गायन, वादन, नृत्य यांचा समाजात प्रसार व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन कृष्णा गोपाल ऊर्फ कृ. गो. धर्माधिकारी यांनी ८ नोव्हेंबर १९७८ रोजी पुण्यामध्ये या संस्थेची स्थापना केली.

संगीत सभांमध्ये कला सादरीकरणाबरोबरच संगीत साधकांच्या वैचारिकतेत प्रगल्भता यावी या उद्देशाने संगीत शिबिरे, शास्त्रीय संगीताच्या विशिष्ट विषयांची प्रयोजने, अखिल भारतीय गायन, वादन, नृत्य स्पर्धा, दरवर्षी संगीत विचारवंतांच्या सहभागाने चर्चासत्रे, संगीतोत्सव, निवासी स्वरमंच, नामवंत गायकांची स्वानुभवी सप्रयोग व्याख्याने असे अनेक उपक्रमही संस्था आयोजित करत असते. भारतातल्या विविध प्रांतातील सु. १५०० नवोदित तसेच उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्यही संस्थेने केले आहे. मान्यवर कलाकारही येथे आपल्या कलेचे सादरीकरण करतात. संस्थेकडून मान्यवर तसेच नवोदित संगीत साधकांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. त्यात पुढील पुरस्कारांचा समावेश होतो. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार, कै. अप्पासाहेब जळगावकर संवादिनी वादन पुरस्कार, कै. पं. त्र्यंबकराव जानोरीकर पुरस्कार, नृत्यांगना कै. रोहिणी भाटे, पं. राम माटे पुरस्कार, कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे शिष्यवृत्ती पुरस्कार इत्यादी. काही कार्यक्रम नॅशनल सेंटर फॉर दी परफॉर्मिंग आर्ट्स, मंबई यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संस्थेच्या सहयोगाने सादर होतात.

संगीत विषयक उपक्रमांसोबतच थोडेसे मैफिलीपलीकडे जाऊन संगीताच्या विविध विषयांवर अधिकारवाणीने बोलू शकणारे कलाकार, समीक्षक, संगीतज्ञ यांच्याबरोबर गानवर्धनच्या नवकलाकारांचा व श्रोतृवृंदाचा मुक्त संवाद साधून त्यायोगे सामान्य रसिकांत शास्त्रीय संगीताबद्दलची जाण वाढू शकेल व त्यांच्या विचाराला नवी दृष्टी देऊन संगीत विषयावरील चर्चा जागृत ठेवता येईल, या उद्देशाने मुक्त संगीत चर्चा सप्ताह हा एक सप्रयोग व्याख्यानांचा उपक्रम संस्थेने सुरू केला आहे. प्रारंभीच्या वर्षांमध्ये सात ते नऊ दिवस चालणारी ही चर्चासत्रे गेली काही वर्षे सलग तीन दिवस भरतात. कृ. गो. धर्माधिकारी यांच्या या कल्पनेला ज्येष्ठ संगीत समीक्षक श्रीरंग संगोराम यांनी मूर्तस्वरूप दिले. या चर्चासत्रात अखिल भारतीय कीर्तीच्या अनेक संगीत तज्ज्ञांनी मुक्त सहभाग दिला आहे. १९८२ पासून या चर्चासत्रामध्ये संगीत क्षेत्रातील तपस्वी कलाकारांच्या मुलाखती, भाषणे व त्यांचे आपल्या कलेबाबतचे चिंतन सादर केले जाते. हे चर्चासत्र १९८८ ते १९९७ पर्यंत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मिरज व १९९८ पासून ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहयोगाने संपन्न होत आहे. चर्चासत्रातील मान्यवरांच्या सप्रयोग व्याख्यानांचे रूपांतर संकलित असलेला मुक्त संगीत संवाद  हा ग्रंथ श्रीरंग संगोराम यांनी संपादित केला (प्रकाशन ४ नोव्हेंबर १९८८). यात ४४ महंतांच्या लेखांचा समावेश असून संगीत साधकांसाठी तो उपयुक्त आहे. जानेवारी १९९५ मध्ये याची हिंदी आवृत्ती आणि ऑक्टोबर २०१५ मध्ये माएस्ट्रोज स्पीक ही इंग्रजी आवृत्ती संस्थेने प्रकाशित केली.

गानवर्धनच्या व्यासपीठावरून प्रत्येक महिन्याला एक तसेच जुलै महिन्यात तीन दिवसांचे चर्चासत्र असे दरवर्षी १५ सांगीतिक कार्यक्रम सादर होतात. वर्षभरात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांची एकत्रित पत्रिका आगाऊ काढणे व त्याबरहुकूम सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध घडवून आणणे हा संयोजनातील एक पैलू संस्थेने जपला आहे. संस्थेचे नियोजित सर्व कार्यक्रम हे विनामूल्य स्वरूपात असतात. गानवर्धनच्या व्यासपीठावरील १९७८ या स्थापनेतील वर्षांपासूनच्या संगीत सभांची सुमारे २००० हून अधिक तासांची दृक-श्राव्य फीत संस्थेकडे उपलब्ध आहे. प्रसिद्ध गायिका पद्मभूषण प्रभा अत्रे या संस्थेच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षा असून उस्ताद उस्मानखाँ, नृत्यांगना सुचेता चापेकर, अतुल उपाध्ये व विकास कशाळकर हे मान्यवर समितीत आहेत.

समीक्षण : मनीषा पोळ