स्त्रीची मासिक पाळी बंद होणे व जननक्षमता संपणे (त्यास विराम मिळणे) या स्थितीला ऋतुनिवृत्ती अथवा रजोनिवृत्ती असे म्हणतात. ही वयानुसार घडणारी नैसर्गिक घटना आहे.

ऋतुनिवृत्तीचे प्रकार : नैसर्गिक ऋतुनिवृत्ती : (Natural menopause). वयोमानानुसार जेव्हा सलग एक वर्ष मासिक पाळी येत नाही तेव्हा ऋतुनिवृत्ती झाली, असे समजावे. साधारणपणे ऋतुनिवृत्तीचे वय ४५-५२ या दरम्यान असते.

मुदतपूर्व ऋतुनिवृत्ती : (Premature menopause). वयाच्या चाळीसाव्या वर्षाआधीच पाळी बंद झाली, तर त्यास अकाली अथवा मुदतपूर्व ऋतुनिवृत्ती म्हणतात.

प्रवृत्त ऋतुनिवृत्ती : (Induced menopause). रेडिओचिकित्सा (Radiotherapy) किंवा रसायनचिकित्सा (Chemotherapy) घेताना (उदा., कर्करोग उपचारपद्धती) बीजांडे बाधित झाल्यास ऋतुनिवृत्ती येते, या स्थितीला प्रवृत्त ऋतुनिवृत्ती असे म्हणतात.

कृत्रिम ऋतुनिवृत्ती : (Surgical menopause). शस्त्रक्रिया करताना गर्भाशय किंवा गर्भाशयाबरोबर बीजांडे (Ovaries) काढल्यास अचानक ऋतुनिवृत्ती येते, या स्थितीला कृत्रिम ऋतुनिवृत्ती असे म्हणतात.

लक्षणे : ऋतुनिवृत्ती काळात स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन (Estrogen) या हॉर्मोनच्या कमतरतेमुळे काही शारीरिक व मानसिक बदल दिसून येतात. ऋतुनिवृत्तीची लक्षणे व लक्षणांची तीव्रता ही व्यक्तिपरत्वे भिन्न असते.

(१) मानसिक आरोग्यावरील प्रभाव : ऋतुनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये असुरक्षितता, लहरीपणा, भावनिक हिंदोळे (Mood swings), चिडचिड, नैराश्य, डोके दुखणे, शांत झोप न लागणे किंवा निद्रानाश (Insomnia), वृद्धपणाची भावना अशी संमिश्र लक्षणे दिसून येतात.

(२) क्षणिक उष्मा (Hot flashes) : संपूर्ण शरीरामध्ये उष्ण चमका येतात. यासोबत हृदयाची स्पंदने देखील वाढतात, परिणामी शरीराचे वाढलेले तापमान कमी करण्यासाठी अचानक स्वेदन (Perspiration) होते. रात्रीच्या वेळी स्वेदन झाल्यास त्याला निशास्वेदन (Night sweat) असे म्हणतात.

(३) शारीरिक थकवा : शारीरिक श्रम करताना नेहमीपेक्षा लवकर थकवा येतो.

(४) संभोगेच्छा दमन : स्त्रियांमधील संभोग करण्याची भावना कमी होते.

(५) हृदयावरील परिणाम : (Cardiac effects). छातीमध्ये धडधड किंवा हुरहूर जाणवते. हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार होण्याची शक्यता वाढते.

(६) योनिशुष्कता (Vaginal atrophy) : मूत्रोत्सर्जक द्वारामध्ये म्हणजेच लघवीच्या ठिकाणी आणि योनिमार्गात कोरडेपणा जाणवू लागतो.

तसेच त्वचा आणि श्लेष्मल आवरणे (Mucous membrane) कोरडी होणे, सुरकुत्या पडणे अशी लक्षणेही दिसून येतात. चयापचय क्रिया मंदावते तसेच वजनवाढीच्या तक्रारीही दिसून येतात. काही स्त्रियांमध्ये हॉर्मोन असंतुलनामुळे चेहऱ्यावरील केसांचे प्रमाण वाढलेले दिसून येते. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याने हाडे ठिसूळ होतात. स्तनांचा आकार लहान होतो. श्रोणिभागातील स्नायूंमध्ये (Pelvic muscles) शिथिलता आल्याने मूत्र असंयमितता (Urinary incontinence) जाणवू शकते. तसेच काही स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग किंवा गुदद्वार यांचे योनिमार्गातून पुरस्सरण (Protrusion) होण्याची गंभीर शक्यता संभवते.

ऋतुनिवृत्ती प्रक्रिया : ऋतुनिवृत्तीची स्थिती अचानक येत नाही. बीजांडात तयार होणाऱ्या इस्ट्रोजेन या संप्रेरकाची निर्मिती चाळिशीनंतर हळूहळू कमी होत जाते. त्याचे रक्तातील प्रमाण एका विशिष्ट पातळीच्या खाली गेले की, पाळी बंद होते. या कालावधीत स्त्रियांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. हे बदलही दोन ते पाच वर्षांच्या कालावधीत हळूहळू होतात. या संपूर्ण काळाला ऋतुनिवृत्तीचा काळ असे म्हणतात. यामध्ये ऋतुनिवृत्तीपूर्व काळ, प्रत्यक्ष ऋतुनिवृत्ती आणि ऋतुनिवृत्तीपश्चात काळ या टप्प्यांचा समावेश होतो.

(अ) ऋतुनिवृत्तीपूर्व काळ : (Perimenopause). हा कालावधी प्रत्यक्ष ऋतुनिवृत्ती येण्याआधीचा असतो. हा काळ १ – ५ वर्षांपर्यंत राहतो.

(ब) प्रत्यक्ष ऋतुनिवृत्ती काळ : (Menopause). या कालावधीमध्ये पाळी पूर्णपणे बंद होते.

(क) ऋतुनिवृत्तीपश्चात काळ : (Postmenopause). हा कालावधी मासिक पाळी पूर्ण बंद झाल्यानंतरचा असतो.

उपचारपद्धती : ऋतुनिवृत्ती कालावधीतील क्षणिक उष्मा आणि निशास्वेदन या लक्षणांकरिता जीवनसत्त्वपूरक औषधे (Vitamin supplements), तर लक्षणांची तीव्रता अधिक असल्यास हॉर्मोन संबंधींची औषधे दिली जातात. तसेच मासिक पाळी पूर्णपणे बंद झाल्यानंतर कधीही योनिमार्गातून रक्तस्राव झाल्यास वैद्यकीय तज्ञांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. कारण ते गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

प्रतिबंधात्मक उपाययोजना : ऋतुनिवृत्तीच्या कालावधीमध्ये होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी करण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत काही मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. उदा., दिनक्रम तणावरहित राखणे; शरीराचे वजन संतुलित राखण्यासाठी हलका आहार घेणे; शारीरिक व्यायाम ( ४० मिनिटे दररोज असे आठवड्यात निदान ५ दिवस) करणे; आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा अधिकाधिक समावेश करणे; सकस व संतुलित आहार घेणे; भरपूर पाणी पिणे इत्यादी.

पहा : ऋतुनिवृत्ती (पूर्वप्रकाशित  नोंद); ऋतुस्राव व ऋतुविकार (पूर्वप्रकाशित  नोंद); ऋतुस्राव व परिचर्या.