प्राचीन पश्चिमी राजकीय विचार : मानवजातीच्या ज्ञात इतिहासात मुख्यतः जेथे राज्यसंस्था निर्माण झाल्या, त्या संस्कृतींचाच इतिहास व्यवस्थित रीतीने नोंदला गेला आहे. अलीकडे गेल्या शंभर वर्षात दळणवळणची वेगवान साधने उपलब्ध झाल्यावर राज्यसंस्था स्पष्ट स्वरूपात अस्तित्वात नसलेल्या मागासलेल्या जमातींचे समाज अध्ययनाच्या क्षेत्रात आले आहेत. या अध्ययनातून सत्ताविषयक किंवा राजकीय मानवशास्त्र (पोलिटिकल अँथ्रपॉलॉजी) ही ज्ञानाची नवीन शाखा निर्माण झाली आहे आणि गेल्या सु. पन्नास वर्षांत ही राजकीय मानवशास्त्राची शाखा विशेषकरून विस्तार पावत आहे. भारत, चीन, ग्रीस व रोमन त्याचप्रमाणे मुस्लिम राष्ट्रे यांच्यातील प्राचीन संस्कृतीचे अध्ययन गेल्या दोनशे वर्षात वाढले. या संस्कृतींमध्ये विशिष्ट राजकीय सत्ताविषयक शास्त्रे निर्माण झाली ; परंतु राजकीय शास्त्रांचा गेल्या सु. अडीच हजार वर्षांत यूरोपमध्येच अथवा पश्चिमी संस्कृतींमध्येच अखंड अभ्यास सुरू आहे. त्यामुळे विविध स्वरूपाची वैचारिक भर त्यात पडत गेलेली दिसते. या पश्चिमी संस्कृतीतील राज्यशास्त्राचा प्रारंभ व्यवस्थित, आकर्षक आणि सर्वांगीण स्वरूपात प्लेटोपासून सुरू होतो. एकोणिसाव्या शतकातील कार्ल मार्क्सपर्यंत ही विविध स्वरूपे विस्ताराने मांडलेली दिसतात. कार्ल मार्क्सनंतरही विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत राज्यशास्त्रविषयक चिंतन वाढतच आहे. त्याचा सारांश थोडक्यात देणे आवश्यक आहे.
यूरोपियन राज्यशास्त्राचे तत्त्वज्ञानात्मक स्वरूप प्लेटोने आपल्या सुराज्य (दि रिपब्लिक) या ग्रंथात मांडले आहे. यातील संवाद वादविवादाच्या स्वरूपातील आहे. सुराज्य या ग्रंथापेक्षाही अधिक व्यावहारिक स्वरूपाचे राजकीय चिंतन त्याच्या राज्यकर्ता (स्टेट्समन) आणि कायदे (लॉज) या ग्रंथांमध्ये आले आहेत. सुराज्य या ग्रंथामध्ये कविप्रतिभेने आकर्षक बनलेला राज्यविषयक विचार मांडलेला आहे. नगरराज्य आदर्श कसे असावे, याची मांडणी करीत असता विविध मानवी नैसर्गिक स्वभावांनुसार उच्चनीच वर्गयुक्त समाजरचना वर्णिलेली आहे. ही नगरराज्यातील संस्कृती दासवर्गाच्या श्रमावर निर्माण झालेली आहे. वरिष्ठ वर्गाचे संपन्न आणि नैतिक वा कल्याणमय जीवन आदर्श राज्यात कसे असावे, याचे स्पष्टीकरण यात मिळते. समाजात निसर्ग नियमाप्रमाणे तीन प्रकारचे मानवांचे वर्ग असतात व ते आनुवंशिक रीतीने चालू असतात. मातापित्यांचे गुण संततीमध्ये उतरतात. याला काही अपवाद आढळतात. मातापित्यांपेक्षा अधिक गुणसंपन्न संतती असली, तर तिला वरच्या वर्गात स्थान द्यावे. मातापित्यांपेक्षा कमी गुणांची संतती असेल, तर तिला खालच्या वर्गांत स्थान द्यावे. निसर्गाप्रमाणे तीन प्रकारचे मानववंश असतात. वरिष्ठ, प्रज्ञांसपन्न, उत्साही, शूर अशा माणसांचा वरिष्ठ वर्ग. समाजाचे शास्ते, सत्ताधारी या वरिष्ठ वर्गातले असावेत. हे सोन्यासारखे असतात. चांदीसारखा दुसरा दुय्यम दर्जाचा मानववंश असतो. त्यांतील लोक कमी प्रज्ञाशाली असतात; परंतु चांगले सैनिक बनू शकतात. तिसरा वर्ग लोहवर्ग होय. त्यांतील लोक केवळ शरीर श्रम करूनच जीवनधारणा व समाजधारणा करू शकतात. वरिष्ठ वर्ग म्हणजे राजांचा वर्ग. या राजांना खाजगी संपत्ती, खाजगी संतती आणि खाजगी पत्नी असता कामा नये. खाजगी कुटुंब आणि संपत्तीमुळे सत्तेचा दुरुपयोग सत्ताधारी करतात, भ्रष्टाचार व पक्षपातीपणा वाढतो. सर्व वरिष्ठ सत्ताधारी पतिपत्नी हे सामुदायिक असावे, संपत्ती समुदायाचीच. संततीला आपले स्वतःचे नेमके आईबाप कोण हे माहीत असता कामा नये. अशा तऱ्हेचे स्वार्थरहित सत्ताधारी म्हणजे राजे हे तत्त्वज्ञानी बनले तरच निःस्वार्थी आणि निरहंकारी बनू शकतात ; कारण समाजाला न्यायाचे राज्य पाहिजे असते. राज्याचे खरे उद्दिष्ट न्याय होय. तत्त्वज्ञानी हे या असत्य आणि भ्रममय जगातून वास्तव, शाश्वत, अंतिम सत्यतत्त्वांचे आकलन करतात आणि त्या आदर्श तत्त्वांप्रमाणे शासन चालवितात. असा हा तत्त्ववेत्त्या राजांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा साम्यवादी वरिष्ठ वर्ग असला, तरच न्यायाचे राज्य स्थापित होते. प्लेटोचा असा हा यूटोपियावाद फारसा मोहक आणि उत्तेजक ठरला नाही. प्लेटोचे हे सुराज्य होय. त्याने कल्पिलेले अशा तऱ्हेचे तत्त्ववेत्ते राजे किंवा सत्ताधारी ज्या राज्यात आणि समाजात नसतील, त्या राज्यात, समाजात किंवा नगरराज्यात भ्रष्टाचार आणि गुन्हे यांना खीळ पडत नाही. परंतु आधुनिक उदारमतवादी राज्यशास्त्रज्ञांच्या मते आधुनिक हुकूमशाहीच्या आणि बंदिस्त समाजाच्या राज्यव्यवस्थेचा पहिला पुरस्कर्ता प्लेटो होय. नागरिक स्वातंत्र्याचा प्लेटो हा शत्रू होय, अशीही टीका प्लेटोवर अलीकडे झाली आहे.
प्लेटोने सुराज्य हा यूटोपियावाद मांडल्यानंतर त्या काळी अस्तित्वात असलेल्या राजसत्ता, श्रेष्ठसत्ता (ॲरिस्टॉक्रसी) व प्रजासत्ता इ. निरनिराळ्या राज्यव्यवस्थांचे मूल्यमापन प्लेटोने केले आहे. राजसत्ता उत्तम असते परंतु तिला व्यवहार्य स्वरूप देणे फार कठीण असते. उच्चवर्गीय श्रेष्ठांचे शासन संपत्तीच्या लोभाने अवनत होत जाते कारण शास्ते अधिक संपन्न होतात आणि गरीब लोक त्यांचा हेवा करू लागतात, म्हणून समाजात सुसंवाद टिकत नाही. प्रजासत्ताक पद्धतीत गरीब लोकांचा प्रभाव वाढतो. जे एकसारखे नसतात, त्यांच्या योग्यतेप्रमाणे विशिष्ट वागणूक दिली जात नाही. लोकशाहीतले गरीब नेते संपन्न वर्गाची लूट करू लागतात व ती लूट आपसांत वाटून घेतात. शेवटी अव्यवस्था माजून दंडधारी, जुलमी माणूस राज्य करू लागतो. मनमानी राज्यपद्धती आल्यावर लोकांच्या लक्षात येते की, राज्यकर्ता हा राक्षस असतो. प्लेटो म्हणतो, की राज्यशास्त्र भूमितीसारखे तर्कशुद्ध असते ; परंतु ते कल्पनेतच राहते. याकरता कायद्याचे राज्य निर्माण करावे लागते. राज्यकर्ता हा कलाकारासारखा असतो. सामाजिक विशिष्ट परिस्थिती हे माध्यम नीट लक्षात घेऊन, तो वापरतो. राज्यकर्त्यांना विशिष्ट शिक्षण देऊन तयार केले पाहिजे. मध्यवर्ती किल्ल्यामध्ये सत्ताधाऱ्यांना स्थापित करायला पाहिजे. कवी आणि गवई यांच्यापासून सत्ताधाऱ्यांना दूर केले पाहिजे. सुसंवादी समाजव्यवस्था, कल्याणमय जीवनपद्धती आणि कायद्याचे राज्य या तीन गोष्टी राज्याची उद्दिष्टे होत.
ॲरिस्टॉटलचे राज्यशास्त्र (पॉलिटिक्स) वाचनीय आणि महत्त्वाचे आहे. त्या काळच्या शिक्षित ग्रीक नागरिकांचे ग्रह आणि भावना त्यात प्रतिबिंबित झाल्या आहेत. त्याचप्रमाणे मध्ययुगाच्या अंतापर्यंत तो राज्यशास्त्राचा प्रमाणभूत ग्रंथ होता. आजच्या राज्यकर्त्याला त्या ग्रंथाचा काही उपयोग नसला, तरी राज्यसंस्थेचा महिमा या ग्रंथात प्रथम वर्णिला आहे. उच्चतम कल्याणाच्या उद्देशाने उच्चतम आकृतिबंधाचा अस्तित्वात आलेला मानवी समाज म्हणजे राज्य होय, असे तो दाखवून देतो. मनुष्य हा राज्य निर्माण करून राहणारा प्राणी होय. स्त्री-पुरुष, स्वामी-दास यांनी युक्त अशी कुटुंबसंस्था निसर्गतःच प्रथम अस्तित्वात येते. अनेक कुटुंबांच्या समुदायातून ग्राम निर्माण होते आणि स्वयंपूर्ण ग्रामसमुदाय म्हणजे राज्य होय. पूर्ण विकसित मानवसमाज म्हणजे राज्य होय. समाजाव्यतिरिक्त व्यक्ती काहीही करू शकत नाही. जसा देहावेगळा हात निरुपयोगी असतो, तशीच राज्यरहित व्यक्ती निरुपयोगी असते. ज्याने कायद्याचे राज्य निर्माण केले, त्याने जनहिताचे उत्कृष्ट कार्य केले आहे कारण कायद्यावाचून माणूस जनावरापेक्षा दुष्ट बनतो आणि कायदा हा राज्याधीन असतो. समाज हा केवळ देवघेवीकरिता आणि गुन्हे टाळण्याकरता नसतो. कल्याणमय जीवन हे राज्याचे उद्दिष्ट असते.
प्लेटोच्या सुराज्यावर ॲरिस्टॉटलने विविध आक्षेप घेतले आहेत. राज्याला प्लेटोने घट्ट व्यक्तिमत्त्व दिले आहे. ते प्रमाणबाह्य आहे. वरिष्ठ सत्ताधाऱ्यांची कुटुंबसंस्था प्लेटोने नाकारली आहे. त्यात पिता, माता, बंधू, भगिनी ही वैयक्तिक नाती न राहता, ती सर्वसामान्य होतात. माता, पिता, बंधू इ. हे केवळ शाब्दिक उपचार बनतात. त्यामुळे एकमेकांशी खाजगी नात्याने जे जिव्हाळ्याचे व जबाबदारीचे वर्तन घडते, ते घडू शकत नाही. नवरा-बायको हे नाते नाहीसे झाल्यामुळे व्याभिचारापासून निवृत्ती हा सद्गुण म्हणून शिल्लक राहणार नाही. त्यामुळे सद्गुण आणि दुर्गुण कसे ओळखायचे याची पंचाईत होणार. सगळ्यांच्या समान बायका असल्यामुळे प्रपंचाची जबाबदारी घेणारी अशी व्यक्ती दिसणार नाही. प्रचंड मोठ्या अनेक दालनांच्या घरात सर्वांचे एक भोजनगृह इत्यादी. खऱ्या खाजगी कौटुंबिक जीवनापासून व त्या सुखापासून वंचित असे स्त्रीपुरुष प्लेटोच्या या साम्यवादी कुटुंबात राहणार. साधुसंन्याशांच्या मठासारखे हे मठ होणार, त्यांच्यात ब्रह्मचर्य मात्र राहणार नाही.
संपत्तीची खाजगी मालकी, मानवी समानता इ. प्रश्नांचाही ॲरिस्टॉटलने विचार केला आहे. संपत्तीची खाजगी मालकी असली, तर उपकारवृद्धी आणि उदारता हे सद्गुण म्हणून जीवनात दिसणार. खाजगी संपत्ती नसली, तर ते दिसणार नाहीत. स्वामी आणि दास यांच्यात समानता नाही. विषमतेमुळे क्रांत्या होतात, असे खरे नाही. सत् शासन असले पाहिजे. सबंध समाजाचे हित किंवा कल्याण साधणारे शासनच सत् शासन असले पाहिजे. केवळ शासन नीट चालले म्हणून सर्वांचे कल्याण होते असे नव्हे. तीन प्रकारची सत् शासने असतात: राजसत्ता वा राजेशाही (मॉनर्की), अभिजनसत्ता (ॲरिस्टॉक्रसी) आणि संविधाननिष्ठसत्ता (पॉलिटी). असत् शासने तीन प्रकारची: सुलतानशाही (टिरनी), स्वल्पतंत्र (ऑलिगॉर्की) आणि प्रजाशासन (डेमॉक्रसी). या सहा प्रकारच्या शासनांच्या शिवाय त्यांची अनेक प्रकारची मिश्रणे आढळतात. सत् शासन की असत् शासन हे शासनकर्त्याच्या नैतिक गुणांवर अवलंबून असते संविधानावर नव्हे.
राजसत्ता अभिजनसत्तेपेक्षा अधिक चांगली आणि अभिजनसत्ता संविधाननिष्ठ सत्तेपेक्षा अधिक चांगली असे असले, तरी सर्वांत जी चांगली ती बिघडली म्हणजे अत्यंत दुष्ट बनते. म्हणून मनमानी सुलतानाशाही ही स्वल्पतंत्रापेक्षा आणि लोकशाहीपेक्षा केव्हाही दुष्टच असते. प्रत्यक्ष अस्तित्वात असलेली सरकारे वाईटच असतात, परंतु त्यातल्या त्यात ॲरिस्टॉटलच्या मते लोकशाही उत्तम असते. ॲरिस्टॉटलने बंडे आणि क्रांत्या का होतात याची सविस्तर मीमांसा केली. शिक्षणाचा प्रसार, कायद्याबद्दल आदर आणि कायद्याच्या अंमलबजावणीत व प्रशासनात न्याय या तीन गोष्टी असल्या म्हणजे क्रांती टाळता येते. ॲरिस्टॉटलच्या राज्यशास्त्रात राज्याच्या उद्दिष्टांमध्ये सुसंस्कृत नागरिक निर्माण करणे ही मुख्य गोष्ट सांगितली आहे. कला आणि ज्ञान यांच्याबद्दल प्रेम असलेला श्रेष्ठ वर्ग निर्माण करणे, हे राज्याचे ध्येय होय. हे ध्येय ग्रीक संस्कृतीत दीर्घकालपर्यंत प्रभावी ठरले. प्लेटोच्या मते न्याय व ॲरिस्टॉटलच्या मते कल्याण ही राज्याची अंतिम उद्दिष्टे होत.
राज्यविषयक किंवा सत्ताविषयक तत्त्वज्ञान रोमन संस्कृतीने दिले नाही ते ग्रीक संस्कृतीचेच वैशिष्ट्य होय; परंतु कायदा अथवा वैधता आणि प्रशासन यासंबंधी पश्चिमी जगाला रोमने वैशिष्ट्यपूर्ण मौलिक योगदान केले आहे. त्याचा वारसा जगाला मिळाला व आतापर्यंत टिकून राहिला. हा रोमचा वारसा निर्माण करणाऱ्यांमध्ये सिसरो (इ. स. पू. १०६– ४३) याचा मुख्य वाटा आहे. सिसरो हा कायदेपंडित आणि राजकीय मुत्सद्दी होता. सिसरोची रिपब्लिक आणि लॉ या शीर्षकाखाली दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्लेटोच्या पुस्तकांप्रमाणेच ही शीर्षके आहेत. परंतु त्यात नावीन्य आणि वैशिष्ट्य आहे. तो सगळ्या जगाचा विचार करतो. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल सबंध मानवजातीचे राजकीय तत्त्वज्ञान सांगत नाहीत. ग्रीक लोकसमाजच त्यांच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने होता. सिसरो रोमन साम्राज्याला एक उच्च उद्दिष्ट आहे, असे मानतो. स्थानिक प्रदेशांना स्वयंशासन आणि स्वातंत्र्य दिल्यानेच व्यापक मोठ्या साम्राज्याची एकात्मता सिद्ध होते, अशी त्याची श्रद्धा होती. त्याची अशी श्रद्धा होती की सगळे विश्वच राज्य असून, देव आणि मानव त्याचे नागरिक आहेत. सगळ्या राष्ट्रांना सर्वकाळी लागू पडणारा नैसर्गिक प्रमाणभूत असा कायदा आहे. प्रत्येक मनुष्य मार्गदर्शन मिळाल्यास सद्गुणी बनू शकतो, असे त्याचे मत होते. राज्याची चर्चा करीत असताना कायदेपंडित या नात्याने सिसरो कायद्याचीच चर्चा करतो कारण त्याच्या मते राज्य म्हणजे कायद्याचे राज्य होय. माणसांची संपत्ती समान असू शकत नाही, गुण समान नसतात पण सगळ्या नागरिकांचे समान कायदेशीर हक्क असतात. त्याच्या मते कायदा नुसता अधिकार आणि जबरदस्ती यांच्या मर्यादेत सिद्ध होऊ शकत नाही. खरा कायदा सद्सद्वेकबुद्धीनेच सिद्ध होतो आणि तो निसर्गाशी सुसंगत असतो. सद्सद्विवकेबुद्धी ही सर्व मानवाच्या ठिकाणी वसत असते. त्यामुळे कायदा वा अन्य सर्व मानवांचे अधिकार तत्त्वतः एकच असतात.
राज्याचे निरनिराळे आकृतिबंध तपासत असताना तो ॲरिस्टॉटलची तत्त्वमीमांसा मान्य करून न्याय हे राज्यसंस्थेचे अंतिम उद्दिष्ट होय असे मानतो. म्हणजे राजसत्ता, अभिजनसत्ता की लोकसत्ता, हा महत्त्वाचा प्रश्न राहत नाही. या तिन्ही राज्यपद्धतींचे स्परूप एकत्रित संमिश्र असले पाहिजे आणि हे संमिश्रण समतोल असले पाहिजे.
संदर्भ :
- जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, राज्यशास्त्र (नोंद), मराठी विश्वकोश चौदावा खंड.