झिग्मोंडी, रिचर्ड ॲडॉल्फ : ( १ एप्रिल १८६५ – २३ सप्टेंबर १९२९ ) रिचर्ड ॲडॉल्फ झिग्मोंडी यांचा जन्म ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना येथे हंगेरियन आई वडीलांच्या घरी झाला. आई शास्त्रज्ञ तर वडील कवी होते. आईने दंतशास्त्रातील शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या अनेक उपकारणांचा शोध लावला. वडिलांच्या अकाली मृत्युनंतर रिचर्डला त्यांच्या आईनेच मोठे केले. माध्यमिक शाळेत असतानाच रिचर्ड यांना निसर्ग विज्ञानाची, मुख्यत्वेकरून पदार्थविज्ञान व रसायनशास्त्राची आवड निर्माण झाली आणि घरीच प्रयोगशाळा निर्माण करून त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले.
व्हिएन्ना विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेतून त्यांनी आपली शैक्षणिक कारकीर्द सुरू करून ते व्हिएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठात आणि त्यानंतर म्यूनिक ( Munich ) विद्यापीठात गेले. याठिकाणी त्यांनी विल्हेम वोन मिलर (Wilhelm von Miller) यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले. म्यूनिक विद्यापीठातच त्यांनी इंडेन या हायड्रोकार्बनच्या संयुगावर संशोधन करून सेंद्रीय रसायनशास्त्रात पीएच्.डी. केली. याआधी त्यांनी सिल्वर सॉल्टसच्या सहाय्याने रंगीत काच निर्मितीबाबतचे संशोधन प्रसिद्ध केले.
सेंद्रीय रसायनशास्त्र सोडून, झिग्मोंडी बर्लिन विद्यापीठातील ऑगस्ट कुंट (August Kundt) या संशोधकाच्या मार्गदर्शनाखालील गटात भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सहभागी झाले आणि ग्राझ (Graz) विद्यापीठातून त्यांनी हॅबिलिटेशन (habilitation) ही यूरोपियन विद्यापीठात प्राध्यापक होण्यासाठीची शैक्षणिक अर्हता पूर्ण केली. वेगवेगळ्या प्रकारच्या साध्या आणि रंगीत काचा यातील सखोल ज्ञानामुळे त्यांना स्कॉट ग्लास या काच कंपनीने नोकरी दिली. त्यांनी जेना या जर्मनीतील एक प्रकारच्या काचेचा शोध लावला. ही काच उष्णता प्रतिरोधक असल्याने तापमापक तयार करण्यासाठी याचा उपयोग करतात. तसेच त्यांनी तांबड्या रंगाच्या माणिक (Ruby) या रत्नाच्या काचेच्या गुणधर्मांवरही संशोधन केले. ग्राझ विद्यापीठात असतानाच त्यांनी कोलाइड्सवरील सर्वांत महत्त्वाचे संशोधन केले. ‘माणिक रत्न किंवा करवंदासारखे लहान फळ लाल का दिसते हे केवळ त्यांच्या कोलाइड्स वरील संशोधनामुळे समजले.
त्यांनी स्कॉट ग्लास कंपनी सोडली तरी ते जर्मनीच्या जेना या शहरातच एक खाजगी अध्यापक म्हणून राहून संशोधन करीत राहीले. झिस (Zeiss) या भिंग (lens) आणि भिंगयुक्त उपकरणे तयार करणाऱ्या कंपनीत हेन्रि सिडेनटॉप (Henry Siedentopf) यांच्याबरोबर काम करून त्यांनी द्रावणातील अतिसूक्ष्म कण (nanoparticles ) पाहण्यासाठी ‘स्लीट अल्ट्रामायक्रोस्कोप’ विकसित केला.
त्यांची १९०८ साली गोटीन्जन (Gottingen) विद्यापीठातून विज्ञान क्षेत्रातील संशोधक म्हणून कारकीर्द सुरू झाली आणि असेंद्रिय रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्तीपर्यंत ते तिथेच राहिले. येथे त्यांनी द्रावणातील अतिसूक्ष्मकण पाहण्यासाठी त्यांच्या उपकरणांमध्ये बरीच सुधारणा केली. यामुळेच त्यांच्याकडून इमर्शन अल्ट्रामायक्रोस्कोप तयार झाला. नंतर त्यांनी सोन्याच्या सूक्ष्मकणांवर (Gold hydrosols ) काम केले आणि त्यांचा उपयोग प्रथिनांच्या अभ्यासाठी केला. कोलाइड्सवरील संशोधन आणि अल्ट्रामायक्रोस्कोपी या तंत्रासाठी त्यांना १९२५ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला.
संदर्भ :
- Reitstötter (1966). ‘Richard Zsigmondy’.Journal Colloid & Polymer Science, 211 (1–2): 6–7.
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureates/1925/zsigmondy-bio.html
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureates/1925/zsigmondy-lecture.pdf
- ‘Richard Adolf Zsigmondy: Properties of Colloids’.Nobel Lectures, Chemistry 1922–1941. Amsterdam: Elsevier Publishing Company. 1966.
समीक्षक : रंजन गर्गे