बॅनर्जी, निकुंजविहारी : ( २६ सप्टेंबर १८९७—३१ मार्च १९८२ ). भारतीय तत्त्वचिंतक. पश्चिम बंगालमधील एका खेडेगावी जन्मलेले निकुंजविहारी ह्यांचे शिक्षण कोलकाता विद्यापीठात झाले. ब्रजेंद्रनाथ सील, हिरालाल हल्डर, सुशीलकुमार मैत्र यांसारख्या नामवंत प्राध्यापकांचे ते गुणवंत विद्यार्थी होते. अनेक पदके व बक्षिसे त्यांनी मिळवली.
१९३२ मध्ये लंडन विद्यापीठाची फेलोशिप घेऊन पीएच.डी. ही पदवी त्यांनी जॉन मॅक्मरे यांच्या मार्गदर्शनानुसार कांटप्रणित सेल्फ ह्या विषयावर संशोधन करून मिळवली. पुढील काळात पंजाबमधील महाविद्यालयात व दिल्ली विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले. १९४६ ते १९६३ दरम्यान विद्यापीठात व्याख्याता, प्रपाठक, प्राध्यापक, अधिष्ठाता अशी व्यावसायिक यशाची कमान ते चढत गेले. त्यांच्या प्रेरणेने तत्त्वज्ञान विभागात बौद्ध अध्यासन व मानसशास्त्र ह्या विभागांची स्थापना झाली. ते इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेसचे सचिव व अध्यक्ष होते. निवृत्तीनंतर ते १९६५‒६७ दरम्यान सिमल्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हांस्ड स्टडीमध्ये ‘तत्त्वज्ञान व तौलनिक धर्म’ ह्या विषयाचे प्राध्यापक म्हणून सन्मानपूर्वक दाखल झाले.
१९५५ पासून चीन, जर्मनी, नेदर्लंड्स, ऑस्ट्रेलिया, बल्गेरिया, हंगेरी, पोलंड, ऑस्ट्रिया, इंग्लंड (व पुन्हा ऑस्ट्रेलिया) अशा देशांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली, तसेच द फिलॉसॉफि
कल रिव्ह्यू, द मोनिस्ट, हिबर्ट जर्नल यांसारख्या सुप्रसिद्ध नियतकालिकांतून आपले शोधनिबंध प्रकाशित केले.
विसाव्या शतकात त्यांनी मानववादाचा उद्घोष करणारे तत्त्वज्ञान मांडले. तत्त्वज्ञानात जी तटस्थ, वस्तुनिष्ठ, निःपक्षपाती भूमिका अपेक्षित असते, तिचा अंगीकार त्यांच्या लेखनातून व्यक्त होतो. पूर्वग्रहविरहित दृष्टीने भारतीय तत्त्वज्ञानाकडे पाहिल्यास मानवाला सामर्थ्य प्रदान करण्याची क्षमता प्राचीन साहित्यातून दिसून येते. हे लक्षात आल्याने त्यांनी परंपरेतील कालबाह्य भाग दूर सारत आशा, उमेद, शक्ती, स्फूर्ती, उभारी, प्रेरणा देणारा भाग अखेरपर्यंत अधोरेखित केला. मृत्यूसमयी त्यांच्या ‘द आउटलाइन्स ऑफ जैन एथिक्स अँड रिलिजन’, ‘चैतन्य अँड वैष्णविझम’ आणि ‘नॉलेज, रिझन अँड ह्यूमन ऑटॉनॉमी’ या तीन हस्तलिखितांचे संस्करण पूर्ण झाले होते.
एक समर्पित शिक्षक व मूलगामी प्रगल्भ तत्त्वचिंतक म्हणून त्यांनी लौकिक कमावला. त्यांच्या तत्त्वज्ञानावरील प्रा. मार्गारेट चॅटर्जी ह्यांचा ग्रंथ द फिलॉसॉफी ऑफ एन. व्ही. बॅनर्जी (१९९०) हा संशोधनास पथदर्शी आहे. (या ग्रंथात देवीप्रसाद चटोपाध्याय यांनी डॉ. बॅनर्जी यांच्या बुद्ध व मार्क्सविषयक मतांचा धांडोळा घेतला आहे, तर अ. ग. जावडेकर यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या संकल्पनेचा वेध घेतला आहे).
निकुंजविहारी बॅनर्जी यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : कन्सर्निंग ह्यूमन अडरस्टँडिंग ऑन द कॉमन सेन्स बॅकग्राउंड ऑफ फिलॉसॉफी (१९५८), लँग्वेज, मिनिंग अँड पर्सन्स (१९६३), द कन्सेप्ट ऑफ फिलॉसॉफी (१९६८), ग्लिम्प्सिस ऑफ इंडियन विजडम (१९७१-७२), फिलॉसॉफिकल रिकन्स्ट्रक्शन (१९७३), इंडियन एक्स्पिरिमेंट विथ ट्रुथ (१९७४), कांट्स फिलॉसॉफी ऑफ द सेल्फ (१९७४), द स्पिरिट ऑफ इंडियन फिलॉसॉफी (१९७४), द फ्यूचर ऑफ एज्यूकेशन (१९७६), बुद्धिझम अँड मार्क्सिझम (१९७८), स्टडिज इन द धर्मशास्त्र ऑफ मनू (१९७९-८०), द फ्यूचर ऑफ रिलिजन (१९८४), द भगवद्गीता (१९८४), टुवर्ड्स परपेच्युअल पीस (१९८८), द धम्मपद (१९८९).
संदर्भ :
- Unipune.ac.in/snc/cssh/ipq/English/PQ/6-10 volumes /09 o4 /PDF
समीक्षक : नवनाथ रासकर