म्यानमारच्या (ब्रह्मदेशाच्या) पश्चिम भागातील एक पर्वतरांग. तिला आराकान योमा किंवा राकीन योमा किंवा राकीन पर्वत या नावांनीही संबोधले जाते. पश्चिमेकडील राकीन (आराकान) किनारा आणि पूर्वेकडील इरावती नदीचे खोरे यांदरम्यान ही पर्वतरांग दक्षिणोत्तर गेलेली असून ती सामान्यतः बंगालच्या उपसागर किनाऱ्याला समांतर आहे. तिचे काही फाटे समुद्रापर्यंत गेलेले आहेत. आराकान पर्वताची सरासरी उंची १,८०० मी. पर्यंत असून मौंट व्हिक्टोरिया (कॉनू एम्संग) या सर्वोच्च शिखराची उंची ३,०९४ मी. आहे. दक्षिणेस केप नेग्राईस भूशिरापासून उत्तरेस भारतीय भूमीपर्यंत या रांगांचा विस्तार झालेला आहे. आराकान पर्वताच्या उत्तरेस आराकान टेकड्या, चिन टेकड्या, मिझो (लुशाई), नागा, पातकई टेकड्या इत्यादी डोंगराळ भाग आहेत. काही लोक हा डोंगराळ भाग आराकान पर्वताचाच भाग समजतात. या पर्वतश्रेणीची उत्तरेकडील टेकड्यांसह एकूण लांबी ९५० किमी. असून खुद्द आराकान श्रेणीची लांबी ४०० किमी. आहे. दक्षिणेस नेग्राईस भूशिराच्या पलीकडे मार्ताबानचे आखात व अंदमान समुद्र आहे. पश्चिमेस म्यानमारचा चिंचोळा राकीन किनारा व त्या पलीकडे बंगालचा उपसागर आहे. या रांगेमुळे पश्चिम किनार्‍यावरील राकीन राज्य उर्वरित म्यानमारपासून अलग झाले आहे. आराकान पर्वत उंच उंच डोंगर व त्यांमधील खोल दऱ्या यांनी वेढलेला आहे. नेग्राईस भूशिरापासून पुढे दक्षिणेस या पर्वतरांगा सागरमग्न झाल्या असून बंगालच्या उपसागरातील अंदमान समुद्रात त्या अंदमान व निकोबार बेटांच्या रूपाने सागरपृष्ठावर आल्या आहेत.

आराकान योमाचा गाभा स्फटिकयुक्त खडकांचा असून त्याच्या दोन्ही बाजू मुख्यतः तृतीय युगीन, दाट वलीकरण झालेल्या, कठीण गाळखडकांच्या बनलेल्या आहेत. भारतीय भूपट्ट आणि यूरेशियन भूपट्ट यांच्या टकरीतून हिमालयाचे उत्थान झाले, त्याच वेळेस याचेही उत्थान झाले असावे. हिमालयाचाच हा विस्तारित भाग मानला जातो. यात काही ज्यूरासिक क्रिटेशस खडकही आढळतात. क्रिटेशस काळातील सर्पेंटाईन खडक येथील खडकात घुसल्यामुळे पूर्वेकडील बाजूस विभंग झालेले दिसतात. येथे क्रोमाइट व इतर खनिजे आहेत; परंतु ती खणून काढली जात नाहीत. मिन्बू व हेंझाडा विभागातील पायथ्याच्या टेकड्यांच्या भागात थोडा लिग्नाइट कोळसा सापडतो.

मौंट व्हिक्टोरिया (कॉनू एम्संग) शिखर

आराकान पर्वतामुळे एका बाजूस असलेला म्यानमार व दुसऱ्या बाजूस असलेले भारत आणि बांगला देश यांदरम्यानच्या दळणवळणाच्या दृष्टीने मोठाच अडथळा उत्पन्न झालेला आहे. येथील नद्या दक्षिणोत्तर वाहतात. त्यांपैकी कलदन, लेमरो, मयू व नाफ या प्रमुख होत. त्या शेवटी एकदम वळण घेऊन बंगालच्या उपसागरास मिळतात. त्यांच्या उगमप्रवाहांनी डोंगराळ भागातून काढलेल्या वाटा आधुनिक दळणवळणास उपयोगी नाहीत. दक्षिणेकडे आनपासून अन्गपेपर्यंत व आराकान राज्याच्या अगदी पश्चिम भागातील तौन्गूपासून इरावती नदीच्या काठावरील प्यायपर्यंत जाणारे रस्ते या पर्वताला जेथे ओलांडून जातात, तेथेच फक्त यातील दोन उपयुक्त खिंडी आहेत. या दुर्गमतेमुळे आराकान किनार्‍यावर अक्याबखेरीज एकही महत्त्वाचे बंदर उदयास आलेले नाही.

नैर्ऋत्य मान्सून वाऱ्यांच्या मार्गातही आराकान योमा हा मोठाच अडथळा आहे. त्यामुळे त्याच्या पश्चिम उतारावर नैर्ऋत्य मान्सूनपासून २०० ते ५०० सेमी. पर्यंत पाऊस पडतो. पूर्व उतारावर मात्र पर्जन्यछायेमुळे ५० ते १०० सेंमी., क्वचित थोडा अधिक पाऊस पडतो. पश्चिमेकडे ९०० मी. उंचीपर्यंत उष्णकटिबंधीय वर्षावने आढळतात. तेथील वृक्षांचे लाकूड टणक असल्यामुळे ते फारसे उपयोगी पडत नाही. ९०० मी. पेक्षा जास्त उंचीवर सदाहरित ओक वृक्षांची अरण्ये आहेत. क्वचित पाईन, फर, मॅपल हे वृक्ष आढळतात. अधिक उंच गेल्यास ऱ्होडोडेंड्रॉनची बने दिसतात. काही मोकळ्या जागी काटेरी झुडपे व थोडे गवत आढळते. ९०० मी. पेक्षा जास्त उंचीवर दहिवर व क्वचित बर्फही पडते. १०० सेंमी. पेक्षा अधिक पावसाच्या पूर्वेकडील भागात मौल्यवान सागवान वृक्षाचे लाकूड मिळते. पिंकॅडोच्या लाकडाचा उपयोग लोहमार्गाच्या स्लीपर्ससाठी होतो. इमारती लाकडाच्या उत्पादनावर व तोडीवर आता शासकीय नियंत्रण आहे. या डोंगराळ भागात हत्ती, वाघ, अस्वल, गेंडा, हरिण, माकडे इत्यादी प्राणी आढळतात. येथे राहणार्‍या लोकांच्या फिरत्या शेतीमुळे जंगलाचे फार नुकसान झाले आहे. आधीच्या वृक्षांऐवजी बांबूची लागवड झालेली दिसते. जोरदार पावसामुळे अशा ठिकाणी अरण्यमृदेचेही नुकसान होऊन खडक उघडे पडलेले आहेत.

जानेवारी १९४३ ते मार्च १९४४ यांदरम्यान जपानने ब्रह्मदेशावर कब्जा केला होता. त्या वेळी आराकान पर्वतात घनघोर युद्ध झाले होते. त्या वेळी जपानच्या तेहतीसाव्या आणि पंचावनाव्या सैन्य तुकडीला आराकान किनार्‍यावरील ब्रिटिश लष्कराला सामोरे जावे लागले होते. त्यात ब्रिटिश सैन्याचा विजय झाला होता.

या भागात मुख्यतः चिन हे आदिवासी लोक राहतात. ते मूळ ब्रह्मी लोकांपेक्षा वेगळे असून त्यांच्या अनेक भाषा आहेत. ते दूरदूर, लहान लहान वस्त्या करून राहतात. आराकान पर्वतश्रेणीमुळे पश्चिम किनार्‍यावरील राकीन (आराकान) लोकांत भाषिक व सांकृतिक दृष्ट्या ब्रम्ही लोकांपेक्षा वेगळेपण निर्माण झालेले आढळते. येथील किनार्‍यावरील एमरौक यू व वाइथाली ही आराकान संस्कृतीची मध्यवर्ती केंद्रे बनली आहेत. राजकीय दृष्ट्याही राकीन राज्याचे म्यानमारपेक्षा वेगळेपण आढळते. येथील राकीन राज्यात रोहिंग्या मुस्लिमांची संख्या जास्त आहे. ते अल्पसंख्यांक म्हणून गणले जात असून १९८२ च्या म्यानमार राष्ट्रीयत्व कायद्यानुसार रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व नाकारले आहे. तसेच त्यांना शिक्षण व नागरी सेवांमध्ये नोकरी देण्यावर निर्बंध आहेत. स्वातंत्र्य चळवळ करण्यासाठी त्यांना मनाई आहे. भारत, बांगला देश, पाकिस्तान, सौदी अरेबिया, मलेशिया, थायलंड व इतर आग्न्येय आशियाई देशांत रोहिंग्यांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आहे. काही देशांत ते निर्वासित म्हणून राहात आहेत.

समीक्षक : माधव चौंडे

https://www.youtube.com/watch?v=vY-j5E3R9bk