दया कृष्ण : (१७ सप्टेंबर १९२४—५  ऑक्टोबर २००७). विसाव्या शतकातील उल्लेखनीय आणि प्रेरणादायी भारतीय तत्त्वज्ञ. उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण सनातन धर्मशाळेत, हिंदू महाविद्यालयात व नंतर दिल्ली विद्यापीठात झाले. राजस्थान विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात ते प्राध्यापक होते, तसेच काही काळासाठी राजस्थान विद्यापीठात ते उपकुलगुरू म्हणून कार्यरत होते. त्यांनी अमेरिकेतील नॉर्थफील्ड व हवाई विद्यापीठातदेखील काही काळ शिकवले. दया कृष्ण यांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या ज्या पदांवर काम केले, तेथे त्यांनी स्वतःचा असा खास ठसा उमटवला.

दया कृष्ण हे उत्तम शिक्षक होते. विद्यार्थ्यांत विषयाची आवड निर्माण करणे, प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांना स्वतंत्र, पूर्वग्रहविरहित व नि:पक्षपणे विचार करायला प्रवृत्त करणे ह्यात ते निपुण होते. अगदी ज्या विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञानात रस नाही असेही विद्यार्थी केवळ त्यांच्या शिकविण्याच्या शैलीने प्रभावित होऊन तत्त्वज्ञान विषयाची निवड करायचे. विद्यापीठाच्या आवारात पांढरा शुभ्र झब्बा घालून विद्यार्थ्यांबरोबर अनेकविध विषयांवर चर्चा करताना ते दिसायचे. अनेक विषयांची त्यांना आवड होती. केवळ आवडच नाही तर त्या विषयांचे त्यांचे वाचन व अभ्यासही दांडगा होता. विद्यापीठात आयोजित होणाऱ्या इतर विभागांतील परिसंवाद, कार्यशाळा इत्यादी कार्यक्रमांत ते आवर्जून भाग घेत असत.

तीन दशकांच्या वर संपादक म्हणून जर्नल ऑफ इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्चचा कार्यभार त्यांनी सांभाळला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जर्नलचा चेहरामोहराच बदलून टाकला. या जर्नलच्या प्रत्येक खंडात त्यांचा एक लेख प्रकाशित होत असे. तसेच ‘फोकस’ आणि ‘अजेंडा फॉर रिसर्च’ या नावाचे स्तंभही त्यांनी लिहिले. ज्यामध्ये त्यांनी नवीन तात्त्विक मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या लेखनातून त्यांनी नेहमीच नवीन विचारांना प्रोत्साहन दिले. ‘संवाद’, ‘थेट संवाद’ किंवा ‘मुक्त वादविवाद’ या कल्पना त्यांच्या दार्शनिक कार्याचा एक अनिवार्य घटक होत्या.

प्रामुख्याने भारतीय तत्त्वज्ञान, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र या विषयांवर दया कृष्ण यांचे अनेक लेख व पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या जवळपास वीस पुस्तके व दोनशे प्रकाशित लेखांपैकी बहुतेक इंग्रजीमध्ये आहेत; पण काही हिंदी भाषेतदेखील आहेत. त्यांच्या प्रकाशित साहित्यांत त्यांनी तत्त्वज्ञानाच्या सर्वच शाखांना स्पर्श केला आहे. तसेच समाजशास्त्र, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांतील काही महत्त्वाच्या तत्कालीन मुद्यांवर चिंतन व टीकात्मक भाष्यदेखील त्यांनी केलेले आढळते. कला आणि साहित्यामध्येदेखील त्यांना विशेष रुची होती.

वसाहतवादाच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेच्या विरोधातील अग्रगण्य, उल्लेखनीय काम म्हणून त्यांचे पहिले पुस्तक, नेचर ऑफ फिलॉसॉफीचा उल्लेख केला जातो. हे पुस्तक त्यांच्या पीएच.डी. साठी (१९५५ साली) लिहिलेला प्रबंध होता. या पुस्तकात त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला, विचारांना गंभीरपणे घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यांच्या लेखी तत्त्वज्ञान हे सर्वत्र समान आहे. त्यात भारतीय आणि पाश्चात्त्य असे काहीही नाही.

प्राचीन संस्कृतीचा आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी मूळ ग्रंथांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याने त्यांनी उत्साहाने संस्कृत भाषेचा अभ्यास केला. तसेच भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास व्हावा यासाठी संस्कृतमध्ये तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे विद्वान व इंग्रजीत भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या आभ्यासकांमध्ये संवाद घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दया कृष्ण यांनी प्रा. रेगेंसमवेत भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास करून दोन्ही विचारधारेंतील परस्पर संबंधांचा शोध घेण्यासाठी अनेक परिसंवाद आयोजित केले. पारंपरिक भारतीय  विचारधारा आणि आधुनिक विचारधारा यांना जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या प्रकल्पाला ते ‘रेगे एक्स्परिमेंट’ म्हणून संबोधत. अशा परिसंवादांचा परिपाक त्यांनी व प्रा. रेगेंनी संपादित केलेल्या संवाद या महत्त्वाच्या पुस्तकात झाला.

दया कृष्ण यांनी २००० साली भक्तीवरील खंडांचे संपादन केले. यात भावनांच्या, प्रामुख्याने भक्तीच्या, भावनेच्या तत्त्वज्ञानाविषयी गांभीर्याने संशोधन केलेले दिसते. शेवटच्या दोन वर्षांत त्यांनी एका महत्त्वाच्या व प्रभावी प्रकल्पावर काम केले. ज्याला ते ‘ऋग्वेदाची जयपूर आवृत्ती’ असे संबोधतात. त्यांनी संस्कृत पंडित व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक यांच्यात संवाद आयोजित करून ऋग्वेदाचा सखोल अभ्यास करून त्याची पुनर्लिखित आवृत्ती प्रकाशित केली. त्यांच्या या कामास तोड नाही. ‘ऋगवेदाची जयपूर आवृत्ती’ केवळ एक प्रचंड प्रभावी प्रकल्पच नाही, तर भावी काळात भारतीय तत्त्वज्ञानात प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास करून त्यांचे पुनर्लेखन करण्यासाठी विद्वानांसमोर व तत्त्ववेत्त्यांसमोर ठेवलेले उत्तम उदाहरण तसेच खुले निमंत्रण आहे.

सर्वसामान्य माणसांना, विद्वानांना व तत्त्वज्ञानाच्या भारतीय तसेच पाश्चात्त्य आभ्यासकांना नेहमीच असे वाटत आले आहे की, भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचा घनिष्ठ संबंध आहे. दया कृष्ण यांनी त्यांच्या लेखांतून भारतीय तत्त्वज्ञानाविषयी जनमाणसांच्या तसेच विद्वानांच्या मनात असलेल्या या ठाम प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न केला. दया कृष्ण यांच्या मते भारतीय तत्त्वज्ञान पाश्चात्त्य तत्त्वज्ञानापेक्षा किंवा इतर कोणत्याही तत्त्वज्ञानाच्या तुलनेत वेगळे नाही. इतर वैचारिक परंपरेत जे तात्त्विक विषय, समस्या यांचा ऊहापोह केला जातो, तेच विषय, समस्या भारतीय तत्त्वज्ञ तितक्याच सखोलपणे अभ्यासताना दिसतात. अध्यात्माची ओढ, मोक्षप्राप्तीच्या मार्गांचा शोध हे भारतीय तत्त्वज्ञानासंबधी असलेले एक मिथक आहे. अध्यात्माच्या व मोक्षप्राप्तीच्या इच्छेच्या या जोखडातून भारतीय तत्त्वज्ञानाला मुक्त करणे आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

दया कृष्ण यांच्या मते कुठल्याही संस्कृतीतील ज्ञानशाखेचे मूळ तिथल्या प्राचीन परंपरेत असते. परंतु आज प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान केवळ इतिहास म्हणून कुतूहलाने अभ्यासले जाते. त्याचा आधुनिक तत्त्वज्ञानाशी व आज आभासल्या जाणाऱ्या तात्विक समस्यांशी संबंध दिसत नाही. म्हणूनच त्यांच्या मते पारंपरिक भारतीय तत्त्वज्ञानाचा गांभीर्याने विचार करून त्याचा आधुनिक तत्त्वज्ञानाशी असलेला परस्पर संबंध समजून घेणे आवश्यक आहे. तसेच भारतीय तत्त्वज्ञानाच्या पारंपरिक ग्रंथांचा डोळसपणे अभ्यास करणे पण आवश्यक आहे; कारण सर्वसामान्य अभ्यासक आणि विद्वान हेदेखील या ग्रंथांविषयी बऱ्याच गोष्टी गृहीत धरताना दिसतात.

भारतीय तत्त्वज्ञानासंबंधित तीन मिथकांचा दया कृष्ण उल्लेख करतात व सर्वांच्या मनात असलेले हे गैरसमज दूर होणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटते. त्यांची पहिली ‘तात्त्विक लढाई’ या तीन मिथकांविरुद्ध होती. दया कृष्ण यांच्या इंडियन फिलॉसफी : अ काउंटर पर्स्पेक्टिव्ह या पुस्तकात त्यांचे या मिथकांसंबंधी विचार आढळतात. यातील पहिले मिथक म्हणजे ‘भारतीय तत्त्वज्ञान हे आध्यात्मिक आहे’. भारतीय तत्त्वज्ञानात असलेल्या मोक्षाच्या कल्पनेमुळे सर्वांनाच ते आध्यात्मिक वाटते. त्यांच्या मते कोणतेही तत्त्वज्ञान एकतर वास्तविकतावादाच्या आधारावर किंवा नैतिकतेच्या आधारावर आध्यात्मिक असू शकते. परंतु यांपैकी कोणत्याही आधारावर भारतीय तत्त्वज्ञान आध्यात्मिक नाही, हे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मते मोक्षाची कल्पना भारतीय तत्त्वज्ञानात महत्त्वाची नाही; कारण सर्वच भारतीय दर्शनशास्त्रे मोक्ष हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मानत नाहीत. जी दर्शनशास्त्रे तसे मानतात, तीदेखील मोक्ष या कल्पनेला समान महत्त्व देत नाहीत. तसेच मोक्षाच्या स्वरूपाविषयी आणि मोक्षप्राप्तीच्या मार्गाबद्दलदेखील भारतीय दर्शनशास्त्रात व तत्त्वज्ञांमधे एकमत नाही. म्हणून भारतीय तत्त्वज्ञान आध्यात्मिक आहे, हे एक मिथक आहे.

भारतीय तत्त्वज्ञानातील सर्व दर्शनशास्त्रे ही दोन प्रकारांत विभागली जातात. एक, आस्तिक. जी वेदांना मानतात, त्यांचे श्रेष्ठत्व मानतात व दुसरी, नास्तिक. जी वेदांना, त्यांच्या अधिकाराला मानत नाहीत. अशाप्रकारे भारतीय दर्शनशास्त्रांची केलेली विभागणी ही दया कृष्ण यांच्या मते भारतीय तत्त्वज्ञानाविषयी असलेले दुसरे मिथक आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील सहा आस्तिक दर्शनांपैकी मीमांसा आणि वेदान्त ही दोन वगळता इतर दर्शने ही वेदांच्या अर्थाचे विवेचन करीत नाहीत. मीमांसा आणि वेदान्त हे वेदांचे विवेचन करत असले तरी, वेदांमधला कुठला भाग श्रेष्ठ असून वेदांचे मुख्य अंग कोणते या बाबत मीमांसा आणि वेदान्तदर्शन यांमध्ये एकमत नाही. तसेच वेदांताचे पूरस्कर्ते गीता आणि ब्रह्मसूत्र यांचे श्रेष्ठत्वदेखील मानतात; पण हे दोन ग्रंथ वेदांचा भाग नाहीत. अशा रीतीने आस्तिक दर्शनांमध्ये वेदांचे महत्त्व मर्यादित आहे. शब्द प्रमाणाच्या आधारावर वेदांचा अधिकार मानला जातो. परंतु सर्वच आस्तिक दर्शनशास्त्रे शब्द प्रमाणाला स्वतंत्र प्रमाण मानत नाहीत. म्हणून अशाप्रकारे वेदांचे श्रेष्ठत्व मानणे व त्यावर आधारित दर्शनशास्त्राची विभागणी हे भारतीय तत्त्वज्ञानाविषयी असलेले एक मिथक आहे.

वेदांचे श्रेष्ठत्व मानण्यावर आधारित आस्तिक दर्शनशास्त्रे म्हणजेच भारतीय तत्त्वज्ञानातील विविध ‘स्कूल’ची ओळख ही दया कृष्ण यांच्या मते भारतीय तत्त्वज्ञानाविषयी असलेले तिसरे मिथक आहे. असे ‘स्कूल’ म्हणजेच तत्त्वज्ञानातील विविध मतप्रवाह, ही बंदिस्त ‘स्कूल’ आहेत, असे वाटते. ही ‘स्कूल’ वेदांचे श्रेष्ठत्व स्वीकारत असल्याने त्यांनी त्यांचे विचार, तात्त्विक विवेचन एकदा मांडल्यावर त्यात बदलाला वाव नाही, असे वाटते. परंतु या दर्शनशास्त्रांचा (स्कूल्सचा) अभ्यास केल्यावर तसे दिसून येत नाहीत. ती काळानुसार बदलत व उत्क्रांत झालेली दिसतात.

तीन मिथकांव्यतिरिक्त भारतीय तत्त्वज्ञानातील अनेक विसंगती दया कृष्ण यांनी दर्शविल्या आहेत. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानातील दोन महत्त्वाच्या संकल्पना ‘यज्ञ’ आणि ‘कर्म’ सिद्धांत कसे विरोधाभासी आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. कर्मसिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार बरे किंवा वाईट फळ भोगावेच लागते. भारतीय परांपरेनुसार काही फळाची अपेक्षा ठेऊन यज्ञ केला जातो; परंतु प्रत्यक्ष यजमान यज्ञ करीत नाहीत. त्यांच्यासाठी ऋत्विक यज्ञ करतात. अनेक व्यक्ती मिळून यजमानासाठी यज्ञ करतात व त्यासाठी त्यांना मोबदला म्हणून यजमानांकरवी दक्षिणा दिली जाते. कर्मसिद्धांताप्रमाणे जे यज्ञ करतात त्यांना त्याचे फळ मिळाले पाहिजे; पण तसे न होता यज्ञाचे फळ यजमानाला मिळते. यज्ञ संकल्पनेनुसार दुसऱ्याने केलेल्या कर्माचे फळ यजमानाला मिळते. परंतु कर्मसिद्धांताप्रमाणे एका व्यक्तीने केलेल्या कर्माचे फळ दुसऱ्याला मिळू शकत नाही. हा भारतीय परंपरेतील दोन महत्त्वाच्या संकल्पनांतील विरोधाभास आहे.

‘पुरुषार्थ’ ही अशीच एक भारतीय तत्त्वज्ञानातील महत्त्वाची व मध्यवर्ती संकल्पना आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मानवाच्या आयुष्याची ध्येय आहेत. दया कृष्ण त्यांच्या नेमक्या अर्थाबाबत प्रश्न उपस्थित करतात. तसेच ते विचारतात की, मानवी जीवनाचे सर्व हेतू या पुरुषार्थात समाविष्ट आहेत का? त्यांचा परस्परांशी काय संबंध आहे? ते एकमेकांना पूरक आहेत का? दया कृष्ण यांच्या मते मोक्ष व इतर तीन पुरुषार्थ एकमेकांना पूरक नाहीत. मोक्षप्राप्तीच्या ध्येयाची परिणती इतर पुरुषार्थ नाकारण्यात होते.

दया कृष्ण यांची शेवटची ‘तात्त्विक लढाई’ उत्तर आधुनिकतेच्या (Postmodernism) विरूद्ध होती. त्यांच्या ‘न्यारेटिव्ह, मेटा-न्यारेटिव्ह, नो-न्यारेटिव्ह’ या लेखात ते म्हणतात की, उत्तर आधुनिक विचारसरणी ही पाश्चात्त्य आधुनिकतावादाच्या विरोधात दिलेला बालिश प्रतिसाद आहे.

दया कृष्ण यांची जिज्ञासू, चिकित्सक वृत्ती वाखाणण्यासारखी होती. त्यांची प्रश्न उपस्थित करून प्रस्थापित मते व सिद्धांत यांवर शंका घेणे, तसेच सर्व अंगाने विषयाचे सखोल आणि मुळाशी जाऊन खुल्या मनाने विश्लेषण करून सत्य जाणून घेण्याची ‘सॉक्रेटीक’वृत्ती सर्वांना प्रभावित करणारी होती. केवळ तत्त्वज्ञानच नव्हे, तर कुठल्याही विषयाचा ते सखोल अभ्यास करायचे. उदा., जेव्हा दया कृष्ण आजारी होते, तेव्हा त्यांनी आजाराची कल्पना खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न केला. गंभीर आजारानंतर त्यांनी त्यांच्या मित्राला आर. सी. शाह यांना लिहिले की, “मला आशा आहे की, माझ्या आजाराबद्दलची आपली चिंता संपली आहे. ‘आजारपण’ ही जीवनाच्या सर्व अवस्था आणि वयोगटातील एक ‘नैसर्गिक’ स्थिती असल्याचे दिसते आहे… परंतु ‘आजार’ केवळ शरीराचे नसतात, तर मन, बुद्धी, तर्क आणि आत्मा यांचेदेखील असतात. मानसिक आजार ज्ञात आहेत; परंतु तर्काचे आजार अथवा आध्यात्मिक आजार ऐकीवात नाही आणि कल्पनाशक्तीचे काय? तिची या सर्व स्तरांवरील रोगांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे का? आणि जर तसे असेल, तर अशा रोगांवर ‘उपचार’ काय? जे आजार कल्पनेत रुजले आहेत आणि दुसर्‍या स्तरावर, चैतन्यात रुजले आहेत त्यांचे काय? जर चैतन्य हाच ‘आजार’ असेल ज्याने आपल्या जीवनावर परिणाम केला असेल, तर मग ‘जीवन’ हे भौतिक पदार्थांना/जगाला झालेला आजार म्हणता येईल का? भौतिक पदार्थांना आजार झाला असे वाटत नाही. ‘गंज लागणे’ किंवा ‘किरणोत्सर्गी क्षय’ यांसारख्या गोष्टी असूनही त्या आजार मानल्या जात नाही. एकेकाळी, पदार्थविज्ञानमधल्या कृष्णविवरच्या विवरणावरून असे दिसून आले होते की, त्याला भौतिक पदार्थांना झालेला आजार असे संबोधले जाऊ शकते; परंतु स्टीफन हॉकिंग यांच्या वृत्तपत्रांत आलेल्या सिद्धांतानुसार तसे म्हणता येणार नाही. आपण लेखक आहात; यावर लिहित का नाही? व्हिट्गेन्श्टाइनच्या म्हणण्यानुसार जसे ‘तत्त्वज्ञान’ हा भाषेचा आजार आहे, तसेच ‘साहित्य’ हा भाषेचा आजार आहे का?” या एका उदहरणातून दया कृष्ण यांच्या जिज्ञासू आणि चिकित्सक वृत्तीची पुरेपूर कल्पना येते व ते विसाव्या शतकातील उल्लेखनीय भारतीय तत्वज्ञ म्हणून का ओळखले जातात, हे कळते.

दया कृष्ण यांच्या तत्त्वज्ञानाचा, त्यांच्या कार्याचा गंभीरपणे व बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यांची जिज्ञासू, चिकित्सक वृत्ती, प्रश्न विचारून, संवाद साधून विषयाच्या सर्व अंगांना स्पर्श करून एका तार्किक निष्कर्षाप्रत येण्याची कला, सर्व तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी  अंगीकारून त्यांचा वारसा पुढे नेणे आवश्यक आहे.

जयपूर येथे त्यांचा मृत्यू झाला. दया कृष्ण यांच्या पश्चात त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०११ साली दया कृष्ण अ‍कॅडेमिक फाउंडेशनची स्थापना झाली. ही संस्था २०११ पासून दरवर्षी दया कृष्ण मेमोरियल व्याख्यानमालेचे आयोजन करीत असून २०१३-१४ पासून दरवर्षी राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन करीत आहे. तसेच त्यांनी २०१६ पासून दया कृष्ण निबंध स्पर्धादेखील सुरू केली आहे.

दया कृष्ण यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : इंग्रजी ग्रंथ : द नेचर ऑफ फिलॉसॉफी (१९५५), प्लॅनिंग, पॉवर अँड वेलफेअर (१९५९), कन्सिडरेशन टुवर्ड्स : अ थेअरी ऑफ सोशल चेंज (१९६५), पॉलिटिकल डेव्हलपमेंट : अ क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह (१९७९), डेव्हलपमेंट डिबेट (१९८७), इंडियाज इंटलेक्च्युअल ट्रॅडिशन : अटेम्प्ट्स ॲट कन्सेप्च्युअल रिकन्स्ट्रक्शन (१९८७), द आर्ट ऑफ द कन्सेप्च्युअल (१९८९), इंडियन फिलॉसॉफी : अ काउंटर पर्स्पेक्टिव्ह (१९९१), संवाद : अ डायलॉग बिटविन टू फिलॉसॉफिकल ट्रॅडिशन (१९९१), सोशल फिलॉसॉफी : पास्ट अँड फ्यूचर (१९९३), द प्रॉब्लेमॅटिक अँड कन्सेप्च्युअल स्ट्रक्चर ऑफ क्लासिकल इंडियन थॉट अबाउट मॅन, सोसायटी अँड पॉलिटी (१९९६), प्रोलेगॉमेना टू एनी फ्यूचर हिस्टोरिऑग्राफी ऑफ कल्चर्स अँड सिव्हिलायझेशन (१९९७), इंडियन फिलॉसॉफी : अ न्यू ॲप्रोच (१९९७), टुवर्ड्स अ थेअरी ऑफ स्ट्रक्चरल अँड ट्रान्सडेंटल इल्यूशन (१९९८), भक्ती : अ कन्टेम्पररी डिस्कशन (२०००), न्यू पर्स्पेक्टिव्हज इंडियन फिलॉसॉफी (२००१), डेव्हलपमेंट्स इन इंडियन फिलॉसॉफी फ्रॉम एटीन्थ सेंच्यूरी ऑनवर्ड्स : क्लासिकल अँड वेस्टर्न (२००२), डिस्कशन अँड डिबेट इन इंडियन फिलॉसॉफी : इश्यूज इन वेदांत, मीमांसा अँड न्याय (२००४), द न्याय सूत्राज : अ न्यू कमेंटरी व अन ओल्ड टेक्स्ट (२००४). हिंदी ग्रंथ : भारतीय चिंतन परम्पराएं : नये आयाम, नयी दिशाएं (१९९६), भारतीय एवं पाश्चात्त्य दार्शनिक परम्पराएं (२००६).

संदर्भ :

                                                                                                                                                              समीक्षक : मीनल कातरणीकर