लहान प्रमाणातील लोकसंख्येला पाणीपुरवठा (विशेषतः विहिरीमधून) करण्याआधी विहिरीमध्येच पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याची पद्धत म्हणजे एकघट (Single pot) किंवा द्विघट (Two pot) पद्धत . या पद्धतीमध्ये ७ ते १० लिटर धारणाशक्ती असलेल्या मडक्याच्या तळाला ६ मिमी. व्यासाची ६ – ८ भोके पाडून त्यांवर २ ते ४ सेंमी. आकाराचे दगड ठेवतात. ह्या दगडांवर खडीचा एक थर देऊन त्यावर १ : २ ह्या प्रमाणात विरंजक चूर्ण आणि वाळू यांचे मिश्रण भरतात. विरंजक चूर्णाच्या वजनाच्या ५% सोडियम हेक्झामेटाफॉस्फेट ह्या मिश्रणात घातले तर निर्जंतुकीकरणाचा काळ वाढतो. मडक्यामध्ये उरलेली जागा खडीने भरून टाकली जाते. मडक्याचे तोंड पॉलिथीन कपड्याने बंद करून ते विहिरीतल्या पाण्याच्या पातळीच्या १ ते १.५ मीटर खाली टांगून ठेवले जाते. मडक्यामधले १.५ किग्रॅ. विरंजन चूर्ण साधारणपणे दररोज १००० लि. उपसा असलेल्या विहिरीतील पाण्याचे निर्जंतुकीकरण ७ दिवसांपर्यंत करते. येथे विरंजन चूर्णामध्ये उपलब्ध क्लोरीन २५ ते ३०% आहे असे गृहीत धरले आहे.
द्विघट पद्धतीमध्ये एकात एक बसणारी दोन मडकी वापरतात. आतील मडक्यांत वरीलप्रमाणे विरंजक चूर्ण आणि वाळू भरतात. ह्या मडक्याला छिद्रे पाडलेली असतात ती विरंजक चूर्ण आणि वाळूच्या मिश्रणाच्या पातळीच्या थोडी वर असतात. बाहेरील मडक्याला १ किंवा २ भोके पाडून त्याचे तोंड पॉलिथीन कपड्याने बंद करून मडकी विहिरीतील पाण्याच्या पातळीच्या १ ते १.५ मी खाली टांगून ठेवतात. ह्या पद्धतीमुळे निर्जंतुकीकरणाची क्रिया २ ते ३ आठवड्यापर्यंत चालू रहाते.