ग्राम्शी, आंतोनियो : (२२ जानेवारी १८९१—२७ एप्रिल १९३७). इटालियन राजकीय तत्त्वज्ञ, इटालियन मार्क्सवादी पक्षाचे सहसंस्थापक-नेते आणि विसाव्या शतकातील मार्क्सवादी प्रवाहातील महत्त्वाचे विचारवंत. त्यांचा जन्म इटलीमधील सार्डिनियातील कॅलिगरी प्रांतात झाला. आई-वडिलांना झालेल्या सात अपत्यांपैकी आंतोनियो हे चौथे अपत्य. आपल्या बहिणीसह शिकताना बालपणातच त्यांना साहित्याविषयी आवड निर्माण झाली. त्यांचा सर्वांत मोठा भाऊ जेन्नारो यांचा कल समाजवादाकडे होता. भावाच्या समाजवादी विचारांनुसार सुरू झालेल्या प्रवासाचा आंतोनियो यांच्या राजकीय विकासावर मोठा प्रभाव पडला.

१८९७ साली आंतोनियोच्या वडिलांना प्रशासकीय गैरप्रकाराबद्दल शिक्षा झाली आणि त्यामुळे मुलाबाळांसह आंतोनियोची आई गिलझारा या ठिकाणी स्थलांतरित झाल्या. येथेच ग्राम्शींचे प्राथमिक शिक्षण झाले. अगदी लहानपणीच एका दुर्दैवी घटनेमुळे ग्राम्शींना कुबडेपण आले होते. त्यामुळे त्यांची उंचीही कमी राहिली.

१९११ हे वर्ष तरुण ग्राम्शींच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तूरिन विद्यापीठासाठी त्यांनी अर्ज केला आणि या विद्यापीठाची शिष्यवृत्ती पटकावली. पूर्वीच्या सार्डिनिया साम्राज्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी राखीव अशी ही शिष्यवृत्ती होती. या विद्यापीठामध्ये ‘फॅकल्टी ऑफ लेटर्स’ अभ्यासक्रमाकरता ग्राम्शींनी प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमात साहित्यासह तत्त्वज्ञान, धर्म, भाषा, कला आदी विषयांचा अंतर्भाव केलेला होता. या विद्यापीठात असतानाच ग्राम्शींचा इटालियन समाजवादी पक्षासोबत संपर्क आला. आत्यंतिक हलाखीची परिस्थिती आणि प्रचंड दगदग असतानाही सामाजिक शास्त्रांसह भाषा विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये ग्राम्शींनी विशेष प्रावीण्य मिळवले.

अकादमिक बुध्दिवंत म्हणून आश्वासक कारकीर्द सुरू असतानाही ग्राम्शींनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला. नाटक, कादंबरी यांवरील परीक्षणात्मक स्तंभलेखन ते करत असत. इटालियन समाजवादी पक्षाच्या आवांती  या वृत्तपत्राच्या तूरिन आवृत्तीत हे लेख प्रकाशित होत आणि मोठ्या प्रमाणावर वाचले जात. या वृत्तपत्राचे संपादक म्हणून बेनीतो मुसोलिनी काम पाहात होते. कामगार वर्गाच्या विविध अभ्यासगटांमध्ये ग्राम्शींची व्याख्याने होत असत. या व्याख्यानांचे विषय रोमॉ रोलां यांच्या कादंबऱ्यांपासून ते फ्रेंच कम्युन, फ्रेंच क्रांती, इटालियन क्रांती, कार्ल मार्क्सचे लेखन असे विविध स्वरूपाचे असायचे. पहिले जागतिक महायुद्ध १९१४ ते १९१८ या काळात घडले. इटलीने या युद्धात आक्रमक पवित्रा १९१७ साली अवलंबल्यावर आपण नेमकी काय भूमिका घ्यायची असा संभ्रम पक्षात निर्माण झाला. साम्राज्यवादाच्या समर्थनार्थ भूमिका घ्यावी अथवा घेऊ नये हा मतभेदाचा प्रमुख मुद्दा होता. यातून पक्षामध्ये फूट पडली.

आर्थिक, राजकीय कृतीला सांस्कृतिक जोड असण्याची आवश्यकता या काळात ग्राम्शींना प्रकर्षाने वाटली. यातून कामगार वर्गासाठीच्या सांस्कृतिक संघटनाला सुरुवात झाली. १९१९ मध्ये ग्राम्शींनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत लॉर्दिने नुआवो (इं. भा. द न्यू ऑर्डर) नावाचे साप्ताहिक सुरू केले. इटलीतील डाव्या चळवळीसाठी हे नियतकालिक महत्त्वाचे ठरले. या नियतकालिकातून अमेरिका, रशिया आणि यूरोपमधील राजकीय आणि साहित्यिक प्रवाहांवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले.

राजकीय सहभाग : इ. स. १९२१ ते १९२६ हा कालखंड ग्राम्शींच्या आयुष्यातील अत्यंत धकाधकीचा होता. १९२१ साली इटालियन कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. इटलीचा प्रतिनिधी म्हणून ग्राम्शींनी कम्युनिस्ट इंटरनॅशनलमध्ये सहभाग नोंदविला (मे १९२२–नोव्हेंबर १९२३). यासाठी ते मॉस्कोमध्ये दीड वर्षे वास्तव्यास होते. यानंतर ते इटालियन कम्युनिस्ट पक्षाचे सचिव होते. रशियामध्ये वास्तव्यास असताना रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या जुल्का सुश्त यांच्यासोबत त्यांचा परिचय झाला आणि पुढे त्यांच्यासोबत विवाहही.

१९२६ सालच्या नोव्हेंबर महिन्यात बेनीतो मुसोलिनीच्या फॅसिस्ट सरकारने इटालियन कम्युनिस्ट पक्षावर बंदी आणली आणि ग्राम्शींना अटक करण्यात आली. ग्राम्शींना संसदेचे विशेषाधिकार असतानाही कामगार वर्गामध्ये द्वेषभावना भडकवण्याचा आणि नागरी युद्ध चिथावण्याचा पयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना अटक करताना सरकारी वकील म्हणाले, “या माणसाचा मेंदू किमान २० वर्षांसाठी बंद राहील, अशी व्यवस्था केली पाहिजे”.  त्यानुसार ग्राम्शींना २० वर्षांची शिक्षा झाली. त्यांनी आपल्या कारावासाच्या काळात विपुल लेखन केले. ‘प्रिझन नोटबुक्स’ म्हणून प्रसिद्ध असलेले लेखन हे याच काळातील. १९३५ साली आरोग्याच्या कारणास्तव त्यांना तुरुंगातून बाहेर नेण्यात आले आणि दवाखान्यात भरती करण्यात आले. मेंदूवर आघात होऊन त्यांचा १९३७ साली मृत्यू झाला. ग्राम्शी जीवंत असताना त्यांचे लेखन पुस्तक स्वरूपात प्रकाशित होऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांनी लिहिलेली पत्रे आणि इतर लेखनही प्रसिद्ध झाले.

ग्राम्शींच्या लेखनाचा आढावा घेताना तुरुंगात रवानगी होण्यापूर्वीचे लेखन आणि तुरुंगातील लेखन असे ढोबळमानाने वर्गीकरण करता येते. तुरुंगात रवानगी होण्यापूर्वी ग्राम्शी प्रामुख्याने विविध प्रासंगिक बाबींविषयी प्रसिद्ध नियतकालिकांमधून लिहित होते. लोकांना जागृत करणे, हा त्या लेखनाचा प्रमुख उद्देश होता. समाजवाद आणि मार्क्सवाद हे त्यांच्या चिंतनाचे प्रमुख विषय होते.

नवमार्क्सवाद : उत्पादन पद्धती हा समाजाचा पाया असून उत्पादन साधने आणि उत्पादन संबंध यांच्या द्वंद्वातून धर्म, संस्कृती, कला आदी गोष्टी आकाराला येतात, अशी मांडणी अभिजात मार्क्सवादाने केली. सामाजिक परिवर्तनाचा पाया केवळ भौतिक असल्याचे नाकारत ग्राम्शी मार्क्सवादाची पुनर्मांडणी करतात. म्हणून  त्यांना ‘नवमार्क्सवादी’ असेही संबोधले जाते. ग्राम्शींनी कामगार वर्ग, शिक्षण आणि संस्कृती या संदर्भाने मांडणी केली. समाजवादी लोकशाही आणि साम्यवाद यांबाबत त्यांचे चिंतन विविध लेखांमधून/निबंधांमधून समोर आले.

मार्क्सवादी पक्षाने फॅसिझमच्या विरोधात लढताना वैचारिकदृष्ट्या आणि रणनीतीच्या अंगाने काय करावे, या संदर्भात ग्राम्शींनी युक्तिवाद केला. ग्राम्शींनी तुरुंगात जे लेखन केले, ते प्रिझन नोटबुक्स  या शीर्षकासह १९४५ नंतर प्रकाशित झाले. सु. २९ नोटबुक्सचे हे संकलन आहे. या नोटबुक्समधून ग्राम्शी यांचा मूलभूत विचार ध्यानात येतो. त्यातील ‘धुरीणत्व’ (Hegemony) ही सर्वांत गाभाभूत संकल्पना आहे. ग्राम्शींच्या पूर्वी व्लादिमिर लेनिन यांनी धुरीणत्व या संज्ञेचा वापर केला होता. लेनिन यांच्या मते केवळ आर्थिक अंतर्विरोधाला दिल्या जाणार्‍या प्रतिक्रियेतून क्रांतीकरता पोषक वातावरण निर्माण होणार नाही, तर त्यासाठी सांस्कृतिक संघर्षाकडेही योग्य प्रमाणात लक्ष द्यावे लागेल. तसेच सर्व शोषित वर्गास एकत्र यावे लागेल. लेनिनच्या विचारांचा प्रभाव असला तरीही ग्राम्शींनी धुरीणत्वाच्या संकल्पनेला स्वतःचा असा अर्थ दिला.

धुरा या शब्दाचा अर्थ होतो अग्रभाग, जबाबदारी. धुरा सांभाळणारी व्यक्ती धुरीण. नेतृत्वाच्या या अर्थाने धुरीणत्व संज्ञेचा वापर ग्राम्शींनी केला आहे. सत्ताधारी वर्ग वैचारिक आणि नैतिक प्रभुत्व प्रस्थापित करतो. त्यामुळे इतर समूह सत्ताधारी वर्गाच्या वैचारिक, नैतिक धारणा आत्मसात करतो. सत्ताधारी वर्गाप्रमाणेच इतर समूहांचे सांस्कृतिक वर्तनही होऊ लागते. आपल्या वैचारिक, नैतिक वर्चस्वाच्या माध्यमातून इतर समूहांना विशिष्ट प्रकारे वर्तन करण्यास भाग पाडण्याच्या राज्यकर्त्या वर्गाच्या कृतींना ग्राम्शी धुरीणत्व असे संबोधतात. संमती (Consent) आणि बळाच्या (Coercion) आधारे ही प्रक्रिया घडते.

येथे ‘नागरी समाज’ ही एक महत्त्वाची संकल्पना ग्राम्शींनी मांडली आहे. शासकीय यंत्रणेचा भाग नसलेल्या स्वयंसेवी संस्था, कामगार संघटना, चर्च, प्रसारमाध्यमे आदी बाबींनी मिळून नागरी समाज आकाराला येतो. ग्राम्शींच्या मते नागरी समाजातून संमतीद्वारे धुरीणत्व आकाराला येते. राज्यसंस्थेबाबतच्या आणि एकूणच धुरीणत्वाच्या संदर्भातील त्यांच्या मांडणीत नागरी समाजाची भूमिका निर्णायक आहे.

धुरीणत्वाच्या माध्यमातून राज्यसंस्था आणि भांडवलशाही आपले स्थान अधिक बळकट करते. या धुरीणत्वाला आव्हान देताना ग्राम्शी प्रतिधुरीणत्वाची (Counter-Hegemony) कल्पना मांडतात. कामगार वर्गातून प्रतिधुरीणत्व निर्माण व्हावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. यासाठी त्यांच्या जाणिवा प्रगल्भ होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करून प्रतिधुरीणत्व निर्माण करताना स्थानयुद्ध (War of Position) आणि डावपेचाचे युद्ध (War of Manoeuvre) अशा मार्गांची ग्राम्शी चर्चा करतात. ‘डावपेचाचे युद्ध’ यामध्ये सशस्त्र क्रांतीची कल्पना केलेली आहे. हे युद्ध दीर्घकाळाचे नसते, तर वेगवान आणि झटपट स्वरूपाचे असते. असे डावपेचाचे युद्ध रशियामध्ये १९१७ साली यशस्वी ठरले. मात्र पश्चिम यूरोपामध्ये स्थानयुद्धाची आवश्यकता आहे. स्थानयुद्धात नागरी समाजाची भूमिका निर्णायक असल्याचे ग्राम्शी मानतात. कामगार वर्गाने केवळ आपल्या हितसंबंधांपुरते संघटन न करता संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करावे, असे ते सूचवतात. धुरीणत्व आकाराला आणण्यात आपल्या इटालियन साम्यवादी पक्षाची भूमिका निर्णायक असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. मॅकियाव्हली यांनी कल्पिलेल्या ‘राजा’ प्रमाणे पक्षाने भूमिका पार पाडली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. मॅकियाव्हली यांनी प्रिन्स  या पुस्तकातून राजा कसा असावा, याबाबत उपदेश केला आहे. येथे साम्यवादी पक्ष हाच ‘आधुनिक प्रिन्स’ असेल. कामगार वर्गात राजकीय भान निर्माण होईल आणि सत्ताधारी वर्गाच्या धुरीणत्वाला कामगार आव्हान देतील.

येथे ग्रीक पुराणकथेतील सेंटौरचे रूपक त्यांनी दिले आहे. हा सेंटौर प्राणी म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा घोडा होय. शरीर घोड्याचे आणि डोके, मेंदू, बाहू माणसाचे अशी रचना असलेला प्राणी आहे. डोके हे विचारांचे प्रतीक आहे. शरीर हे बळाचे प्रतीक आहे. मेंदूंमधील विचारांवर जर प्रभुत्व निर्माण केले गेले, तर बाकीचे शरीर आपोआप मागे येते. ग्राम्शींनी सेंटौरचे ‘मवाळ रूप’ स्वीकारले आणि त्या आधारे धुरीणत्वाची मांडणी केली. बळाऐवजी संमतीवर आधारित धुरीणत्वाला त्यांनी अधिक प्राधान्य दिले.

या धुरीणत्व निर्मिती प्रक्रियेत बुद्धिवंत निर्णायक भूमिका पार पाडतात. ग्राम्शी पारंपरिक बुद्धिवंताची कल्पना स्पष्ट करतात आणि ‘सेंद्रिय बुद्धिवंत’ (Organic Intellectual) या संकल्पनेची मांडणी करतात. सेंद्रिय बुद्धिवंत ही व्यक्ती केवळ सैद्धांतिक मांडणी करणार नाही, तर ती प्रत्यक्षात तळागाळात जाऊन काम करेल. प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्या व्यक्तीस असेल. व्यावहारिक कौशल्ये, तांत्रिक कौशल्ये सेंद्रिय बुद्धिवंतास अवगत असतील. कामगार वर्गासोबत त्या व्यक्तीची जैविक नाळ जोडली गेलेली असेल. हस्तिदंती मनोर्‍यातील सिद्धांताच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामात, चळवळीत सहभाग घेणारी ही व्यक्ती असेल. ही बुद्धिवंत व्यक्ती कार्यकर्ता आणि विचारवंत या दोहोंचे काम करेल. तिचे ज्ञान हे प्रत्यक्ष व्यवहार आणि सैद्धांतिक आकलन यातून निर्माण झालेले असेल. सेंद्रिय बुद्धिवंताने सिद्धांत आणि व्यवहार यांतील द्वैत मिटवणे अपेक्षित आहे. या दोहोंमध्ये फरक करून सैद्धांतिकतेला अधिक महत्त्व देणे आणि व्यवहारातून प्राप्त झालेल्या ज्ञानास कनिष्ठ लेखणे ही उतरंड ग्राम्शी नाकारतात आणि नव्या सर्जनशील सेंद्रिय बुद्धिवंताची कल्पना मांडतात.

ग्राम्शींच्या मते कोणत्याही समाजात सत्ताधारी वर्गाच्या धुरीणत्वाला धक्का पोहोचल्याने अरिष्ट (Crisis) निर्माण होते. फ्रेंच राज्यक्रांती आणि इटलीच्या एकीकरणाच्या संदर्भाने ग्राम्शी अशा अरिष्टांविषयी भाष्य करतात. बळाच्या आधारे किंवा प्रतीकात्मक साधनांचा वापर करून सत्ताधारी सामाजिक गटाला संकटातून बाहेर पडता येऊ शकते; मात्र तो उपाय पुरेसा किंवा समाधानकारक नसतो. संकटास तात्पुरते उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या अधिकारांसह पुन्हा सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी सामाजिक गट करतो; मात्र व्यापक समाजास आपल्या धुरीणत्वाच्या प्रकल्पाच्या अधीन करून घेऊ शकत नाही, त्यातून ‘अकरणात्मक क्रांती’ (Passive Revolution) आकाराला येते. प्रत्यक्ष क्रांती न होता ही क्रांती घडते, त्यामुळे ‘क्रांतिविहीण क्रांती’ असेही या क्रांतीस म्हटले जाते. इटलीच्या एकीकरणाच्या दरम्यान आणि नंतरही धुरीणत्व स्थापण्यात आलेल्या अपयशाच्या शृंखलेतून मुसोलिनीच्या फॅसिझमचा उदय झाला, अशी मांडणी ते करतात.

रोमन एकाधिकारशहा ज्यूलियस सीझर याच्या नावावरून रूढ झालेला ‘सीझरवाद’ हा शब्द ग्राम्शी अनेकदा वापरतात. बेनीतो मुसोलिनी आपण स्वतःच ‘नवे सीझर’ असल्याचा भास निर्माण करत होता. याची चिकित्सा करत राजकीय पक्ष या सीझरवादाला कसे प्रत्युत्तर देऊ शकतात, या संदर्भात ग्राम्शींनी मांडणी केली.

या संपूर्ण मांडणीत ग्राम्शींनी सांस्कृतिक आयामाचा मूलगामी विचार केला आहे. इंग्रजीतील ‘कॉमन सेन्स’ या शब्दाचा वापर ‘व्यवहारी शहाणपण’ या अर्थाने केला जातो. मात्र ग्राम्शी तो शब्द ‘सामूहिक लोकजाणीव’ या अर्थाने वापरतात. लोकसाहित्याचे महत्त्व येथे अधोरेखित केले आहे. लोकजाणिवेतील मूल्यांच्या आधारे ‘चांगली जाणीव’ निर्माण केली पाहिजे, अशी आग्रही भूमिका ग्राम्शी प्रतिपादित करतात. लोकसंस्कृती ही कनिष्ठ दर्जाची आहे, असे मानता कामा नये. या संस्कृतीसोबत कसे नाते प्रस्थापित करता येईल, याचा विचार केला पाहिजे, असे ग्राम्शींचे मत आहे. यातून आकाराला येणार्‍या राष्ट्रीय जनकेंद्री संस्कृतीतून परिवर्तन घडवता येऊ शकते, असा त्यांचा विश्वास होता. धर्म, संस्कृती, नीती, तत्त्वज्ञान हे घटक परिवर्तन प्रक्रियेत महत्त्वाचे असतात.

कादंबऱ्यांच्या विविध प्रकारांची चर्चा करून ग्राम्शी लोकप्रिय साहित्याबाबत मांडणी करताना लेखकांनी वास्तवाशी नाते सांगत जगण्याला भिडावे, अशी सूचना करतात. तसेच कादंबरीसह विविध नाटक, सिनेमा अशा लोकप्रिय कलांचा प्रभाव ध्यानात घेऊन सेंद्रिय बुद्धिवंताने समाजातील धारणा प्रभावित करायला हव्यात, असे आग्रही प्रतिपादन करतात. लोकाभिमुख वक्तृत्व, पत्रकारिता आदी बाबींचे महत्त्व ते पटवून देतात.

आधीच उल्लेखल्याप्रमाणे इटलीतील फॅसिझमच्या आवृत्तीला संबोधताना ते ‘अकरणात्मक क्रांती’ असा शब्दप्रयोग करतात. या फॅसिझमला वैचारिक आणि व्यावहारिक पातळीवर कशाप्रकारे उत्तर देता येऊ शकते, याची सैद्धांतिक आणि डावपेचात्मक मांडणी ग्राम्शींनी केली.

आक्षेप :

  • धुरीणत्व ही संकल्पना मांडताना आंतोनियो ग्राम्शींनी बळ आणि संमती या दोहोंमध्ये सुस्पष्ट फरक केला नाही, अशी टीका त्यांच्यावर होते.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवरील धुरीणत्वाची चिकित्सा ग्राम्शींच्या लेखनात अपुर्‍या प्रमाणात आहे.
  • ‘राष्ट्रीय जनकेंद्री’ संस्कृतीचे निकष सापेक्ष असल्याने अशा संस्कृतीचे निर्धारक काय असतील, ही बाब सुस्पष्ट होत नाही. त्यामुळे धुरीणत्वाचा प्रकल्प कामगार वर्गाच्या उत्थानासाठी कसा केला जाईल, हा मुद्दा धूसर राहतो.
  • प्रतिधुरीणत्वाच्या माध्यमातून कामगारांनी क्रांती करण्याची त्यांची अपेक्षा असल्याने धुरीणत्वाची चौकटच ग्राम्शी नाकारत नाहीत आणि त्यामुळे त्यांची मांडणी मूलगामी स्वरूपाची नाही, असे म्हटले गेले आहे.

असे असले तरीही कार्ल मार्क्स, बेनीदेत्तो क्रोचे, निकोलो मॅकियाव्हेली, फ्रीड्रिख एंगेल्स, व्लादिमीर लेनिन, जॉर्ज सोरेल, विलफ्रेडो परेटो आदींच्या वैचारिक मांडणीच्या आकलनातून ग्राम्शींनी स्वतंत्र आणि दिशादर्शक लेखन केले. इटलीतील मुसोलिनीचे फॅसिस्ट राजकारण, पहिले महायुद्ध व त्यानंतर दुसर्‍या महायुद्धाच्या पूर्वीचा काळ, जागतिक महामंदी या उलथापालथीच्या आणि संक्रमणाच्या काळात ग्राम्शींनी मूलभूत मांडणी केली. त्यांच्या मांडणीने नवे सांस्कृतिक भान निर्माण झाले.

संदर्भ :

समीक्षक : मंगेश कुलकर्णी