अलास्का पर्वतरांग (Alaska Mountain Range) : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अलास्का राज्यातील वेगवेगळ्या पर्वतरांगांपैकी एक प्रमुख पर्वतरांग. अलास्का हे राज्य उत्तर अमेरिका खंडाच्या वायव्य भागात कॅनडाला लागून आहे. या राज्याच्या दक्षिणमध्य भागात ही पर्वतरांग पसरलेली आहे. अलास्का पर्वतरांग हा उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातील पॅसिफिक पर्वतप्रणालीचाच अतिउत्तरेकडील विस्तारित भाग आहे. या पर्वतरांगेची लांबी ६५० किमी. असून तिची रुंदी कमी आहे. या पर्वतरांगेचा विस्तार राज्याच्या नैर्ऋत्य भागातील अल्यूशन पर्वतरांगेपासून ते कॅनडातील यूकॉन प्रांताच्या आग्नेय भागात असलेल्या व्हाइट नदीपर्यंत झालेला आहे. तिचा विस्तार पश्चिम-पूर्व, परंतु धनुष्याकृती असून पर्वतरांगेच्या साधारण मध्यभागातील बहिर्वक्र बाजू उत्तरेच्या बाजूला वळलेली दिसते. या बहिर्वक्र मध्य भागापासून ही पर्वतरांग नैर्ऋत्येकडे अलास्का द्वीपकल्पाकडे व अल्यूशन पर्वतरांगेकडे पसरत गेली आहे, तर या मध्यभागापासून ती आग्नेयीकडे विस्तारत जाऊन पॅसिफिक महासागराच्या किनारी पर्वतरांगांमध्ये विलीन होते. पर्वतेरांगेच्या मध्यवर्ती भागात अल्पाइन टंड्रा आणि तैगा अरण्यांचा निसर्गरम्य भाग असलेले दनाली राष्ट्रीय उद्यान आहे. याच नैसर्गिक उद्यान परिसरात अलास्का पर्वतरांगेतील आणि उत्तर अमेरिकेतील दनाली (मौंट मॅकिन्ले) हे सर्वोच्च (उंची ६,१९० मी.) शिखर आहे. या पर्वताच्या मध्यवर्ती भागातच दनाली गिरिपिंड असून त्याच्याभोवती अलास्का पर्वतरांगेतील सर्वाधिक उंचीची शिखरे आढळतात. दनालीच्या नैर्ऋत्येस असलेले फॉरिकर (उंची ५,३०४ मी.) हे संयुक्त संस्थानीतील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर त्यांपैकीच एक आहे. त्याशिवाय ४,००० मी. पेक्षा अधिक उंचीची इतर अनेक शिखरे तेथे आहेत. उदा., मौंट हंटर, स्टीव्हन्झ, सिल्व्हरथ्रोन, हेझ इत्यादी. आशिया खंडाच्या बाहेरचा आणि अँडीज पर्वतरांगेव्यतिरिक्त अलास्का हा सर्वाधिक उंचीचा पर्वत आहे.

दनाली (मौंट मॅकिन्ले) शिखर.

अलास्का पर्वतरांगेच्या उत्तरेकडील भागाचे जलवाहन यूकॉन आणि कुस्कोक्वीम या प्रमुख नद्यांनी, तर दक्षिण भागाचे जलवाहन अनेक प्रवाहांनी केले असून ते प्रवाह शेवटी पॅसिफिक महासागराच्या अलास्का आखाताला जाऊन मिळतात. या पर्वतरांगेला छेदून जाणाऱ्या चार प्रमुख नद्यांपैकी डेल्टा व नीनॅना या नद्या मध्य भागातून, तर नबेस्ना आणि चीसाना या पूर्व भागातून वाहतात. हवामानाच्या दृष्टीने हा पर्वत म्हणजे एक प्रमुख अडसर ठरला असून त्यामुळे अंतर्गत भागातील टंड्रा प्रदेश पॅसिफिकच्या किनारी प्रदेशापासून वेगळा झाला आहे. अलास्का आखाताकडून उत्तरेकडे वाहत येणारे बाष्पयुक्त वारे अलास्का पर्वतरांगेला अडविले जातात. त्यामुळे या भागात जगातील अत्यंत वाईट प्रकारचे हवामान निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे अनेक हिमनद्यांची निर्मिती या भागात झाली आहे.

अलास्का पर्वतरांग हा पॅसिफिक अग्निकंकणचा एक भाग आहे. या पर्वतरांगेच्या दक्षिणेला लागून पसरलेला दनाली प्रस्तरभंग हा अनेक प्रमुख भूकंपांच्या निर्मितीचे कारण ठरला आहे.
अल्यूशन ज्वालामुखीय कमानीच्या ईशान्य टोकावर मौंट स्पर नावाचा ज्वालामुखी असून त्याची दोन ज्वालामुखी कुंडे आहेत. अलास्का पर्वतरांगेच्या काही भागात राष्ट्रीय उद्यानांमुळे हा भाग संरक्षित झाला आहे. त्यात प्रामुख्याने रँगल-सेंट इलाइअस राष्ट्रीय उद्यान, दनाली राष्ट्रीय उद्यान, क्लार्क राष्ट्रीय उद्यान इत्यादी संरक्षित उद्यानांचा समावेश होतो.

अलास्का पर्वतरांगेतील उंच शिखरे गिर्यारोहकांना आव्हान ठरतात. तसेच अवाढव्य हिमनद्या आणि विलोभनीय आर्क्टिक सृष्टीसौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतात. अलास्का पर्वतातील इझाबेल खिंडीतून  ट्रान्स-अलास्का ही पाईपलाईन टाकलेली असून तिच्याद्वारे उत्तर अलास्कातील प्रधो उपसागरात असलेल्या खनिजतेल क्षेत्रातील तेल दक्षिणेस १,३०० किमी. वर असलेल्या व्हॅल्डीझ या बंदरापर्यंत आणले जाते.

समीक्षक : वसंत चौधरी