पुणे जिल्ह्यातील एक पुरातात्त्विक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थळ. महाराष्ट्रातील प्राचीन राजवंश सातवाहन यांच्या काळातील एक मुख्य ठिकाण, तसेच छ. शिवाजी महाराज यांचे जुन्नरजवळील शिवनेरी येथील जन्मस्थळ यांमुळे जुन्नर हे स्थळ प्रसिद्ध आहे. मानवी वास्तव्याचे पुरावे या परिसरात अश्मयुगापासून (बोरी) प्राप्त होतात. जुन्नर परिसरातील अग्निजन्य खडकात इ. स. पू. पहिल्या शतकात खोदलेली हीनयान पंथाची साधारणतः २५० बौद्ध चैत्यगृहे, विहार आणि लेणी आहेत. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजामशाही आणि आदिलशाही, मराठा आणि पेशवे काळापर्यंत जुन्नर हे आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते.
जुन्नर हे भारतीय-रोमन व्यापारी काळात कोकण आणि देश यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून कल्याण-पैठण-तेर आणि भृगुकच्छ-पैठण-तेर या मुख्य व्यापारी मार्गावर स्थित होते. सातवाहन काळात पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल मुंबईजवळील सोपारा या बंदरांत येत असून या मालाची वाहतूक विशेषकरून नाणेघाट खिंडीतून जुन्नर मार्गे देशावर होत असे. सोपारा व कल्याण येथून देशावर येण्यास नाणेघाट हा अगदी जवळचा आणि सोपा मार्ग होता.
भौगोलिक दृष्ट्या जुन्नर हे सपाट विस्तीर्ण क्षेत्र असून सह्यादी पर्वतरांगेपासून २५ किमी. पूर्वेस आहे. कुकडी, मीना आणि पुषावती या तीन प्रमुख नद्या असून पांढरीचे टेकाड कुकडी नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. जुन्नर येथील पांढरीचे टेकाड क्षेत्र साधारणतः २० हेक्टर क्षेत्रांत पसरलेले आहे. या प्राचीन स्थळाचे सर्वप्रथम उत्खनन महाराष्ट्र शासनाच्या, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने १९८४ मध्ये करण्यात आले. तदनंतर २००५ ते २००८ या तीन सत्रांत डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ), पुणे येथील पुरातत्त्वज्ञांनी उत्खनन केले.
या उत्खननामध्ये सर्वांत खाली सातवाहन-पूर्व काळात वस्ती असल्याचे संकेत मिळाले आहेत. जुन्नर या स्थळाचा सर्वांगीण विकास सातवाहन काळातील स्तरामध्ये दिसून येतो. या कालखंडाला दोन टप्प्यांत विभाजित केले आहे. जुन्नरच्या वरच्या स्तरांत मध्ययुगीन ते मराठा काळाचे पुरावे मिळाले आहेत. परंतु वर्तमान काळातील मानवी वस्ती आणि इतर खोदकामांमुळे या स्तरांचे अवशेष जवळपास नष्ट झाले आहेत.
जुन्नरच्या इतिहासात सातवाहन कालखंड विशेष महत्त्वाचा असून पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट भाजणीची काळ्या-आणि-तांबड्या रंगाची, लाल लेप असलेली आणि उत्तरेकडील काळी झिलईदार खापरे मिळाली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात सातवाहन काळाची वैशिष्ट्यपूर्ण लाल रंगाची, लाल चकाकीयुक्त, काळी चकाकीयुक्त, राखाडी रंगाची यांशिवाय हिरव्या रंगाची चकाकी असलेली खापरे आणि अंफोरा प्रकारची मृद्भांडी मिळाली आहेत. पुरावशेषांमध्ये अर्धमौल्यवान दगडी, मृण्मय, शंख आणि विविध धातूंचे मणी, मातीचे शिल्पावशेष, बांगड्या, कर्ण-कुंडले, पदके, काचेचे मणी आणि बांगड्या, लोखंडी अवजारे, पाटे-वरवंटे प्रमुख आहेत. काही मृण्मय शिल्पांमध्ये रोमन प्रभाव दृष्टीगोचर होतो. उत्खननामध्ये ऐतिहासिक काळातील सातवाहन आणि क्षत्रपांची नाणी, मध्ययुगातील बहमनी, गुजरातच्या सुलतानाची, निजामशाही, मराठा कालखंडातील शिवराई आणि ब्रिटिश काळातील इ. नाणी प्राप्त झाली. सातवाहन काळात गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर इ. पाळीव प्राणी आणि काळवीट, मृग, ससा आणि डुक्कर इ. जंगली प्राण्याची हाडे मिळाली असून धान्यांमध्ये गहू, तांदूळ, मूग, मसूर, उडीद डाळ, चना इ. पुरावे प्राप्त झाले आहेत.
उत्खननात सातवाहन काळातील घरांचे आणि वर्तुळाकार विहिरींचे अवशेष मिळाले आहेत. घरबांधणीकरिता भाजल्या विटांच्या उपयोग होत असून भिंतीवर मातीचा गिलावा केला जात असे. घराच्या आतील जमीन चुना आणि मातीने सारवून तयार केल्या जात असत. सातवाहन काळातील खापरे आणि पुरावशेषांच्या आधारे हा कालखंड इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. दुसरे शतक इतका निर्धारित केला आहे. उत्खननात प्राप्त अंफोरा प्रकारची, हिरव्या रंगाची चकाकी असलेली आणि चिनी खापरांवरून जुन्नरचे यूरोपातील रोम, फारसचे आखात आणि चीनसोबत व्यापारिक संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.
संदर्भ :
- Jhadhav, S. S. ‘A Preliminary Report of Excavations at Satvahana Site of Junnar, District Pune, Maharashtraʼ, Man and Environment, XXXI (1), pp. 108-113, 2006.
- Shinde, Vasant; Jhadhav, Shreekant; Shirvalkar, Prabodh; Kulkarni, Amol; Dandekar, Abhijit; Ganvir, Shrikant; Joglekar, P. P.; Mandke, Girish; Deshpande-Mukherjee, Arti; Deo, Shushma G.; Rajguru, S. N.; Kajale, M. D. & Naik, Satish, ‘A Report on the Recent Archaeological Investigations at Junnar, Maharashtraʼ, Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, Vol. 66/67, pp. 113-159, 2006-07.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर