साधारणपणे १९७० च्या दशकापासून मेंदूविषयक संशोधने अधिक प्रमाणात होऊ लागली. १९८० च्या दशकापासून त्यांना वेग येऊ लागला. १९९० चे दशक तर ‘मेंदू संशोधनांचे दशक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. या संशोधनांतून मेंदूची अंतर्गत रचना, मेंदूची कार्ये आणि ही कार्ये कशी घडून येतात, यांबाबत वाढत्या प्रमाणात स्पष्टता येऊ लागली. या संशोधनातील स्पष्ट अशा निष्कर्षांचा संदर्भ घेऊन, त्यांचा मुलांच्या-माणसांच्या शिक्षणाशी असलेला संबंध बांधण्याचा सुरुवातीच्या काळातील पहिला प्रयत्न लेस्ली हार्ट यांनी आपल्या १९८३ मधील ह्यूमन ब्रेन अँड ह्यूमन लर्निंग या ग्रंथाद्वारे केला. या ग्रंथावर अनेक उलटसुलट चर्चा झाल्या असल्या, तरी या ग्रंथाच्या आशयाचे महत्त्व आजही टिकून राहिले आहे.
लेस्ली हार्ट यांनी आपल्या या ग्रंथात मेंदू व शिकणे या संबधाबाबत तीन संकल्पना मांडल्या आहेत.
- मेंदूआधारित शिक्षण : मानवी मेंदूचे जे काही शास्त्रीय तत्त्व उपलब्ध असेल, त्याचा वापर शिक्षणासाठी करून घेणे.
- मेंदूअनुरूप शिक्षण (ब्रेन कम्पेटेबल एज्युकेशन) : मानवी मेंदूचा आकार व स्वरूप यांबाबत जी काही स्पष्टता आजवर आली असेल त्याच्याशी अनुरूप, जुळणारे असे शिक्षण.
- मेंदूविरोधी शिक्षण (ब्रेन ॲन्टॅगोनिस्टिक एज्युकेशन) : मेंदू कसा असतो, याची काहीही कल्पना नसताना मुलांवर शिक्षण लादण्याचा जो प्रकार आहे त्याचा बरेचदा अनिष्ट परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो. थोडक्यात, मेंदूविषयक शास्त्रीय ज्ञानाचा अध्यापनामध्ये उपयोग करावा, मेंदूच्या नैसर्गिकतेशी मिळतेजुळते असे शिक्षण असावे, असा विचार पुढे आला.
या तीनही संकल्पना आणि विशेषतः मेंदूआधारित शिक्षणाची संकल्पना आज शिक्षणक्षेत्रात मान्यता पावत असलेली दिसते. अलीकडच्या काळात शिक्षणविषयक विचार आणि प्रत्यक्ष व्यवहारांत ही संकल्पना खूपच विस्तार पावली आहे. उदा., अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ सुझन कोवालिक यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मेंदूअनुरूप शिक्षणाचे शालेय शिक्षणातील ‘इंटिग्रेटेड थिमॅटिक इन्स्ट्रक्शन मॉडेल‘ हे प्रतिमान १९९४ मध्ये विकसित केले. याच कालावधीत रिनेट केन व जिऑफ्री केन या पती-पत्नींचे मेकिंग कनेक्शन्स हे पुस्तक १९९१ साली प्रकाशित झाले. त्यांनी त्यामध्ये मेंदूआधारित शिक्षण या संकल्पनेचा तात्विक पातळीवर, तसेच प्रत्यक्ष शैक्षणिक वातावरणाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर विस्तार करून त्याला नेटके वळण दिले. पुढे जेन हिली, रॉबर्ट सिल्वेस्टर, पॅट कोल्फ अशा अनेकांनी आणि मुख्यतः एरिक जेनसन यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्यात महत्त्वाचा हातभार लावला आहे. या प्रकारच्या तात्विक विचारांत आणि पद्धतींत आमूलाग्र बदल होत आहे. रिनेट व जिऑफ्री केन यांच्या मते, एका अर्थी सर्वच शिक्षण मेंदूआधारित असले तरी, मेंदूआधारित शिक्षण या संकल्पनेचा खरा अर्थ वेगळा आहे. या संकल्पनेत अर्थपूर्ण शिक्षणाचे मेंदूस्थित जे नियम असतात, त्यांना अनुसरून किंवा ते लक्षात घेऊन आपले शिकविण्याचे काम करणे अभिप्रेत असते. यात आपण मानवी मेंदूलाच शिकवित असतो. केन यांनी हे नियम आणि त्यांना पायाभूत असणारी मेंदूची खास वैशिष्ट्येही पुढील प्रमाणे सांगितली आहेत : (१) आकृतिबंधाचा शोध घेऊन अंदाज करण्याची क्षमता. (२) विविध प्रकारच्या स्मृतींची अफाट शक्ती. (३) बाह्य माहिती व त्यावर विचार करता येण्याची क्षमता. यांचे विश्लेषण करून स्वतःमध्ये सुधारणा करीत अनुभवांतून शिकण्याची क्षमता. (४) अपरिमित अशी निर्मिती क्षमता. मेंदूच्या या वैशिष्ट्यांमुळे मेंदूचे शिकणे घडत असते.
रिनेट व जिऑफ्री केन यांनी मेंदूआधारित शिक्षणाला सैद्धांतिक दृष्ट्या पायाभूत ठरणारी, तसेच शिक्षणातील कार्यक्रम व पद्धती ठरविण्यासाठी साहाय्यभूत ठरतील अशी बारा मेंदूविषयक तत्त्वे दिली आहेत. शिकणे आणि शिकविणे या प्रत्यक्ष शिक्षणातील दैनंदिन क्रियांसाठी ही तत्त्वे म्हणजे एक उपयुक्त चौकट आहे. ही तत्त्वे मांडताना लेखकांनी यांतील प्रत्येक तत्त्वाचे शैक्षणिक पर्यवसानही मांडले आहे. मेंदूआधारित शिक्षणासंदर्भात दिली गेलेली तत्त्वे ही शिक्षणाचा सैद्धांतिक पाया म्हणून येतात; कारण ही तत्त्वे मेंदूमधील शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेशी संबंधित आणि सिद्ध अशी तत्त्वे आहेत. ही तत्त्वे जेव्हा प्रत्यक्ष शिक्षणाच्या संदर्भात विचारात घेतली जातात, तेव्हा ती एक नवीनच प्रारूप आपल्यासमोर ठेवतात आणि हे प्रारूप पारंपरिक, वर्तनवादी मानसशास्त्रावर आधारलेल्या शिक्षककेंद्री शिक्षणापेक्षा वेगळ्या विद्यार्थीकेंद्री, रचनावादी शिक्षणपद्धतीकडे आपल्याला घेऊन जाते. ही तत्त्वे आपल्याला माहिती, घोकमपट्टीने साठविण्याच्या शिक्षणपद्धतीकडून अर्थपूर्ण शिकण्याकडे आणि विद्यार्थ्यांच्या स्वयंशिक्षणाकडे नेणारी आहेत.
केन पती-पत्नींनी शिक्षण व्यवहारासंबंधीचा एक मेंदूआधारित शिक्षणाचा हेतू सांगितला आहे. तो म्हणजे, माहिती साठविण्याच्या शिक्षणाकडून अर्थपूर्ण शिकण्याकडे जाण्याचा आणि त्यासाठी अन्योन्य क्रिया करणाऱ्या तीन घटकांची उपस्थिती आवश्यक मानली आहे.
(१) चिंतामुक्त कार्यदक्षता (रिलॅक्स्ड अलर्टनेस) : ही एक मनाची अशी अवस्था मानली आहे की, यात मेंदूच्या कार्यांशी म्हणजे अर्थपूर्णतेचा शोध घेणे अथवा आव्हाने घेणे याच्याशी, मनाची एकतानता होते. शिकणाऱ्या मुलांच्या बाबतींत अशी मनोवस्था केव्हा होते, जेव्हा मुलांना भीती, धमकी यांपासून सुरक्षित असे वातावरण मिळते व त्याच वेळी शिकण्याची नवनवीन आव्हाने उपलब्ध होतात; यातून मुले कार्यमग्न होतात.
(२) क्षमतावृंद कार्यमग्नता (ऑर्किस्ट्रेट इम्मर्शन) : एखाद्या अनुभवात विद्यार्थी बुडून जातो, सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर करून सर्वांगाने अनुभव घेतो, तेव्हा तो खरा कार्यमग्नतेचा अनुभव घेतो. शिक्षक अशा तऱ्हेच्या अनुभवांसाठी विद्यार्थ्याला प्रेरित करू शकतो किंवा संधी प्राप्त करून देऊ शकतो. अशा वेळी साहजिकच शिक्षणाचा दर्जा उंचावतो.
(३) कृतिशील प्रक्रिया (ॲक्टिव प्रोसेसिंग) : विद्यार्थी जेव्हा एखाद्या अनुभवात प्रत्यक्ष भाग घेत असतो, त्यासाठी करावयाच्या कृतीत दंग असतो, तेव्हा संकल्पना नेमकेपणाने समजण्यास मदत होते. स्वतः कृती करणे, स्वतः त्यावर विचार करणे, स्वतःच्या जबाबदारीने अनुभव घेणे इत्यादींमुळे विद्यार्थी पूर्णांशाने ज्ञान आत्मसात करतात.
विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकातील रिनेट व जिऑफ्री केन यांच्या मेकिंग कनेक्शन्स (१९९१ – १९९४) आणि एज्युकेशन ऑन द एज ऑफ पॉसिबिलिटी (१९९७) या ग्रंथातील मेंदूआधारित शिक्षण या संकल्पनेच्या सविस्तर मांडणीनंतर २००८ मध्ये एरिक जेनसेन यांनी आपल्या ग्रंथातून मेंदूविषयक नवसंशोधनांच्या आधारे मेंदूआधारित संकल्पनेची नव्याने मांडणी केली आहे. जीवशास्त्र, मज्जाशास्त्र, मानसशास्त्र, मानसोपचारशास्त्र, मज्जासमाजशास्त्र अशा शास्त्रांमधील संशोधनांच्या आधारे एरिक जेनसेन एकीकडे मेंदू आणि दुसरीकडे शिकणे यांच्या संबंधांकडे नव्याने दृष्टी वळवतात. मुख्यतः शिकविण्याविषयी मार्गदर्शन करतात.
मेंदूआधारित शिक्षण या संकल्पनेची नव्याने, परंतु अतिशय सोपी व्याख्या जेनसेन करतात. त्यांच्या मते, ‘मेंदू ज्या नैसर्गिक पद्धतीने शिकण्यासाठी निर्माण झाला आहे, त्या पद्धतीला अनुसरून शिकणे, म्हणजे मेंदूआधारित शिक्षण होय’. त्यांच्या मते, ही संकल्पना आंतरविद्याशाखीय अशी आहे; कारण यामध्ये केवळ मज्जाशास्त्रच नव्हे, तर रसायनशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, जनुकशास्त्र, जीवशास्त्र, संगणकीय मज्जाजीवशास्त्र अशा अनेक शास्त्रांतून ‘मेंदूला अनुसरून म्हणजे काय?’ याचा शोध घेतला गेला आहे. यामुळे ही संकल्पना विस्तारत गेली आहे. ‘आपल्या मनात मेंदू ठेवून शिकणे’ असे अल्प शब्दांत या संकल्पनेचे वर्णन जेनसेन करतात.
आज जगामध्ये मेंदूआधारित शिक्षण ही संकल्पना शिक्षणक्षेत्रात आणि शिक्षणविचारांत बऱ्यापैकी स्थिर झाली आहे. मन, मेंदू आणि शिक्षण या नव्या निर्माण झालेल्या शास्त्रात ही संकल्पना शिक्षणव्यवहारासाठी पायाभूत मांडली जाते. या संकल्पनेभोवती होत असलेल्या अनेक संशोधनांतून निर्माण होणारे ज्ञान प्रत्यक्ष वर्गव्यवहारांत, तसेच धोरणे ठरविण्यात उपयोगात आणले जात आहे. अनेक पाश्चात्त्य विद्यापीठांतून मेंदूआधारित शिक्षण या संकल्पनेचे पदवी व पदव्युत्तर पातळीवरचे अभ्यासक्रम चालविले जात आहेत. अनेक शास्त्रीय जर्नल्समधून नवी संशोधने, नवे वाङ्मय प्रकाशित होत आहेत. शिक्षणाला विचारांची एक बळकट आणि उपयुक्त दिशा देण्याचे कार्य मेंदूआधारित शिक्षण ही संकल्पना करीत आहे.
संदर्भ :
- Caine, Renate Nummela; Caine, Geoffrey, Education on the Edge of Possibility, 1997.
- Caine, Renate Nummela; Caine, Geoffrey, Making Connections: Teaching and the Human Brain, 1991.
- Hart, Leslie, Human Brain and Human Learning, 1983.
- Jensen, Eric, Brain Based Learning –The new Paradigm of Teaching, 2008.
समीक्षक : कविता साळुंके