विद्युत ऊर्जा दर ठरविण्याची प्रति एकक पद्धती म्हणजे टॅरिफ होय. टॅरिफ म्हणजे प्रति एकक वीज ऊर्जा वापरावर मोजावी लागणारी किंमत होय. (रुपये प्रति युनिट जसे रु. किलोवॅटतास kWh किंवा रु./ किलोवोल्टअँपिअर तास kVAh)……
दरपत्रकाचे प्रचल : विद्युत ऊर्जेचे दरपत्रक ठरवताना वीज निर्मितीचा व वीज वितरणाचा खर्च लक्षात घेऊन किंमत ठरवावी लागते. घरगुती, औद्योगिक, व्यापारी, कृषी क्षेत्रात विजेच्या वापराप्रमाणे वेगवेगळा दर आकारण्यात येतो. औद्योगिक ग्राहकांचा वीज वापर जास्त असल्याने त्यांना घरगुती ग्राहकांपेक्षा जास्त दर असतो. दरपत्रक ठरवताना काही महत्त्वाच्या बाबींचा विचार केला जातो : (१) विद्युत भाराचा प्रकार, (२) महत्तम मागणी, (३) भार वापरण्याची वेळ, (४) शक्ती गुणक (Power factor), (५) विद्युत ऊर्जावापर.
वीजबिल गणना करताना त्यात तीन प्रकारची किंमत धरतात : स्थिर आकार D, अर्धस्थिर आकार Ax , चालू आकार By.
C = एकूण आकार ठराविक मुदतीसाठी (१ महिना)
X = त्या महिन्यातील महत्तम मागणी (kW or kVA)
y = त्या महिन्यात एकूण विद्युत ऊर्जेचा वापर (kWh)
A = महत्तम मागणीच्या प्रमाणात प्रति kVA चा दर
B = प्रति एकक ऊर्जा (kWh) दर,
D = स्थिर आकार (विद्युत निर्मिती, पारेषण यंत्रणेसाठी लागणारी किंमत)
C = D + Ax + By
(१) विद्युत भाराचा प्रकार : घरगुती, व्यापारी, कृषी, औद्योगिक, एककला (Single phase), त्रिकला (Three phase), कमी दाब (२३०/४१५ V), उच्च दाब (११/ २२/ ३३/ ६६ kV) असे याचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाच्या मागणीप्रमाणे वीज आकार वेगळा असतो.
(२) महत्तम मागणी (Maximum demand) : वीज निर्माण करताना उभारलेल्या जनित्राची विद्युतनिर्मिती क्षमता आणि निर्माण केलेली विद्युत ऊर्जा वाढवल्यास उत्पादनाचा खर्च वाढतो. त्यामुळे जास्ती मागणी केल्यास, जनित्राची क्षमता व त्याप्रमाणात खर्च वाढतो.
(३) ग्राहकाची महत्तम मागणीची वेळ : जर सर्व ग्राहकांच्या वीजेची मागणी एकत्रित मागणीच्या (शिखर भार- Peak demand) वेळेतच असेल, तर अधिक क्षमतेची निर्मिती करावी लागेल. परंतु जर महत्तम मागणीची वेळ ही सर्व ग्राहकांच्या एकत्रित मागणीच्या वेळी नसेल, (Off peak load hours) तर भारगुणक (Load factor) वाढतो. त्यामुळे अधिक क्षमतेच्या जनित्राची गरज लागत नाही. त्यामुळे वीजनिर्मितीचा एकूण खर्च कमी होतो.
(४) विद्युत भाराचा शक्ती गुणक (Load power factor) : विद्युत निर्मितीच्या अर्थशास्त्रावर शक्तिगुणकाचा मोठा परिणाम होतो. कमी शक्तिगुणक असल्यास विद्युत प्रवाह वाढतो.त्यामुळे शक्तीत खूप घट होते तसेच व्होल्टेज कमी होते. शक्तिगुणक वाढविण्यासाठी शक्तिगुणक सुधार यंत्रणा वापरावी लागते आणि खर्च कमी करावा लागतो.
(५) विद्युत ऊर्जेचा वापर : जास्त ऊर्जा जास्त वेळ वापरल्यास विद्युत ऊर्जेची किंमत कमी होते.
विद्युत ऊर्जा दरपत्रकाच्या पध्दती : विद्युत ऊर्जेचा दर आकारताना विविध पद्धती अवलंबल्या जातात.
(१) सरसकट दरपद्धत : C=Ax . या प्रकारात महत्तम मागणीच्या प्रमाणे वीज आकार घेतात. यात किती वीज ऊर्जा वापरली, हे पाहिले जात नाही. पथदिवे, सिंचन उपकरणे यांचे एकूण वापरलेले तास माहित नसतात आणि तेथे ऊर्जामापन यंत्र नसते. तेथे ही पद्धत वापरतात.
(२) खंड दरपद्धत : यात ऊर्जा वापर ठराविक खंडात विभागली जाते. प्रत्येक खंडाचा ऊर्जा एकक दर ठरवलेला असतो. चढत्या क्रमाने त्याचा दर असतो. पहिल्या खंडाचा (०-१००) दर कमी, त्यानंतर ( १०१-३००) दर थोडा जास्त अशा प्रमाणात दर आकारले जातात.
(३) द्विभाग दरपद्धत : या प्रकारात दोन भाग असतात : पहिला स्थिर आकार व दुसरा चालू आकार. महत्तम मागणीच्या प्रमाणात स्थिर आकार आणि विद्युत ऊर्जा एकक वापरण्याच्या प्रमाणात चालू आकार ठरवतात.
एकूण किंमत = स्थिर आकार + चालू आकार
C = दर (A प्रति किलोवोल्टअँपिअर) X महत्तम मागणी (x किलोवोल्टअँपिअर) X A. x + B प्रति एकक ऊर्जा दर X y किलोवॅटतास B.y
C= A (kVA) + B (kWh) येथे A व B हे स्थिरांक आहेत.
(४) शक्तिगुणक दरपद्धत : याचे चार भाग आहेत.
(क) किलोवोल्ट अँपिअर महत्तम मागणीप्रमाणे (kVA) : एकूण किंमत = A (kVA) + B (kWh) शक्तिगुणक कमी झाल्यास किलोवोल्ट अँपिअर वाढते.
(ख) सक्रिय ऊर्जा आणि प्रतिरोधी ऊर्जा पद्धत (kWh, kVarh) : एकूण किंमत =A1 (किलोवॅटतास) + B1 (kVarh).
प्रतिरोधी ऊर्जा, शक्तिगुणकाच्या व्यस्त प्रमाणात असते. या पद्धतीत प्रतिरोध ऊर्जा, शक्तिगुणकाच्या प्रमाणात ग्राहकांकडून दंड (Penalty) किंवा उत्तेजन (Incentive) वसूल केली जाते. शक्तिगुणक ०.९ च्या खाली गेल्यास दंड वसूल केला जातो आणि ०.९५ च्या वर गेल्यास उत्तेजन दिले जाते.
सक्रिय ऊर्जा आणि प्रतिरोधी ऊर्जा एकाच वेळी खर्च होते, परंतु प्रतिरोधी ऊर्जेमुळे विद्युत जनित्र आणि विद्युत वितरण यंत्रणेची क्षमता कमी होते. त्यामुळे आता आभासी (Apparent -KVA) ऊर्जा दर पद्धती सुरू झाली आहे. यात सक्रिय आणि प्रतिरोधी ऊर्जेसाठी स्वतंत्र पद्धतीची गरज लागत नाही.
(ग) आभासी (Apparent -KVA) ऊर्जा दर पद्धतीमध्ये दंड (Penalty) किंवा उत्तेजन (Incentive) समाविष्ट आहे. या पद्धतीचा मुख्य उद्देश ग्राहकांनी शक्तिगुणक एक ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, वीज गळती कमी करणे, ऊर्जा बचत करून ऊर्जेची कार्य क्षमता वाढवणे हा आहे.
शक्तिगुणक एक ठेवल्यामुळे प्रतिरोधी ऊर्जा शून्य होते व त्यामुळे ऊर्जेची बचत होऊन गाहकांना फायदा होतो. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, बिहार, हरियाणा, पंजाब, दिल्ली व आता महाराष्ट्रात ही (KVAH- billing) दर पद्धती चालू झाली आहे. ही पद्धत समजण्यास सोपी आहे.
(घ) सरासरी शक्तिगुणक : एक ठराविक शक्तिगुणक संदर्भसाठी ठरवतात. त्यापेक्षा कमी झाल्यास ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागते आणि जर शक्तिगुणक संदर्भापेक्षा जास्त झाल्यास ग्राहकांना सूट मिळते.
(५) शिखर भार पद्धत : शिखर भार पद्धतीत एका दिवसाचा शिखर भार मोजतात. या पद्धतीत ग्राहकाच्या आवारात महत्तम मागणी मापन यंत्र बसवून महत्तम मागणीची नोंदणी केली जाते. जर शक्तीचा वापर जास्त असेल, तर त्यास शिखर भार पध्दती आणि कमी असेल तर ऑफ शिखरभार पध्दती असे म्हणतात.
(६) त्रिभाग दरपद्धत : ही पध्दती मोठ्या ग्राहकांसाठी वापरली जाते.
एकूण किंमत (C)= स्थिर आकार (D) + अर्ध स्थिर आकार(Ax) + चालू आकार(By)
याशिवाय अजून दोन प्रकारचा वीज ऊर्जा वापराचा यात समावेश केला जातो. (अ) किती एकक वीज ऊर्जा वापरली त्या प्रमाणात प्रति एकक वीज वहन आकार आणि (ब) इंधन समायोजन आकार.
(अ) वीज वहन आकार : वीज निर्मिती ठिकाणापासून ग्राहकांपर्यंत वीज वाहून नेण्यासाठी येणारा खर्च म्हणजे वीज वहन आकार होय. उच्च दाब वाहिन्यांमार्फत अनेक किलोमीटर दूर वीज वाहून नेताना थोडी वीज गळती होते. वीज नियामक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रति एकक वीज वहन आकार वीज वितरण कंपनी ग्राहकांना लावते.
(ब) इंधन समायोजन आकार : कोळसा किंवा इंधनाची किंमत दर महिन्याला मागणी व पुरवठा प्रमाणे बदलत असते. त्यामुळे वीजनिर्मितीचा खर्च दर महिन्याला बदलत असतो. वीजनिर्मिती कंपनी हा खर्च वीज वितरण कंपनीस लावते. तो ग्राहकाकडून वसूल केला जातो. प्रति एकक दराने याची गणना करतात. त्यामुळे किती एकक वापर झाला त्या प्रमाणात ही किंमत बदलती असते.
औद्योगिक वीज वापरताना दिवसाच्या वेळेप्रमाणे (Time of the Day, TOD) वीजदर बदलतो. दिवसाच्या वेळेचे चार भाग केले जातात. प्रत्येक भागाचे दर वेगळे असतात. असे केल्याने एकाच वेळी सर्व ग्राहकांच्या मागणीमुळे विद्युत पुरवठ्यावर पडणारा शिखर भार कमी करणे शक्य होते. ग्राहकांना वेगळ्या वेळी वीज वापरल्याने कमी दरात वीज मिळते, भार आलेख सुधारतो. शिखर भार कमी झाल्याने २४ तासाचा भार आलेख (Load Curve) सरळ रेषेत आणता येतो.
धन (+) म्हणजे नेहमीच्या दरापेक्षा % जास्त दर (दंड/Penalty) आणि ऋण (-) म्हणजे नेहमीच्या दरापेक्षा % कमी दर (उत्तेजन /Incentive) होय.
सोबतचे कोष्टक पाहून लक्षात येईल की, संध्याकाळी ६ ते ९ (ड भाग) शिखर भार असल्यामुळे दर १.१% जास्त आहे आणि अ भागात (वेळ रात्री १० ते सकाळी ६ ) -१.५% दर कमी आहे.
त्यामुळे औद्योगिक ग्राहकांनी इतर वेळेपेक्षा रात्रपाळीला (जेव्हा दर कमी असतो ) पाण्याचे पंप, मालाचे उत्पादन चालू ठेवल्यास विजेचे बिल कमी येते.
संदर्भ :
• www.mahadiscom.in
• Shivangraju, Generation and Transmission of Electrical Energy, Pearson Publication.
समीक्षक : अंजली धर्मे