कामाकुरा कालखंड : (इ.स.११८५-१३३३). जपानी साहित्याचा कालखंड. हा सामुराइ योद्ध्यांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. हेइआन कालखंडामधील साहित्यावर राजदरबार आणि सम्राटांचा ठसा होता. कामाकुरा कालखंडामध्ये राजदरबार आणि सम्राट राजधानी क्योतोमध्ये असले तरी त्यांचा फारसा प्रभाव नव्हता. ह्या कालखंडामध्ये क्योतोपासून लांब पूर्वेकडील कामाकुरा ही सामुराइ योद्ध्यांची राजधानी होती. स्वत:च्या क्षेत्र-विस्तारासाठी सामुराइंच्या गटामध्ये नेहमी युद्ध होत असत. त्यामुळे साहित्यामध्ये पण युद्धांचा उल्लेख जाणवतो. या कालखंडामध्ये गेनजी आणि हेइशी हे दोन शक्तीमान गट होते. सुरूवातीला हेइशी गट शक्तीशाली होता; परंतु नंतर त्यांच्यातल्या कुरबुरी वाढू लागल्या. हेइशी आणि गेनजीमध्ये युद्ध झाले आणि त्यामध्ये हेइशी गटाचा पूर्ण निप्पात झाला. ह्या युद्धाचे वर्णन करणारी “हेइके मोनोगातारी” ही कामाकुरा कालखंडातील प्रसिद्ध कादंबरी आहे.
नारा कालखंड आणि हेइआन कालखंडामध्ये बौद्ध धर्म हा राजघराणे आणि उच्चकुलीन सरदारांपुरता मर्यादीत होता. कामाकुरा कालखंडामध्ये बौद्ध धर्म सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचला. योशिदा केनको ह्या बौद्ध भिक्षूने ह्याच काळात त्सुरेझुरेगुसा हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे ३ खंड आहेत. पुस्तकाचे स्वरूप निबंध असे आहे.मनात आलेले विचार पुस्तकामध्ये लिहिले आहेत. पहिल्या खंडामध्ये निसर्गाचे वर्णन केले आहे. दुसर्या आणि तिसर्या खंडामध्ये तत्त्वज्ञानाचा वापर केला आहे. जीवन क्षणभंगुर आहे हा विचार या दोन्ही खंडांचा गाभा आहे. होज्योकि हे सुद्धा ह्याच काळात लिहिले गेलेले पुस्तक आहे. कामो नो च्योमेइने या पुस्तकामध्ये त्याच्या झोपडी मधून पाहिलेल्या नैसर्गिक आपत्तींबद्दल लिहिले आहे. त्या काळात क्योतो मध्ये आग, वादळ, भूकंप अशा अनेक आपत्ती आल्या होत्या.
कामाकुरा कालखंडामध्ये हेइआन कालखंडाप्रमाणेच जपानी कवितांचे संकलन केले गेले. साम्राटापासून बौद्ध भिक्षूंपर्यंत वेगवेगळ्या स्तरातील कवींच्या कविता शिन कोकिन वाकाश्यु ह्या संकलित पुस्तकामध्ये दिसून येतात. ह्या कवितांचे विषय वेगवेगळे आहेत. प्रेमाच्या कविता, निसर्ग वर्णनाच्या कविता, आनंदी तसेच दुःखी कविता संकलित केल्या आहेत. कामाकुरा कालखंडामध्ये ह्या काव्यसंग्रहा व्यतिरिक्त ओगुरा हयाकुनिन इश्यू हे १०० कवींच्या कविता असलेले पुस्तक पण संकलित केले गेले. यातील प्रत्येक कवितेचा कवी वेगळा आहे. ह्या कालखंडामध्ये काही रोजनिशी पण लिहिल्या गेल्या. क्योतो आणि कामाकुरा ह्या दोन ठिकाणी कामाच्या निमित्ताने येजा करणारे खूप लोक होते. प्रवासवर्णनात्मक रोजनिशी असे त्यांचे स्वरूप आहे. गद्य आणि पद्य यांचा वापर करून त्या लिहिल्या आहेत. इ.स. १२७७ मध्ये भिक्षुणी आबुत्सुने इझायोइ निक्किमध्ये प्रवास वर्णन लिहिले आहे. इ. स. १३०७ मध्ये लेडी निज्यो ने लिहीलेल्या तोवाझु गातारिमध्ये आत्मचरित्रा बरोबरच उत्कृष्ट निसर्ग वर्णन केले आहे.
कामाकुरा कालखंडामध्ये रोजनिशी हा साहित्य प्रकार खूप कमी प्रमाणात आढळतो. १३ व्या शतकाच्या सुरूवातीला उजि श्युइ मोनोगातारि लिहिली गेली. त्यामध्ये १५ खंडांमध्ये विभागल्या गेलेल्या १९७ गोष्टी आहे. त्यातील काही गोष्टी हेइआन कालखंडात लिहिल्या गेलेल्या कोनज्याकु मोनोगातारी मध्ये पण आल्या आहेत. ह्या कथा धार्मिक,सामाजिक आणि वैयक्तिक अशा तीन प्रकारात मोडतात. ह्या कथांमधून फारसे उपदेशपर भाष्य केलेले नसल्याने त्या इतर सेत्सुवा (गोष्टी) पेक्षा वेगळ्या ठरतात. सतत चालू असलेली यादवी युद्धे, वैभवशाली कुलांचा उदय आणि नाश, सरदार उमरावांचे कमी होत चाललेले महत्त्व ह्या पार्श्वभूमीवर सामुराइ योद्ध्यांचे वाढते वर्चस्व ही कामकुरा कालखंडाची वैशिष्टे म्हणता येतील. ह्या युद्धांमुळे राजधानी क्योतो आणि गावकडील संस्कृतीची देवाणघेवाण सुरू झाली. नारा आणि हेइआन कालखंडातील परंपरागत संस्कृती आणि गावाकडील संस्कृती यांचा मिलाफ झाला आणि नवीन संस्कृती उदयास आली.
संदर्भ :
- https://www.britannica.com
- medieval_literature.enacademic.com
- https://www.newworldencyclopedia.org
- 国語便覧 by浜島書店
Keywords: #鎌倉時代