महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय कोपऱ्यातील एक जिल्हा. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,८९५ चौ. किमी. असून ते महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४·८४% आहे. लोकसंख्या ४३,१५,५२७ (२०११). अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १७° १०ʹ ते १८° ३२ʹ उ. अक्षांश आणि ७४° ४२ʹ ते ७६° १५ʹ पू. रेखांश. पूर्व-पश्चिम विस्तार २०० किमी. व उत्तर-दक्षिण विस्तार १५० किमी. आहे. जिल्ह्याचा आकार अनियमित स्वरूपाचा आहे. याच्या नैर्ऋत्येस व दक्षिणेस सांगली जिल्हा, पश्चिमेस सातारा जिल्हा, वायव्येस पुणे, उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद, पूर्वेस उस्मानाबाद हे महाराष्ट्रातील जिल्हे, तर आग्नेयीस व दक्षिणेस कर्नाटकातील विजापूर जिल्हा आहे. जिल्ह्यात करमाळा, बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट असे अकरा तालुके आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने माळशिरस हा सर्वांत मोठा, तर उत्तर सोलापूर हा सर्वांत लहान तालुका आहे. सोलापूर शहर (लोकसंख्या ९,५१,११८-२०११) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
भूवर्णन : सोलापूर जिल्हा प्रामुख्याने भीमा, नीरा, सीना व माण या नद्यांच्या खोऱ्यात वसलेला आहे. जिल्ह्यात मोठे व महत्त्वाचे पर्वतीय प्रदेश नाहीत. सह्याद्रीच्या प्रमुख फाट्यांपैकी बालाघाट व शंभू महादेव डोंगररांगांचे काही फाटे या जिल्ह्यापर्यंत आलेले आहेत. बार्शी, करमाळा, मोहोळ, माळशिरस व सांगोला या तालुक्यांतील काही भाग वगळता जिल्ह्यात इतरत्र अगदी मोजक्याच टेकड्या असून त्यासुद्धा एकाकी व अवशिष्ट स्वरूपात आहेत. बार्शी तालुक्याच्या उत्तर व पूर्व भागातील बालाघाट डोंगररांगेच्या विस्तारित श्रेणीची उंची ६०० मी. पेक्षा अधिक आहे. काही ठिकाणी तीव्र उताराचे कडे आढळतात. यातील वडसिंगघाट आणि रामलिंगचे डोंगर प्रमुख आहेत. करमाळा तालुक्यात भीमा व सीना नद्यांदरम्यान खंडीत टेकड्या आढळतात. यांमध्ये ब्यूट (टेकडीवजा उंचवटा) व कमी उंचीचे टेबललँड पहावयास मिळतात. केमजवळील वाघोबा व बोडकी टेकड्या महत्त्वाच्या आहेत. करमाळा तालुक्यातील टेकड्यांचा विस्तार पुढे माढा तालुक्यात दिसतो. अगदी पूर्व भागातील अक्कलकोट तालुक्यात काही सपाट माथ्याच्या खंडीत टेकड्या व उत्तर-दक्षिण पसरलेल्या डोंगरांच्या सोंडी पाहावयास मिळतात. पश्चिम भागातील माळशिरस तालुक्याच्या पश्चिम सरहद्दीवर शंभू महादेव डोंगररांगांचा विस्तारित भाग असून येथे त्यांना फलटण डोंगर या नावाने ओळखले जाते. त्यांची उंची ७०० मी. पेक्षा अधिक असून त्यांत तीव्र उताराचे कडे आढळतात. हे डोंगर उघडे बोडके व ओसाड आहेत. या डोंगररांगांच्या उत्तरेस व पूर्वेस माळशिरस मैदान असून त्याचे जलवाहन नीरा व भीमा नद्यांच्या उपनद्यांनी केलेले आहे. सांगोला तालुक्याच्या अगदी नैर्ऋत्य आणि दक्षिण भागात तीव्र कड्यांच्या टेकड्या आढळतात. तालुक्याच्या अगदी नैर्ऋत्य भागात शुक्राचार्याचा डोंगर आहे. डोंगराळ प्रदेश वगळता जिल्ह्यातील उर्वरित भाग सरासरी ५००-६०० मी. उंचीच्या पठारी प्रदेशाने व्यापला आहे. सोलापूर जिल्ह्याचे ढोबळमानाने पुढील प्रमाणे आठ भौगोलिक विभाग करता येतात : (१) माळशिरस तालुक्याच्या दक्षिण भागातील व सांगोला तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगराळ प्रदेश. (२) माळशिरस तालुक्यातील नीरा नदीचे खोरे. (३) माण नदीचे खोरे. (४) भीमा नदीचे खोरे. (५) मध्य करमाळा व माढ्यातील मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेश. (६) सीना-भोगावती नद्यांची खोरी. (७) बार्शीच्या पूर्व भागातील डोंगराळ प्रदेश. (८) अक्कलकोट मैदान व बोरी नदीचे खोरे. जिल्ह्यात काळी, भुरी, बरड आणि तांबड्या रंगाची मृदा आहे.
भीमा, सीना, नीरा व माण या जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. कृष्णा नदीची प्रमुख उपनदी असलेली भीमा ही जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाची नदी असून ती करमाळा, माढा,
माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ आणी दक्षिण सोलापूर या तालुक्यांतून व त्यांच्या सरहद्दींवरून वाहते. करमाळा तालुक्यातील जिंती येथून ती जिल्ह्यात प्रवेश करते, तर अक्कलकोट तालुक्यातील हिळळी येथून जिल्ह्यातून कर्नाटकातील विजापूरकडे वाहत जाते. तिचा जिल्ह्यातील प्रवाहमार्ग २८९ किमी. असून त्यापैकी सुरुवातीचे ११० किमी. अंतर ती पुणे-सोलापूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहते. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र या नदीतीरावर आहे. पंढरपूर येथून वाहताना भीमा नदी चंद्रकोरीप्रमाणे वळण घेत वाहते म्हणून तेथे तिला चंद्रभागा नदी या नावाने ओळखले जाते. भीमेला उजवीकडून नीरा व माण, तर डावीकडून सीना या उपनद्या येऊन मिळतात. माळशिरस व इंदापूर (पुणे जिल्हा) या तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहत येणारी नीरा नदी माळशिरसमधील संगम गावाजवळ भीमा नदीला मिळते. जिल्ह्याच्या नैर्ऋत्य भागाचे जलवाहन करणारी व ईशान्यवाहिनी माण नदी पंढरपूरच्या आग्नेयीस १७ किमी. वरील सरकोली गावाजवळ भीमा नदीला मिळते. या नदीचा जिल्ह्यातील प्रवाहमार्ग ८० किमी. आहे. सीना ही जिल्ह्यातील दुसरी प्रमुख नदी आहे. ती अहमदनगर जिल्ह्याकडून वाहत येते. काही अंतर ती सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहते. जिल्ह्यातून सामान्यपणे आग्नेयीस वाहत गेल्यानंतर याच्या दक्षिण सीमेवर कुडलसंगम गावाजवळ भीमा नदीस मिळते. भोगावती ही तिची प्रमुख उपनदी मोहोळच्या उत्तरेस ७ किमी.वर तिला मिळते. जिल्ह्यातील बहुतांश नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या असतात.
हवामानाच्या दृष्टीने संपूर्ण जिल्हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८०·७ सेंमी. आहे. जिल्ह्यात एकूण ३५८ चौ. किमी. क्षेत्र वनांखाली आहे (२००३-०४).
इतिहास : सोलापूर जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही; तथापि पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर प्राचीन काळापासून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. भगवानलाल यांच्या मते, ‘पंढरपूरच्या विठोबाची मूळची मूर्ती प्राचीन असावी’. तज्ज्ञांच्या मते, आजची मूर्ती आद्य मूर्ती नसावी. या धार्मिक स्थळामुळे सोलापूर व पंढरपूर ही ठिकाणे प्राचीन काळापासून लोकांना माहीत असावीत. प्राचीन काळापासून अरबी समुद्रकिनाऱ्यावरील चौलकडे जाणारा व्यापारी मार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात होता. ब्रिटिश काळात व्यापारी मार्गांनी हा भाग मुंबईशी जोडला होता. हा जिल्हा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जोडणारा दुवा आहे.
सातवाहन (आंध्रभृत्य) राजांच्या काळात दक्षिणेकडील भागाप्रमाणेच सोलापूर जिल्हाही त्यांच्या राज्याचा एक भाग असला पाहिजे. या घराण्यानंतर बादामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव यांच्याही राज्यांत हा जिल्हा काही काळ मोडत असावा. यादव राजांच्या कारकिर्दीतील हेमाडपंती इमारती, देवालये व शिलालेख हे चपळगाव, जेऊर, बावी, मोहोळ, माळशिरस, नातेपुते, वेळापूर, पंढरपूर, पुळूज, कुंडलगाव, कासेगाव, मार्डी, कपडगाव, वाफे इत्यादी ठिकाणी आढळतात. पुढे दक्षिणेत मुस्लिम राज्याचे प्राबल्य झाले. बहमनी राज्याची राजधानी सोलापूरच्या पूर्वेस सुमारे १०० किमी.वरील गुलबर्गा येथे होती. सोलापूर जिल्हा हा गुलबर्गा तरफ (भाग) चा एक भाग होता. मुहम्मद शाह बहमनीच्या कारकीर्दीच्या सुमारास (इ. स. १३५८ – १३७५) सोलापूर व इतर काही ठिकाणचे किल्ले बांधले असावेत. इ. स. १३९६-१४०७ या बारा वर्षांच्या काळात या प्रदेशात जो भयंकर दुष्काळ पडला होता, त्यास दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणतात. इ. स. १४६० मध्ये दक्षिणेत पुन्हा दुष्काळ पडला होता, तो पंतांचा दुष्काळ म्हणून प्रसिद्ध आहे. या वेळी मंगळवेढ्यास पुष्कळ धान्याची कोठारे होती. ती दामाजीपंत या अधिकाऱ्याच्या ताब्यात होती. दामाजीपंताने हुकूमाशिवाय आपल्या ताब्यातील सरकारी धान्यकोठारातील धान्य देऊन दुष्काळी परिस्थितीत हजारो गोरगरिबांना पोसले.
विजापूरचा सुभेदार यूसुफ आदिलखान (१४८९ – १५१०) याने जिंकलेल्या प्रदेशात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूरचा काही भाग समाविष्ट होता. त्याच्या मृत्यूनंतर
(१५१०) कमालखानने राजपुत्र ईस्माईल आदिलशहा व त्याची आई यांस कैदेत टाकून सोलापूर किल्ल्यास तीन महिनेपर्यंत वेढा दिला होता. अहमदनगरहून वेळेवर मदत न आल्यामुळे झैन खानाने इ. स. १५११ मध्ये सोलापूरचा किल्ला व इतर काही भाग कमालखानाच्या ताब्यात दिला. सोलापूरच्या कब्जासाठी विजापूर व अहमदनगर या राज्यांमध्ये सारखे तंटे चालू होते. बुऱ्हाणशहाचा मुलगा हुसेन निजामशहा याने आपली मुलगी चांदबिबी हिचे लग्न विजापूरच्या अली आदिलशहाशी करून दिले. त्या वेळी सोलापूरचा किल्ला आंदण म्हणून देण्यात आला. औरंगजेबाने १६८६ मध्ये विजापूरवर स्वारी केली, त्या वेळी त्याच्या सैन्याचा तळ सोलापूर शहरात होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सोलापूर प्रांत त्याचा मुलगा कामबक्ष याच्याकडे आला असावा. इ. स. १७१६ च्या सुमारास पंढरपूर प्रांत आणि नीरा व माण नद्यांच्या मधला प्रदेश शाहूराजांच्या ताब्यात देण्यात आला. १७२३ च्या सुमारास सोलापूर शहर व किल्ला, जिल्ह्याचा काही मुलूख निजामाकडे गेला.
परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या ताब्यात पंढरपूर व त्याच्या आसपासचा प्रांत होता (१७९२). जेव्हा खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला (१७९५), तेव्हा जो तह झाला, त्यानुसार सोलापूर जिल्हा मराठ्यांस दिला गेला. १८१५ मध्ये पंढरपूरजवळ गंगाधरपंतास ठार मारण्यात आले. आष्टीच्या लढाईनंतर तीन महिनेपर्यंत सोलापूर हे रणक्षेत्र होते. पेशव्यांनी सोलापूरच्या किल्ल्यात आपला तळ दिलेला होता. ९ मे १८१८ रोजी ब्रिटिश सैन्य सोलापूरनजीक येऊन दाखल झाले होते. त्यांनी सोलापूरच्या किल्ल्यास वेढा देऊन १० मे रोजी शहरात प्रवेश केला. १५ मे रोजी ब्रिटिशांनी मराठा सैन्याकडून हा किल्ला ताब्यात घेतला. अशा रीतीने सोलापूर जिल्ह्याचा ताबा १८१८ पासून ब्रिटिशांच्या हाती गेला. सांप्रत सोलापूर जिल्हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्यांचा भाग होता. १८३८ मध्ये सोलापूर हा अहमदनगर जिल्ह्याचा उपजिल्हा बनला. तो १८६४ मध्ये बरखास्त करण्यात आला. त्यानंतर १८६९ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा व सातारा जिल्ह्यातील पंढरपूर व सांगोला हे उपविभाग जोडून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पुढे १८७५ मध्ये त्याला माळशिरस जोडण्यात आला. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर सोलापूर जिल्हा मुंबई प्रांतात समाविष्ट करण्यात आला आणि १९६० पासून हा महाराष्ट्रातील एक स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. १९८१ च्या जनगणनेनंतर बार्शी तालुक्यातील ८ गावे उस्मानाबाद जिल्ह्यात व सांगोला तालुक्यातील एक गाव सांगली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले. जिल्ह्यात सोलापूर, माढा (कुर्डूवाडी), माळशिरस व पंढरपूर असे चार महसूल उपविभाग असून ९ नगर परिषदा व एक महानगरपालिका आहे.
आर्थिक स्थिती : महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो. पारदासानी समितीने १९५७ पर्यंतच्या ३० वर्षांच्या कालावधीतील पर्जन्यमान, जाहीर
झालेली दुष्काळी स्थिती यांचा अभ्यास करून बार्शी व पाटबंधारे लाभक्षेत्रातील माळशिरस तालुक्याचा भाग वगळता इतर सर्व तालुके अवर्षणप्रवण असल्याचे १९६० मध्ये जाहीर केले. दुसऱ्या केंद्रीय जलसिंचन आयोगाने (१९६२) देखील माळशिरस तालुका वगळता इतर सर्व तालुके अवर्षणप्रवण जाहीर केले. त्यानंतर सुखटनकर समितीने १९७३ मध्ये जिल्ह्यातील लहरी व तुटपुंज्या पर्जन्यमानाचा सखोल अभ्यास करून माळशिरस व पंढरपूरचा कालवा बागायत भाग वगळता संपूर्ण जिल्हा अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर केला. त्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यातील सर्व ११ तालुके अवर्षणप्रवण असल्याचे मान्य केलेले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील २००८-०९ मधील भूमिउपयोजन पुढीलप्रमाणे होते (क्षेत्र हजार हेक्टर) : जंगलव्याप्त क्षेत्र ३२, पिकांखालील क्षेत्र १,०४८·५९, शेतीला उपलब्ध नसलेली जमीन ७९·२२, लागवडीलायक परंतु पडीक जमीन ३३·५९ आणि पडीक जमीन २९४·४५. एकूण ओलिताखालील क्षेत्र २५,९०० हे. होते. जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा, तूर, उडीद, मूग, भुईमूग, करडई, कापूस, ऊस इ. कृषी उत्पादने घेतली जातात. ज्वारी (जोंधळा) उत्पादनात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. अलीकडच्या काळात डाळींब, बोर, आवळा, लिंबू, द्राक्षे, सीताफळ, अंजीर, जांभूळ इत्यादी फळझाडांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. केंद्र शासनाने कोंडी येथे डाळिंबावरील संशोधनाचे केंद्र स्थापन केले आहे. याशिवाय मोहोळ येथे ज्वारी व करडई पिकांवरील संशोधन, तर अकलूज येथे ऊस संशोधन केंद्र आहे. सोलापूरची शेंगदाण्याच्या कुटाची चटणी अतिशय प्रसिद्ध असून तिला मोठी मागणी असते.
माढा तालुक्यातील उजनी येथे भीमा नदीवर उजनी धरण बांधण्यात आले आहे (१९८०). जिल्ह्यातील हा एकमेव मोठा प्रकल्प आहे. या धरणाची एकूण लांबी २,४७५ मी. असून त्याला ४१ वक्रकार दरवाजे बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील तृषार्त जमिनीवरील पिकांसाठी पाणीपुरवठा, जलविद्युतशक्तीनिर्मिती, उद्योगांना पाणीपुरवठा, मत्स्योद्योग अशा बहुउद्देशीय दृष्टीने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. अवर्षणप्रवण जिल्ह्यांच्या दृष्टीने या प्रकल्पाला विशेष महत्त्व आहे. पुणे-सातारा जिल्ह्यांच्या सरहद्दीवर नीरा नदीवर बांधण्यात आलेल्या वीर धरणातील पाण्याचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला झाला आहे. जिल्ह्यात हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव (बार्शी), बोरी (अक्कलकोट), एकरूख (उत्तर सोलापूर), बुद्धीहाळ (सांगोला) व मांगी (करमाळा) हे सात मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. यांशिवाय ६६ लघु-पाटबंधारे प्रकल्प, १,०९० पाझर तलाव व ७२९ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत (२००९-१०). एक मोठा बोगदा खोदून त्याद्वारे भीमा-सीना जोड कालव्याची निर्मिती करण्यात आली आहे. या बोगद्याद्वारे उजनी धरणातील पाणी प्रवाही पद्धतीने सीना नदीत सोडून उपसा सिंचन पद्धतीने ते पाणी बार्शी, माढा, मोहोळ या तालुक्यांना पुरविण्याची योजना आहे.
जिल्ह्यात दुग्धव्यवसाय महत्त्वाचा आहे. सर्वाधिक दुभती जनावरे माळशिरस तालुक्यात असून त्याखालोखाल सांगोला व पंढरपूर तालुक्यांचा क्रमांक लागतो. वेगवेगळे दूध उत्पादक
संघ व सहकारी दूध संस्थांमार्फत दूध संकलन केले जाते.
सोलापूर जिल्ह्यात महत्त्वाच्या खनिजांचे उत्पादन होत नाही; तथापि बांधकामासाठी उपयुक्त असणारा दगड, माती, वाळू, मुरूम इत्यादी गौण खनिजे उपलब्ध आहेत. जिल्ह्यात २२ साखर कारखाने असून त्यांपैकी १५ सहकारी क्षेत्रातील व ७ खाजगी मालकीचे होते. विणकर सहकारी संस्थांची संख्या ३३३ होती (२०१०-११). वेगवेगळ्या ठिकाणी औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत. जिल्ह्यात कृषी मालावरील प्रक्रिया उद्योगाला महत्त्वाचे स्थान आहे. सहकारी सूत गिरण्या १७ होत्या (२०१०). येथील सुती वस्त्रोद्योगास वैभवशाली परंपरा आहे. इ. स. १८५९ मध्ये लोहमार्गाचा एक फाटा सोलापूरपर्यंत आला. दरम्यानच्या काळातच
सोलापूर शहराजवळ एकरूख हा मोठा तलाव बांधण्यात आला. यामुळे सोलापूर येथील औद्योगिक विकासास चालना मिळाली. सोलापूर स्पिनिंग अँड वीव्हिंग कंपनी लि. ही पहिली कापडगिरणी सोलापूर येथे सुरू झाली (१८७७). त्यानंतर अल्पावधीतच सोलापूर शहरात व जिल्ह्यात आणखी कापड गिरण्या व सूतगिरण्या स्थापन झाल्या. अकलूज येथे मद्यनिर्मिती कारखाना आहे. सोलापूर, बार्शी ही कापड उद्योगाची प्रमुख केंद्रे असून त्याशिवाय करमाळा, पंढरपूर, अकलूज, मोहोळ, अक्कलकोट येथे कापडगिरण्या आहेत. उत्तम प्रतिच्या जेकॉर्ड चादर, पलंगपोस, सतरंज्या, टॉवेल, नॅपकिन, साड्या इत्यादी येथील प्रमुख उत्पादने आहेत. सोलापूरी चादरीला तिच्या उत्कृष्टतेमुळे भारतातच नव्हे, तर परदेशातही मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्यात हातमागावरील कापड व घोंगड्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. येथील विडी निर्मिती उद्योगही महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात १७७ किमी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आणि १,५७२ किमी. लांबीचे राज्य महामार्ग आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या लोहमार्गाची लांबी ३७५·४ किमी. आहे (२०१०-११).
लोक व समाजजीवन : जिल्ह्यातील स्त्री-पुरुष गुणोत्तर दर हजारी ९३२ आहे. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स २९० व्यक्ती इतकी आहे. ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण ६७·६०% व
सरासरी साक्षरता ७७·७२% आहे. सोलापूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठ (स्था. २००४) आहे.
सोलापूर जिल्हा ही संत, साहित्यिक, कवी, शाहीर यांचा वारसा लाभलेली भूमी आहे. कलावंत व संतकवी शुभराय महाराज, प्रतिभासंपन्न शाहीर व कवी राम जोशी, कवी कुंजविहारी, कवी व गीतकार संजीव (कृ. गं. दीक्षित), शाहीर अमर शेख, कादंबरीकार, समीक्षक व कवी त्र्यं. वि. सरदेशमुख, साहित्यिक व समीक्षक गो. मा. पवार, मराठी संत साहित्यातील विद्वान निर्मलकुमार फडकुले, कवी दत्ता हलसगीकर, साहित्यिक द. ता. भोसले, निशिकांत ठकार व शरणकुमार लिंबाळे, लेखक व कवी हेमकिरण पत्की, कवी नारायण सुमंत, लेखिका, कवयित्री व बालसाहित्यिका विजया जहागीरदार, साहित्यिका सुरेखा शहा इत्यादी येथील साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्ती आहेत. प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन, अभिनेत्री शशिकला, मराठी नाट्य अभिनेत्री आणि गायिका फैयाज, चित्रपट अभिनेत्री व गायिका सरला येवलेकर, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल,
तसेच नागराज मंजुळे, प्रसिद्ध उद्योजक वालचंद हिराचंद यांचे जन्मस्थान सोलापूर जिल्ह्यातील आहे. मानवतावादी व सेवाभावी डॉ. द्वारकानाथ कोटणीस आणि पक्षी व वन्य जीवनविषयक लेखक मारुती चितमपल्ली यांचीही सोलापूर ही मातृभूमी आहे.
महत्त्वाची स्थळे : सोलापूर जिल्ह्यात उल्लेखनीय तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक स्थळे व पर्यटन केंद्रे आहेत. त्यांपैकी पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून तेथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सोलापूर शहरातील श्रीसिद्धेश्वर मंदिर, सिद्धेश्वर तलाव व सोलापूर भुईकोट किल्ला, सोलापूरपासून आग्नेयीस ३८ किमी.वरील अक्कलकोट येथील अक्कलकोटकर स्वामी यांचे मंदिर व मठ, बार्शी येथील श्रीभगवंताचे (विष्णूचे) हेमाडपंती मंदिर, मंगळवेढा येथील संत दामाजी, चोखामेळा, गणपती इत्यादी मंदिरे, करमाळा येथील भवानी मंदिर, माढा येथील माढेश्वरी देवीचे (जगदंबा) मंदिर, वेळापूर (माळशिरस) येथील हरनेश्वर महादेव (अर्धनारी नटेश्वर) हे हेमाडपंती मंदिर व प्राचीन अवशेष, दहिगाव येथील जैन मंदिर इत्यादी उल्लेखनीय आहेत. बार्शी तालुक्यातील रामलिंग हे पर्यटन केंद्र आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज हे नव्याने उदयास येत असलेले पर्यटनस्थळ आहे. उत्तर सोलापूर जिल्ह्यातील नान्नज हे माळढोक या दुर्मिळ पक्षाचे व हरणांचे अभयारण्य विशेष प्रसिद्ध आहे.
समीक्षक : ना. स. गाडे