माकुरानो सोशि : हेइआन कालखंडामधील रोजनिशी. द पिलो बुक हे या रोजनिशीचे इंग्रजी शीर्षक होय. ही गेंजी मोनोगातारी या साहित्य कृतीइतकीच महत्वाची आहे. सेई शोनागुन ह्या स्त्री लेखिकेने लिहिलेली ही रोजनिशी म्हणजे लेखिकेच्या राजदरबारातील आठवणी आहेत. ह्या रोजनिशीमध्ये गद्य आणि पद्य (वाका अथवा तांका कविता) ह्या दोन्हीचा समावेश आहे. जरी रोजनिशी म्हटले तरी आठवणींच्या स्वरूपात लिहिले गेलेले लहान व मोठे लेख असे ह्याचे स्वरूप आहे. मनातले विचार लिहताना, निबंध अथवा स्फुटक अशा साहित्य प्रकाराचा पायंडा माकुरानो सोशिमधून सेई शोनागुनने पाडला असे म्हटले जाते. सम्राज्ञी तेइशिची राजदासी म्हणून काम केलेल्या १० वर्षातल्या आठवणी ह्या रोजनिशी मध्ये लिहिलेल्या आहेत. रोजनिशीचा काही भाग राजसेवेत असताना लिहिला गेला असून, काही भाग सेवेतून मुक्त झाल्यानंतर लिहिला गेला आहे.
सेई शोनागुन (इ.स.९६६ ते १०१७) ही हेइआन कालखंडातील प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री आहे. तिचे वडील विद्वान आणि कवी होते. सेई शोनागुन हिने सम्राज्ञी तेइशिची (राणी सादाको ?) राजदासी म्हणून काही वर्षे काम केले. तिच्या अभिजात आणि मार्मिक टिपणीमुळे ती राजदरबारात प्रसिद्ध होती. तिने केलेल्या टिपणीमुळे लेखांची लज्जत वाढली आहे. हेइआन कालखंड हा जपानी सौंदर्यशास्त्राचा उगम मानला जातो. ह्या कालखंडामध्ये लिहिल्या गेलेल्या माकुरानो सोशी मध्ये आपल्याला ह्याचा पुरेपूर अनुभव येतो. सेई शोनागुनच्या खऱ्या नावाबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. तसेच तिच्या उर्वरित आयुष्याबद्दल निश्चित माहिती हाती नाही. काही ठिकाणी तिने बौद्ध भिक्षुणीचा मार्ग अवलंबिला असे लिहिले गेले आहे तर काही ठिकाणी तिने सेत्सु प्रांतप्रमुखाशी लग्न केले असे म्हटले आहे. तिच्या खाजगी जीवनाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. सेई शोनागुन तिच्या साहित्यकृती बरोबरच समकालीन लेखिका मुरासाकी शिकिबू हिच्या बरोबर असलेल्या वितुष्टाबद्दल पण प्रसिद्ध आहे. दोन्ही लेखिका समकालीन असल्या तरी दोघींची लेखनशैली खूप वेगळी आहे.
माकुरानो सोशि तीन विभागात विभागले आहे. १. निसर्ग आणि मानवस्वभावाच्या वैशिष्ट्या संदर्भातले लेख २. आजूबाजूला घडणाऱ्या व लक्षात राहिलेल्या गोष्टी आणि निसर्ग ३. राजदरबारातल्या सेवेमध्ये अनुभवलेल्या गोष्टी. सेई शोनागुनने स्वत:चे विचार मुक्तपणे लिहिण्यासाठी रोजनिशीचा वापर केला होता. म्हणूनच नाव सुद्धा ‘उशीजवळ ठेवायची वही’ (द पिलो बुक) असे ठेवले आहे. रोजच्या दिवसभरातल्या घटना ह्या वहीमध्ये लिहिल्या जात होत्या. अचानक एक दिवस ही वही कोणाच्या तरी नजरेला पडली आणि त्यात लिहीलेल्या सहज सुंदर लेख आणि चुटक्यांमुळे ती प्रसिद्धीस आली.
विविध विषयांवरची मार्मिक टिपणे ह्या रोजनिशीमध्ये दिसून येतात. जरी जुन्या काळातल्या गोष्टी असल्या तरी आजही त्या वाचताना वाचक लेखिकेशी सहमत होतो. कारण काळ बदलला तरी कित्येक गोष्टी बदलत नाहीत. उदाहरणार्थ निसर्ग, मनुष्यस्वभाव. मनाला आल्हाद देणार्या गोष्टी, आनंद देणाऱ्या गोष्टी हा ह्या रोजनिशीचा गाभा आहेत. त्यामुळे वाचकाला वाचताना आनंद मिळतो. यात निसर्गाचे अतिशय उत्कृष्ट वर्णन केले आहे. रोजनिशीच्या सुरुवातीचा उतारा वाचल्यावर शब्दचित्रण किती सुंदरतेने केले आहे हे लक्षात येते. त्या काळातील सौंदर्यशास्त्राच्या कसाला हे पुस्तक पुरेपूर उतरले आहे. कोणत्या ऋतु मध्ये कोणती वेळ जास्त सुंदर असते ह्याचे लेखिकेने वर्णन केले आहे. वसंत ऋतुमधली पहाट. डोंगरांच्या कडा हळूहळू उजाडत असताना लाल होताना दिसतात. किरमिजी जांभळ्या रंगांचे ढग आकाशात लांबवर पसरलेले असतात. ग्रीष्म ऋतुमधली रात्र. चंद्रप्रकाश असलेली रात्र तर सुंदर असतेच ; परंतु चंद्र नसलेली रात्र पण सुंदर असते. काजव्यांचे थवे उडत असताना बघणे तर मन आनंदीत करते ; परंतु एखाद दुसऱ्या काजव्याचा स्निग्ध प्रकाश पण तितकेच मन मोहित करतो. ग्रीष्मातला रात्री पडणारा पाऊस तर किती छान वाटतो. शरद ऋतुमधली सायंकाळ. दिवसभर प्रखर वाटणारा सूर्य डोंगरांच्या कडेला टेकतो. घरट्याकडे घाईने निघलेलेल्या पक्षांना बघणे खूप आल्हाददायक वाटते. दूर आकाशात उडत जाणाऱ्या हंसांच्या थव्याकडे बघून मन हर्षित होते. सूर्य अस्ताला गेल्यानंतर वाढत जाणार्या काळोखात वारा आणि किड्यांचे आवाज ऐकताना होणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. शिशिरामधली सकाळ. जर बाहेर बर्फ पडत असेल तर सुंदरच दिसते ; परंतु गोठलेले दवबिंदू बघणे पण आनंददायी असते. खूप थंडी असेल तर शेगडी पेटविण्यासाठी कोळसे घेऊन लगबगीने इकडून तिकडे माणसे जाताना बघणे पण छान वाटते. मात्र जसजशी दुपार होऊ लागते आणि शेगडीमधल्या कोळश्यांवर राखेचा पांढरा थर जमू लागतो तेव्हा मात्र मन उदास होते.
निसर्गप्रमाणेच मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी, दु:ख देणाऱ्या गोष्टी अशा विविध विषयांच्या याद्या पण ह्या रोजनिशीत वाचायला मिळतात. उदाहरणार्थ मोठ्या माणसाचे कपडे घालून चालणारी छोटी मुले, कमळफुले, हिना बाहुल्या इ. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी आणि क्वचित बघायला मिळणाऱ्या गोष्टींमध्ये जावयाचे कौतुक करणारा सासरा आणि सुनेचे कौतुक करणारी सासू, मालकाचे गुणगान गाणारा नोकर ह्या गोष्टी येतात. ह्या याद्या वाचताना कित्येक वेळा वाचकाला आपल्याच मनातले विचार लेखिकेने मांडले आहेत असे वाटते. राजदरबारातल्या घटना वाचताना त्या काळातल्या रीतीरिवाजांबद्दल माहिती प्राप्त होते. जपानचे सुवर्णयुग मानले गेलेल्या हेइआन कालखंडाच्या काही भागाचे वर्णन मनाला भुरळ पाडते. कला आणि सौंदर्य यांचा उत्कृष्ट संगम झालेल्या ह्या कालखंडाला अजरामर करायचे काम ही रोजनिशी करते. त्यामुळे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून पण हिच्याकडे बघितले जाते. समकालीन गेंजी मोनोगातारी पेक्षा वापरलेली सहज सुंदर सोपी भाषा आणि लालित्य ह्यामुळे जपानी शालेय पुस्तकांमध्ये या रोजनिशीच्या काही भागाचा समावेश केला गेला आहे.
संदर्भ :
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.