ईद उल्-फित्र : हा मुस्लिम धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे. याला ईद उल्-सगीर असेही म्हटले जाते. हिजरी कालगणनेनुसार नवव्या रमजान महिन्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास केले जातात, ज्यांना रोजे पाळणे असे म्हणतात. रमजानचा पवित्र व शुभ महिना संपल्यावर चंद्रदर्शन होताच शव्वाल ह्या दहाव्या महिन्याचा प्रारंभ होतो. या दिवशी उपवासाचे पारणे फेडले जाते. या दिवसाला ईद अल्-फित्र असे म्हणतात. ‘ईद’ म्हणजे आनंद किंवा खुशी. फित्र हे ‘फित्रा’चे छोटे स्वरूप आहे. फित्रा हे प्रचलित, वापरात असलेल्या अंदाजे दोन किलो दान करण्यासाठी काढलेल्या धान्याचा हिस्सा असतो. ईदपूर्वी एक दिवस हा फित्रा परिसरातील गोरगरिबांना दिला जातो. याचा हेतू हाच की, दुसऱ्या दिवशी ईदच्या नमाजीला जाताना त्यांनी उपाशी पोटी न जाता खाऊन-पिऊन जावे. हा फित्रा कुटुंबातील प्रत्येक जीविताच्या वतीने कुटुंबप्रमुखाने स्वतः लाभार्थीच्या घरी जाऊन, त्याची अस्मिता न दुखावता, दिला पाहिजे. किमान एक फित्रा एका लाभार्थीला देणे अपेक्षित असून गरजेनुसार त्यात वाढ करता येते. माणसाने आनंद साजरा करताना बेफाम होऊन पैशाची उधळपट्टी न करता आपल्या आनंदात परिसरातील दु:खी, गरजू, दुर्लक्षित लोकांना सहभागी करून घेण्यात खरा आनंद आहे, ही इस्लामची शिकवण आहे. थोडक्यात ईद उल्-फित्र म्हणजे फित्रा वाटप करण्याचा आनंदाचा दिवस होय.
या ईदपेक्षा बकरी ईद मोठ्या प्रमाणात साजरी करत असल्याने तिला मोठी ईद आणि रमजान ईदला लहान ईद म्हणतात. या प्रसंगी यथाशक्ती गरजूंना दानधर्म करतात म्हणून हिला ‘ईदुस्सदका’ असे म्हणतात. ‘सदका’ या शब्दाचा अर्थ ओवाळून टाकणे असा आहे.
इस्लाममध्ये ज्या व्यक्तीकडे साडेसात तोळे सोने, वर्षभर शिल्लक आहे त्याला एकूण मालमत्तेच्या अडीच टक्के रक्कम ‘जकात’ या अनिवार्य दानाखाली आठ प्रकारच्या गरजू लोकांना (विधवा, वाटसरू, गरजू विद्यार्थी, आई वडिलांचे छत्र हरवलेली प्रौढत्वास न पोहोचलेली व्यक्ती, कर्जाने जर्जर व्यक्ती, इ.) देण्याची प्रथा आहे. हे फक्त वर्षातून एकदा द्यावयाचे असते. या व्यतिरिक्त वर्षभर जे दान स्वखुशीने (सिदके दिल से) दिले जाते, त्याला ‘सदका’ असे म्हणतात. लोकांच्या सोयीकरिता एखाद्याने पिण्याच्या पाण्याची सोय केली, तर त्याला ‘सदका’ असे म्हणतात.
या प्रसंगी विविध प्रकारे आनंद साजरा केला जातो. दानधर्म करणे, प्रार्थना करणे अथवा नमाज पढणे, गोडधोडाचे जेवण करणे आणि नातेवाईक, मित्रमंडळींना भेटणे असा कार्यक्रम या दिवशी असतो. या दिवशी सकाळी स्नान करतात. त्यानंतर आपापल्या इच्छेनुसार कपडे, धान्य किंवा पैसे या रूपात खैरात अर्थात दानधर्म करतात. दानधर्म केल्यावरच प्रार्थनेची अनुमती मिळते. दानानंतर उपवास सोडला जातो. या दिवशीच्या पक्वान्नात खारका, खजूर, द्राक्षे, शेवया (शीरखुर्मा) यांचा समावेश असतो. नंतर नवीन वस्त्र परिधान करून प्रार्थनेसाठी बाहेर पडतात. ही प्रार्थना सकाळच्या वेळेत केली जाते. या दिवशी विशेष प्रार्थना केली जाते. या प्रार्थनेला ‘सलत’ असे म्हटले जाते. यामध्ये दोन भाग असतात. प्रार्थना सामान्यत: गावातील किंवा गावाबाहेरील मोठ्या मोकळ्या पटांगणावर केली जाते. या जागेला ‘ईदगाह’ असे म्हटले जाते. प्रार्थना संपल्यावर ती चालविणारा मुख्य इमाम ‘खुत्बा’ पढतो. खुत्बा म्हणजे कर्तव्यांचा उपदेश. या उपदेशानंतर सर्वजण अल्लाहकडे अर्थात ईश्वराकडे आपल्या सर्वतोपरी कल्याणासाठी मागणे मागतात, ज्याला ‘मुनाजात’ असे म्हणतात. ते झाल्यावर इमाम ‘आमीन’ म्हणजेच ‘शांती असो’ असे म्हणतात. हा प्रार्थनेचा कार्यक्रम संपल्यावर सर्वजण एकमेकांना आलिंगन देऊन/मिठ्या मारून भेटतात आणि ‘ईद मुबारक’ अर्थात ‘ही ईद तुमच्यासाठी आनंददायी असो’ असे म्हणून एकमेकांना शुभेच्छा देतात. नंतरच्या दिवसभरात परिचितांसह मेजवान्या, मित्र नातेवाईकांच्या भेटीगाठी, असा आनंदोत्सव केला जातो.
संदर्भ :
- अमीन सय्यद अहंमद, इस्लाम, सांगली, १९६९.
- जोशी, श्रीपाद, मुस्लीम सण आणि संस्कार, पुणे, १९६२.
- सूर्यवंशी, अ. प. अनु. इस्लामची जीवनपद्धती, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९७६. (मूळ लेखक व ग्रंथनाम–शरीफ जफर, कानून-इ-इस्लाम).
समीक्षक : गुलाम समदानी