ठोसर, हरिहर शाहुदेव : (२३ जुलै १९३८ – २२ मे २००५). विख्यात भारतीय पुराभिलेखविद व इतिहासकार. त्यांचा जन्म मराठवाड्यातील केसापुरी (जि. बीड) येथे झाला. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून (सांप्रत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) इतिहास विषयात एम. ए. ही पदवी प्राप्त केली (१९६५). तसेच ‘हिस्टॉरिकल जिऑग्रफी ऑफ मराठवाडा’ या विषयावरील प्रबंध सादर करून विद्यावाचस्पती (पीएच.डी) ही पदवी प्राप्त केली (१९७७).

प्रारंभिक काळात राज्य पुरातत्त्व विभागात संशोधन साहाय्यक म्हणून औरंगाबाद येथे कार्यरत होते. या काळात न. श. पोहनेरकर यांच्याबरोबर व्यापक गवेषण व संशोधनकार्य केले. काही काळ ते औरंगाबाद येथे शासकीय कला व विज्ञान महाविद्यालयात व पुढे मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते (१९८२-९६). मुंबई येथील अनंताचार्य इंडॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये पीएच.डी चे मार्गदर्शक व इतिहास संशोधक म्हणून त्यांनी योगदान दिले. एस. एन. डी. टी. महाविद्यालयात इतिहासाचे अभ्यागत प्राध्यापक व मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले.

ठोसर यांनी पुराभिलेख, प्राचीन हस्तलिखितातील पाठनिश्चिती, पुनःपरिष्कार याचबरोबर प्राचीन शिलालेख व ताम्रपटातील स्थलनामांची केलेली निश्चिती यांतील त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. त्यांचा हिस्टॉरिकल जिऑग्रफी ऑफ महाराष्ट्र अँड गोवा (२००४) हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. ‘एपिग्राफीकल सोसायटी ऑफ इंडिया म्हैसूर’ व ‘प्लेस नेम सोसायटी’ साठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते. त्यांनी विविध विषयावरील १४० शोधनिबंध वेगवेगळ्या नियतकालिकांमधून प्रकाशित केले आहेत. ठोसर यांनी एकूण ६१४ शिलालेख व ताम्रपट यांची पडताळणी करून एकूण १६५३ स्थलनामांची, तसेच काही नद्या, पर्वत व जलाशयांची स्थलनिश्चिती अभिलेखांच्या आधारे केली. नाशिक परिसरातील अभिरांचे सत्तास्थान, कंधार या स्थानाचे प्राचीनत्व निश्चित केले. पैठणचे सुप्रतिष्ठान हे वाकाटक ताम्रपटात आलेले स्थलनाम, धेनुकटक, मान्यखेट या व अशा अन्य स्थलनामांचा शोध घेत असताना अभिलेखीय नोंदीत आलेल्या स्थलनामांची निश्चिती केली. हे सर्व त्यांनी प्रत्यक्ष पुरातत्त्वीय गवेषणाच्या आधारे व परिसरातील वस्तुनिष्ठ तथ्यांच्या आधारे केले. सांस्कृतिक भूगोलाच्या अभ्यासातही ठोसर यांनी मूलगामी स्वरूपाचे संशोधन करून आपला ठसा उमटवला. राज्य दार्शनिका (गॅझेटिअर), प्राचीन इतिहास खंड १ (२००२) या ग्रंथात वातापीचे चालुक्य तसेच राष्ट्रकूट राजवंश यांवर ठोसर यांनी स्वतंत्र लेखन केले. कल्याणी चालुक्य, यादव राजवंश, शिलाहार राजवंश या लेखनाचे नवीन प्रकाशित साधने व दृष्टीकोनातून त्यांनी संपादन केले.

प्राचीन अभिलेखातील स्थलनामांची निश्चिती करताना विविध गोष्टींचे व्यवधान ठेवावे लागते. निश्चित करावयाच्या स्थानांची भौगोलिक पार्श्वभूमी, परिसरातील अवशिष्ट तसेच रूढ भाषिक संदर्भ आणि त्यात होणारे परिवर्तन, उपलब्ध ग्रांथिक नोंदी, स्थळांचे पौराणिक संदर्भ, रूढ प्रथा व परंपरा यांसारख्या बाबी लक्षात घेऊन त्यांनी अजंठा लेणी व तेथील अन्य स्थानांचा विस्ताराने अभ्यास केला. यासाठी एन. एल. डे आणि एस. सी. दास यांनी या स्थानांविषयी केलेली नोंद, एम. एन. देशपांडे (मधुसूदन देशपांडे), अजयमित्र शास्त्री यांसारख्या अभ्यासकांचा मागोवा घेत अजंठाचे प्राचीन नाव अजितन्जय असे स्थान असावे आणि त्याचे अजंता/अजिंठा हे रूप झाले असावे, असे मत ठोसर यांनी मांडले. अचंत याची निश्चिती अजंता (जि. औरंगाबाद ) अशीही करता येते, असेही मत मांडले. तसेच अ) अजंताचे बाबतीत त्याचे प्राचीन नाव अचिंत संघ होते.  ब) बौद्ध धर्मातील योगाचार पंथाचे ते प्रमुख केंद्र होते. क) योगाचार पंथाचे एक प्रमुख आर्यसंग हे अजंता संघामध्ये राहत होते. ड) अजंता येथे राहणाऱ्या बौद्ध भिक्षुंचा योगाचार पंथाचा प्रचार चीनमध्ये करण्यात मोठा सहभाग होता, यांसारख्या अनेक गोष्टी अनुषंगिक बाबी म्हणून त्यांनी नोंदविल्या आहेत. याशिवाय अजिंठा येथील शिलालेखांच्या तपशिलाधारे त्यांनी पुढील मत मांडले : १) अचिन्त्यराज हा लेणी समूहाच्या प्रारंभिक काळात प्रमुख प्रायोजक असावा. २) त्याच्या संदर्भातील अन्य उल्लेखांवरून इसवी सनाच्या २५० ते २७० या कालावधी मध्ये अचिन्त्यराज याच्याच नावाने हा लयन समूह ओळखला जात असावा. हे त्यांचे निष्कर्ष  किंवा एकूण लयन निर्मितीच्या सातत्याविषयीचे त्यांनी व्यक्त केलेले मत, या विषयाला नवीन दिशा देणारे ठरते.

ठोसरांनी एकूणच महाराष्ट्र व गोवा यांच्या संदर्भात अनेक स्थलनामांचा व त्यांच्या व्युत्पत्तीचा घेतलेला शोध हा या क्षेत्रातील अभ्यासाला दिशा देणारा ठरतो. विशेषतः अनुषंगिक पुराव्याच्या आधाराने त्यांनी अचूकपणे केलेली स्थलनिश्चिती हे त्यांच्या संशोधनाचे विशेष ठरते. त्रैकूटकांची त्र्यंबक ही सुरुवातीची राजधानी असावी, नंतर त्यांनी अनिरुद्धपुरीला राजधानी स्थापन केली, असे मत ठोसर यांनी मांडले. इ. स. ४०० च्या सुमारास कोकणच्या मौर्यांनी आपली सत्ता कोकणावर स्थापन करून अनिरुद्धपूर ही राजधानी वसवली. ठोसरांनी या स्थानाची निश्चिती घारापुरीशी केली आहे. मौर्यांचे नाविक सामर्थ्य हे बदामीच्या चालुक्य सत्तेलाही आव्हान देऊ शकले, असे मत त्यांनी नोंदविले आहे. चालुक्य सत्तेने हे स्थान सतत हल्ले करून पूर्णतः उद्ध्वस्त केले व पुढे ७ व्या शतकाच्या शेवटच्या चतुर्थकामध्ये चालुक्य विक्रमादित्य याने पृथ्विचन्द्र भोगशक्ती याला उत्तर कोकणचा प्रांतपाल म्हणून नेमले. पृथ्विचन्द्र भोगशक्ती याने घारापुरी या स्थानाचे नूतनीकरण केले. तेथे राजधानी हलवली. त्याच्या अंजनेरी ताम्रपटातील नोंदीप्रमाणे हे स्थान पुन्हा वसविण्यासाठी विशेष योजना राबवण्यात आल्या, विविध सवलती दिल्या गेल्या यांसारख्या अनेक बाबी त्यांनी सप्रमाण मांडल्या. अ. प्र. जामखेडकर यांनी पुरासंचय भाग १ मध्ये ठोसरांनी निश्चित केलेल्या विविध राजवटीतील प्रशासकीय विभागांची केलेली नोंद दिली आहे, तसेच ठोसरांनी महाराष्ट्रातील १९ दुर्गविषयक नोंदींची यादी दिली आहे. हे दुर्ग इस्लाम राजवटीच्या आधीचे दुर्ग आहेत. ती नोंद अशी : भाम्भागिरी, चंद्रादित्यपूर, चंद्रपूर, देवगिरी, देवक्षेत्रपाटण, देवलक्ष्मी, गंगवाड, इरिडीगे, जिंतूर, कंधारपूर, कन्हगिरी, खिलीगील, नळवाडी, नंदिवर्धन, पद्मनाल, पिप्पलाखेटक, प्रणालक, उच्च्छीव, उदयगिरी, धच्छवभपर्व, खिलीगिलाचल, कोटगिरी, पृथ्वीपर्वत, रामगिरी, उदयगिरी, हरीवत्सकोट, मंगळगेकोट्ट, पान्हालेयकोट्ट. तसेच गणेशवाडी येथील १५० ओळींचा शिलालेख त्यांनी वाचून संपादित केला.

त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून एपिग्राफीकल सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय पुराभिलेख संस्था) या संस्थेने त्यांना ताम्रपत्र देऊन गौरविले. म्हैसूर विद्यापीठाच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले (२००२). ‘भारतीय राष्ट्रीय ग्रंथालय कोलकाता’ या संस्थेने त्यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त त्यांना विशेष पुरस्कार दिला (२००३). तत्पूर्वी अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक इतिहास परिषदेतून मार्गदर्शकपर बीजभाषणे त्यांनी दिली होती.

औरंगाबाद येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण : शिल्पकार चरित्रकोश, प्राच्यविद्या आणि धर्म परंपरा, साप्ताहिक विवेक, पुणे.
  • जामखेडकर, अ. प्र. पुरासंचय, भाग १, पुणे, २०१६.
  • ठोसर, एच. एस. हिस्टॉरिकल जिऑग्रफी ऑफ महाराष्ट्रा अँड गोवा .
  • ठोसर, एच. एस. स्टडीज इन द हिस्टॉरिकल अँड कल्चरल जिऑग्रफी अँड इथोनोग्राफी ऑफ मराठवाडा, औरंगाबाद, १९७७.
  • पाठक, अ. शं. संपा., राज्य गॅझेटिअर, इतिहास : प्राचीन काळ, खंड १, महाराष्ट्र राज्य दार्शनिका विभाग, मुंबई, २००२.

                                                                                                                                                                       समीक्षक : कल्पना रायरीकर