रॉथ, ॲल्विन इ. (Roth, Alvin E.) : (१८ डिसेंबर १९५१). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. रॉथ यांना बाजारपेठा अभिकल्प (Design) व स्थिर विभागणी सिद्धांत (Allocation Theory) विकसित केल्याबद्दल २०१२ मध्ये अर्थतज्ञ लॉईड स्टॉवेल शॅप्ले (Lloyd Stowell Shapley) यांच्या बरोबरीने अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

रॉथ यांचा जन्म न्यूयॉर्कमधील न्यूयॉर्कसिटी या शहरात झाला. त्यांनी १९७१ मध्ये प्रचालन संशोधन (Operation Research) या विषयात कोलंबिया विद्यापीठातून बी. एस. पदवी घेतली. १९७३ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथून त्यांनी त्याच विषयात एम. एस. व १९७४ मध्ये पीएच. डी. या पदव्या प्राप्त केल्या. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर ते इलीनोइस विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यानंतर १९८२ मध्ये त्यांची पीट्सबर्ग विद्यापीठात अँड्र्यू मेलॉन प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स या पदी नियुक्त झाली. तेथे अध्यापनकार्य करीत असताना काट्झ ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेतही त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. २०१२ पासून पुन्हा ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात पूर्ण वेळ प्राध्यापक तसेच हॉर्व्हर्ड विद्यापीठाचा सन्माननीय प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयाचे सुसान मॅक्रॉ प्राध्यापक हे पद त्यांनी धारण केले.

रॉथ हे क्रीडा सिद्धांत (Game Theory), बाजारपेठा अभिकल्प व प्रायोगिक अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रात संशोधन कार्य करीत आहे. जागतिक स्तरावरील वास्तव समस्या सोडविण्यासाठी व्यवहार्य तोडगा याबाबतच्या त्याच्या कार्याची दखल एक उत्तम उदाहरण म्हणून रॉयल स्विडिश अकॅडेमी ऑफ सायन्सेस या प्रख्यात संस्थेने घेतली होती. रॉथ यांच्या मानवी किडनी अदलाबदलीसाठीचा न्यू इंग्लंड प्रोग्रॅम मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आला. सदरच्या ताळमेळ प्रणाली वा उपक्रमाद्वारे मूत्रपिंड आदान-प्रदान व्यवहारासंबंधीची पुनर्मांडणी केली. संबंधित व्यक्तीबरोबरच दवाखाने, डॉक्टर्स व विविध सामाजिक संस्थांना मूत्रपिंडांचे आदान-प्रदान तसेच निवडी करण्याबाबत मोठी मदत झाली. अनेकदा सुदृढ व्यक्तींना आपले मूत्रपिंड आपल्या नात्यातील व्यक्तींना देण्याची इच्छा असते; परंतु सदरचे मूत्रपिंड गरजू व्यक्तींच्या मूत्रपिंडांशी मिळते-जुळते नसते. त्यासाठी मूत्रपिंड दान करू इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या जोड्यांनी एकत्रितपणे दुसऱ्या जोडीतील व्यक्तीला मूत्रपिंड देवू केले, तर त्यापैकी गरजू व्यक्तीला निश्चितपणे योग्य असे मूत्रपिंड मिळू शकते. शिवाय अशा पद्धतीमुळे सुयोग्य अशा उपलब्ध मूत्रपिंडांची उपलब्धताही वाढू शकते. याच रॉथ यांच्या सुजोड प्रणाली (Matching Theory) व्यवहारातील प्रचलित समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे.

रॉथ यांनी अर्थशास्त्राचा केवळ एक सामाजिकशास्त्र म्हणून नव्हे, तर मानवतेच्या भूमिकेतून त्याचा विचार व्हावा, हे आग्रहपूर्वक मांडले. जेव्हा व्यक्ती शाळा-कॉलेजात जातात, नोकऱ्या मिळवतात, आपल्या कारकिर्दीची निवड करतात, विवाह जमवतात अशा सर्व बाबतीत सुजोड बाजारपेठ (Matching Market) संकल्पना लागू पडते अशी मांडणी केली. आर्थिक सिद्धांतांचे प्रयोगशाळा आधारित विश्लेषण अनुसंधान (Investigation) करण्यासंबंधीचे प्रायोगिक अर्थशास्त्र विकसित करणारे ते पहिलेच अर्थतज्ज्ञ मानले जाते. न्यूयॉर्क शहरातील सार्वजनिक शालेय व्यवस्था व प्रवेश इच्छुक विद्यार्थी यांचा ताळमेळ कसा घालायचा, यासाठीही त्यांनी आपली सुजोड प्रणाली उपयोगात आणली. बोस्टन शहरातील शालेय प्रवेशासाठीही सदरची प्रणाली प्रस्तावित करून तेथील प्रवेशाचे प्रश्न मार्गी लावले. विवाह इच्छुकांची लग्ने जमवण्यासाठी तसेच लग्नानंतर त्यात स्थैर्यता यावी यासाठीही त्यांनी किरकोळ बदलासह सदरची सुजोड प्रणाली उपयुक्त असल्याचे दाखवून दिले. एकूणच सामाजिक समस्या सोडविण्याचे महत्त्वाचे साधन म्हणून अर्थशास्त्रीय सिद्धांताचा-विचारांचा वापर केला.

रॉथ यांनी अनेक ग्रंथाचे व शोध-निबंधाचे लेखन केलेले आहे. त्यातील ऑक्सिओमॅटिक मॉडेल्स ऑफ बार्गेनिंग (१९७९), गेम थिरॉटिक मॉडेल्स ऑफ बार्गेनिंग (१९८५), लॅबोरेटरी एक्स्पीरीमेन्टेशन इन इकॉनॉमिक्स (१९८७), दि शॅप्ले व्हॅल्यू (१९८८), टू-साइड मॅचिंग (१९९०), हँडबूक ऑफ एक्स्पीरीमेंटल इकॉनॉमिक्स (१९९५), गेम थिअरी इन दि ट्रडिशन ऑफ बॉब विल्सन (२००१), बार्गेनिंग एक्सपेरिमेन्ट रॉथ (२००१), व्हू गेट्स व्हॉट – ॲण्ड व्हाय : दि न्यू इकॉनॉमिक्स ऑफ (२०१५), व्हू गेट्स व्हॉट : दि न्यू इकॉनॉमिक्स ऑफ मॅचमेकिंग ॲण्ड मार्केट डिझाइन (२०१५) इत्यादी ग्रंथ महत्त्वाचे आहेत. शिवाय त्यांचे सत्तरच्या वर शोधनिबंध व लेख प्रसिद्ध झाले आहेत.

रॉथ यांना नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त आपल्या संशोधनकार्याबद्दल पुढील मानसन्मान लाभले : ॲल्फ्रेड स्लोअन फेलोशीप, गुग्गेनहेम फेलोशीप, अमेरिकन अकॅडेमी ऑफ सायन्सेस फेलोशीप, नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिकलची मेंबरशीप, इकॉनॉमेट्रिक सोसायटी मेंबरशीप.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा