नारायण तीर्थ (श्रीसंत) स्वामिगळ :  (१६७५-१७४५ किंवा १६१०-१७०५). श्रीकृष्ण लीला तरंगिणी  या ग्रंथाचे लेखक, कर्ते व कर्नाटक संगीत रचनाकार भागवत पंचरत्नांपैकी एक. त्यांच्या जन्ममृत्यूच्या तसेच कालविषयीच्या तारखा व निश्चित इसवी सन उपलब्ध नाहीत. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील काझा गावी सामान्य कुटुंबात झाला. पुढे त्यांचे वास्तव्य मुख्यत: तंजावर जिल्ह्यात होते आणि आई-वडील आंध्र प्रदेशातील गुंतूर या गावी रहात असत. प्रसिद्ध गीतिकाव्य गीतगोविंदाच्या सखोल अभ्यासामुळे त्यांना संस्कृत महाकवी जयदेव यांचा अवतार मानीत.

आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील कुचिमांची अग्रहरम् येथे ते काही दिवस रहात होते. तत्पूर्वी ते श्रीकाकुलम्, शोभानांद्री व व्यकटांद्री येथे गेले होते. या काळात त्यांनी संगीतशास्त्रावर श्रीकृष्ण लीला तरंगिणी  हा साक्षेपी संस्कृत भाषेतील बारा सर्गांचा ग्रंथ लिहीला. हे काव्य भागवताच्या दशमस्कंधावर बेतलेले असून त्याची सुरुवात श्रीकृष्ण जन्माने होते आणि कृष्णाबरोबर रुक्मिणीच्या विवाहाने याची सांगता होते. ही संगीत नाट्यकृती यक्षगान शैलीत असून यामध्ये १२ तरंगमसह १४५ कीर्तने, २६७ श्लोक व ३० गद्ये आणि ३० पद्ये (चूर्णिका) आहेत. ग्रंथाची प्रासादिक भाषा व सात्त्विक आशय यांमुळे हे काव्य वाचनीय झाले आहे. त्यात एकूण ३६ रागांचे विवरण आहे. यांत मंगल काफी हा सर्वस्वी नवीन राग आहे. यातील काही पदे संगीत जलशांतही गायली जातात. यातील काव्यमय, सात्त्विक व सुमधूर भक्तियुक्त तरंगिणी ‘अभिनय’ करून सादर करतात. श्रीकृष्ण लीला तरंगिणी शिवाय त्यांनी  शांडिल्य भक्तिसूत्र व्याख्यानम्, पारिजातपाहरणम्, हरिभक्ती सुधार्णवम्  इत्यादी अन्य काव्यग्रंथही लिहिले आहेत.

शिवरामानंदतीर्थ हे स्वामी नारायण तीर्थांचे गुरू. श्रीकृष्ण लीला तरंगिणी या काव्यात त्यांनी स्वत:चा निर्देश शिवरामानंदतीर्थपाद सेवक असा केला आहे. त्यामुळे तज्ञांच्या मते नारायणतीर्थ हे त्यांचे संन्यास आश्रमातील नाव असावे. त्यांना संन्यास घ्यावा लागला तो प्रसंग असा., वैन्नार नदीच्या पैलतीरावर त्यांच्या सासऱ्यांचे घर होते. पत्नी माहेरी गेली असता ते तिच्या भेटीला वैन्नार नदी पोहून जात असता एक भोवऱ्यात सापडले. त्यांतून बाहेर येणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपत्संन्यास घ्यायचे ठरविले आणि जानवे तोडून केस उपटून पाण्यात टाकले. तेवढ्यात त्यांना एक लाकडी ओंडक्याचा आधार सापडला व त्या आधाराने ते सासुरवाडीस गेले व पत्नीस ही हकीकत सांगितली. नंतर ते तीर्थाटनास निघाले व आंध्र प्रदेशातील चल्लापल्ली या ठिकाणी आले.

नारायणतीर्थ हे संगीत व संस्कृत या विषयांतील पंडित होते. श्रीकृष्ण लीला तरंगिणीच्या रचनेनंतर त्यांना आपण मुक्त झाल्यासारखे वाटू लागले. त्यांनी सद्गुरू शिवरामानंद तीर्थ यांच्या अनुग्रहाने विधिवत संन्यास घेतला. त्यांच्या संन्यस्त वृत्तीला त्यांच्या पत्नीनेही मान्यता दिली. त्यांच्यासंबंधी आणखी एक आख्यायिका अशी, त्यांना अतिशय तीव्र पोटदुखीचा विकार जडला. त्यावेळी नादूकावेरी येथे असताना त्यांना या विकारावरील इलाजाचे दर्शन घडले. त्यानुसार ते एका वराहाचा पाठलाग करीत भूपतिराजपूरम् या गावी गेले. तेथे त्यांनी ईश्वर भक्तीसोबत श्रीकृष्ण लीला तरंगिणीचे गायन केल्याने त्यांचा हा विकार बरा झाला. पुढे त्या गावाला वाराहूर हे नाव पडले व तिथेच ते अनेक वर्षे वास्तव्यास होते. तिथेच राहून त्यांनी आपल्या संगीत रचनांच्या माध्यमातून देवदेवतांची सेवा केली. त्या सर्व रचना नारायणतीर्थ या नावाने लिहिल्या. त्यांची श्रीकृष्ण लीला तरंगिणी ही साहित्यकृती नृत्य-नाटक म्हणून नावारूपाला आली. त्यांच्या इतर गानरचना देखील विविध भाव व्यक्त करणाऱ्या आणि वेगवेगळ्या रागांमध्ये स्वरबद्ध केलेल्या आहेत. त्यांच्या स्वरगान रचनेमध्ये त्यांनी वापरलेल्या विविध जाती आणि भजनामुळे त्या सर्व रचना लोकप्रिय झाल्या. त्यांनी तिरुवैय्यारूळजवळच्या तिरुप्पून्तूर्ती येथे समाधी घेतली. त्यांचा हा स्मृतिदिन कर्नाटकात अनेक ठिकाणी साजरा केला जातो. त्यांच्या पदांचा प्रसार करण्यासाठी एक विश्वस्त संस्था कार्यरत आहे. दरवर्षी वाराहूर येथे त्यांच्या स्मतिप्रीत्यर्थ अनेक धार्मिक व संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

संदर्भ : 

  • http://www.varagur.org/home/sri-narayana-theerthar

मराठी  भाषांतर : शुभेन्द्र मोर्डेकर

समीक्षण : सु. र. देशपांडे