लालगुडी जयराम : ( १७ सप्टेंबर १९३० – २२ एप्रिल २०१३ ). कर्नाटक शैलीच्या व्हायोलिनवादनास आंतरराष्ट्रीय दर्जाची कीर्ती प्राप्त करून देणारे प्रसिद्ध व्हायोलिनवादक, गायक आणि संगीतकार. त्यांचे पूर्ण नाव लालगुडी गोपाल अय्यर जयराम. त्यांचा जन्म भारतीय संगीतातील महान संत व संगीतकार त्यागराज यांच्या वंशामध्ये तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्लीजवळील लालगुडी येथे झाला. त्यांचे वडील गोपाल अय्यर वी. आर. हे कर्नाटक शास्त्रीय संगीतातील एक प्रतिभासंपन्न कलावंत होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना अत्यंत कौशल्याने कर्नाटकी शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले होते. त्यामुळे वयाच्या बाराव्या वर्षीच लालगुडी जयराम यांनी व्हायोलिनवादक म्हणून त्यांच्या सांगीतिक जीवनाची सुरुवात केली.

लालगुडी जयराम यांनी कर्नाटकी शैलीच्या व्हायोलिनवादनाच्या नवीन पद्धतीची सुरूवात केली. त्यामुळे व्हायोलिन हे भारतीय शास्त्रीय संगीतासाठी अनुकूल वाद्य आहे, याचा प्रसार झाला आणि ही व्हायोलिनवादनाची शैली पुढे ‘लालगुडी बानी’ या नावाने प्रसिद्ध झाली.

कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध संगीततज्ञांच्या विविध व्यक्तिगत शैलींच्या अभ्यासातून, विविध संगीत समारोहांतून मिळालेल्या अनुभवाने लालगुडी जयराम यांनी मेहनतीने त्यांची शैली विकसित केली. या संगीताबद्दलची त्यांची आवड आणि रुची यांमधून निर्माण होणाऱ्या सांगीतिक विचारांना अभिव्यक्ती देण्याच्या प्रबळ इच्छेमुळे ते भारतीय कर्नाटक संगीतातील एक प्रतिभावंत एकल व्हायोलिनवादक म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना थिलानस, वरणम् आणि अनेक नृत्यरचनांच्या निर्मितीचे श्रेय दिले जाते. ज्यामध्ये राग, भाव, ताल आणि गीतात्मक सौंदर्य आहे. व्हायोलिनवादनाची शैली व त्यामधील रचनांमधून त्यांनी गीतात्मक सामग्रीचे सादरीकरणही केले. लालगुडी जयराम यांनी भारतासोबत परदेशांमध्येही अनेक संगीत मैफलींचे सादरीकरण केले. १९६५ मध्ये एडिनबर्ग महोत्सवामध्ये त्यांच्या व्हायोलिनवादनाने प्रभावित होऊन जगप्रसिद्ध व्हायोलिनवादक यहुदी मेन्युहिन यांनी त्यांना सुप्रसिद्ध इटालियन बनावटीची व्हायोलिन भेट दिली होती. १९७९ मध्ये आकाशवाणी केंद्र दिल्ली येथे केलेल्या त्यांच्या व्हायोलिनवादनाच्या ध्वनिमुद्रणास (रेकॉर्डिंग) आंतरराष्ट्रीय संगीत परिषद, बगदाद आशिया-पॅसिफिक रोस्टर व इराक प्रसारण एजन्सी यांद्वारे विविध देशांतील ७७ प्रवेशिकांमधून जगामधील सर्वश्रेष्ठ ध्वनिमुद्रण म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यांनी बेल्जियम, फ्रान्स, सिंगापूर, मलेशिया, मनिला, जपान, इटली आणि पूर्व युरोपीय देशांमध्येही भारतातील विविधांगी व्हायोलिनवादनाच्या मैफिली सादर केल्या. भारत शासनाकडून त्यांना भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळातील सदस्य म्हणूनही रशियामध्ये पाठवण्यात आले होते.

अमेरिका आणि लंडन येथे आयोजित ‘फेस्टिवल ऑफ इंडिया’ या कार्यक्रमांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लालगुडी जयराम यांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी एकल व जुगलबंदी अशा अनेक व्हायोलिनवादनाच्या मैफली सादर केल्या. त्या खूप गाजल्या. १९८४ मध्ये त्यांनी ओमान, संयुक्त अरब अमिरात, बहरीन, कतार या देशांचाही दौरा केला. ‘जय जय देवी’ या त्यांनी केलेल्या गीताच्या व संगीताच्या रचनेचे सादरीकरण १९९४ मध्ये क्वीनलंड (अमेरिका) येथे झाले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील अनेक शहरांमध्ये ते प्रदर्शितही करण्यात आले होते. १९९६ मध्ये त्यांनी व्हायोलीन, बासरी आणि वीणा यांचे एकत्रित मिश्रण करून नवीन स्वरूपात जुगलबंदीच्या मैफलींच्या कार्यक्रमांची सुरुवात केली.

ऑक्टोबर १९९९ मध्ये लालगुडी जयराम यांनी ‘श्रुथी लय संगम’(इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट) ब्रिटन येथे आपली कला प्रदर्शित केली. तसेच याच ठिकाणी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पंचेस्वरम्  या नृत्यनाटिकेचे सादरीकरणही करण्यात आले.

लालगुडी जयराम यांनी अनेक कलावंतांसोबत साथ-संगत, जुगलबंदी आणि मैफिलींचे सादरीकरण केले. त्यामध्ये अरियकुडी रामानुज अयंगार, चेंबई वैदीनाथ भागवतर, सेमांदगुडी श्रीनिवास अय्यर, जी. एन. बालसुब्रमण्यम्, मदुराई मणि अय्यर, के. वी. नारायणस्वामी, महाराजापुरम् संथानम्, डी. के. जयरामन्, एम. बालमुरली, टी. वी. संकर नारायण, टी. एन. शेष गोपालन् यांसोबतच प्रसिद्ध बासरीवादक व संगीतज्ञ एन. रमानी अशा अनेक गायक व संगीतकारांचा समावेश होतो.

लालगुडी जयराम यांच्या पत्नीचे नाव राजलक्ष्मी होते. त्यांना दोन मुले आहेत. त्यांपैकी मुलगा लालगुडी गोपाल अय्यर जयराम राधाकृष्ण हे जी. जे. आर. कृष्णन या नावाने ख्यातनाम असून मुलगीचे नाव लालगुडी विजयालक्ष्मी आहे. हे दोघेही कर्नाटक संगीतामध्ये आपल्या वडिलांप्रमाणेच उत्कृष्ट व्हायोलिनवादक, गायक व संगीतकार आहेत. तर त्यांची भाची जयंती कुमारेश ही वीणावादक म्हणून प्रसिद्ध आहे.

लालगुडी जयराम यांनी राग धनश्रीमध्ये स्वाती तिरूनल थिलना “गीतू धुनिका ताका धिम” स्वरबद्ध करून सध्याच्या स्वरूपात अनेक रचना बनवल्या. त्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्या. तसेच या रचनांव्यतिरिक्त त्यांनी ‘जतीस्वरम्’ आणि ‘स्वरजती’ यांच्याही रचना केलेल्या आहेत. भरतनाट्यम् नर्तकांमध्ये रसिकप्रिया रागातील जतीस्वरम् लोकप्रिय आहे. त्यांनी सिंधू भैरवी, चेनचुरुट्टी, मोहन कल्याणी, बेहग आणि तिलंग या रागांचा उपयोग करून मूर्च्छनांची ओळख करून देणारी अनोखी स्वररचना केली. अंबुजम कृष्णांच्या कित्येक कृत्यांसह असंख्य गाणी आणि रचना संगीतबद्ध करण्याची त्यांना आवड होती.

लालगुडी जयराम यांच्या संगीतातील अलौकिक कार्यासाठी त्यांना विविध मानसन्मान व पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पुढील पुरस्कारांचा समावेश होतो. म्युझिक लवर्स असोसिएशन ऑफ लालगुडी यांच्यातर्फे ‘नाद विद्या तिलक’ हा पुरस्कार (१९६३), भारती सोसायटी, न्यूयॉर्क यांच्याकडून विद्या संगीत कलारत्न पुरस्कार (१९७१), फेडरेशन ऑफ म्युझिक सभा, चेन्नई यांच्याकडून संगीत चुडामणी हा पुरस्कार (१९७१), भारत सरकारकडून पद्मश्री (१९७२) व पद्मभूषण पुरस्कार (२००१), स्टेट विद्वान ऑफ तमिळनाडू हा तमिळनाडू राज्याचा पुरस्कार (१९७२), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७९), श्रीनगरम्  या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२००६), संगीत नाटक अकादमीचे सदस्यत्व (२०१०) इत्यादी.

थिलानस आणि वरणम् यासाठी प्रसिद्ध असणारे लालगुडी जयराम यांना आधुनिक युगामध्ये सर्वांत यशस्वी कर्नाटकी शास्त्रीय संगीतकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या रचना तमिळ, तेलगू, कन्नड आणि संस्कृत या चार भाषांत केलेल्या आहेत. त्यांच्या रचनांमधील माधुर्य आणि तालबद्ध पद्धती ही त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये होत. त्यांच्या अनेक रचना भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्य प्रकारांमधील नृत्यांगणामध्ये खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. तसेच कर्नाटक संगीतकारांमधील एक प्रमुख संगीतकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे निधन चेन्नई येथे झाले.

संदर्भ :

  • Devnath, Lakshmi, An Incurable Romantic: The Musical Journey of Lalgudi Jayaraman, 2013.