निकोल्सन, जॅक : (२२ एप्रिल १९३७). हॉलीवूडमधील अमेरिकन अभिनेते, दिग्दर्शक व निर्माता. त्यांचे पूर्ण नाव जॅक जॉन जोसेफ निकोल्सन. त्यांचा जन्म नेपच्यून सिटी, न्यू जर्सी येथे झाला. त्यांची आई जून फ्रान्सेस निकोल्सन या नर्तिका होत्या. जॅक यांचे पालनपोषण त्यांच्या आजीआजोबांनी केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण न्यू जर्सीमधील मानास्क्वान हायस्कूल येथे झाले.

१९५४ मध्ये जॅक कामाच्या शोधात हॉलीवूडमध्ये आले. सुरुवातीला त्यांनी एमजीएम स्टुडिओमध्ये विलियम हॅना आणि जोसेफ बार्बरा यांच्याकडे काम केले. या काळात त्यांनी ‘प्लेअर्स रिंग थिएटर’ या नाट्यसमूहाबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच त्यांनी काही सोप ऑपेरांमध्येही (ठराविक भाग असलेली दूरचित्रवाणी मालिका) काम केले. वयाच्या विसाव्या वर्षी जॅक कॅलिफोर्निया एअर नॅशनल गार्ड (अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया सैन्यदलाच्या तीन उपविभागांपैकी एक) येथे दाखल झाले (१९५७). दरम्यान त्यांचा पहिला चित्रपट द क्राय बेबी किलर प्रदर्शित झाला (१९५८). चित्रपटांत काम करताकरता जॅक पटकथा लिहिण्याचेही काम करीत असत. १९६१ मधील “बर्लिन संकट” काळात त्यांनी काम केले (सोविएत रशियाने, दोन भागांत विभागलेल्या बर्लिन शहरातून सशस्त्र सैन्याच्या माघारीची मागणी केली, या मागणीवरून आंतरराष्ट्रीय तणाव निर्माण झाला, त्यालाच बर्लिन संकट म्हणून ओळखतात). १९६२ सालच्या अखेरपर्यंत जॅक या ठिकाणी कार्यरत होते. यानंतर जॅक हॉलीवूडमध्ये परतले.

१९६९ साली आलेला इझी रायडर हा चित्रपट जॅकच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट म्हणता येईल. या चित्रपटासाठी त्यांना पहिलेवहिले ऑस्कर नामांकन मिळाले. तसेच हा चित्रपट त्यांच्या पहिल्या काही प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात त्यांनी अट्टल दारूबाज वकील जॉर्ज हॅनसनची भूमिका केली. पुढील वर्षी (१९७०) आलेला फाईव्ह इझी पिसेस  हा चित्रपटदेखील तिकीटबारीवर यशस्वी ठरला. यामधील जॅकच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. त्यांचा अभिनय पाहून त्यांची तुलना मार्लन ब्रँडो यांच्याशी होऊ लागली. बऱ्याच समीक्षकांच्या मते जॅक मार्लन ब्रँडोंच्या अभिनयाचे वारसदार होते. १९७३ मधील द लास्ट डिटेल  व १९७४ मधील चायना टाऊन  या चित्रपटांच्या रूपाने त्यांना दुसरे ऑस्कर नामांकन प्राप्त झाले. चायना टाऊन या चित्रपटात त्यांनी अतिशय तल्लख बुद्धी असलेल्या आक्रमक खासगी गुप्तहेराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवा मिळवली. सांस्कृतिक, सौंदर्यानुभव आणि ऐतिहासिक दृष्ट्या लक्षणीय मानले जाणारे चित्रपट अमेरिकेत जतन करून ठेवण्याची पद्धत असल्याने, तेथील लायब्ररी ऑफ काँग्रेसने नॅशनल फिल्म रजिस्ट्रीमध्ये हा चित्रपट जतन करण्याची सूचना केली. वन फ्ल्यू ओव्हर ककूज नेस्ट हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरला (१९७५). यातील मानसिक रुग्णाच्या भूमिकेसाठी जॅक निकोल्सनला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्यासोबत या चित्रपटात नर्सचे काम केलेल्या अभिनेत्री लुईस प्लेचर यांनाही सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट तिकीटबारीवरही खूपच यशस्वी ठरला. या चित्रपटातील जॅकच्या अभिनयाने रॉजर एबर्टसारखे समीक्षकदेखील प्रभावित झाले.

१९८० साली जॅकची प्रमुख भूमिका असलेला द शायनिंग हा भयपट प्रदर्शित झाला. स्टीवन किंग यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतला होता. द शायनिंग तिकीटबारीवर अतिशय यशस्वी ठरला. १९८३ च्या टर्म्स ऑफ एंडियरमेंट या चित्रपटासाठी जॅकला कारकीर्दीतील दुसरा ऑस्कर मिळाला. या चित्रपटात त्यांनी एका अंतराळवीराची भूमिका साकारली होती. १९८९ साली आलेल्या बॅटमॅन या चित्रपटात त्यांनी मानसिक विकाराने ग्रस्त आणि खुनी असलेल्या “जोकर” या खलनायकाची भूमिका साकारली. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. आजदेखील ही भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधते.

९० च्या दशकात जॅक निकोल्सन यांनी चरित्र भूमिकांकडे आपला मोर्चा वळवला. १९९२ साली आलेला अ फ्यु गुड मेन ह्या “यू एस मरीन कॉर्प्स” या अमेरिकन सैन्यदलातील विभागावर आधारित चित्रपटात त्यांनी काम केले. त्यामध्ये त्यांनी कडक शिस्तीच्या व रागीट अशा कर्नल नाथन आर. जेसपची भूमिका अतिशय कौशल्याने साकारली. सैन्यदलातील कठोर शिस्तीच्या मानसिकतेवर हा चित्रपट भाष्य करतो. ॲज गुड ॲज इट गेट्स (१९९७) हा चित्रपट एक हलकाफुलका विनोदी प्रेमकथापट होता. या चित्रपटातील मेल्विक उडाल या विक्षिप्त आणि मानसिक विकाराने त्रस्त असलेल्या लेखकाच्या भूमिकेसाठी त्यांनी तिसरा ऑस्कर पुरस्कार पटकावला. हा चित्रपट तिकीटबारीवर अत्यंत यशस्वी झाला.

२००० च्या दशकात वयपरत्वे जॅक निकोल्सन यांनी चित्रपटात काम करणे हळूहळू कमी केले. द डिपार्टेड (२००६) हा बॉस्टन शहरातील गुन्हेगारी विश्वावर प्रकाश टाकणारा एक माफियापट. जॅक यांच्या या चित्रपटातील माफिया डॉनच्या भूमिकेचे कौतुक झाले. या चित्रपटामध्ये जॅक व्यतिरिक्त लिओनार्डो डीकाप्रियो, मॅट डेमन तसेच मार्क व्हॉलबर्ग हे कसलेले अभिनेते होते. जॅक निकेल्सन यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपटांत मुख्य आणि साहाय्यक भूमिका केल्या आहेत. यामध्ये विनोदी, विडंबनात्मक विनोदी अशा विविध भूमिकांचा समावेश होतो. तसेच नायक आणि खलनायकांच्या भूमिकादेखील त्यांनी केल्या. अभिनयाचे विविध पैलू या भूमिकांमधून त्यांनी सादर केले. त्यामुळेच आज जगातील श्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते.

सुप्रसिद्ध अभिनेते मार्लन ब्रँडो हे जॅक निकोल्सनचे जवळचे मित्र होते. ते दोघेही बेव्हर्ली हिल्स येथे शेजारी राहत असत. पुढे ब्रँडो यांच्यानंतर त्यांचा बंगला जॅक यांनी मित्राची आठवण म्हणून विकत घेतला.

जॅक निकोल्सन यांना ६० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत १२ ऑस्कर नामांकने मिळाली आहेत. हॉलीवूडमधील सर्वाधिक ऑस्कर नामांकनाचा हा एक विक्रम आहे. तसेच १९६० ते २००० मधील प्रत्येक दशकात अभिनयासाठी ऑस्कर नामांकन मिळवणारे ते अभिनेते आहेत. त्यांच्याबरोबरीने मायकल केन यांनीही अशी नामांकने मिळालेली आहेत. १२ ऑस्कर नामांकनांपैकी ३ ऑस्कर पुरस्कार निकोल्सन यांनी मिळवले आहेत. त्यातील २ सर्वश्रेष्ठ अभिनेत्यासाठी तर १ सर्वश्रेष्ठ साहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी आहे. याशिवाय त्यांना तीन बाफ्टा पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळालेले आहेत. जगातील श्रेष्ठ अभिनेत्यांच्या यादीत जॅक निकोल्सन यांचे नाव आदराने घेतले जाते.

समीक्षक : गणेश मतकरी