पसंतीनुसार मतदान पध्दत : भारतामध्ये गुप्तमतदान पध्दतीच्या निवडणुकीमध्ये दोन निवडणूक पध्दतींचा अवलंब केल्याचे दिसून येते, एक पध्दतीमध्ये उमेदवाराच्या नावापुढे / चिन्हापुढे फुली मारून मतदान केले जाते. ही मतदानाची पध्दत सर्वसामान्य जनतेला ज्ञात आहे. दुसऱ्या निवडणुक पध्दतीमध्ये उमेदवाराच्या नावापुढे पसंतीनुसार १, २, ३, ४, क्रंमाक देऊन मतदान केले जाते. या पसंतीनुसार मतदान पध्दतीमध्ये उमेदवाराचे फक्त नाव मतपत्रिकेवर असते. ही पध्दत नॉर्वे, स्वीडन, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशात वापरली जाते. भारतात पसंतीनुसार मतदान पध्दतीने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य तसेच काही महत्वाच्या पदांच्या निवडणुका घेतल्या जातात. लोकनियुक्त महानगरपालिका, नगरपरिषदा यांच्या विषय समित्यांच्या निवडणुका सन १९६६ च्या कायद्याप्रमाणे पसंतीनुसार मतदान पध्दतीने घेतल्या जातात. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामध्ये कायद्याने या पसंतीनुसार मतदान पद्धतीने त्यांच्या अधिकार मंडळाच्या निवडणुका घेतल्या जातात.
मतमोजणी : पसंतीनुसार मतदान पद्धतीच्या तंत्रात उमेदवार निवडून येण्यासाठी सर्व उमेदवारापेक्षा जास्त मते मिळणे पुरेसे नसते, त्याऐवजी निवडून येण्यासाठी ठराविक मते (कोटा) पूर्ण करणे आवश्यक असते. शिवाय एकाहून अधिक उमेदवार निवडावयाचे असतील तर आवश्यकतेपेक्षा जादा मिळालेली उमेदवारांची मते इतरांना वाटली जातात. या मतांचे वाटप मतपत्रिकेवरील पसंतीनुक्रमाने होत असते. यातून निवडून यावयाच्या उमेदवारांची संख्या कमी असल्यास सर्वात कमी मते असलेल्या उमेदवारांना वगळले जाते आणि वगळलेल्या उमेदवारांची मते पसंतीच्या अनुक्रमाने वाटली जातात. या मतावरून आपणास निवडून आलेल्या उमेदवारांची मतदारांमध्ये असलेली गुणात्मक प्रतिष्ठा दिसून येते.
वैध व अवैध मते : निवडणूक अधिकारी सर्व मतपत्रिका तपासून वैध व अवैध मतपत्रिकांची छाननी करतात. मतपत्रिका अवैध होण्याची कारणे : १) मतपत्रिकेवर १ क्रमांक नसल्यास, २) १ क्रमांक एकाहून अधिक उमेदवारांच्या नावापुढे नोंद केल्यास, ३) मतपत्रिकेवर सही केल्यास, ४) पसंतीचे क्रमांक एकाच अंकात नसल्यास, ५) मतपत्रिकेवर क्रमांकाशिवाय इतर खुणा केल्यास,
उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक मते (कोटा) : कोटा ठरविताना निवडणुकीमध्ये निवडून घ्यावयाच्या उमेदवारांच्या संख्येमध्ये १ अधिक करावा, येणाऱ्या संख्येने एकूण वैध मतास भागावे, येणाऱ्या पूर्णांक संख्येमध्ये १ अधिक करावे, याप्रमाणे येणारी संख्या म्हणजे कोटा होय.
हेअर यांनी सुचविलेले सूत्र :
एकूण वैध मतदान
प्रमाण मतसंख्या = ———————
निवडून द्यावयाच्या प्रतिनिधींची संख्या
ह्या पध्दतीत मतमोजणी करताना प्रथम फक्त सर्व उमेदवारांची पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. एक उमेदवार निवडायचा असेल तर आणि दोनच उमेदवार असतील तर अधिकची मते मिळाली असतील तो उमेदवार निवडून आल्याचे जाहीर केले जाते. दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली असल्यास लॉटरी पद्धतीने दोन्हीपैकी ज्या उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी उचलली जाईल त्या उमेदवारास वगळण्यात येते शिल्लक राहिलेला उमेदवारास निवडून आल्याचे जाहीर केले जाते. दोनपेक्षा अधिक उमेदवार असतील तर आणि मतमोजणीच्या पहिल्या फेरीमध्ये कोणत्याही उमेदवाराला कोटा पूर्ण करण्याएवढी मते मिळाली नसल्यास सर्वात कमी मते असलेल्या उमेदवाराला वगळण्यात येते व त्याच्या मतपत्रिकेतील दोन नंबरची मते इतर उमेदवारांना वाटली जातात आवश्यक कोटा पूर्ण होई पर्यंत मतमोजणीच्या फेऱ्या चालतात.
एक पेक्षा अधिक उमेदवारांची निवड करावयाची असल्यास कोटा पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला निवडून आल्याचे जाहीर केले जाते, कोट्यापेक्षा जास्त मते असल्यास इतर उमेदवारांना वाटप केले जाते, अधिकच्या मतांना निवडून आलेल्या उमेद्वारच्या एकूण मतपत्रिकेने भागल्यास एक मतपत्रिकेची किमत कळते, ही किंमत पूर्णांकामध्ये ठरवावी, सर्वात कमी मते मिळलेल्या उमेदवाराला वगळले जाते व त्याची मते इतर उमेदवारांना वाटली जातात. निवडून द्यावयाचे उमेदवारांना कोटा पूर्ण होईपर्यत मतमोजणीच्या फेऱ्या होतात.
संदर्भ :
- मगदूम, वसंत बापूसाहेब, पसंतीनुसार मतदानपद्धती व मतमोजणी, कोल्हापूर, १९८८,
- व्होरा, पळशीकर, राज्यशास्त्र कोश, दास्ताने प्रकाशन, पुणे, १९८६.