लैंगिकता ही मानवी जीवनातील एक प्रबळ व विधायक शक्ती आणि प्रेरणा आहे. तिच्यातील जे चांगले, निकोप-निरोगी व वांछनीय आहे, त्याचे सम्यक ज्ञान मुलामुलींना देणे म्हणजे लैंगिक शिक्षण होय. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक आनुवांशिक प्रेरणा आहे; मात्र मानवेतर प्राण्यांमध्ये जशी नैसर्गीक लैंगिक प्रेरणा असते, तशी मानवामध्ये या प्रेरणेचे नियमन करण्याची यंत्रणा नाही. मानवांत तिचे कार्य व आविष्कार प्राण्यांप्रमाणेच पुनरुत्पादनापुरताच मर्यादित असता, तर लैंगिक शिक्षणाची गरज भासली नसती; परंतु मानव केवळ लैंगिक सुखाकरिता त्या प्रेरणेचा आविष्कार करू लागला. त्यामुळे या प्रेरणेचे नियमन करण्याकरिता लैंगिक शिक्षणाची आवश्यकता अपरिहार्य ठरली.

स्वरूप : लैंगिक शिक्षणात स्त्री-पुरुष यांच्या जननेंद्रियांची शारीरिक रचना, त्यांचे कार्य, भिन्नलिंगी व्यक्तिमत्त्वाच्या आकर्षणाचा अर्थ जाणून दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याबाबत मार्गदर्शन व जागृती निर्माण केली जाते. लैंगिक गरज भागविताना जोडीदाराची निवड करणे, लैंगिक जीवनातून निर्माण होणाऱ्या जबाबदाऱ्या आणि परिणामाची जाणीव करून देणे, लैंगिक संबंधाविषयी कर्तव्यबुद्धी विकसित करणे, गुप्तरोगांसंबंधी माहिती देऊन जागृती करणे, कुटुंबनियोजनाची महती पटवून देणे इत्यादी बाबींचा समावेश लैंगिक शिक्षणात होतो. यांशिवाय लैंगिक व्यवहाराबाबतची धार्मिक व सामाजिक नीतिबंधने यांची माहिती लैंगिक शिक्षणात अंतर्भूत असते. यांपैकी कोणती माहिती वयाच्या कोणत्या टप्प्यावर व कशा भाषेत दिली पाहिजे, ते बालविकासतज्ज्ञांच्या आणि शिक्षणतज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरविले पाहिजे.

महत्त्व : मुलामुलींना वयानुरूप आलेली ज्ञान जाण लक्षात घेऊन त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आणि झेपेल एवढेच लैंगिक शिक्षण देण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे; कारण वयात येणारी मुलेमुली गोंधळलेली असतात. त्यामुळे त्यांना वयात येत असताना व वयात आल्यानंतर अशा दोन टप्प्यांत लैंगिक शिक्षण दिल्यास ते प्रभावी ठरते. भारतामध्ये मुलेमुली पौगंडावस्थेमध्ये पदार्पण करण्याचे वय कालमानानुसार कमी होत चालले आहे. या वयात मुलीचे शरीर तयार होत असले, तरी तिचे मन एका बालिकेचेच असते. ऋतुप्राप्तीनंतरच्या काळात घ्यावयाची काळजी, जननेंद्रियाची स्वच्छता आणि शारीरिक बदलाची तसेच भिन्नलिंगी व्यक्तिमत्त्वाच्या आकर्षणाची कल्पना इत्यादींचे शिक्षण देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुले वयात येत असताना त्यांना शिश्न, शिश्नाची रचना, त्याची कार्यपद्धती, वीर्य, शारीरिक बदल, मुलींसंबंधी आकर्षण इत्यादी बाबी निसर्गनियमांचा आधार घेऊन समजावून सांगणे आवश्यक आहे. तसेच लैंगिक व्यवहाराच्या अनिष्ट व विघातक बाजूवर (उदा., व्यभिचार, गुप्तरोग, अनौरस संतती, कौमार्यावस्थेतील मातृत्व इत्यादींवर) भर न देता ती बाजू शक्यतो टाळावी. शिवाय लैंगिक व्यवहारातून येण्याऱ्या शारीरिक व मानसिक विकृती, लैंगिक अपमार्गण (पापकृत्य-Deviation), दुष्ट सामाजिक प्रभाव वगैरेंबाबत तरुणांना सावध करण्यापुरतेच महत्त्व देऊन शिक्षण दिले पाहिजे; कारण या गोष्टी त्यांना बाहेरच्या माध्यमांतून कळत असतात.

उद्देश : लैंगिक शिक्षण ही संज्ञा प्रामुख्याने कामजीवन, प्रजनन आणि गुप्तांगाबद्दल दिलेल्या माहितीकरिता वापरली जाते; मात्र त्यात केवळ शरीराच्या भागांची माहिती देणे एवढेच पुरेसे  नाही, तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांत निर्माण होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घ्यायला, भावनांच्या उताविळतेला संयमित करायला शिकविणे गरजेचे आहे. मुलांमधील लैंगिकतेसंबंधित विचार विवेकपूर्ण बनविण्याकरिता पालक, मोठी भावंडे, शाळा, विद्यालये व महाविद्यालये आणि वैद्यकीय संस्था यांच्याकडून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. लैंगिक शिक्षणामध्ये आत्यंतिक महत्त्वाची बाब म्हणजे मुलेमुली व त्यांच्या संगोपन-संस्करणास जबाबदार असलेले मातापिता, इतर प्रौढजन व अध्यापक यांच्याकडून मानवी लैंगिकतेवर उघड निखळ चर्चा व्हायला पाहिजे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांत लैंगिक शिक्षण हे प्रजनन, मासिक ऋतुचक्र, जननेंद्रियांचे आरोग्य, त्यांचे रोग (गुप्तरोग – AIDS), लैंगिक अपमार्गण इत्यादींवर केंद्रित असावे. प्रशालांमध्ये त्यात्या विषयाच्या तज्ज्ञांकडून हे शिक्षण दिले जावे व त्यात ज्ञानाच्या अचूकपणावर भर असावा. जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र वगैरे विषयांतील तज्ज्ञ माणसे, त्याचप्रमाणे डॉक्टर व परिचारिका यांचादेखील त्यात सहभाग असावा. लैंगिक शिक्षणाचा जो भाग वर्गातील पाठामध्ये अंतर्भूत करता येत नाही, त्यासाठी तज्ज्ञांची चर्चात्मक व्याख्याने आयोजित करावीत. हे सर्व शिक्षण अतांत्रिकी (Nontechnical) भाषेत करावे. त्याचप्रमाणे लैंगिक अपमार्गण, स्वैराचार यांची अनिष्टता व ते टाळण्यासाठी आवश्यक असलेली आरोग्यकारक दृढ मनोवृत्ती याचा विद्यार्थ्यांत विकास केला पाहिजे.

गरज : मानवी उत्क्रांतीपासूनच मानवाने आपल्या लैंगिक प्रेरणेचा वापर लैंगिक सुख व प्रजोत्पादनासाठी केलेला आहे. या सर्व बाबींमध्ये मानवाने स्वत:वरील नियंत्रणासाठी नीतिनियमांची निर्मिती केली. लैंगिक गरज ही नैसर्गिक व स्वाभाविक असली, तरी कामवासनेच्या अतिरेकामुळे आज सामाजिक प्रश्न भेडसावत आहे. मुलामुलींत परस्परांविषयी आकर्षण निर्माण होणे हा निसर्गनियम आहे. वाढत्या वयाबरोबर मुलांमध्ये शारीरिक, भावनिक, मानसिक बदल घडत असतात. कामोत्तेजक भावना निर्माण होतात आणि या बदलांविषयी त्यांच्यांमध्ये कुतूहल निर्माण होते. त्या अवस्थेतून त्यांना सुखरूप बाहेर पडता यावे, यासाठी लैंगिक शिक्षणाची आत्यंतिक गरज आहे.

अलीकडे युवा पिढीमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली समलैंगिक संबंध, बलात्कार, एड्स, मुलींची छेडछाड इत्यादी प्रकारचा स्वैराचार वाढताना दिसून येत असून त्यांच्या संख्येतही मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे.  त्यामुळे अशा समस्यांना तोंड देण्यासाठी युवक-युवतींमध्ये योग्य ती सामाजिक जाणीव तयार करणे, वैज्ञानिक मनोवृत्ती विकसित करणे इत्यादींकरिता लैंगिक शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून लैंगिकतेकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची मनोवृत्ती तयार झाली, तर कामवासनेच्या बाबतीत उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी निश्चितच वातावरणनिर्मिती होऊ शकते. त्याचप्रमाणे आज भोगवादी पिढी मूळ धरू लागली आहे. तिला नियंत्रित करणे सामाजिक स्थैर्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. त्यासाठी युवा पिढीमध्ये लैंगिक अंत:प्रेरणेवर स्वयंप्रेरित नियंत्रण ठेवण्याची क्षमता विकसित होईल, या दृष्टीने लैंगिक शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. जीवनातील शिस्त, आनंद कायम ठेवणे, तरुणाईचे चारित्र्यसंवर्धन, उज्ज्वल भविष्य आणि समृद्ध राष्ट्र यांसाठी लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे. लैंगिक शिक्षणाने घडून येणारी लैंगिक साक्षरता हा लैंगिक शिक्षणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

मुल्ये : भारतीय संस्कृतीमध्ये लैंगिक वर्तनासंबंधीचीही परंपरागत मूल्ये आढळतात. लैंगिक संबंध, लैंगिक भावना, लैंगिक वर्तन, संभोग यांसंबंधी उघडपणे बोलणे निषिद्ध मानले जाते. संभोगासंबंधी वाचणे, लिहिणे, बोलणे हे विकृतीचे लक्षण समजले जाते. अशा सामाजिक परिस्थितीमध्ये मुलामुलींना उघडपणे लैंगिक शिक्षण देणे हे जिकिरीचे काम आहे. तेव्हा लैंगिक शिक्षण देताना किंवा देण्याचा विचार करताना या बाबींकडेसुद्धा लक्ष देणे आवश्यक ठरते. शाळांमध्ये लैंगिक शिक्षणासाठी योग्य अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याची संधी जीवशास्त्राच्या वर्गात मिळू शकते. त्यात प्रजोत्पादनयंत्रणेचे सामान्य ज्ञान देणे, लैंगिक विषयांबाबत वैज्ञानिक मनोवृत्ती तयार करणे, लैंगिकतेबाबतच्या सामाजिक समस्यांना तोंड देण्यासाठी योग्य ती पार्श्वभूमी तयार करणे वगैरेंकडे लक्ष वेधले जाईल, अशा पद्धतीने लैंगिक शिक्षणाचे आयोजन केले पाहिजे.

काही आदिवासी जमातींमध्ये, विशेषत: गोंड (Gond) जमातीत गोटुल (Ghotul), मुंडा (Munda) जमातीत ‘गिटिओरोʼ, ओराओं (Orao) जमातीत ‘जोंख-एरपाʼ, भुइया (Bhuiya) जमातीत ‘धनगर बासʼ या नावांनी अस्तित्वात असलेली युवागृहे लैंगिक शिक्षणाच्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. या युवागृहांत ठरावीक वयानंतरची सर्व अविवाहित तरुण मुलेमुली स्वेच्छेने व मोकळ्या मनाने रात्री वास्तव्याला  येऊन परस्परांच्या स्वभावाचा परिचय करून घेतात. या ठिकाणी त्यांना लैंगिक जीवनाची व नेतृत्वाची कला व शिक्षण मिळविता येते. अमेरिकेतील संकेतभेटीची (Dating) तुलना या प्रथेशी काही प्रमाणात करता येण्यासारखी आहे.

मुलांना शाळा-महाविद्यालयांतून लैंगिक शिक्षण द्यावे अथवा देऊ नये, या प्रश्नाच्या  व्यावहारिकतेबद्दल मतमतांतरे आढळून येतात; तथापि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून मुलांना लैंगिक शिक्षण देण्यावर विशेष भर आहे. त्यासाठी दृक-श्राव्य माध्यमे, चित्रे यांच्या माध्यमातून विषयतज्ज्ञ शास्त्रीय ज्ञान मुलामुलींपर्यंत पोचवीत आहेत. यामध्ये लैंगिक शिक्षणाच्या परिसीमा निश्चित करणे कठीण आहे; परंतु विद्यार्थ्यांना आपल्या लैंगिक भावनांवर नियंत्रण ठेवून आरोग्य निकोप ठेवता येईल, एवढे तरी लैंगिक शिक्षण त्यांना मिळावे, हा त्यामागील व्यावहारिक दृष्टिकोन असावा. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला लैंगिक अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून पाचव्या इयत्तेपासूनच शाळांमध्ये जागरूकता करणारे शिक्षण (लैंगिक) देण्याच्या सूचना केल्या आहेत. दुसरीकडे लैंगिक शिक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या मते, लैंगिक शिक्षणामुळे तरुणाईच्या लैंगिक भावनेला प्रोत्साहन दिलं जाईल. त्यामुळे मुलामुलींचे इतर विषयांकडे दुर्लक्ष होऊन युवापिढी स्वैराचारी बनेल. विद्यार्थ्यांत नको त्या विषयांत नको तितका रस निर्माण होईल. त्यामुळे लैंगिक शक्ती बंधमुक्त होऊन उफाळून येण्याचा संभव आहे, अशी टीका होते. असे असले, तरी लैंगिक शिक्षण हे केवळ शरीरशास्त्राचे शिक्षण नसून त्याला सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक, भावनिक अशी विविध परिमाणे असल्यामुळे ते जीवनशिक्षणच आहे.

समीक्षक : सु. र. देशपांडे