गट ग्रामपंचायत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम, ५ प्रमाणे, प्रत्येक गावात एक पंचायत असेल. ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठी गावाची लोकसंख्या किमान ६०० इतकी असावी लागते. ज्या गावांची लोकसंख्या सहाशे पेक्षा कमी आहे अशा दोन किंवा अधिक लहान गावांसाठी एकच ग्रामपंचायत असेल, अशा ग्रामपंचायतीला गट ग्रामपंचायत म्हणतात. शासन अध्यादेशाद्वारे महसुली गावांचा एक गट तयार करते आणि  त्यास गाव म्हणून जाहीर करते. अशा गावांसाठी एकच गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते.

पुरेशी लोकसंख्या नसलेल्या गावात स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे, सोयीचे नसल्यामुळे अशा प्रकारची तरतूद करण्यात आली आहे. गट ग्रामपंचायतीत समाविष्ट केलेल्या गावांपैकी जे गाव लोकसंखेच्या दृष्टीने मोठे असेल, त्याच गावाचे नाव गट ग्रामपंचायतीला दिले जाते. गट ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक गावाच्या विकासावर लोकसंख्येच्या प्रमाणात उत्पनातील खर्च करावा लागतो. लोकसंख्यावाढ अथवा इतर कारणामुळे गट ग्रामपंचायतीचे विघटन करण्याचा अधिकार शासनाला आहे. शासन असे विघटन करून, त्यातील एका किंवा काही गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करू शकते.

संदर्भ : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८