एखाद्या मार्गावरून १८०० अंशामध्ये वळणासाठी वाहनाला नालाकृती आकारातील वळणातून जावे लागते. अशा प्रवासामध्ये नागमोडी संरेखनाचा वापर करून रूळमार्ग तयार केला जातो. या रूळमार्गावर बांधलेल्या ज्या स्थानकावरून रेल्वे आपला प्रवास उलट दिशेने सुरू ठेवते, त्या स्थानकाला व्युत्क्रमी स्थानक म्हणतात. मुख्य रस्त्याला लागून असलेला डोंगर पार करून पलीकडील पठारावर रेल्वे नेणे आवश्यक असते तेव्हा अशा प्रकारच्या वळणांचा उपयोग करावा लागतो.
रेल्वेला १८० अंशातून वळण्यासाठी खूप मोठ्या त्रिज्येची गोलाई लागते. त्यामुळे नालाकृती वळण शक्य नसते. अशा वेळी परतीचे वळण (Switch back) हा पर्याय असतो. यासाठी व्युत्क्रमी स्थानकाची आवश्यकता असते. आजसुद्धा निलगिरी रेल्वे व दार्जीलिंग हिमालयीन रेल्वेमार्गांवर अशी परतीची वळणे अस्तित्वात आहेत. यामध्ये अशा स्थानकांवर रेल्वे विरुद्ध (Reverse) वळवण्याची व्यवस्था असते, म्हणजेच घाटाच्या खालच्या पातळीवरून येणारी रेल्वे अशा स्थानकावर आल्यावर थांबते. त्यानंतर उलट दिशेकडे वरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आपला पुढील प्रवास सुरू करते. घाटामध्ये रेल्वेच्या दोन्ही टोकांना इंजिन जोडण्यात आलेली असतात.
फायदे : बोगदे तयार न करता तीव्र चढ असलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नालाकृती वळणाचा वापर केला जातो. व्युत्क्रमी स्थानकाचे बांधकाम करणे हे आर्थिक दृष्ट्या स्वस्त असते. यामुळे बांधकामामध्ये लागणाऱ्या वेळेची बचत होते.
तोटे : (१) नालाकृती वळणामुळे रेल्वे गाडीच्या लांबीवर मर्यादा येतात कारण ही लांबी स्टब ट्रेकच्या लांबीवर अवलंबून असते. ह्याचा रेल्वे मार्गाच्या वाहन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
(२) रेल्वेच्या दोन्ही टोकांना इंजिन असतात. ही ढकल-ओढ (Push-pull operation) क्रिया धोकादायक ठरते.
(३) वळणांची संख्या अधिक असल्यास एका ठराविक अंतरावर जाऊन रेल्वे थांबवणे, स्विच करणे आणि वळवणे ही प्रक्रिया करण्यामध्ये वेळ लागतो. परिणामी प्रवासाचा अधिक वेळ खर्ची पडतो.
काही महत्त्वपूर्ण प्रकल्प : नालाकृती वळण असलेल्या काही मार्गांवरील व्युत्क्रमी स्थानकांची निवडक उदाहरणे तक्ता क्र. १ मध्ये दिलेली आहेत.
तक्ता क्र. १. व्युत्क्रमी स्थानक : काही महत्त्वपूर्ण प्रकल्प
कालबाह्य प्रकल्प : कालबाह्य झालेल्या व्युत्क्रमी स्थानकांची निवडक उदाहरणे तक्ता क्र. २ मध्ये दिलेली आहेत.
तक्ता क्र. २. व्युत्क्रमी स्थानक : काही कालबाह्य प्रकल्प
पहा : अमृतांजन पूल
संदर्भ :