच्या वतीने सन २००९ ते २०११ मध्ये पुन्हा विस्तृत उत्खनन करण्यात आले. उत्खननामध्ये खालीलप्रमाणे कालक्रम मिळाला आहे :
प्रथम कालखंड (मौर्य-पूर्व) : उत्खननाच्या या सर्वांत खालच्या स्तरात लाल रंगाची, खडबडीत लाल रंगाची, लेपयुक्त लाल रंगाची, काळ्या-आणि-तांबड्या रंगाची इ. खापरांची विविध आकाराची वाडगे, मडकी, रांजण, कढई, थाळ्या इ. भांडी मिळाली. या स्तराच्या मर्यादित उत्खननामुळे या कालखंडातील लोकांच्या घरांबद्दल काही समजू शकले नाही.
द्वितीय कालखंड (मौर्य-शुंग काळ) : या कालखंडामध्येही लाल रंगाची, खडबडीत लाल रंगाची, लेपयुक्त लाल रंगाची इ. मौर्य-पूर्व काळातील खापरे प्राप्त झाली. काळ्या-आणि-तांबड्या रंगाच्या खापरांच्या ऐवजी काळी चकाकीयुक्त खापरे मोठ्या प्रमाणात मिळाली होती, ज्यामध्ये वाडगे आणि थाळ्या प्रामुख्याने प्राप्त झाल्या. या कालखंडातील महत्त्वपूर्ण पुरावशेषांमध्ये उत्कृष्ट अलंकरण असलेले दगडी तबक (Plaque), सुंदर अलंकरण आणि चकाकी असलेली कर्णकुंडले, मौर्य काळातील चकाकी असलेली दगडी अवशेष, अर्धमौल्यवान दगडी मणी, काचेचे मणी, तांब्यांची नाणी, मृण्मय शिल्पे, मातीचे मुद्रांक यांचा समावेश करता येईल. तसेच विटा आणि दगडांनी निर्मित चौकोनी आणि आयताकृती घरांचे अवशेष प्राप्त झाले असून धान्य साठवण्याकरिता दोन वर्तुळाकार आकारातील कोठारांचे अवशेष विशेष उल्लेखनीय आहेत.
तृतीय कालखंड (गुप्त-पूर्व काळ) : या कालखंडामध्ये मल्हारच्या सांस्कृतिक रचनेत बदल दिसून येतो. घरांचा आकार मोठा होऊन घरांत अनेक खोल्या, छताचे कवेलू, नाल्या इ. मिळाले आहेत. घरांकरिता जमीन खोदून दगडांचा थर आणि त्यावर काळी माती, दगड आणि मुरुमांचा भक्कम थर टाकून घरांचा पाया मजबूत केल्याचे प्रमाण मिळाले आहेत. मोकळे अंगण असलेले सातवाहन काळातील दोन खोल्यांचे विटांचे घर विशेष उल्लेखनीय आहे. विटांचे १.६० मी. आकाराचे चौकोनी कुंड मिळाले आहे. या कुंडाचे पाच थर असून ते खालून वर निमुळते होत गेले आहे, याचा उपयोग धार्मिक प्रयोजनाकरिता होत असावा. मोठ्या आकाराचे रांजण या स्तरातील वैशिष्ट्यपूर्ण अवशेष आहेत. लाल रंगाची, लाल रंगाची खडबडीत, लेपयुक्त लाल रंगाची, लेपयुक्त काळ्या रंगाची आणि काळ्या-आणि-तांबड्या रंगाची इ. खापरे या कालखंडात वापरात असून यांचे वाडगे, मोठाली मडकी, रांजण, हंडी, झाकणी, थाळ्या, तोटीयुक्त भांडी इ. मिळाले. सातवाहन राजा वाशिष्ठिपुत्र पुळुमावी याचे नाणे, अर्धमौल्यवान दगडी मणी, मृण्मय मणी, हस्तिदंताचे पासे, लोखंडी वस्तू आणि अनेक मृण्मय मुद्रांक महत्त्वपूर्ण आहेत. सातवाहन काळातील ब्राह्मी लिपीतील ‘युवराजस्य वाशिष्ठिपुत्रस्य गुतलाशीयʼ नमूद मुद्रांक विशेष उल्लेखनीय आहे.
चतुर्थ कालखंड (गुप्त-वाकाटक काळ) : ब्राह्मी लिपीतील गुप्त काळाची मुद्रा आणि पेटिकाशीर्षक ब्राह्मी लिपीतील वाकाटक काळाची मुद्रा या स्तरात प्राप्त झाल्या. विटा आणि दगडांनी निर्मित घरांचे अवशेष मिळाले असून, घरे आकाराने लहान आणि प्रामुख्याने एका खोलीची आहेत. या स्तरात लाल रंगाची, लाल रंगाची खडबडीत, राखडी रंगाची आणि काळ्या-आणि-तांबड्या रंगाची खापरे मिळाली असून यात मोठे रांजण, मडकी, वाडगे, हंडी इ. भांड्याचे तुकडे मिळाले आहेत. ठप्पा असलेली खापरे मोठ्या प्रमाणात प्राप्त झाली असून चंद्र, स्वस्तिक, तारे, पुष्प, त्रिरत्न आणि भूमितीय चिन्हे प्रामुख्याने आढळतात. अर्धमौल्यवान दगडी मणी, काचेचे मणी, मृण्मय मणी, धार्मिक अंकन असलेली अलंकृत दगडी फळी, रोमन चांदीची नाणी, तांब्याची नाणी, मृण्मय मुद्रांक, लोखंडी खिळे, विळे, बाणाग्रे, चाकू इ. प्रमुख पुरावशेष आहेत.
पाचवा कालखंड (गुप्तोत्तर कालखंड) : या कालखंडाचे मर्यादित स्वरूपाचे प्रमाण मिळाले आहेत. या काळातील लोकांची घरे हे गुप्त-वाकाटक काळातील लोकांनी वापरलेल्या विटा आणि विटांच्या तुकड्यापासून निर्मित होती. लाल रंगाची खडबडीत, लाल रंगाची, ठप्पा असलेली खापरे, लोखंडी वस्तू, मृण्मय आणि अर्धमौल्यवान मणी मिळाले आहेत.
मल्हारच्या तटबंदीचे आणि खंदकाचे निर्माण कार्य मौर्य-शुंग काळात सुरू झाले होते. सातवाहन आणि गुप्त-वाकाटक कालखंडात खंदकाचा विस्तार करण्यात येऊन तटबंदीची उंची वाढविण्यात आली.
निष्कर्ष : मल्हार हे दक्षिण-कोसल मधील महत्त्वपूर्ण स्थळ असून, या उत्खननाने छत्तीसगढच्या प्राचीन इतिहासातील अनेक पैलू दृष्टीक्षेपात आणले आहेत. या उत्खननामुळे महाजनपद काळापासून ते कलचुरी कालखंडापर्यंत मल्हारचा क्रमिक विकास प्राप्त झाला असून कालपरत्वे होणारे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक बदल यांची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. मल्हार येथे मोठ्या प्रमाणात मृण्मय मुद्रांक प्राप्त झाले असून यावर ब्राह्मी लिपीत मल्हारचे चिन्ह ‘मʼ असलेले मुद्रांक मोठ्या प्रमाणावर मिळाले आहेत. याच प्रकारची चिन्हे मल्हार येथील क्षेत्रीय नाण्यांवरही प्राप्त झाल्याने या स्थळाची तत्कालीन विशेषता आणि महत्त्व लक्षात येते.
संदर्भ :
- Bajpai, K. D. ‘Excavations at Malhar: A Historical Site of Madhya Pradeshʼ, Proceedings of the Indian History Congress, Vol. 36 (1975), pp.63-67, 1975.
- Indian Archaeology A Review: 2009-10, Archaeological Survey of India, New Delhi, pp. 2-10.
- Indian Archaeology A Review: 2010-11, Archaeological Survey of India, New Delhi, pp. 5-7.
- Gupta, Chandrashekhar, ‘Two Terracotta Sealings from Mallar (Malhar), District Bilaspur, Chhattisgarhʼ, Heritage: Journal of Multidisciplinary Studies in Archaeology, 6, pp. 831‐837, 2018.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर