अली खॉं, इनाम : १२ नोव्हेंबर १९२८ — २८ जानेवारी १९८८). भारतातील तबलावादकांच्या दिल्ली घराण्यातील एक ख्यातकीर्त तबलावादक. त्यांचा जन्म सांगीतिक परंपरा असलेल्या घराण्यात झाला. त्यांचे वडील गामे खॉं हे दिल्ली घराण्याचे एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित असे तबलावादक होते. त्यांच्याकडून आणि काका मुन्नू खाँ यांच्याकडून इनाम अली खॉं यांना दिल्ली घराण्याची तबलावादनाची विशेष तालीम मिळाली. प्रथितयश तबलावादक नत्थू खॉं हे इनाम अली खॉं यांचे मामा होते. त्यांच्या वादनाचा विशेषत: निकास-शैलीचा प्रभाव इनाम अली खॉं यांच्यावर होता.
इनाम अली खॉं यांच्या वादनावर दिल्ली घराण्याची छाप दिसत असली तरी पेशकार, कायदा वादन यांमध्ये त्यांची स्वत:ची सौंदर्यदृष्टी आणि त्यांची प्रतिभा दिसून येते. कधीकधी ते पूरब अंगाच्या गतींचेही वादन करायचे म्हणजेच ते पूरब शैलीचा तबलाही प्रभुत्वाने वाजवीत. त्यांचे स्वतंत्र वादन जास्तीतजास्त त्रितालात झालेले दिसून येते. त्रितालामध्ये पेशकार, कायद्याच्या सौंदर्यपूर्ण विस्तारात ते सादरीकरण करायचे. त्यांच्या मते त्रिताल हा समबद्ध आकाराचा चतस्त्र जातीचा ताल आहे, त्यामुळे त्रितालामध्ये ज्याप्रमाणे सर्वांगसुंदर व परिपूर्ण रचना झाल्या किंवा नवीन होतील तशा इतर तालात होत नाहीत. यामुळे ते तीन तालात रमायचे. मात्रांचे सूक्ष्म विभाजन करताना जे विविध मात्रा संख्येने बोलसमूह येत की जे इतर तालांसाठी उपयोगी असत. ते सर्व त्यांच्या तीन तालांच्या विचारात प्रकट होत होते. शास्त्रशुद्ध दिल्ली घराण्याचे खानदानी निकास व कलात्मक विस्तार प्रक्रिया ही त्यांची वैशिष्ट्ये होती. याचबरोबर प्रभावी पढत हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य.
इनाम अली खॉं यांनी लहानवयातच भारतातील विविध आकाशवाणी केंद्रावर आपल्या वादनाचे सादरीकरण केले. १९६० मध्ये वाराणसीचे गुदई महाराज यांच्यासोबतची त्यांची तबलावादनाची जुगलबंदी खूप गाजली. त्याचबरोबर त्यांच्या कलेच्या सादरीकरणासाठी त्यांनी देशपरदेशात अनेक मैफिली केल्या. तसेच ते भारतीय कला केंद्र, दिल्ली आणि दिल्ली विश्वविद्यालय यांच्या संगीत विभागासोबत अनेक वर्षे कार्यरत होते. त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये गुलाम हैदर, फैय्याज खाँ, लतीफ अहमद खाँ इत्यादी उल्लेखनीय आहेत.
दिल्ली घराण्याच्या या प्रतिष्ठित तबलावादकांचे मुंबई येथे निधन झाले.
समीक्षण : सुधीर पोटे