ठाकूर जयदेव सिंह : (१९ सप्टेंबर १८९३—२७ मे १९८६). भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय संगीत यांचा सखोल व्यासंग करून आणि त्यात साहित्य निर्मिती करून संगीतक्षेत्रात भरीव योगदान दिलेले एक व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील शोहरतगढ येथे झाला. त्यांचे वडील ठाकूर गोपाल नारायण सिंह हे जमीनदार होते. जयदेव सिंह यांच्या आईंना लोकसंगीतात रूची होती, त्या गातही असत. त्यांच्याकडे विविध ऋतूंवर आधारित लोकगीतांचा मोठा संग्रह होता. जयदेव सिंह यांनाही संगीतात रूची होती. कृष्णराव हिर्लेकर, नानुभैय्या तेलंग यांच्याकडून संगीताची तालीम घेतल्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्य, संस्कृत आणि तत्त्वज्ञानामधील पदव्युत्तर शिक्षण घेतले. विष्णु नारायण भातखंडे यांच्यापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी संगीतासाठी आकाशवाणीच्या माध्यमातून निर्मिती प्रमुख पदावरून १९५६ ते १९६२ दरम्यान मोठे कार्य केले. कानपूर आणि लखीमपूर येथे तत्वज्ञान आणि इंग्रजीचे अध्यापन केले. उत्तर प्रदेश सरकारने राज्याच्या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष म्हणून १९७३ साली त्यांची नेमणूक केली. इंदिरा कला विश्वविद्यालय येथेही त्यांनी मानद अध्यापक म्हणून कार्य केले. भारतीय संगीताच्या इतिहास तसेच तत्त्वज्ञानाच्या शिव सूत्राचा अनुवाद आदी लिखाण त्यांनी केले. १९६२ साली जपान येथे गेलेल्या भारतीय सांस्कृतिक शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. १९७४ साली पद्मभूषण या पुरस्काराने भारत सरकारने त्यांना गौरविले तसेच १९८३ सालचा तानसेन पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. वाराणसी येथे त्यांचे दीर्घकालीन आजारपणाने निधन झाले.

समीक्षक : सुधीर पोटे