कतरिना दी सान क्वान : (१६०६–१६८८). मेक्सिकन वसाहतीतील एक गुलामगिरीविरोधी चळवळीतील कार्यकर्ती आणि ख्रिस्ती धर्मगुरू. तिच्या पूर्वायुष्याविषयी नेमकी माहिती मिळत नाही. तिचा जन्म मोगलशासित उत्तर भारतात आग्रा येथे झाला असावा. तिचा धर्म हिंदू किंवा इस्लाम असावा. तिचे सुरुवातीचे नाव मिर्रा (मीरा) होते. १६१५ साली तिच्या कुटुंबाने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थलांतर केले. ती समुद्रकिनाऱ्यावर इतर मुलांसोबत खेळत असताना पोर्तुगीज चाच्यांनी तिला पकडून गुलाम म्हणून विकण्यासाठी नेले. तेथून जहाजमार्गे तिला इतर गुलामांसोबत कोचीनला नेण्यात आले. तेथे इतरांसोबत तिलाही बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करण्यात येऊन कतरिना दी सान क्वान हे नाव दिले गेले. अनेक महिन्यांनंतर श्रीलंकामार्गे बंगालच्या उपसागरातून मलेशिया, इंडोनेशिया व तेथून अखेरीस फिलिपीन्समधील मानिला शहरातील मोठ्या गुलामांच्या बाजारात कतरिना इतर गुलामांसोबत आली.
फिलिपीन्समध्ये विकले जाणारे गुलाम प्रामुख्याने तत्कालीन स्पॅनिश अंमलाखालील मेक्सिकोत पाठवले जात. तेथे मानिलामार्गे येणाऱ्या आणि कृष्णवर्णीय आफ्रिकी नसणाऱ्या सर्वांना ‘चिनो’ असे संबोधन वापरत. मेक्सिकोतील व्हाइसरॉयने देखण्या ‘चिनो’ स्त्रियांची मागणी केल्यामुळे कतरिनाला मानिलातून विकत घेऊन पश्चिम किनाऱ्यावरील अकापुल्को बंदरात पाठवण्यात आले होते. तेथून तिला मेक्सिकोत पाठवण्यात येणार होते; परंतु तिला घेऊन येणारे जहाज अकापुल्कोला आले, तेव्हा प्रचंड पाऊस व वादळी वारे असल्याने व्हाइसरॉयच्या लोकांकडे कतरिनाला सोपवता आले नाही. परिणामी तिला कॅप्टन मिगुएल डिसोजा नामक माणसाने खरेदी करून मेक्सिकोतील प्वेब्लो शहरात नेले. याच शहरात कतरिना पुढे तिच्या मृत्यूपर्यंत राहिली.
कतरिना प्वेब्लो शहरात हळूहळू तिच्या ख्रिस्ती धर्मनिष्ठेबद्दल प्रसिद्धी होऊ लागली. तिचा मालक कॅप्टन डिसोजाने तिला गुलामीतून मुक्त केले (१६१९). कतरिना डिस्काल्सेड कार्मेलाइट (Discalced Carmelites) या पंथाच्या मठात एक नन म्हणून राहिल्यास तिच्या चरितार्थासाठी १०० पेसो इतकी रक्कम देण्याचे त्याने आपल्या मृत्यूपत्रात नमूद केले होते. या मठात प्रामुख्याने यूरोपियनांनाच प्राधान्य मिळत असल्याने ती कॅप्टन डिसोजाच्या मरणोत्तर त्याच्या विधवेच्या सेवेत दोन वर्षे राहिली व नंतर मुक्त झाली. त्यानंतर ती पेद्रो सुआरेझ नामक पाद्र्याच्या सेवेत राहिली. त्याच्या सेवेत असताना तिने घरकामासोबतच शिवणकामही सुरू ठेवले. त्यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर ती इतर अनेक गुलामांच्या मुक्ततेसाठी करत असे. पेद्रो सुआरेझने कतरिनाला त्याच्या पदरी असलेल्या डोमिंगो सुआरेझ नामक एका गुलामाशी लग्न करण्यास भाग पाडले. तिने यथावकाश डोमिंगोच्या मुक्ततेसाठीचे शुल्कही भरून त्याला कायद्याने स्वतंत्र केले. लवकरच तोही मरण पावला. त्यानंतर मग तिने एक स्वतंत्र धार्मिक स्त्री म्हणून शपथ घेतली. तिने अनेक वर्षे प्वेब्लोतील जेझुईट कॉलेजमध्ये धर्मकार्य चालू ठेवले.
वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी ती मरण पावली. प्वेब्लो येथे तिचे दफन करण्यात आले. स्थानिक जनतेची तिच्यावर चर्चपेक्षाही जास्त भक्ती असल्याने तेथील ख्रिस्ती न्यायपीठाने (इन्क्विझिशन) तिला अधिकृतपणे संत म्हणून घोषित करण्यास नकार दिला (१६९१). कतरिनाचे चित्र बाळगण्यावर किंवा तिच्याशी निगडित कोणतीही वस्तू जवळ ठेवण्यावर बंदी आणली गेली. पण याच सुमारास तिची चरित्रे आलोन्सो रामोस आणि होजे कास्तिलो ग्राहेदा या तिला प्रत्यक्ष भेटलेल्यांकडून प्रकाशित केली गेली. रामोसकृत चरित्रावर ख्रिस्ती न्यायपीठाने बंदी घातली; परंतु ग्राहेदाकृत चरित्र मात्र त्यांच्या तावडीतून सुटल्यामुळे त्याच्या माध्यमातून व एकूणच मौखिक इतिहासाद्वारे तिची स्मृती जागृत राहिली.
आजच्या मेक्सिकोत कतरिनाची ओळख आहे, ती ‘चिना पोब्लानाʼ (China Poblana) या पोशाखाची निर्माती म्हणून. या शब्दांचा मूळ अर्थ ‘प्वेब्लो शहरातील गुलाम स्त्रीʼ असा होतो. एक पांढरा ब्लाउझ, एक शाल आणि स्कर्ट असे ढोबळमानाने या पोषाखाचे स्वरूप आहे. मेक्सिकन स्त्रियांची पारंपरिक वेषभूषा तशी असल्याचे मानले जाते.
संदर्भ :
- Bailey, Gauvin Alexander, ‘A Mughal Princess in Baroque New Spain – Catarina de San Juan (1606-1688), the China Poblanaʼ, Anales del Instituto de Investigaciones Esteticas, Vol. 71, Mexico, 1997.
- Seijas, Tatiana, Asian Slaves in Colonial Mexico – from Chinos to Indians, New York, 2014.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर