एखाद्या ऊतीतील (ऊतक; Tissue) पेशींचा संसर्ग, जखम किंवा रक्तपुरवठा थांबण्यामुळे तेथील पेशी (Cell) मृत पावतात यास पेशीनाश (Necrosis) असे म्हणतात. मोठ्या प्रमाणात झालेल्या पेशीनाशास ऊती/ऊतकनाश असेही म्हणतात. ‘पेशीनाश’ हा शब्द ग्रीक भाषेतील ‘नेक्रॉस-प्रेत’(Nekros-corpse) या शब्दावरून आला आहे. पेशीनाश व पेशीमृत्यू (Apoptosis) या दोन्ही भिन्न क्रिया आहेत.
पेशीनाशाची कारणे बहुधा पेशीबाह्य असतात. पेशीनाशास भौतिक घटक आणि जैविक घटक कारणीभूत असतात. भाजणे, कापणे, खरचटणे, आपटणे,मोठे वजन अंगावर पडणे, इमारतीखाली दबणे, ऊतींमध्ये ऑक्सिजनचा अभावही पेशीनाशाची भौतिक कारणे आहेत. पेशीनाशाची जैविक उदाहरणे म्हणजे उघड्या जखमेमध्ये जीवाणू संसर्ग, परजीवी संसर्ग, शरीरांतर्गत अवयवांचे ज्वलन, अवयवरोपणानंतर ज्या व्यक्तीमध्ये दुसऱ्याच्या अवयवाचे रोपण झाले आहे तो अवयव नाकारला जाणे, कीटक दंश, तीव्र रसायनांचा संपर्क, सर्पविषबाधा किंवा विषारी द्रव्यांशी संपर्क इत्यादी जैविक घटकांमुळे पेशीनाश होतो. मधुमेही रुग्णांमध्ये अनियंत्रित साखर वाढल्याने केशवाहिन्या अरुंद होतात. पायाच्या बोटांचा रक्तपुरवठा थांबतो. त्यामुळे पुरेसे रक्त न मिळाल्याने ऊतीनाश होऊन कोथ (Gangrene) निर्माण होतो. अशा अवयवांत जीवाणू संसर्ग होऊन शस्त्रक्रियेने कोथ झालेला भाग काढून टाकावा लागतो.
पेशीनाश होऊन मरणाऱ्या पेशींतील स्वत:च्या लयकारिका (Lysosome) व नष्ट पेशीच्या तुकड्यांकडे आकृष्ट झालेल्या श्वेतपेशींमधील लयकारिका या देखील पेशीनाशाला कारणीभूत ठरतात. एकदा पेशीस इजा झाली म्हणजे पेशीतील लयकारिका तुटतात. लयकारिकातील विकरे मृत पेशीतील घटकाचे विघटन करतात. ऊतीमधील कोणतीही पेशी मृत झाली म्हणजे भक्षक पेशींना त्याचा सुगावा लागतो. उरलेल्या मृत पेशींच्या भक्षणाचे काम भक्षक पेशी करतात. शारीरिक जखमांमुळे पेशींतील काही विकरे सक्रिय होतात. विकरांमुळे पेशीतील आधारक तंतूंचे जाळे विस्कळीत होते.
हिमदंश (Frostbite) : शून्य अंश सेल्सिअस जवळपासच्या अतिशीत तापमानामुळे मानवामध्ये व अन्य सस्तन प्राण्यांमध्ये हिमदंश आढळून येतो. हिमदंश हा देखील एक प्रकारचा पेशीनाश आहे. नाक, कान, गाल, हाताची-पायांची बोटे यांना हिमदंश लगेच होऊ शकतो. खूप काळ थंडवारा, थंड पाणी, बर्फ यांच्या संपर्कामुळे त्वचा, हाडे आणि खोलवरचे अन्य अवयवही हिमदंश बाधित होतात. अतिशीत वातावरणात पेशीमधील पाण्याचे स्फटिक तयार होऊन पेशी भंगतात. रक्तवाहिन्यांतील रक्तपुरवठा थांबतो. हा प्रकार नाक, कान, हातापायांची बोटे यांसारख्या परिघीय (Peripheral) अवयवांत होण्याची शक्यता अधिक असते.
कोथ (Gangrene) : पेशीनाशावर वेळीच उपचार झाले नाही, तर रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होतात. त्यामुळे अवयवांना दीर्घकाळ रक्त व ऑक्सिजन न पोहोचल्याने कोथ होऊ शकतो. हिमदंश, भाजणे, गंभीर स्वरूपाचा मधुमेह ही देखील कोथ होण्याची कारणे असू शकतात. क्लॉस्ट्रिडियम (Clostridium) जीवाणूंच्या संसर्गामुळे तीव्र गंभीर स्वरूपाचा वायूकोथ (Gas gangrene) संभवतो. क्लॉस्ट्रिडियम जीवाणूची फक्त ऑक्सिजन विरहित स्थितीत वाढ होते. खोल जखमा काळजीपूर्वक निर्जंतुक केल्या गेल्या नाहीत, तर क्लॉस्ट्रिडियमची त्वरित वाढ होते. त्यामुळे शरीराच्या एखाद्या भागात मोठ्या प्रमाणात पेशीनाश होऊन पेशीमृत्यू किंवा ऊतीमृत्यू होतो. जखमा दूषित झाल्यावर पू होतो. जीवाणूनिर्मित अंतर्विषे आणि पू इतरत्र पसरतो. जखमेतून वायूचे बुडबुडे येतात. दुर्गंधी सुटते. रोग्याचा जीव वाचवण्यासाठी असा अवयव कापून टाकावा लागतो किंवा अतिप्रभावी प्रतिद्रव्ये द्यावी लागतात.
सुमारे १९७१ पर्यंत पेशींच्या सर्व प्रकारच्या मृत्यूंसाठी सरसकट ‘पेशीनाश’ हा शब्द वापरला जात असे. जॉन फॉक्सटन कर (John Foxton R. Kerr) यांना काही विशिष्ट परिस्थितीत पेशींचा नैसर्गिक मृत्यू होतो असे लक्षात आले. जॉन कर यांनी त्याला ‘पेशीचा आक्रसून होणारा मृत्यू’ (Shrinkage necrosis) असे नाव दिले. नैसर्गिक पेशीमृत्यूचा शरीराच्या समस्थितीशी (Homeostasis) संबंध आहे हे नंतर समजले. तेव्हा अशा मृत्यूप्रकाराला ‘नियत पेशीमृत्यू’ (Apoptosis) असे नाव दिले. यामध्ये पेशींच्या नियतमृत्यूचा घटनाक्रम पूर्वनियोजित असतो. याउलट पेशीनाश क्रियेत घटना नियत क्रमाने घडत नाहीत. पेशीनाशात अनेकदा जखमेत पू निर्माण होतो. पू म्हणजे मृत पांढऱ्या पेशी (श्वेतपेशी). काही वेळा क्षयरोग्यांत क्षयाच्या जीवाणूभोवती भक्षकपेशी (Macrophages) व तंतुमय ऊतींचे (Fibrous connective tissue) पांढुरक्या रंगाचे आवरण तयार होते. जीवाणूंमुळे पेशीनाश झालेल्या ठिकाणी मृत फुफुसपेशी आणि मृत श्वेतपेशी यांमुळे बनलेल्या गाठीच्या मध्यभागी चीझसारखा मऊ पदार्थ दिसतो. अशा गाठींत (Granuloma) क्षयाचे जीवाणू सुप्तावस्थेत अनेक वर्षे राहू शकतात. काही रोगांत पेशीनाशाचा परिणाम म्हणून प्रतिजने (Antigen) आणि प्रतिद्रव्ये (Antibody) यांचे रेणूसमूह धमन्यांच्या भिंतींत साठतात. पेशीनाशात आसपासच्या पेशींना इजा होऊ शकते. थोडक्यात पेशीनाश म्हणजे पेशींचा अनियत आणि विकृतीतून होणारा (unprogrammedand pathological) मृत्यूहोय.
वनस्पतींतील पेशीनाश : वनस्पतींमध्येही पेशीनाश होतो. काही वृक्ष उत्तर गोलार्धातील थंड भागांत वाढतात. त्यांना दिवसा खूप उष्णता आणि रात्री अतीशय कडक थंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे खोडांचे बाह्य आवरण भेगाळते. तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पेशीभित्तीका व्यवस्थित निर्माण होत नाहीत. खोडाच्या आणि मुळाच्या टोकाकडील ऊती (अग्रज ऊती; Apical meristem) बनणे कठीण होते. अशावेळी त्याजागी पेशीनाश होतो. वनस्पतींच्या अनेक रोगांत पेशीनाश हे लक्षण दिसते. मुख्यत: पाने आणि खोडे यांत पेशीनाश होतो. फॉस्फरसची कमतरता हे वनस्पती पेशीनाशाचे प्रमुख कारण असते. नायट्रोजन, लोह, बोरॉन अशी मूलद्रव्ये अपुरी मिळाल्यानेही वनस्पतींत पेशीनाश घडतो. बुरशी, विषाणू, जीवाणू किंवा गोल कृमी परजीवींच्या संसर्गामुळेही पेशीनाश होऊ शकतो. बटाट्याच्या मांसल भागात जागोजागी पेशीनाश होऊन तो भाग काळा पडणे, मक्याच्या पानाच्या कडा सफेद होतात इत्यादी वनस्पतींतील पेशीनाशाची काही उदाहरणे आहेत.
पहा : ऊतकमृत्यु (पूर्वप्रकाशित नोंद), कोथ, पेशीमृत्यू, हिमदंश.
संदर्भ :
- http://www.discoverymedicine.com/Michael-T-Lotze/2009/07/14/dying-dangerously-necrotic-cell-death-and-chronic-inflammation/
- https://www.britannica.com/science/necrosis
- www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3093920/
- https://www.hunker.com/12003546/the-definition-of-necrosis-in-plants
समीक्षक : नीलिमा कुलकर्णी