ऑइकेन, रूडोल्फ क्रिस्टॉफ : (५ जानेवारी १८४६ ‒ १५ सप्टेंबर १९२६). जर्मन तत्त्ववेत्ता. जन्म ऑरिश येथे. त्याचे शिक्षण गटिंगेन व बर्लिन विद्यापीठांत लोत्से व ट्रेंडेलेनबुर्क यांच्या हाताखाली झाले. त्यांच्या विचारातील नैतिक प्रवृत्ती व तत्त्वज्ञानाची ऐतिहासिक मांडणी यांनी तो विशेष प्रभावित झाला. स्वित्झर्लंडमधील बाझेल येथे १८७१ ते १८७४ पर्यंत व जर्मनीत येना येथे १८७४ ते १९२० पर्यंत त्याने तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून काम केले. १९०८ मध्ये त्यास नोबेल पारितोषिक मिळाले.
ऑइकेनच्या मते केवळ निसर्गवाद किंवा केवळ विवेकवाद हा सत्चे स्पष्टीकरण देऊ शकत नाही, म्हणून तो हे दोन्ही वाद नाकारतो. मानवी प्रकृती केवळ नैसर्गिक शक्ती व प्रक्रिया ह्यांचा परिपाक आहे, असे निसर्गवाद मानतो. पण निसर्गवाद तत्त्वत: जरी मानसिक जगत नाकारत असला, तरी प्रत्यक्षात तो या ना त्या स्वरूपात ते मानतो. शिवाय मानव हा केवळ निसर्गप्रकियाधीन मानला, तर त्याच्या कर्तव्यभावनेचे स्पष्टीकरण देता येत नाही. तसेच नैसर्गिक तत्त्वांपलीकडील विवेक ही शक्ती माणसाच्या ठिकाणी असते असे विवेकवाद मानीत असला, तरी त्यामुळे माणसाच्या समग्र अनुभवांचा, विशेषत: नैतिक व धार्मिक अनुभवांचा, उलगडा होऊ शकत नाही.
मनुष्य हा निसर्ग व चैतन्य किंवा प्राकृतिक शक्ती व आत्मिक शक्ती यांचे संगमस्थान आहे. मानवात व मानवी इतिहासात अनंताची, पूर्णत्वाची जी ओढ दिसून येते, त्यावरून वैश्विक स्वरूपाच्या आध्यात्मिक क्रियेचे अस्तित्व सिद्ध होते. व्यक्तीमध्ये ही प्रक्रिया स्वतंत्र, क्रियाशील अशा आत्म्याच्या भौतिकतेपलीकडे जाणाऱ्या पूर्णाभिमुख गतिमानतेत दिसून येते. वस्तुत: मानवाचे आध्यात्मिक जीवन इतिहासातीत किंवा निसर्गबंधनातीत आहे.
ऑइकेनच्या मते आध्यात्मिक जीवन द्वंद्वयुक्त असल्याने संघर्षमय आहे. आध्यात्मिकतेचा निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न त्यात सातत्याने व चिकाटीने केला जातो. केवळ चिंतनातून नव्हे, तर आत्म्याची क्रियाशीलता व धडपड ह्यांच्या द्वारा जीवन घडले जाते. यातूनच मानवाची सत्य व प्रेम यांची आवड व उच्चतम जीवन जगण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त होते. अंतर्शायीकडून अतिशायीकडे, निसर्गबंधनापलीकडील आध्यात्मिक जीवनाकडे जाण्याची माणसाची सतत धडपड आहे. या वैश्विक, आध्यात्मिक जीवनात द्वंद्वे निर्माणही होतात व विरूनही जातात. या सर्वांतून प्रतीत होणारी अनंत आध्यात्मिक शक्ती हीच अंतिम सत् मानली पाहिजे कारण मानवी जीवन तसेच जाणीव व इतिहास यांचे, एवढेच नव्हे, तर निसर्गाचेही ही अनंत आध्यात्मिक शक्तीच अधिष्ठान आहे. ऑइकेनने इतिहासाचा आध्यात्मिक अन्वय लावला आहे. त्याच्या मते मानवी जीवनात अनेक जीवनपद्धती नांदत असतात. ह्या जीवनपद्धती सापेक्षतेने स्वायत्त व म्हणून पूर्ण असतात. त्यांना ऑइकेन ‘सिंटॅग्मा’ म्हणतो. ऐतिहासिक घटनांतून अशा जीवनपद्धतींचा आविष्कार होत असतो.
अशा तऱ्हेने ऑइकेनच्या सत्ताशास्त्रात मानवी मूल्ये व तार्किकता यांना त्यांचे न्याय्य स्थान मिळाले आहे. त्या काळी प्रचलित असलेल्या केवळ तार्किक चिद्वादाच्या जागी त्याने नैतिक किंवा आध्यात्मिक असा, धार्मिक विचारात चराचरेश्वरवादाकडे झुकणारा, क्रियाशील चिद्वाद मांडला. तो मांडताना त्याने संस्कृतीच्या ऐतिहासिक विचाराचा व्यापक आधार घेतला आहे. तो संस्कृतीच्या पुनर्नूतनीकरणावर भर देतो.
त्याच्या विचारांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर माक्स शेलर याच्या तात्त्विक समाजशास्त्रावर आणि स्प्रॅन्गर व स्पेंगलर यांच्या सांस्कृतिक मानसशास्त्रावर आणि त्यांद्वारा एकंदर विचारविश्वावर पडलेला दिसून येतो. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे आधुनिक जीवनाचा माणसावर जड आणि बधिर करणारा जो भयावह प्रभाव पडतो, त्याविरुद्ध लढण्यासाठी त्याने दिलेली हाकच होय.
त्याचे ग्रंथ जर्मन भाषेत असले, तरी त्यांची इंग्रजीत भाषांतरे झालेली आहेत. त्यांतील महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : मेन करंट्स ऑफ मॉडर्न थॉट (१९०९), द प्रॉब्लेम ऑफ ह्यूमन लाइफ (१९१४), व्हॅल्यू अँड मिनिंग ऑफ लाइफ (१९०९), लाइफ्स बेसिस अँड लाइफ्स आयडियल (१९११), द लाइफ ऑफ द स्पिरिट : एथिक्स अँड मॉडर्न थॉट (१९०९).
येना येथे तो मरण पावला.
संदर्भ :
- Gibson, W. R. B. Rudolf Eucken’s Philosophy of Life, New York 1907.
- Jones, W. T. An Interpretation of Rudolf Eucken’s Philosopphy, London, 1912.
- https://www.nobelprize.org/prizes/literature/1908/eucken/lecture/
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.