सामाजिक मानसशास्त्रातील एक महत्त्वाची विचारपद्धती. समाजात वावरत असताना इतर व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह यांच्याशी आपला संपर्क येत असतो. परस्परांचा सहवास व निर्माण होत असलेले नातेसंबंध यांमुळे त्यांच्याशी आंतरक्रिया (interactions) होत असतात. व्यक्ती वा व्यक्तीसमूह यांची विलक्षण कार्यपद्धती, कौशल्ये, प्रेरणामूल्ये इत्यादींचा एकमेकांवर प्रभाव पडत असतो. सामाजिक प्रभावांचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यांतील एक म्हणजे ‘अनुपालन’. इतर लोकांच्या कृतीशी जुळवून घेण्यासाठी स्वत:मध्ये बदल करणे म्हणजे अनुपालन होय. त्याचे उत्तम उदाहरण आपल्याला समूह निर्णय-प्रक्रियेत दिसून येते. काही वेळा असे होते, की निर्णय घेताना सर्वांगीण विचार न होता नेत्याला किंवा समूहातील ठराविक व्यक्तींच्या एकांगी विचाराला पुष्टी दिली जाते व चुकीच्या निर्णयाला अनुमोदन दिले जाते. ह्या प्रसंगाला समूहविचार म्हणतात.
ग्रुपथिंक ही संकल्पना प्रथम अमेरिकन पत्रकार विल्यम एच्. व्हाइट (ज्युनि.) यांनी विख्यात इंग्रज कादंबरीकार व समीक्षक जॉर्ज ऑर्वेल यांच्या नाइन्टीन एटीफोर (१९४९) या कादंबरीवरून सुचविली; परंतु अमेरिकन मानसशास्त्रज्ञ इरविंग जेनिस यांनी ही संकल्पना १९७२ मध्ये सर्वप्रथम विकसित केली. ते येल विद्यापीठातील संशोधन मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. व्हिक्टिम्स ऑफ ग्रुपथिंक, ए सायकॉलॉजिकल स्टडी ऑफ फॉरिन-पॉलिसी डीसिजन्स अँण्ड फियास्कोज (१९७२) हा त्यांचा समूहविचारविषयक प्रभावी ग्रंथ. त्यात त्यांनी असे मांडले आहे की, समूहविचार हा एकप्रकारचा बोधनिक प्रमाद आहे. ज्यात समूहातील सदस्य समूहाला एकत्रित ठेवण्यासाठी समूहाशी जुळवून घेण्यावर भर देतात. ही एक अशी मानसिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये निर्णय घेताना महत्त्वाच्या तपशीलाचा विचार सदस्य करत नाहीत. त्यामुळे निर्णय चुकतो आणि दुर्दैवी घटना घडते. जेनिस यांनी ह्यासाठी ‘बे ऑफ पिग्स’ (कॅस्ट्रो यांच्या क्यूबावर अमेरिकेचे अयशस्वी आक्रमण – १९६१) व पर्ल हार्बरवरील जपानी आक्रमण (१९४१) याचे उदाहरण दिले आहे.
जेनिस यांच्या मते समूहविचार पुढील कारणांमुळे होतो : सदस्यांमधील संलग्नता, सामर्थ्यशाली नेतृत्व, बाह्यमताचा विचार न करणे, इतर पर्यायांचा विचार व मूल्यमापन करण्याची यंत्रणा नसणे, तणाव किंवा बाह्य धोके इत्यादी. त्यांनी असेही म्हटले आहे की, समूहविचार करणाऱ्या गटाची वैशिष्ट्ये म्हणजे समूहाला ते अभेद्य आहेत असे वाटणे, त्यांची बाजू नैतिकतेची वाटणे, आव्हाने न ओळखता स्वत:ची बाजू युक्तिवादाने पटवून देणे, सदस्यांकडून शंका किंवा विरोधी मत न नोंदविणे, विरोधी सदस्याला जुळवून घेण्यास दबाव टाकणे, समूहात एकमत असल्याचा आभास असणे. अशा वैशिष्ट्यांमुळे समूहातील सदस्य त्यांच्याकडे असलेल्या पर्यायांचा विचार करत नाहीत किंवा त्यांच्याकडून ती कृती होत नाही, निवडलेल्या पर्यायांमधील धोक्यांचे साकल्यपूर्ण मूल्यमापन होत नाही, अधिक माहितीचा शोध घेतला जात नाही, असलेल्या माहितीची पूर्वग्रहदूषितपणे तपासणी केली जाते तसेच पर्यायी योजनेचे नियोजन केले जात नाही.
समीक्षण : मनीषा पोळ