ब्रँडो, मार्लन : (३ एप्रिल १९२४ – १ जुलै २००४). हॉलीवूडमधील एक सुप्रसिद्ध अभिनेते. त्यांचे पूर्ण नाव मार्लन ब्रँडो ज्युनियर. त्यांचा जन्म अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनातील ओमाहा, नेब्रास्का (Nebraska) या राज्यात झाला. मार्लन ब्रँडो यांना दोन मोठ्या बहिणी होत्या. जोसलीन (Jocelyn) आणि फ्रान्सेस (Frances). मार्लन ब्रँडो यांचे प्राथमिक शिक्षण लिबर्टीव्हिल हायस्कूल येथे झाले. तर पुढील शिक्षण शटक मिलिटरी हायस्कूल येथे झाले. त्यांच्या मोठ्या बहिणीने म्हणजेच जोसलीन ब्रँडो हिने अभिनयक्षेत्रात पाय ठेवला, त्यासाठी ती न्यूयॉर्क येथे गेली. मार्लन ब्रँडो यांचा देखील अभिनय क्षेत्राकडेच ओढा होता. ते शाळेतील नाटकांत उत्साहाने भाग घेत असत. पुढे त्यांनी बहीण जोसलीनच्या पावलावर पाऊल ठेवत न्यूयॉर्क गाठले. ब्रँडो न्यूयॉर्कमध्ये सुरुवातीला ‘अमेरिकन थिएटर विंग प्रोफेशनल स्कूल’मध्ये दाखल झाले. इथेच त्यांची स्टेला ॲडलर (Stella Adler) यांच्याशी भेट झाली. स्टेला ॲडलर या तत्कालीन सुप्रसिद्ध अभिनय गुरू होत. त्यांच्याकडेच ब्रँडो यांनी “Stanislavaski System” या अभिनय तंत्राचे धडे गिरवले. प्रसिद्ध दिग्दर्शक एलिया कझान (Elia Kazan) हेदेखील ब्रँडोंचे शिक्षक होते.
Stanislavaski System ही रशियन नाट्यकर्मी स्टॅनिस्लाव्ह्स्की यांची कल्पना. अभिनय करताना अभिनेत्याने आपल्या जीवनातील अनुभवांचा किंवा घटनांचा उपयोग करावा, अशी या तंत्राची मूळ संकल्पना. त्यामुळे अभिनयात अधिक नैसर्गिकता येते हा त्यामागील विचार. अभिनेत्याने एखाद्या दृश्यात (सीन) दाखवल्या जाणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण स्वत: असलो तर, हा विचार करून ती भूमिका स्वत: जगण्याचा प्रयत्न करावा, असा विचार त्यामध्ये मांडला आहे. त्या काळात समाजावर नाटकांचा बराच प्रभाव होता. तेव्हा नाटकांतील अभिनयही अधिक भडक असे. स्टेला ॲडलर यांच्याकडे ब्रँडो हे तंत्र शिकले, पुढे जाऊन याच तंत्राला “मेथड ॲक्टिंग” असेही म्हटले जाऊ लागले. भडक अभिनयाचा पगडा असताना ब्रँडोंच्या या नाविन्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षक, सहकलाकार तसेच दिग्दर्शक देखील चकित झाले.
१९४७ साली टेनेसी विल्यम्स (Tennessee Williams) यांच्या अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर (A Streetcar Named Desire) या नाटकात ब्रँडो यांना संधी मिळाली. ब्रँडोंचे मित्र एलिया कझान या नाटकाचे दिग्दर्शक होते. पुढे १९५१ साली आलेल्या याच नावाच्या चित्रपटात ब्रँडोंनी मेथड ॲक्टिंगचा पहिला प्रयत्न केला. या भूमिकेच्या तयारीसाठी ब्रँडो जवळच्याच व्यायामशाळेमध्ये जाऊन रॉकी ग्राझीयानो (Rocky Graziano) ) या मुष्टियोद्ध्याचे निरीक्षण करत असे. हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. ब्रँडोंनी चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाचे तिकीट रॉकी ग्राझीयानो यांना पाठवले होते. त्यानंतर ब्रँडो यांनी व्हिव्हा झपाता (Viva Zapata!, १९५२) या चित्रपटात प्रसिद्ध मेक्सिकन स्वातंत्र्यसैनिक एमिलीयानो झपाता यांची भूमिका साकारली. ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांची ज्यूलियस सीझर (Julius Caesar, १९५३) चित्रपटामधील मार्क अँटोनीची भूमिकादेखील बरीच गाजली. या चित्रपटातील त्यांचे सहकलाकार, सुप्रसिद्ध ब्रिटीश अभिनेता जॉन गिलगुड (John Gielgud) यांनीही ब्रँडोच्या भूमिकेचे कौतुक केले. १९५४ साली आलेला ऑन द वॉटरफ्रंट (On the Waterfront) हा चित्रपट तिकीटबारीवर अतिशय यशस्वी ठरला. या चित्रपटात ब्रँडोने टेरी मलॉय नावाची भूमिका केली होती. या भूमिकेसाठी त्याला त्यावर्षीचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
यादरम्यान ब्रँडोने दिग्दर्शनात देखील प्रयत्न करून बघितला. वन -आईड जॅक्स (One-Eyed Jacks, १९६१) हा ब्रँडोने दिग्दर्शित केलेला एकमेव चित्रपट. मार्लन ब्रँडो आणि पिना पेलीसर (Pina Pellicer) चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. प्रसिद्ध दिग्दर्शक स्टॅन्ले क्युब्रिक (Stanley Kubrick) आधी हा चित्रपट दिग्दर्शित करणार होते, परंतु काही कारणास्तव ते या प्रकल्पातून बाहेर पडल्यावर दिग्दर्शनाची कमान ब्रँडोच्या हातात आली. निश्चित वेळापत्रकापेक्षा अधिक काळ या चित्रपटाचे चित्रीकरण लांबले, तसेच त्यामुळे चित्रपटाचे निर्मितीमूल्यही वाढले. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समीक्षकांनी देखील त्याच्यावर टीका केली. यापुढे मात्र ब्रँडोने कोणताही चित्रपट दिग्दर्शित केला नाही.
पुढील दशकात ब्रँडोंचे चित्रपट तिकीटबारीवर आपटत गेले; मात्र १९७१ मध्ये आलेल्या फ्रान्सिस फोर्ड-कोपोला ( Francis Ford Coppola) यांच्या द गॉडफादर (The Godfather) या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले. या चित्रपटात ब्रँडोंनी डॉन व्हिटो कॉर्लीऑनी ही न्यूयॉर्क शहरातील एक शक्तिशाली माफिया कुटुंबप्रमुखाची भूमिका साकारली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. एक शांत, संयमी आणि दूरदर्शी माफिया डॉनची भूमिका ब्रँडो यांनी कौशल्याने वठवली. या चित्रपटामुळे पुढे अनेक माफियापटांची लाट आली. आजही हा चित्रपट सिनेचाहत्यांमध्ये आपले स्थान टिकवून आहे. हा चित्रपट ख्यातनाम लेखक मारियो पुझो (Mario Puzo) यांच्या द गॉडफादर या कादंबरीवर आधारित होता. या भूमिकेसाठी त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील दुसरा ऑस्कर पुरस्कार मिळाला; परंतु त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. “हॉलीवूडमधील चित्रपटात आदिवासी आणि नेटिव्ह अमेरिकन वंशाच्या लोकांना एकांगी पद्धतीने दाखवण्यात येते, त्याचा निषेध” हे त्यामागचे कारण होते.
१९७२ साली आलेला लास्ट टँगो इन पॅरीस (Last Tango in Paris) हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला. यामध्ये ब्रँडो यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे. मारिया श्नायडर (Maria Schneider) ही अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटातील काही दृश्ये वादाचा विषय ठरली. तरीदेखील सर्व प्रकारच्या वाद विवादांना पुरून उरत हा चित्रपट तिकीटबारीवर गाजला.
पुढे ब्रँडो यांनी विशेष करून चरित्र भूमिकाच केल्या. द मिझोरी ब्रेक्स (१९७६), तसेच सुपरमॅन (१९७८) मधील जॉर-एल ही पाहुण्या कलाकाराची भूमिका किंवा फ्रान्सिस फोर्ड-कपोलाचा ॲपोकॅलीप्स नाऊ (१९७९) मधील भूमिका या त्यांच्या नंतरच्या काळातील काही गाजलेल्या भूमिका. २००४ साली आलेला द स्कोर हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.
ब्रँडो यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यामध्ये ऑन द वॉटरफ्रंट या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार, द गॉडफादर या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या मते १९५० च्या आधी पदार्पण केलेल्या अभिनेत्यांमधील जगातील चौथा सर्वश्रेष्ठ अभिनेता हे मानांकन. टाइम्स या प्रसिद्ध साप्ताहिकाच्या “जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती” या यादीत समावेश इत्यादी आहेत. ब्रँडो यांचे तीन विवाह झाले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव ॲना काशफी, दुसऱ्या पत्नी मोविता कॅस्तानेडा आणि तिसऱ्या पत्नीचे नाव तारिता तेरियापिया आहे.
मार्लन ब्रँडो हे आपल्या अभिनयासाठी तर जगभर प्रसिद्ध होतेच, पण कृष्णवर्णीय आणि मूळ अमेरिकन रहिवासी (अमेरिकन इंडियन) लोकांच्या अधिकारांसाठी लढून आपल्या समाजकार्याचा ठसाही त्यांनी उमठवला. मार्टिन ल्यूथर किंग यांनी काढलेल्या ‘मार्च ऑन वॉशिंग्टन’ मध्येही ते सहभागी होते (१९६३). तब्बल पाच दशके आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मार्लन ब्रँडो यांचे वयाच्या ८० व्या वर्षी लॉंस अँजेलिस येथे निधन झाले.
समीक्षक : गणेश मतकरी