लेडेरर्बर्ग, जोशुआ : ( २३ मे, १९२५ –  २ फेब्रुवारी, २००८ ) जोशुआ लेडेरर्बर्ग यांचा जन्म न्यू जर्सी येथील माँटक्लेअर येथे झाला. त्यांच्या वडलांचे नाव झ्वी आणि आईचे नाव इस्थर असे होते. हे ज्यू दांपत्य पॅलेस्टाईन मधून जोशुआच्या जन्माआधी अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी आले होते. वयाच्या १५ व्या वर्षापासून जोशुआ निरनिराळ्या प्रथितशय  प्रयोगशाळात  पेशीतील घटकांवर परिणाम करणारी रसायने शोधू लागले व त्यांनी कोशिका रसायनशास्त्राच्या ज्ञानात मोलाची भर घालण्यास सुरुवात केली. १९४१ साली ४०० डॉलरची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्राणीशास्त्र विषयात पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला. १९४३ साली त्यांनी अमेरीकन सैन्यात पण काम केले आणि १९४४ साली त्यांना प्राणीशास्त्र विषयात  पदवी मिळाली.

वयाच्या १९ व्या वर्षी जोशुआ लेडेरर्बर्गने ॲव्हरी यांचे स्ट्रेप्टोकोकाय  (Streptococci) मधील जनुकीय परिवर्तन व त्यात डीएनएचा संबंध या विषयी सर्व संशोधन वाचून काढले. एक पेशीय जिवाणूंचे प्रजनन केवळ पेशींचे विभाजन होते आणि त्यात जनुकीय बदल होत नाहीत हा त्या काळातील सामान्य समज होता. या समजुतीला छेद देत जोशुआ लेडेरर्बर्गने यांनी येलमधील टॅटम या शास्त्रज्ञाच्या हाताखाली काम करून असे सिद्ध केले की एक पेशीय जिवाणूत पण लिंग भेद असतो व विरुद्ध लिंगी पेशींच्या संयोगापासून त्यांच्यात नैसर्गिकरित्या जनुकीय देवाण घेवाण होत असते. या साठी त्यांनी इश्चरेचिया कोलाय  या आतड्यातील जीवाणूवर बरेच संशोधन केले. इश्चरेचिया कोलायच्या दोन प्रकारच्या जिवाणूत जनुकांचे पुनर्संयोजन (Genetic Recombination) कसे होते हे दाखवितानाच इश्चरेचिया कोलायच्या गुणसूत्रातील जनुकांचा क्रम लावण्याची पद्धतही शोधून काढली. हे जीवाणू प्रतीजैविकांच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती कशी विकसित करतात हेही विषद केले. याच संशोधनासाठी त्यांना १९४७ साली येल विद्यापीठाने डॉक्टरेट दिली. जोशुआ लेडेरर्बर्गने त्यावेळी फक्त केवळ २२ वर्षाचे होते आणि वैद्यकीय कॉलेजमध्ये परत जायचा विचार करत होते. पण त्यांना विस्कॉन्सिन विद्यापीठातून सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी निमंत्रण आले आणि वैद्यकीय शिक्षण घेण्याचा सोडून त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आणि पुढची १२ वर्षे आपल्या बायकोबरोबर म्हणजे इस्थर झिमर यांच्या बरोबर जीवाणूशास्त्रातील महत्त्वाचे शोध निबंध प्रसिद्ध केले. यात एक महत्त्वाचा शोधनिबंध विषाणू हे जीवाणूमध्ये कसे प्रवेश मिळवतात आणि त्यात कसे आपले साम्राज्य पसरवितात याबद्दलचा मानला जातो. जीवाणूत गुणसूत्रांव्यतिरिक्त जनुके प्लाझमिड नावाच्या डीएनएच्या तुकड्यांवर असतात हे लेडेरर्बर्ग यांनीच दाखवून दिले. जोशुआ लेडेरर्बर्गन यांनी जीवाणूतील जनुकीय देवाणघेवाणीसाठी निसर्गात घडणाऱ्या ट्रान्सफॉर्मेशन (ज्यात डीएनए थेट पेशीच्या आत शिरून पेशीच्या गुणसूत्रात स्थानापन्न होतो), ट्रान्सडक्शन (ज्यात विषाणूचा डीएनए पेशीच्या आत शिरून पेशीत काम करू लागतो) व कॉन्जुगेशन (ज्यात प्लाझमिडच्या सहाय्याने दोन पेशीत  डीएनएचे हस्तांतरण होते) ह्यावर आपल्या संशोधनाने प्रकाश टाकला व जीवाणू जनुकशास्त्राचा भक्कम पाया घातला. या अभ्यासातून पुढे जनुकीय अभियांत्रिकीचा जन्म झाला व  जनुकीय अभियांत्रिकीमध्ये विषाणूंचा उपयोग करण्याची सुरुवात झाली.

वैज्ञानिक यशाबरोबर त्यांच्यावर प्रशासकीय जबाबदारी येऊ लागली. १९५७ मध्ये त्यांनी अमेरिकेतील पहिला  वैद्यकीय जनुकशास्त्र विभाग विस्कॉन्सिन विद्यापीठात सुरू केला आणि १९५८ मध्ये स्टॅनफोर्ड येथील विद्यापीठातील जनुकीयशास्त्र विभागाचे प्रमुख सूत्रसंचालक म्हणून काम सुरू केले आणि याच सुमारास त्यांना नोबेल पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली. जोशुआ लेडेरर्बर्गना शरीरविज्ञानशास्त्रातील हा नोबेल पुरस्कार टाटम व बिडल यांच्यासोबत त्यांच्या जनुकीय क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनाबद्दल मिळाला होता. त्यावेळी ते केवळ ३३ वर्षाचे होते.

जोशुआ लेडेरर्बर्ग यांना १९५० साली बर्कले येथील प्रथितयश विश्वविद्यालयात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्त केले होते. या शिवाय त्यांना १९५७ मध्ये मेलबोर्न विश्वविद्यालयात फुलब्राईट प्रोफेसर म्हणून नियुक्त केले होते.

स्टॅनफोर्ड येथे आपल्या आवडत्या जनुकीय संशोधनाबरोबर जोशुआ लेडेरर्बर्ग यांनी आपल्या संशोधनाच्या कक्षा वाढविल्या. सोविएत युनियनने १९५८ साली स्फुटनिक हा उपग्रह अवकाशात सोडला होता. अमेरिकेने सुद्धा अवकाश संशोधनाची सुरुवात केली. जोशुआ लेडेरर्बर्ग यांना या अवकाश उपक्रमात जीवाणूसंबंधी संशोधन करण्याची कामगिरी दिली गेली. १९५८ ते १९७४ पर्यंत ते ह्या संशोधनाशी निगडीत होते. ह्याच काळात त्यांनी एक्झोबॉयॉलॉजी या जीवशास्त्राच्या शाखेची स्थापना केली.

या संशोधनासाठी स्वयंचलित यंत्रे निर्माण करताना त्यांचा सबंध त्याकाळच्या संगणकांशी आला आणि १९६० साली एडवर्ड फेगेनबॉम या स्टॅनफोर्ड येथील संगणकतज्ज्ञाबरोबर डेंड्राल नावाची संगणकप्रणाली त्यांनी विकासित केली. प्रयोग शाळेतील मास स्पेक्ट्रममधील लक्षणांपासून एखाद्या रासायानिक पदार्थाची संरचना ठरविण्यासाठी ही संगणकप्रणाली तयार करण्यात आली होती. अशा तऱ्हेने जीवरसायन व वैद्यकीयशास्त्रात संगणकीय विशेषज्ञ व त्याची कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा पाया घातला गेला.

आयुष्यभर लेडेरर्बर्ग यांनी विज्ञानाचा मानवी जीवनाचा उत्कर्ष होण्यासाठी काय करता येईल याचाच विचार केला. राष्ट्राची सुरक्षा व शस्त्रात्र स्पर्धा यांच्यावर विज्ञानाचा अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी पेंटॅगॉनच्या समितीचे सदस्य म्हणून १९७९ पासून काम केले. विज्ञान सर्व सामान्य माणसाला समजावे म्हणून ‘वॉशिंटन पोस्ट’ या वर्तमानपत्रात १९६६ ते १९७१ पर्यंत  स्तंभलेखन केले. १९७८ मध्ये लेडेरर्बर्ग रॉकफेलर युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. १९९० मध्ये ते एमेरिटस प्रोफेसर म्हणून नियुक्त झाले व स्वतः प्रयोगशाळेत विविध विषयावर काम करू लागले. या काळात ते सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील काम करीत असत.

लेडेरर्बर्ग यांची अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीवर १९५७ साली नियुक्ती झाली. याशिवाय १९७९ मध्ये रॉयल सोसायटी लंडनचे व १९८२ मध्ये अमेरिकन कला आणि विज्ञान अकादमीचे ते सदस्य बनले. अमेरिकेत त्यांना विशेष पदके देऊन गौरविण्यात आले होते. ह्याशिवाय त्यांना जगभरातील बऱ्याच विद्यापीठांच्या मानद पदव्या मिळाल्या होत्या. लेडेरर्बर्ग यांनी ३०० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले. १९९४ मध्ये अमेरिकेतील संरक्षण खात्यात आखाती युद्धाच्या परिणामावर अभ्यास करणाऱ्या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी संभाळले. १९५० पासून अमेरिकन सरकारच्या वेगवेगळ्या समित्यांवर त्यांची सल्लागार म्हणून  नियुक्ती होत होती.

त्यांना २००२ मध्ये बेंजामिन फ्रँकलीन पदक तर २००६ मध्ये प्रेसेडेंशिअल मेडल फॉर फ्रीडम मिळाले होते. २०१२ मध्ये लेडेरर्बर्ग यांच्या सन्मानार्थ मंगळावरील एका विवरला त्यांचे नाव दिले आहे.

लेडेरर्बर्ग यांचे न्यूमोनियामुळे न्यूयॉर्क येथे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे