ड्यूई, जॉन : (२० ऑक्टोबर १८५९—१ जून १९५२). प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ व शिक्षणशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बर्लिंग्टन येथे झाला. शिक्षण पुरे होताच १८८८ साली मिनेसोटा विद्यापीठात ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. १८८९ ते १८९४ पर्यंत मिशिगन विद्यापीठात व १८९४ ते १९०४ पर्यंत शिकागो विद्यापीठात अध्यापनाचे काम करून १९०४ साली ते न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात तत्त्वज्ञानशाखेचे प्रमुख झाले. १९२९ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते या विद्यापीठातच होते. ॲलिस चिपमन या तरुणीशी ड्यूईंची ओळख झाली आणि ओळखीची परिणती पुढे विवाहात झाली. आपल्या शैक्षणिक सिद्धांतांची चाचणी घेण्याकरिता त्यांनी एक ‘ड्यूई स्कूल’ नावाचे प्रायोगिक विद्यालय सुरू केले होते. त्याचे प्राचार्यपद ॲलिस चिपमन ह्यांच्याकडे देण्यात आले. १९२७ मध्ये त्यांची ही पहिली पत्नी वारली. पुढे वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी रोबेर्टा ग्रांट या विधवेशी लग्न केले. ड्यूईंनी अमेरिकेतील संयुक्त संस्थानांत आणि यूरोपातील अनेक देशांत खूप प्रवास केला होता. या प्रवासात त्यांनी रशियातील शिक्षणपद्धती पाहिली; ती त्यांना आवडली.

ड्यूई यांचे तात्त्विक विचार : ड्यूई हे चार्ल्स सँडर्स पर्स (१८३९−१९१४) आणि विल्यम जेम्स (१८४२−१९१०) ह्यांच्या बरोबरीने फलप्रामाण्यवादाचे एक प्रणेते मानले जातात; पण ह्या मताची मांडणी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने केली आहे. अनुभव ही संकल्पना ड्यूई यांच्या तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे. सुरुवातीला ड्यूई हेगेलच्या मताचे अनुयायी होते आणि हेगेलवाद्यांप्रमाणे अनुभव अनेकांगी, गतिमान पण एकात्म असतो, अनुभवाचे भिन्न घटक परस्परावलंबी असतात आणि एकमेकांशी सुसंवाद राखून, आपापली विशिष्ट कार्ये पार पाडून अनुभवाचे एक सेंद्रियपूर्ण स्वरूप ते सिद्ध करतात, असे ते मानीत; पण पुढे हे मत त्यांनी अनेक दिशांनी बदलले. एक तर हेगेलचे चिद्वादी अनुयायी, ज्ञान हा अनुभवाचा मूलभूत किंवा प्राथमिक प्रकार आहे, असे मानीत आणि इतर प्रकारच्या अनुभवांना गौण मानीत. ह्याच्या उलट ड्यूई ह्यांनी माणूस प्रथम कर्ता आणि भोक्ता असतो व नंतर तो ज्ञाता असतो, ह्यावर भर दिला. तसेच अनुभव हा एकात्मपूर्ण असतो, हे मत त्यांनी नाकारले व अनुभव बहुविध असतो, अनेक घटकांचा बनलेला असतो आणि प्रत्येक घटकाचे इतर घटकांशी काही प्रमाणात व काही बाबतींत साम्य असले, तरी त्याचे स्वरूप पृथगात्म, वैशिष्ट्यपूर्ण असते, ह्या मताचा पुरस्कार केला. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्यूईंनी निसर्गवादी भूमिका स्वीकारली. अनुभव स्वयंभू व स्वयंसिद्ध आहे आणि निसर्ग हा एका समावेशक, स्वयंपूर्ण अनुभवाचा एक घटक किंवा त्याचे एक अंग आहे, असे चिद्वादी मानीत. उलट, माणसाला त्याचा अनुभव निसर्गाच्या संदर्भात एक प्राणी म्हणून प्राप्त होतो, असे ड्यूई ह्यांचे म्हणणे होते. निसर्गाचे घटक परस्परांवर कार्ये करीत असतात. ह्या परस्पर व्यवहाराच्या देवाण-घेवाणीच्या वेगवेगळ्या पातळ्या असतात. भौतिक, रासायनिक घटना ही एक पातळी. प्राणी आणि त्यांचा परिसर ह्यांच्यामधील परस्पर व्यवहाराने घडले जाणारे प्राण्यांचे जीनव ही तिच्या वरची पातळी. माणसाचा अनुभव हे सुद्धा माणूस आणि निसर्ग ह्यांच्यातील परस्पर व्यवहाराने धारण केलेले रूप होय. पण माणसाची भाषा, त्याचे सामाजिक जीवन व संभाषण आणि त्यांच्या जोरावर माणूस पूर्वानुभवाचे जे संचित जोडू शकतो त्यामुळे हे रूप, हा अनुभव वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. माणूस हा निसर्गाचा एक घटक आहे आणि माणसाचे जीवन, त्याचा अनुभव व नैसर्गिक प्रक्रियांचाच एक प्रकार आहे. हा निसर्गवादी दृष्टिकोण ड्यूई ह्यांच्या तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य होय. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रयोगाधिष्ठित वैज्ञानिक विचारपद्धतीला त्यांनी दिलेले महत्त्व.

अन्वेषण वा चौकशी ही ड्यूईंच्या तत्त्वज्ञानातील मूलभूत संकल्पना आहे. ह्या संकल्पनेचे स्पष्टीकरण थोडक्यात असे करता येईल : जेव्हा एखादी समस्या आपल्यापुढे आहे असे आपण म्हणतो, तेव्हा आपली परिस्थिती कोणत्या तरी प्रकारे असमाधानकारक असते. तिच्यात काही उणिवा असतील किंवा तिचे घटक परस्परांशी विसंवादी असल्यासारखे दिसत असतील किंवा तिच्यात कोणत्या शक्यता दडलेल्या आहेत हे स्पष्ट नसेल म्हणून ती असमाधानकारक असेल. चौकशीची प्रक्रिया अशा असमाधानकारक परिस्थितीपासून सुरू होते आणि ह्या असमाधानकारक परिस्थितीची पुनर्रचना करून तिचे समाधानकारक परिस्थितीत परिवर्तन करणे हे चौकशीचे उद्दिष्ट असते. परिस्थितीचे वेगळ्या प्रकारे विश्लेषण करून, तिच्या घटकांत वेगळे परस्परसंबंध स्थापित करून, तिच्यात गर्भित असलेल्या शक्यतांचा विकास करून, चौकशी तिचे समाधानकारक परिस्थितीत परिवर्तन करण्याचे आपले उद्दिष्ट साधते. समस्या कोणत्याही क्षेत्रातील असली−विज्ञान, कला, नीती, समाजकारण इ.−तरी चौकशीचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती सारखीच असतात. चौकशीची प्रक्रिया ही बौद्धिक कृती असते आणि तिचे फलित अधिक समाधानकारक, सुसंगत, सुस्पष्ट, सुरचित, जिच्यातील उणिवा भरून काढल्या आहेत अशी परिस्थिती निर्माण होण्यात असते. म्हणून बौद्धिक कृती ही मूल्यनिरपेक्ष सत्य प्रस्थापित करू पाहणारी कृती असे मानणे गैर आहे. सत्य आणि मूल्य असे द्वंद्व मानणे हेही गैर आहे. बौद्धिक कृती नेहमीच मूल्यावर आधारलेली, मूल्यलक्ष्यी असते. सत्य हे एक विशिष्ट मूल्य आहे. पण मानवी अनुभवाला आणि परिस्थितीला नेहमीच नैतिक, व्यावहारिक, सौंदर्यात्मक अंगे असतात आणि ह्या सर्व मूल्यांच्या संबंधात अधिक समाधानकारक, सुसंगत आणि स्थिर अशी परिस्थिती निर्माण करणे हे बौद्धिक कृतीचे साध्य असते.

माणसाच्या ठिकाणी विवेक किंवा बुद्धी अशी एक शक्ती असते. तिला कित्येक अनिवार्यतेने सत्य असलेली तत्त्वे अवगत होतात, त्यांच्यापासून निष्पन्न होणारी दुसरी सत्ये ती प्राप्त करून घेते आणि ही सत्यांची व्यवस्था म्हणजे ज्ञान, ही पारंपरिक विवेकवादी भूमिका ड्यूई नाकारतात; पण त्याचबरोबर वेदनदत्तांपासून आपल्याला संशयातीत ज्ञान प्राप्त होते, ही अनुभववादी भूमिकाही ते नाकरतात. आपण केलेल्या चौकशीचे फळ म्हणून आपल्याला ज्ञान प्राप्त होते. आपण चौकशी करतो, कारण आपल्या पूर्वानुभवांच्या संदर्भात पाहता संदिग्ध ठरेल किंवा त्यांच्याशी विरोधी ठरेल, अशा परिस्थितीत आपण सापडलेले असतो, ह्या संदिग्धतेच्या जागी आपल्याला नेमकेपणा निर्माण करायचा असतो किंवा ह्या विरोधाचे निरसन करायचे असते. ह्यासाठी त्या परिस्थितीची परिकल्पना आपण करतो; म्हणजे तिचे अमूक अमूक घटक आहेत व त्यांचे परस्परांशी असे असे संबंध आहेत, अशी तिची मानसिक रचना आपण करतो, तिची अशी रचना करताना पूर्वीच्या चौकशांचे फळ म्हणून प्राप्त करून घेतलेल्या कल्पनांना मुरड घालून, त्यांचा विस्तार करून आपण त्या वापरतो. मग आपली मानसिक रचना परिस्थितीला कितपत अनुरूप आहे, हे पारखतो. ती अनुरूप असेल, तर असे असे अनुभव आपल्याला प्राप्त झाले पाहिजेत, असा निष्कर्ष तिच्यापासून काढून तसे अनुभव आपल्याला प्राप्त होतात की नाहीत, हे प्रयोगाने किंवा निरीक्षणाने आपण पडताळून पाहतो. ह्या परीक्षेला आपली परिकल्पना उतरली, तर ती स्वीकारायला आधार आहे, असे मानून ती ग्राह्य धरतो. सत्य किंवा ज्ञान म्हणजे असे स्वीकारार्ह निष्कर्ष; पण नवीन स्वीकारार्ह निष्कर्षांची पूर्वी स्वीकारलेल्या निष्कर्षांत केवळ भर पडत नाही, त्यांच्यामुळे पूर्वी स्वीकारलेले काही निष्कर्ष त्याज्य ठरतील. मानवी संस्कृतीत अशा तऱ्हेची चौकशी जेव्हा प्रगत होते व दृढमूल होते, तेव्हा तिच्यावषियी विचार करून चौकशी करताना कोणती पद्धत अनुसरली पाहिजे, कोणते नियम पाळले पाहिजेत, हे आपण स्पष्ट करतो; पण हे दंडक त्रिकालाबाधित नसतात. अनुभवाने व चिंतनाने त्यांच्यातसुद्धा आपण बदल करतो. थोडक्यात, चौकशी ही स्वतःला दुरुस्त करीत जाणारी प्रक्रिया आहे; तेव्हा ती पूर्णपणे मोकळ्या मनाने केली पाहिजे. ह्याचा एक अर्थ असा की, चौकशी ही एक सामाजिक वा सार्वजनिक प्रक्रिया असते. पूर्वीच्या चौकशांतून प्राप्त झालेल्या कल्पना, हे एक सामाजिक धन असते. त्यांचा वापर हाती घेतलेल्या चौकशीत आपण करीत असतो. मी माझ्या चौकशीतून जे निष्कर्ष काढतो, त्यांची पारख करण्याची व ते कसोटीला उतरले, तर आत्मसात करण्याची संधी इतरांना असली पाहिजे, अशा मोकळ्या मनाने, मुक्तपणे, पण जबाबदारीने चौकशी करणाऱ्या व्यक्तींच्या संघामध्येच खुली चौकशी होऊ शकते. लोकशाही समाजाचीही हीच वैशिष्ट्ये आहेत. खुली चौकशी आणि लोकशाही ह्यांची एकमेकींपासून फारकत करता येणार नाही.

ड्यूईंनी ह्याच दृष्टिकोणातून मूल्यांकडे पाहिले. काही चिरंतन मूल्ये असतात (किंवा योग्य वर्तनाचे काही चिरंतन नियम असतात) आणि त्यांना आपल्या अनुभवांत मूर्त करणे (किंवा त्यांचे पालन करणे) हे आपले कर्तव्य असते, असे ते मानीत नाहीत. कित्येक प्रकारचे अनुभव आणि कृती स्वतःच आनंददायक असतात; ही साक्षात मूल्ये. तथापि जेव्हा एखाद्या परिस्थितीला असे साक्षात मूल्य नसते, तेव्हा आपल्या वेगवेगळ्या कृतींनी तिला कोणती वेगवेगळी वळणे देता येतील व ह्याचे काय काय परिणाम होतील, हे कल्पकतेने ताडावे लागेल व काय करावे हा निर्णय घ्यावा लागेल. त्या विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात कोणती मूल्ये साधने शक्य होते, ह्याचा विचार करून तो निर्णय योग्य होता की नाही, हे ठरवावे लागेल. अगदी नवीन परिस्थितीत नवीन मूल्ये निर्माण करावी लागतील; म्हणजे आनंदाचे व साफल्याचे नवीन प्रकार शोधून काढावे लागतील. हे मूल्यविषयक निर्णयही सामाजिक संदर्भात घेतले जातात. सामाजिक अनुभवांचे संचित, त्यांतून निर्माण झालेले व बहुजनांनी स्वीकारलेले वर्तनाचे नियम, प्रघात, रूढी ह्यांच्या पार्श्वभूमीवरच असे निर्णय घेतले जातात व घेता येतात.

ड्यूई ह्यांनी केलेली कलेची मीमांसाही ह्या दृष्टिकोणावर आधारलेली आहे. प्रत्येक अनुभव पृथगात्म असतो, त्याचे स्वतःचे असे वैशिष्ट्य असते, हे ड्यूई यांचे मत आपण पाहिलेच आहे. प्रत्येक अनुभव हा आपण ‘भावलेला’ अनुभव असतो; त्याचे वैशिष्ट्य, त्याला व्यापून राहिलेला एक विशिष्ट गुण, आपण साक्षात भावतो. उदा., मला आलेल्या एखाद्या अनुभवाला विषण्णतेने व्यापलेले असेल. अनुभवांच्या अशा व्यापक आणि ज्यांना आपण साक्षात भावतो, अशा गुणांना ड्यूई सौंदर्यात्मक गुण म्हणतात. अशा गुणांच्या अनुरोधाने त्या अनुभवाचा विकास करता येईल; म्हणजे त्या अनुभवाचे घटक, त्यांचे परस्परसंबंध स्पष्ट करता येतील, त्यांच्याशी जुळणाऱ्या कल्पनेने निर्मिलेल्या घटकांचा त्यांच्याशी समन्वय करून त्याला अधिक संपन्न, ‘अर्थपूर्ण’ करता येईल. आपण साक्षात भावलेल्या अनुभवाचे असे विकसित स्वरूप म्हणजे कलाकृती.

सारांश, मूळच्या संदिग्ध अनुभवात अंतर्हित असलेल्या शक्यता हेरणे, त्यांना निश्चित स्वरूप देऊन मूर्त करणे आणि अशा रीतीने त्याला विकसित करणे; ही प्रक्रिया ज्ञान, व्यवहार आणि कला ह्या अनुभवांच्या तिन्ही क्षेत्रांत घडत असते.

ड्यूई यांचे शैक्षणिक विचार : ड्यूई ह्यांची शिक्षणाची उद्दिष्टे, आशय आणि पद्धती ह्यांविषयीची मते त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारलेली आहेत. तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन ड्यूई यांनी असे निदान केले की, बदललेल्या समाजस्थितीत संपूर्ण व सफल जीवन कसे कंठावे, याचे शिक्षण शाळांतून मिळावयाचे असेल, तर शाळांचा कायाकल्प केला पाहिजे. या क्रांतीचा उपाय म्हणून कृतिप्रधान शिक्षणपद्धतीचा त्यांनी पुरस्कार केला. शिक्षणात व्यवसायास स्थान दिल्याने वरील सर्व विरोधांचा आपोआपच परिहार होईल. ग्रामीण जीवनात मिळणारे; पण नागरी जीवनात पारखे झालेले अनुभव व्यवसायांच्या द्वारा मिळू शकतील. मुलांच्या कृतिशीलतेला वाव मिळेल, स्वयंनिर्मितीचे दार मोकळे होऊन कल्पक बुद्धीचा विकास होईल आणि व्यवसायातील स्वाभाविक श्रमविभागामुळे सहकार्याची सवय लागून आत्महित आणि समाजहित यांच्या अन्योन्याश्रयांचा प्रत्यय येईल.

आपल्या प्रायोगिक शाळेत ड्यूई यांनी व्यवसायांचे शैक्षणिक मूल्य पारखून सिद्ध केले आणि घर, शाळा व समाज यांत घनिष्ठ संबंध निर्माण केले. त्यांच्या मते शाळा म्हणजे जीवनसदृश अनुभवांतून बालकांचा आत्मविकास घडविणारी कर्मभूमी होय. नम्रता, आज्ञाधारकता इ. (निष्क्रिय) गुणांची जोपासना शाळेने करू नये. व्यवसायांत मुलांची शक्ती गुंतवून स्वावलबंन, कल्पकता, सहकार आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन या गुणांचा विकास घडवून आणावा.

ड्यूईंच्या शिक्षणविषयक विचारांचा प्रभाव आज जगभर दिसून येतो. कृतिप्रधान शिक्षण आणि मुलांच्या आत्मसंयमावर आधारलेली शिस्त, ही त्यांनी शिक्षणाला बहाल केलेली बहुमोल लेणी होत. सोबतच उदार शिक्षणाची व्याख्या करताना ते म्हणतात, “मानवी मनाची सर्व तऱ्हांच्या संकुचितपणापासून मुक्तता करणारे शिक्षण म्हणजे उदार शिक्षण होय”.

ड्यूईंनी विपुल ग्रंथलेखन केले. त्यांचे सु. ३०० हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले. त्यांपैकी आउटलाइन्स ऑफ अ क्रिटिकल थिअरी ऑफ एथिक्स (१८९१), द स्टडी ऑफ एथिक्स (१८९४), स्कूल अँड सोसायटी (१८९९), स्टडीज इन लॉजिकल थिअरी (१९०३), हाऊ वी थिंक (१९१०), डेमॉक्रसी अँड एज्युकेशन (१९१०), द इन्फ्ल्यूअन्स ऑफ डार्विन ऑन फिलॉसॉफी अँड अदर एसेज इन कंटेंपररी थॉट (१९१०), जर्मन फिलॉसॉफी (१९२०), ह्मूमन नेचर अँड कंडक्ट (१९२२), एक्स्पीरिअन्स अँड नेचर (१९२५), द पब्लिक अँड इट्स प्रॉब्लेम्स (१९२७), फिलॉसॉफी अँड सिव्हिलायझेशन (१९३१), लिबरॅलिझम अँड सोशल ॲक्शन (१९३५), लॉजिक : द थिअरी ऑफ इन्क्वायरी (१९३८), एक्स्पीरिअन्स अँड एज्युकेशन (१९३८), फ्रीडम अँड कल्चर (१९३९), प्रॉब्लेम ऑफ मेन (१९४६), नोइंग अँड द नोन (१९४९, ए. एफ. बेंटली सहलेखक) वगैरे ग्रंथ विशेष प्रसिद्ध असून त्यांतून त्यांचे शिक्षण, तत्त्वज्ञान, राजकारण इत्यादीं संबंधीचे विचार प्रकट झाले आहेत.

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि विज्ञानविषयक क्षेत्रांत फार मोठी क्रांती झालेली डॉ. ड्यूई यांनी पाहिली; पण त्यांची भूमिका केवळ प्रेक्षकाची नव्हती. जीवनाच्या सर्व अंगांत विज्ञानाची प्रयोगप्रधानपद्धती प्रचलित करण्याचा आग्रह धरून त्यांनी या क्रांतीस विशिष्ट वळण दिले व शिक्षणविषयक नव्या विचारांना चालना देऊन भावी लोकजीवन घडविले.

न्यूयॉर्क येथे ते मरण पावले.

संदर्भ :