हा भावनेचा बोधनिक सिद्धांत आहे. भावनांच्या अभ्यासाविषयी जी मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत त्यांना भावनेचे सिद्धांत म्हणतात. भावनेचे विविध सिद्धांत विविध घटकांवर भर देतात. भावनेच्या बोधनिक घटकांवर भर देणाऱ्या सिद्धांताचे असे प्रतिपादन आहे की, बोधनिक घटक हा नेहमीच भावनांचा महत्त्वाचा भाग असतो. कारण प्रेम असो की तिरस्कार, आनंद असो की दु:ख सर्व भावनांनुभवांकरिता विचार जबाबदार असतात.

स्टॅन्ले शाक्ख्टर (Stanley Schachter) व जेरोम सिंगर (Jerome singer) या मानसशास्त्रज्ञांनी १९६२ साली भावनेचा हा सिद्धांत मांडला. या सिद्धांतास भावनेचा द्विघटक सिद्धांत (Two Factor Theory) असेही म्हणतात. कारण यामध्ये दोन निर्धारक घटक भावना निश्चित करतात. ते पुढीलप्रमाणे –

१. शरीरशास्त्रीय उद्दीपन व २. त्या उद्दीपनास दिलेले बोधनिक नाव.

या सिद्धांतात असे प्रतिपादन केले आहे की, व्यक्ती जेव्हा शारिरीक उद्दीपन अनुभवते. तेव्हा ते कशामुळे निर्माण झाले हे समजून घेण्यासाठी परिस्थितीजन्य सूचकांची ती मदत घेते व त्यानुसार भावना कोणती ते ठरवते. उदा., एकसारखे शारीरिक उद्दीपन दोन व्यक्तींना दिले, तरीही स्वत:ला क्रोध आला, की आनंद झाला हे दोन्हीही व्यक्ती समोर असलेल्या परिस्थितीचा ते कसा अर्थ लावतात यावर ठरते. हेच आणखी वेगळ्याप्रकारे असे सांगता येईल की, आपले शरीर थरथरायला लागले किंवा आपल्याला आतून तसे जाणवायला लागले की, आपण त्या थरथरण्याचा अर्थ भीती असा लावला की आपणास भीतीचा अनुभव येईल आणि त्याच थरथरण्याचा अर्थ आपण राग असा लावला की आपणास राग या भावनेचा अनुभव येईल.

व्यक्ती विशिष्ट प्रसंगी विशिष्ट भावनेचा अनुभव संगतवार कसा घेते. हे पुढीलप्रमाणे दर्शविता येईल.

या सिद्धांतास पुढीलप्रमाणे केलेल्या प्रयोगाच्या फलितांद्वारे पुष्टी मिळाली. सर्व प्रयुक्तांना एपिनेफ्राइनचे अंत:क्षेपण (इंजेक्शन) दिले. या औषधामुळे रक्तदाब वाढणे, हात आणि पाय यांची थरथर होणे व हृदयाची गती वाढणे हे बदल होतात. काही प्रयुक्तांना हे माहीत होते, तर काहींना ते जीवनसत्त्वाचे (व्हिटॅमीन) औषध आहे, असे सांगितले गेले. ह्यांपैकी काही प्रयुक्तांकरिता आनंदी परिस्थिती निर्माण केली, तर काही प्रयुक्तांकरिता दु:खी परिस्थिती निर्माण केली गेली. एपिनेफ्राइन या औषधामुळे निर्माण होणाऱ्या उत्तेजनेचा, ज्या प्रयुक्तांना याबाबतीत अगोदरच माहिती दिलेली होती, ते योग्य अर्थ लावू शकतील; पण ज्या प्रयुक्तांना याबाबत कल्पना नव्हती, ते मात्र जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याप्रमाणे आपल्या भावना व्यक्त करतील. असा संशोधकांचा अभ्युपगम ( संशोधकांनी संशोधनाची दिशा ठरविताना मांडलेले निष्कर्ष तपासावयाचे विधान) होता. प्रयोगाच्या फलितांनी त्यास पुष्टी मिळाली. म्हणजेच समान स्वरूपाची शारीरिक उत्तेजना मिळाली असली, तरी प्रयुक्तांनी मात्र संदिग्ध परिस्थितीत मिळालेल्या सूचकांनुसार वेगवेगळे अर्थ लावले होते.

संदर्भ :

  • Morgan, C.T.; King, R.A., Weisz, J.R. ; Schopler, J., Introduction to Psychology, 7th  Ed., New Delhi, 1994.
  • Santrock, John W., Psychology , 7th Ed., 2003.

समीक्षक : माधव चौंडे