विद्युत्चलित वाद्यांपैकी एक आद्य आणि महत्त्वपूर्ण वाद्य. थेरेमिन हे स्पर्शही न करता ध्वनित होणारे वाद्य आहे. रशियामध्ये १९१९ च्या सुमारास ल्येव्ह टर्मन (Lev Termen) यांनी हे वाद्य निर्माण केले, मात्र संयुक्त राष्ट्रसंघात त्यांच्या नावाचा उल्लेख ‘लिआँ थेरेमिन’ असा केला गेल्याने या वाद्यासही ‘थेरेमिन’ असेच संबोधले गेले.

चौकोनी खोक्यासारखा आकार असलेल्या या वाद्यास दोन पातळपट्ट्या वा कांबीसारख्या संवेदनाग्र किंवा आकाशक (अँटेना) असतात – त्यांपैकी एक उर्ध्वदिश संवेदनाग्रातून उजव्या हाताच्या हालचालींद्वारे तारता-नियमन केले जाते, तर समतल संवेदनाग्रातून डाव्या हाताच्या हालचालींद्वारे गरिमा-नियमन केले जाते. विद्युतकर्षुकीय क्षेत्र निर्माण करणाऱ्या दोन संवेदनाग्रांच्या दरम्यान हातांचे विशिष्ट अंतर राखून हे तारता व गरिमा नियमन साधले जाते – तारता-संवेदनाग्राच्या जवळ हात नेल्यास तारता वाढते. या उलट, गरिमा-संवेदनाग्रापासून हात दूर नेल्यास गरिमा कमी कमी होत जाऊन अंतिमत: वाद्य निर्ध्वनित अवस्थेस पोचते. वाद्याच्या सुमारे चार फुटांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्रात कोणत्याही अन्य माध्यमाद्वारे व्यत्यय आल्यास ध्वनिस्तर बदलून वाद्य बेसूर भासू लागते. त्यामुळे थेरेमिन वादकास व्यत्ययरहित जागेतच स्थानापन्न होऊन वादन करावे लागते. या वाद्याच्या अंतर्भागात घट्ट विणीच्या अनेक तारा असतात, त्या रेडिओ कंप्रता दोलक (रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑक्झिलेटर) म्हणून काम करतात. ध्वनिस्तर व ध्वनीची गरिमा निर्माण करणाऱ्या तारांच्या युगुलांपैकी एक स्थिर दोलक (ऑक्झिलेटर) असते, तर दुसरी तार बाह्य संवेदनाग्रास जोडलेली – चल दोलक असते.

थेरेमिन हे एकध्वनी वाद्य असल्याने एका वेळी केवळ एकच स्वर यातून निर्माण होतो; मात्र याचा पल्ला सुमारे आठ स्वर-अष्टकांचा असतो. याच्या ध्वनिगुणात बरेच वैविध्य आहे व वादक आपल्या निवडीनुसार यातून व्हायोलिन, चेलो, क्लॅरिनेट, मानवी कंठ, गूढ अवकाश ध्वनी इत्यादी अनेक प्रकारचे नादरंग सहा सप्तकापर्यंत निर्माण करू शकतो. थेरेमिन वादक या वाद्यावर एकल वा समूह स्वरूपातील रचना वाजवतात.

या वाद्याचा जनक असलेल्या लिआँ थेरेमिन व त्यांच्या शिष्यांनी मुख्यत: पाश्चात्त्य संगीताच्या अभिजात (क्लासिकल) कालखंडातील रचना वाजवल्या. मुळात व्हायोलिनवादक असलेल्या व नंतर लिआँ थेरेमिनची शिष्या बनलेल्या क्लारा रॉकमोअर हिने एक सर्वोत्कृष्ट थेरेमिन वादिका म्हणून १९२० च्या दशकात मोठा लौकिक मिळवला. तिने या वाद्याचे वादनतंत्र पुष्कळ विकसित केले आणि परिणामत: या वाद्यास पाश्चात्त्य अभिजात संगीताच्या क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त झाले. लोकप्रिय संगीताच्या क्षेत्रात सॅम्युएल हॉफमन याने थेरेमिनचा वापर मोठ्या वाद्यवृंद प्रस्तुतींत केल्यानंतर अनेक चित्रपटांच्या पार्श्वसंगीतासाठीदेखील या वाद्याचा वापर होऊ लागला. प्रथम स्पेलबाउंड (१९४५) या चित्रपटातील संगीतासाठी याचा वापर करण्यात आला. पुढे पॉप व रॉक संगीतकारांनी-संगीतरचनाकरांनी त्याचा सर्रास वापर केला.

लिआँ थेरेमिन यांनी या वाद्याच्या संचाची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली. त्यानंतर या वाद्याच्या निर्मितीत आणि संशोधनातून नवनवीन संस्करणे तयार करण्यात ‘मूग म्युझिक’ ही कंपनी अग्रेसर ठरली. गेल्या सुमारे वीस वर्षांत थेरेमिनमध्ये अनेक पातळ्यांवर तांत्रिक बदल व सुधारणा झाल्या असून आता हे वाद्य सिंफनी ऑर्केस्ट्रापासून रॉक बँड्सपर्यंत आणि व्यावसायिक ध्वनिमुद्रणांपासून हौशी व्हिडीओंपर्यंत सर्व प्रकारच्या संगीत सादरीकरणात वापरले जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=-QgTF8p-284

मराठी भाषांतर : चैतन्य कुंटे

समीक्षण : सु. र. देशपांडे