राज कपूर : (१४ डिसेंबर १९२४ – २ जून १९८८). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता, संकलक आणि दिग्दर्शक. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतातील (सध्याच्या पाकिस्तानमधील) पेशावर येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातकीर्त अभिनेते व नाट्यकलाकार पृथ्वीराज कपूर हे त्यांचे वडील आणि त्यांच्या आईचे नाव रामसरीनी असे होते. या दांपत्याच्या सहा मुलांपैकी राज कपूर एक. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर व शशी कपूर हे त्यांचे लहान भाऊ. राज कपूर यांचे मूळ नाव रणबीरराज कपूर असे होते; पण त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना नावातील रणबीर गाळून फक्त ‘राज कपूर’ असे नाव धारण केले.

राज कपूर यांना लहानपणापासून अभिनयात रुची होती. त्यामुळे शिक्षणाऐवजी त्यांच्या आवडीकडे त्यांनी जास्त लक्ष दिले. वडिलांचा नाटकांतील आणि चित्रपटांतील अभिनय पाहतच ते मोठे झाले आणि याच क्षेत्रात काम करायचे त्यांनी ठरवले. वयाच्या दहाव्या वर्षी इन्कलाब या चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली (१९३५). तरुणपणातील त्यांची कारकीर्द बॉम्बे टॉकीजमधील क्लॅपर बॉय (चित्रीकरणाच्या सुरुवातीस लाकडी चौकट आपटून दृश्यास सुरुवात करणारा कर्मचारी) म्हणून झाली. त्याचवेळेस ते त्यांच्या वडिलांनी निर्मिलेल्या पृथ्वी थिएटरमध्ये (१९४४) रंगमंचावरील विदूषक आणि दीवार या नाटकातील नोकर व पडदे ओढणारे पडद्यामागील कलाकार म्हणूनही काम करत असत. भालजी पेंढारकर यांच्या वाल्मिकी या चित्रपटात नारदमुनींची तसेच हमारी बात, गौरी इत्यादी चित्रपटांत लहानलहान भूमिका त्यांनी केल्या.

दिग्दर्शक केदार शर्मा यांच्या चित्रपटासाठी राज कपूर क्लॅपर बॉय म्हणून काम करत होते. तेव्हा त्यांच्याकडून घडलेल्या एका चुकीमुळे त्यांना या दिग्दर्शकांचा राग सहन करावा लागला; पण नंतर त्यांनीच राज कपूर यांना नीलकमल (१९४७) या चित्रपटात नायक म्हणून पहिली संधी दिली. वयाच्या चोवीसाव्या वर्षी राज कपूर यांनी चेंबूर येथे भव्य व सर्व सोयींनी सुसज्ज अशा आर. के. स्टुडिओची स्थापना केली (१९४८). याचबरोबर आर. के. फिल्म्स या निर्मितीसंस्थेचीही स्थापना करण्यात आली. त्यांचा निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आग हा पहिला चित्रपट. या चित्रपटाला तिकीटबारीवर फारसे यश मिळाले नाही. १९४९ साली प्रदर्शित झालेला बरसात हा राज कपूर निर्मित, दिग्दर्शित आणि अभिनित असा पहिला चित्रपट. त्यात राज कपूर-नर्गिस आणि प्रेमनाथ-निम्मी अशा दोन जोड्या होत्या. हलकीफुलकी प्रेमकथा, नायक-नायिकेसोबतच सहकलाकारांचाही छान जमून आलेला अभिनय आणि शंकर-प्रेमकिशन या जोडीने दिलेले सुश्राव्य संगीत सोबतच लता मंगेशकर, मुकेश आणि महंमद रफी यांनी गायलेली गाणी यांमुळे हा चित्रपट गाजला. त्यानंतर आलेले आवारा (१९५१), श्री ४२० (१९५५) हे राज कपूर आणि नर्गिस या जोडीचे आणखी काही गाजलेले चित्रपट. त्यांच्या अनेक चित्रपटांत नर्गिस यांनी भूमिका केल्या आहेत. आर. के. फिल्म्सने राजा नवाथे दिग्दर्शित आह (१९५३), प्रकाश अरोरा दिग्दर्शित बूट पॉलिश (१९५४), अमित मिश्रा आणि शोमु मित्रा दिग्दर्शित जागते रहो (१९५६), अमरकुमार दिग्दर्शित अब दिल्ली दूर नहीं (१९५७), आणि राधू करमाकर दिग्दर्शित जिस देश में गंगा बहती है (१९६१) अशा सामाजिक विषय असलेल्या चित्रपटांचीही निर्मिती केली. जागते रहो हा चित्रपट समाजातील दुटप्पी लोकांच्या वागण्यावर प्रहार करणारा होता. यात राज कपूर यांनी एका निरक्षर, गावंढळ पण अतिशय सज्जन अशा गरीब, भोळ्या माणसाची भूमिका केली.

स्वतःच्या निर्मिती-दिग्दर्शनाशिवाय राज कपूर यांचे इतर निर्माता आणि दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून भूमिका साकारलेले व गाजलेले चित्रपट म्हणजे अंदाज (१९४९), दास्तान (१९५०), सरगम (१९५०), अनहोनी (१९५२), चोरी चोरी (१९५६), शारदा (१९५७), परवरीश (१९५८), फिर सुबह होगी (१९५८), अनाडी (१९५९), दो उस्ताद (१९५९), छलीया (१९६०), नजराना (१९६१), आशिक (१९६१), दिल ही तो है (१९६३), तिसरी कसम (१९६६) हे आहेत. राज कपूर यांनी दिग्दर्शन आणि अभिनय केलेलासंगम (१९६४) हा आर. के. फिल्म्सचा पहिला रंगीत चित्रपट. यामधील प्रेमत्रिकोणाच्या कथेत राज कपूर, राजेंद्र कुमार आणि वैजयंतीमाला हे कलाकार होते. संगम हा भारतातील पहिला दोन मध्यांतर असलेला चित्रपट आहे. त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतरचे दुल्हा दुल्हन (१९६४), अराऊंड दी वर्ल्ड (१९६६), सपनों के सौदागर (१९६८), मेरा नाम जोकर (१९७०) हे चित्रपट अपयशी ठरले. तेव्हा राज कपूर यांनी ‘नायका’ची भूमिका साकारणे थांबवले आणि चरित्र भूमिका साकारणे सुरू केले. नरेशकुमार दिग्दर्शित दो जासूस, दारासिंग दिग्दर्शित मेरा देश मेरा धरम या चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र भूमिका साकारली.

आर. के. फिल्म्सचा मेरा नाम जोकर  हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट होय. हा पूर्ण व्हायला तब्बल सहा वर्षे लागली. मुळात ४ तास आणि ४३ मिनिटे इतक्या अवधीचा हा चित्रपट प्रदर्शित करताना ४ तास ९ मिनिटे अशा स्वरूपाचा आणि दोन मध्यांतर ठेवून प्रदर्शित केला गेला; पण पहिल्याच दिवसापासून चित्रपटाबाबत निराशेची प्रतिक्रिया उमटल्यामुळे आठवड्याभरातच तो एक मध्यंतर असलेला आणि १७८ मिनिटांचा करण्यात आला. काही काळाने का होईना हा चित्रपट एक “उत्तम कलाकृती” असल्याचे कला जगतातून मत आले. त्यानंतर पुनर्प्रदर्शनात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला; पण त्याने आर्थिक अपयश धुवून निघाले नाही. मेरा नाम जोकर च्या व्यावसायिक अपयशाने आर .के. फिल्म्स ही निर्मितीसंस्था आर्थिक संकटात सापडली; पण राज कपूर या अपयशाने खचून गेले नाहीत. १९७१ साली आर. के. फिल्म्ससाठी रणधीर कपूर यांनी कल आज और कल हा चित्रपट दिग्दर्शित केला. यात पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर अशा कपूर कुटुंबातील तीनही पिढीतील अभिनेत्यांनी भूमिका साकारली. मेरा नाम जोकरच्या धक्क्यातून सावरत राज कपूर यांनी बॉबी (१९७३) या कोवळ्या वयातील तरुणांच्या प्रेमकथेची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. या चित्रपटातून त्यांनी त्यांचा मुलगा ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया अशी तजेलदार रूपेरी जोडी रसिकांसमोर आणली. नवतरुणांची ही प्रेमकथा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावली. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने तरुण पिढीला रुचेल असे संगीत दिले. या चित्रपटाने तिकीटबारीवर खणखणीत यश मिळवले.

ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला राज कपूर यांनी स्त्रीवादी भूमिका असलेल्या सामाजिक चित्रपटांना प्राधान्य दिले. या काळात त्यांनी सत्यम् शिवम् सुंदरम् (१९७८), प्रेमरोग (१९८२) आणि राम तेरी गंगा मैली (१९८५) या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. नंतरच्या काळात आर. के. फिल्म्सच्या वतीने रणधीर कपूर यांनी धरम करम (१९७६) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यामध्ये राज कपूर यांनी चरित्र भूमिका साकारली. या काळात अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटातही त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या. यात दुलाल गुहा दिग्दर्शित शत्रुघ्न सिन्हासोबत खान दोस्त (१९७६) ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित राजेश खन्नासोबत नौकरी (१९७९) आणि संजय खान दिग्दर्शित अब्दुल्ला (१९८०) या चित्रपटांचा समावेश आहे.

भावपूर्ण डोळे, चेहऱ्यावरचा नैसर्गिक भोळा भाव आणि अभिनेता चार्ली चॅप्लिनसारख्या काही शारीरिक लकबी, आवाजातले मार्दव या वैशिष्ट्यांनी सजलेला राज कपूर यांचा सहजसुंदर अभिनय रसिकांच्या मनाचा ठाव घेत असे. त्यांनी त्यांच्या चित्रपटांसाठी निवडलेल्या बहुतांशी कथा या समाजाच्या वेगवेगळ्या वैगुण्यावर हळुवार भाष्य करीत असत; पण त्याचबरोबर त्यांच्या चित्रपटांतील नायिकेसोबतची अंतरंग दृश्ये ही विवादास्पदही होती. असे तत्कालीन काही समीक्षकांचे मत होते. राज कपूर यांना प्रकाश योजना, संकलन, संगीत आणि नृत्य सादरीकरण यांचीही चांगली जाण असल्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटात कथेला साजेसे सेट्स असत, नृत्य असे. त्यांच्या बहुतांश चित्रपटांना शंकर-जयकिशन यांचे संगीत आहे. या संगीतकार जोडी बरोबरच गीतकार हसरत जयपुरी आणि शैलेंद्र यांनाही प्रथम संधी त्यांनी दिली. राज यांच्यावर चित्रित झालेल्या बहुतांशी गाण्यांना मुकेश यांचे पार्श्वगायन आहे. जयकिशन आणि शैलेंद्र यांच्या मृत्यूनंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि रवींद्र जैन यांनी प्रामुख्याने संगीताची धुरा यशस्वीपणे सांभाळली. हे सर्वजण प्रतिभावंत आणि  कलाकारांतील सर्वोत्तम ओळखून त्याप्रमाणे त्यांच्याकडून काम करवून घेण्याची राज कपूर यांची हातोटी त्यामुळे ‘अवीट गोडीचे संगीत’ ही आर. के. फिल्म्सची ओळख कायम राहिली. रसिकांच्या तीन पिढ्या ओलांडूनही त्यांच्या चित्रपटांतील गाणी आजही लोकप्रिय आहेत. उदा., मेरा जूता है जापानी, आवारा हूँ, ए भाई जरा देख के चलो, जीना इसीका नाम है, बोल राधा बोल इत्यादी. राज कपूर दिग्दर्शित चित्रपटांतील गाण्यांत नृत्य सौंदर्य आणि दृश्य सौंदर्य यांचा अनोखा मिलाफ दिसून येतो.

राज कपूर यांना तीनदा राष्ट्रीय पुरस्कार, विविध प्रकारांतील अकरा फिल्मफेअर पुरस्कार आणि तब्बल एकवीस नामांकने मिळाली. त्यांना अनाडी आणि जिस देश मै गंगा बहती है या चित्रपटांसाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा तर संगम, मेरा नाम जोकर आणि प्रेमरोग या चित्रपटांसाठी सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. त्यांना फिल्मफेअरने ‘जीवनगौरव पुरस्कार’, स्टार अवॉर्ड्सने ‘शतकातील सर्वोत्तम दिग्दर्शक’ आणि ‘शतकातील सर्वोत्तम शोमॅन’ हे पुरस्कार देऊन गौरविले. त्यांच्या आग आणि बूट पॉलिश या चित्रपटांना ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात ‘पाम डोर’ या पुरस्कारासाठी नामांकने मिळाली होती; तर आग या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला टाईम या मासिकाने जगातील सर्वोत्तम दहा अभिनय सादरीकरणात स्थान दिले. १९६५ आणि १९७९ साली मॉस्को येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांची परीक्षकपदी नियुक्ती झाली होती. रशिया, चीन, जपान इत्यादी देशांत त्यांचे चाहते आहेत. आवारा या चित्रपटाने रशिया आणि पूर्व यूरोपमध्ये खूप लोकप्रियता मिळवली. चीनचे क्रांती नेते माओ त्से तुंग यांना हा चित्रपट विशेष आवडे. अमेरिका आणि फ्रान्समधील भारतीय चित्रपट महोत्सवात आवाराला लोकप्रियता लाभली. श्री ४२० मधील सामाजिक उपरोधामुळे या चित्रपटाला भारतीय इतिहासात मानाचे स्थान आहे.

भारत सरकारने राज कपूर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले (१९७१) तर २००१ साली त्यांची प्रतिमा असणारे टपाल तिकीट प्रकाशित केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना जाहीर झाला (१९८७). नवी दिल्ली येथे झालेल्या ह्या पुरस्कार समारंभातच त्यांची प्रकृती गंभीर झाली. उपचारार्थ मुंबईतील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते; पण त्यांचा अस्थमा हा आजार बळावून त्यातच त्यांचे निधन झाले. या काळात ते हीना या चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटाची दोन गीते त्यांनी ध्वनिमुद्रित केली. त्यांच्यानंतर हा चित्रपट रणधीर कपूर यांनी दिग्दर्शित केला (१९९१). वकील बाबू हा राज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला शेवटचा चित्रपट ठरला (१९८२). माईक पवार यांच्या कलंक या मराठी चित्रपटात त्यांनी पाहुणा कलाकार म्हणून छोटीशी भूमिका साकारली होती.

राज कपूर यांचा विवाह कृष्णा मल्होत्रा यांच्याशी झाला होता. त्यांचे पुत्र रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर यांनीही एकेक करत यशस्वी रीतीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. काही चित्रपटांमुळे त्यांची ‘भारताचे चार्ली चॅप्लिन’ अशी प्रतिमा तयार झाली. पुण्यापासून तीस कि.मी. अंतरावर लोणी काळभोर या गावी ‘राजबाग” या कपूर कुटुंबियांच्या फार्ममध्ये राज कपूर आणि त्यांच्या आईवडिलांची समाधी आहे. येथे त्यांच्या चित्रपटांविषयी माहिती देणारे संग्रहालय आहे. तसेच १९४५ ते १९९० या काळातील चित्रपट निर्मितीचे काही क्षणही चित्र स्वरूपात आहेत.

राज कपूर यांना शोमॅन म्हटले जाते. ‘चोवीस तास चित्रपटाचा विचार करणारी व्यक्ती’ अशी राज कपूर यांची खासियत होती.

संदर्भ :

  • अगरवाल, प्रल्हाद, राज कपूर : आधी हकीकत आधा फसाना, नवी दिल्ली, २००७.

समीक्षण : दिलीप ठाकूर