ऋतुस्राव : मुलगी वयात आल्यावर योनिमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो त्यास ऋतुस्राव, रजोदर्शन अथवा मासिक पाळी असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षाची झाली की, मासिक पाळी येणे सुरू होते. हे एक महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडते. म्हणून त्यास मासिक पाळी चक्र असे म्हटले जाते.

मासिक पाळीच्या अवस्था :

मासिक पाळीच्या अवस्था

१) रक्तस्रावाची अवस्था : या अवस्थेमध्ये स्त्रीच्या योनी मार्गातून रक्तस्राव होतो ही अवस्था सुमारे चार दिवस असते.

२) पुनर्निर्माण अवस्था : ही अवस्था दोन दिवसांची असते मासिक पाळीचा रक्तस्राव थांबल्यानंतर या अवस्थेला सुरुवात होते. या अवस्थेत गर्भाशयात शिल्लक राहिलेल्या ग्रंथींची वाढ होऊ लागते आणि पुन्हा गर्भाशयाचा अंत:स्तर वाढू लागते.

३) विकास अवस्था : ही अवस्था पुनर्निर्माण अवस्थेनंतर सुरू होते. ती बीजोत्सर्गापर्यंत सुरूच असते. म्हणजे जवळ जवळ ती आठ दिवसांची असते. या अवस्थेमध्ये गर्भाशयाच्या अंतस्थ त्वचेची जाडी वाढते. तेथील रक्तवाहिन्यांची व श्लेष्म ग्रंथीचीही संख्या वाढून फलित बिजाच्या आगमनाची तयारी पूर्ण होते हे स्तर वेल्वेट सारखे जाड व मुलायम असते.

४) बीजोत्सर्ग : बीजांडकोषातील एक स्त्री बीज पक्व होऊन बीजांडकोषाच्या पृष्ठभागावर येते व फुटून परिपक्व स्त्रीबीज बाहेर पडते यालाच बीजोत्सर्ग असे म्हणतात. पुढची पाळी येण्या अगोदर चौदाव्या दिवशी बीजोत्सर्ग होतो.

५) स्रावी अवस्था : याला श्रावण अवस्था असे ही म्हणतात. ही अवस्था मासिक पाळीच्या आधी असते. म्हणून ऋतुपूर्व अवस्था (Premenstrual Phase) असे म्हणतात. या अवस्थेत वाढलेल्या गर्भाशय आवरणाची जाडी आणखीनच वाढते. श्लेष्म ग्रंथींची वाढ जास्त प्रमाणात होऊन श्लेष्म स्रावांचे प्रमाणही वाढते व त्यामुळे फलितबीज रुजविण्यासाठी योग्य वातावरण तयार होते. बीजांडामधून बाहेर पडलेले बीज शुक्राणुंद्वारे फलित न झाल्यास मृत होते व तयार झालेले गर्भाशय आवरण ढासळून पाळीच्या स्वरूपात रक्तस्राव सुरू होतो.

मासिक पाळीमध्ये मुलींना भेडसावणार्‍या समस्या :

१) पाळीपूर्व तनाव : कित्येक मुलींना दर महिन्याला मासिक पाळी येण्याअगोदर काही मानसिक तनाव जाणवतो आणि हा मानसिक तनाव बर्‍याच वेळा मुलींच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत असल्याने निर्माण होतो. बर्‍याच मुलींना स्तन ताठर होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, झोप न लागणे, चिडचिड, थकवा, थोडे वजन वाढणे अशा तक्रारी मासिक पाळी येणार्‍या आधी व मासिक पाळी दरम्यान जाणवतात.

२) पहिली पाळी लवकर येणे : बदलत्या जीवनशैलीमुळे बर्‍याच मुलींना वयाच्या दहाव्या ते अकराव्या वर्षापूर्वीच पहिली मासिक पाळी येते. इतक्या लहान वयात मासिक पाळी आल्याने बर्‍याच मुली घाबरून मानसिक दडपणाखाली येतात. त्यामुळे पहिली पाळी येण्याच्या अगोदर आई – वडिलांनी आपल्या मुलींशी या विषयावर खुलेपणाने बोलणे गरजेचे असते. पाळी जितकी लवकर येईल तितक्या लवकर मुलींमध्ये स्त्रीत्वाची लक्षणे अधिक दिसू लागतात.

३) उशिरा पाळी येणे : शारीरिक कमजोरीमुळे किंवा योग्य पोषण न मिळाल्यामुळे वयाच्या १४ वर्षांनंतर पहिली मासिक पाळी येते जर हे वय उलटून गेले तर डॉक्टरांकडे जाऊन योग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते.

४) पाळी आतल्या आत राहणे : काहीवेळा योनिमार्ग एका पडद्यामुळे बंद असतो त्यामुळे मासिक पाळी आली तरी पाळीचे रक्त आत योनिमार्गात साठून राहते. सामान्य मुलींप्रमाणे त्यांचा रक्तस्राव बाहेर येत नाही. अशा मुलींना पाळीच्या वेळी पोटात दुखणे, ओटीपोटात फुगवटा येणे असे त्रास उद्भवतात. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

५) पाळी अजिबात न येणे : शीर्षस्थ ग्रंथीचे कार्य बिघडल्यामुळे बीजांडाची वाढ न होणे हे जन्मजात दोष किंवा काही आजारांमुळे बिघाड होतो त्यामुळे पाळी येतच नाही. अशावेळी स्त्री संप्रेरक निर्माण होण्यात अडथळा निर्माण होतो. ही गंभीर समस्या असून यावर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते.

६) कमी अंतराने येणारी पाळी : दर महिन्याला मासिक पाळीचे चक्र सामान्यपणे २४ दिवसांचे असते म्हणजे पाळीतील रक्तस्रावाचे तीन ते पाच दिवस सोडल्यास दोन पाळी मध्ये सुमारे २५ ते २८ दिवस एवढे अंतर असते यात दोन तीन दिवस मागेपुढे बद्दल होऊ शकतात. या प्रकाराला लहान पाळी असे म्हणतात.

७) पाळीदरम्यान उद्भवणाऱ्या समस्या : पाळीच्या वेळी किंवा पाळी येण्याआधी पोटात दुखणे ही समस्या ९०% मुलींना सतावत असते. हार्मोन्समध्ये बदल झाल्याने चिडखोरपणा, थकवा, लघविला वारंवार लागणे, डोकेदुखी, पोटात कळ, बद्धकोष्ठता, स्तन ताठरणे, पायांवर सूज इत्यादी त्रास होतात. यातला बहुतेक त्रास शरीरात या काळात पाणी व क्षार जास्त साठल्यामुळे होत असतात. म्हणून असे त्रास होत असल्यास जेवणातील मिठाचे प्रमाण कमी करावे.

मासिक पाळीच्या समस्यांवरील उपचार :

१) नियमित व्यायाम करणे.

२) संतुलित आहार घेणे. आहारात लोह, ब जीवनसत्त्वाचा जास्त समावेश करणे (अथवा रक्त वाढीसाठी पूरक औषधे किंवा गोळ्या घेणे).

३) मासिक पाळीच्या वेदनांसाठी औषधे (शक्यतो घेणे टाळावे)

४) गरम पाण्याची पिशवी ओटीपोट शेकण्यासाठी वापरणे.

मासिक पाळीत घ्यावयाची काळजी : मासिक पाळीच्या कालामध्ये स्वच्छतेचे फार महत्त्व आहे. त्यामुळे जंतुदोषाला प्रतिबंध करता येतो.

१) या काळात दररोज आंघोळ करावी.

२) जननेंद्रियांची स्व्छता ठेवावी.

३) शक्यतो बाजारातील उपलब्ध असलेले सॅनिटरी पॅड वापरावेत.

४) दिवसातून २-३ वेळा गरजेनुसार सॅनिटरी पॅड बदलावेत.

५) सॅनिटरी पॅड न वापरल्यास पाळीमध्ये वापरावयाच्या कापडाच्या घड्या मऊ व सूती असाव्यात.

६) दिवसातून जरूरी प्रमाणे ३-४ वेळा घड्या बदलाव्यात.

७) एकमेकींच्या घड्या वापरू नयेत.

८) वापरलेल्या घड्या थंड पाण्याने धुवाव्यात. नंतर साबण पाण्याने धुवाव्यात, उन्हामध्ये दोरीवर वाळवून पुन्हा वापराव्यात. जमिनीवर किंवा अंधारी जागी वाळवू नये. त्यामुळे बुरशी सारखे जंतु वाढू लागतात.

९) रोजची कामे करावीत, शाळा, खेळ चालू ठेवावे.

ऋतुप्राप्ती दरम्यान परिचारिकेचे कर्तव्य :-

१) मुलीला भावनिक आधार व धीर देणे.

२) मासिक पाळी बद्दल समजवून सांगणे, मासिक पाळी म्हणजे काय? का येते? या शंकाचे निरसन करणे.

३) मुलीला पॅड किंवा स्वच्छ कापडाची घडी घेण्यास सांगावे.

४) वडिलांचा मुलीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असावा जेणे करून तिच्यात विश्वासपूर्ण भावना प्रस्थापित होईल.

५) मुलीला पोषक आहार द्यावा.

६) पोट शेकण्यास गरम पाण्याची पिशवी देणे.

७) या वयात होणारे सर्वसाधारण बदल, आहार व आरोग्याच्या गरजा इत्यादींबाबत तिच्याशी चर्चा करावी.

८) मासिक पाळी येणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. याबाबत मुलीला विश्वासात घेऊन सांगावे.

९) यामध्ये लाज किंवा घाण वाटण्याचे कारण नाही व स्वता:ला दोषी ठरण्याचे कारण नाही याबाबत मुलींना समजून सांगावे.

१०) चांगला आहार, स्व्छता, व्यायाम व विश्रांति घेणे गरजेचे आहे. याबाबत मुलीला धीर देऊन सांगावे.

११) मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. हा आजार नाही याबाबत मुलीला जागृत करावे.

१२) मुलीला स्वत:मध्ये आत्मविश्वास बाळगण्यास प्रवृत्त करावे.

१३) परिचारिका ही पालकांची (वडिलांची) भूमिका निभावण्यासाठी आरोग्य शिक्षणाद्वारे त्यांना समृद्ध करते.

१४) परिचारिकांमार्फत अशी माहिती मोठ्या प्रमाणात दिली गेल्यास जबाबदार पालक, समजूतदार समाज व कर्तव्यदक्ष पितृत्व या तिहेरी गोष्टींचा नक्कीच लाभ होऊ शकतो.

पहा : ऋतुस्राव व ऋतुविकार.

संदर्भ :

  • डॉ. प्रकाश भातलवंडे, डॉ. रमण गंगाखेडकर, यौवनाच्या उंबरठ्यावर, युनिसेफ, प्रथम आवृत्ती, २००१,
  • डॉ. शं. पं. सबनीस, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम, आरोग्यसेवक – प्रशिक्षण पुस्तिका, प्रथम आवृत्ती, नोव्हेंबर २००१.