मध्य आशियातील कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या दोन देशांत विस्तारलेला समुद्र. याला अरल सरोवर म्हणूनही ओळखले जाते. कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या दोन देशांची सरहद्द या समुद्रातून गेली असून समुद्राचा उत्तर भाग कझाकस्तानात, तर दक्षिण भाग उझबेकिस्तानात आहे. एकेकाळी हा मध्य आशियातील सर्वांत मोठा, तर जगातील चौथ्या क्रमांकाचा मोठा खंडांतर्गत समुद्र होता. आज मात्र या समुद्राचा बहुतांश भाग कोरडा पडलेला आहे. तुलनेने हा समुद्र उथळ आहे. अरलच्या उत्तरेस स्टेपचा गवताळ प्रदेश, पश्चिमेस उश्तउर्तचा पठारी प्रदेश, दक्षिणेस खिवा हा सुपीक प्रांत आणि पूर्वेला किझिलकुम हे वाळवंट आहे. अमुदर्या आणि सिरदर्या या अरल सरोवराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन प्रमुख नद्या असून समुद्रातून कोणताही प्रवाह बाहेर पडत नाही. तुर्कीक आणि मंगोलिक भाषेत अरल (Aral) म्हणजे बेट (Island) किंवा द्वीपसमूह (Archipelago). या समुद्रात सुमारे १,१०० पेक्षा अधिक बेटे आहेत. त्यावरूनच अरल समुद्र (Sea of Islands) हे नाव पडले असावे. अरलच्या पश्चिमेस २८२ किमी.वर कॅस्पियन समुद्र असून एकेकाळी तो याला जोडलेला असावा.
नीओजीन कालखंडाच्या अखेरीस सुमारे २३ ते २.६ द. ल. वर्षांपूर्वी या समुद्राच्या जागेवरील खळगा निर्माण झाला. या प्रक्रियेच्या कालखंडातच सिरदर्या नदीमुळे या समुद्राचा अंशत: भाग पाण्याने भरला. प्लाइस्टोसीन युगाच्या सुरुवातीस आणि मध्यात (सुमारे २.६ द. ल. ते ११,७०० वर्षांपूर्वी) हा खळगा कोरडा पडला. त्यानंतर प्लाइस्टोसीन युगाच्या अखेरीस आणि होलोसीन युगाच्या सुरुवातीस (सुमारे ११,७०० वर्षांपूर्वी) कॅस्पिअन समुद्राला मिळणाऱ्या अमुदर्या नदीने पहिल्यांदा आपला प्रवाहमार्ग बदलून ती अरल समुद्राकडे वाहू लागली. त्यामुळे पुन्हा अरल समुद्रातील पाणीसाठा वाढला. त्यानंतर इ. स. पू. तिसऱ्या ते पहिल्या शतकातील कोरडी स्थिती वगळता अमुदर्या व सिरदर्या या दोन्ही नद्यांनी १९६० च्या दशकापर्यंत या समुद्रातील पाण्याची पातळी उच्च राखली.
अरल सरोवराच्या परिसरात आणि अमुदर्या-सिरदर्या या नद्यांच्या खोऱ्यांतील हवामान वाळवंटी आहे. खंडांतर्गत स्थानामुळे दैनिक तापमानकक्षा जास्त असते. थंड हिवाळे, उष्ण उन्हाळे आणि अल्प पर्जन्य ही येथील हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान केवळ १० सेंमी. असून तो प्रामुख्याने वसंत आणि शरद ऋतुंमध्ये पडतो. या समुद्रातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा नेहमीचा वेग पाहिला, तर हे पर्जन्यमान अगदी नगण्य आहे. तरीही दोन्ही नद्यांमुळे १९६० च्या दशकापर्यंत समुद्रातील पाण्याची पातळी कायम राहत असे.
प्राकृतिक बदल आणि सागराचा ऱ्हास : सन १९६० मध्ये अरल समुद्रातील पाण्याची पातळी स. स.पासून ५३ मीटर आणि जलव्याप्त क्षेत्र ६८,६८० चौ. किमी. होते. त्या वेळी समुद्राचा उत्तर-दक्षिण कमाल विस्तार सुमारे ४३५ किमी. आणि पूर्व-पश्चिम विस्तार सुमारे ३०० किमी. होता. सागराची सरासरी खोली तुलनेने कमी म्हणजे १६ मी. इतकी असली, तरी पश्चिम भागात ती जवळजवळ ६९ मी.पर्यंत होती. या समुद्रात काही उपसागर होते. सखल आणि अनियमित असलेल्या पूर्व किनाऱ्याचे उत्तर भागातील मूळ स्वरूप सिरदर्या नदीच्या विस्तृत त्रिभुज प्रदेशामुळे बदलले गेले आहे. त्याचप्रमाणे अगदी दक्षिण किनाऱ्यावर अमुदर्या नदीचा विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. समुद्राचा अखंड पश्चिम काठ उश्तउर्त पठाराने सीमित केलेला आहे.
सन १९६० पासून अमुदर्या आणि सिरदर्या या नद्यांचे पाणी शेतीच्या सिंचनाकडे वळविण्यास सुरुवात होऊन दिवसेंदिवस या समुद्रातील पाण्याच्या पातळीत नाट्यमय रित्या घट होण्यास सुरुवात झाली. त्या वेळी येथील प्रदेशावर सोव्हिएट युनियनची सत्ता होती. सोव्हिएट युनियनच्या शासनाने अमुदर्या, सिरदर्या आणि त्यांच्या उपनद्यांच्या पाण्याचा उपयोग करून सांप्रत कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान व मध्य आशियातील इतर प्रदेशांतील कुरणांखालील, वाळवंटाखालील आणि लागवडीखाली नसलेल्या फार मोठ्या क्षेत्राचे रूपांतर बागायती शेतीत केले. त्यामुळे येथे तांदूळ, तृणधान्ये, कलिंगड, कापूस इत्यादी पिकांची शेती भरभराटीस आली. कापूस या नगदी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होऊन त्याची मोठ्या प्रमाणावर निर्यातही होऊ लागली. परिणामत: या नद्यांचे अरल समुद्राला मिळणारे पाणी कमी होऊ लागले. १९८० च्या दशकातील उन्हाळ्यात दोन्ही नद्या अरल समुद्राला मिळण्यापूर्वीच कोरड्या पडत होत्या. त्यामुळे समुद्राला मिळणारे पाणी अधिकच कमी झाले. त्याबरोबरच बाष्पीभवनामुळे समुद्रातील पाण्याची पातळी आणि समुद्राच्या विस्तारात प्रचंड वेगाने घट होत गेली.
सातत्याने समुद्र मागे हटत जाऊन १९८९ मध्ये दक्षिणेकडील ‘ग्रेटर सी’ आणि उत्तरेकडील ‘लेसर सी’ असे या समुद्राचे दोन स्वतंत्र भाग निर्माण होऊन त्या प्रत्येकाची लवणता १९५० च्या दशकातील लवणतेच्या तुलनेत जवळजवळ तिप्पट वाढली. १९९२ मध्ये दोन्ही भागांचे मिळून सागरी क्षेत्र ३३,८०० चौ. किमी.पर्यंत कमी होऊन पाण्याची सस.पासूनची पातळी १५ मीटरने घटली. सभोवतालच्या प्रदेशातील शासनकर्त्यांनी अमुदर्या व सिरदर्या या नद्यांचे प्रवाह आणि अरल समुद्रातील पाण्याची पातळी कायम ठेवण्याच्या दृष्टीने सागराच्या दक्षिण आणि पूर्व भागात कमी पाण्यावरील शेतीचे धोरण अवलंबिले. या धोरणामुळे काही प्रमाणात पाण्याचा वापर कमी होऊन अधिक पाणी समुद्राला मिळू लागले; परंतु अपेक्षेइतका पाण्याचा वापर कमी न झाल्याने सागरजलाची अपेक्षित पातळी ठेवता आली नाही. अरल समुद्राचे अस्तित्व टिकविण्याच्या प्रयत्नांसाठी १९९४ मध्ये या प्रदेशातील सर्व देशांनी मिळून एक संयुक्त समिती स्थापन केली; परंतु एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या या राष्ट्रांमध्ये याबाबतीत कोणत्याही योजनेवर एकमत व सहकार्य होऊ शकले नाही.
विसाव्या शतकाच्या अखेरीस समुद्र आणखी मागे हटत गेल्यामुळे त्याचे तीन भाग पडले. ‘ग्रेटर सी‘चे पश्चिम व पूर्व असे दोन भाग झाले. त्यांतील पश्चिम भाग लांब व अरुंद, तर पूर्वेकडील भाग मोठा व रुंद झाला. उर्वरित उत्तरेकडील ‘लेसर सी‘ तसाच राहिला. काही वेळा मधला लहान आकाराचा वेगळा चौथा भाग मानला जातो. १९६० ते १९९८ या कालावधीत समुद्राच्या पृष्ठभागाचे क्षेत्र ६० टक्क्यांनी, त्यातील पाण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी आणि सस.पासूनची पाण्याची पातळी ३६ मी.पर्यंत घटली. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस समुद्राचे पाणी फारच कमी होऊन बिकट समस्या निर्माण झाली. जागतिक बँकेने सिरदर्या नदीवर कोक-अरल हे धरण बांधण्यासाठी निधी दिला. समुद्राचा उत्तर भाग (लेसर सी) वाचविणे हा त्यामागचा उद्देश होता. हे धरण २००५ मध्ये बांधून पूर्ण झाले. या धरणामुळे उत्तर भागात अगदी काही प्रमाणतच पाणी वाढले. तसेच दक्षिणेकडील पूर्व व पश्चिम हे दोन्ही भाग मात्र आटतच राहिले. २०१४ मध्ये ‘नासा’ ने घेतलेल्या उपग्रहीय छायाचित्रात असे आढळले की, आधुनिक इतिहासात पहिल्यांदा अरल समुद्राची पूर्वेकडील द्रोणी पूर्णपणे कोरडी पडली होती. आज या पूर्व द्रोणीला अरलकुम वाळवंट म्हणून संबोधले जाते. अशाप्रकरे जगातील एखाद्या मोठ्या समुद्राचे अस्तित्व संपुष्टात येणे हा शास्त्रज्ञांच्याही कुतुहलाचा विषय बनला आहे.
समस्या : अरल समुद्राच्या ऱ्हासामुळे परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. स्थानिक हवामान बदलले गेले. उन्हाळे व हिवाळे अधिक तीव्र आणि नुकसानकारक बनले आहेत. समुद्रातील पाण्याची लवणता आणि त्यातील खनिजद्रव्यांचे प्रमाण वाढल्यामुळे माशांचे अस्तित्व नष्ट झाले आहे. एकेकाळी येथे मोठ्या प्रमाणावर चालणारा मासेमारी व्यवसाय संपुष्टात आला आहे. उघड्या पडलेल्या समुद्राच्या तळावरून मीठ, खते आणि कीटकनाशकयुक्त धुळीची वेगवान वादळे वाहू लागली आहेत. किनाऱ्यावरील बंदरे सध्याच्या किनाऱ्यापासून बरीच दूरवर राहिली आहेत. अरल (कझाकस्तान) व मूईनाक (उझबेकिस्तान) ही येथील प्रमुख शहरे आहेत. परिसरातील लोकसंख्या घटली असून राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. बदललेल्या पर्यावरणामुळे श्वसनाचे विकार, कर्करोग, रक्तक्षय, डोळ्यांचे व मूत्रपिंडाचे विकार वाढले आहेत. जगातील सर्वाधिक बालमृत्युमान असणाऱ्या प्रदेशांपैकी हा एक आहे. बेरोजगारी वाढली असून लोकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. येथील परिसंस्था संपुष्टात आल्या आहेत. एकूणच येथील नैसर्गिक पर्यावरणात झालेले बदल म्हणजे ही एक पर्यावरणीय शोकांतिका ठरली आहे.
अरल समुद्रात एक हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाची सुमारे अकराशेवर बेटे विखुरलेली आहेत. पाण्याअभावी समुद्राचा आकार जसजसा मागे हटत गेला, तसतशी ही सर्व बेटे मुख्य भूमीला जोडली गेली. त्यांपैकी फॉझ्रॉझदेन्या हे एक महत्त्वाचे बेट आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस या समुद्राच्या पाण्याची पातळी इतकी कमी होत गेली की, फॉझ्रॉझदेन्या हे बेट मुख्य भूमीचे द्वीपकल्प बनले. त्यामुळे मुख्य भूमीवरून या बेटावर सहज जाणे शक्य होऊ लागले. इ. स. १९४८ मध्ये या बेटावर सोव्हिएट युनियनने जैविक अस्त्रांवर संशोधन करणारी प्रयोगशाळा स्थापन केली होती. शीतयुद्धाच्या काळात (इ. स. १९४७ – १९९१) येथे जैविक अस्त्रांच्या गुप्त चाचण्या घेतल्या जात. त्याशिवाय येथे गाठीचा प्लेग आणि पाश्चुरेला ट्युलारेन्स या जंतूमुळे होणारा ट्युलारेमिया हा तीव्र सांसर्गिक ज्वर (Tularemia) या सांसर्गिक रोगांसंबंधी संशोधन केले जात होते. १९८० च्या दशकात संसर्गजन्य काळपुळी रोगाचे हजारो टन जीवंत सूक्ष्मजंतू आणि त्यांचे बीजकण या ठिकाणी सापडले होते. २००२ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या एका कामगार संघाने येथील जमिनीत जे जे घटक, जेथे जेथे गाडले होते त्या जागा स्वच्छ करून घेतल्या.
समीक्षक : माधव चौंडे