मजुमदार, रमेशचंद्र : (४ डिसेंबर १८८८ — ११ फेब्रवारी १९८०). भारतातील एक थोर व परखड बंगाली इतिहाकार. त्यांचा जन्म बंगालमध्ये (विद्यमान बांगला देश) फरीदपूर जिल्ह्यात खंडारपाटा या खेड्यात हालधर व विधुमुखी या सधन दांपत्याच्या पोटी झाला. कटक येथे प्रारंभीचे शिक्षण घेऊन त्यांनी रेवनशॉ महाविद्यालयातून १९०५ मध्ये प्रवेश परीक्षा दिली व पुढे प्रेसिडेन्सी कॉलेज (कलकत्ता विद्यापीठ) मधून एम्. ए. ही पदवी घेतली (१९११). त्यांना ढाक्का विद्यापीठात अधिव्याख्यात्याची नोकरी मिळाली; नंतर काही वर्षातच त्यांची प्राध्यापक म्हणून तिथेच नियुक्ती झाली. याच वेळी त्यांना कुशाण वंशासंबंधी संशोधन करण्यासाठी ‘प्रेमचंद रायचंद’ ही बहुमानाची दुर्मीळ शिष्यवृत्ती देण्यात आली. या सुमारास रवींद्रनाथ टागोर, अशुतोष मुकर्जी, जदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन यांच्यासारख्या उच्च साहित्यिक–विचारवंतांचा सहवास त्यांना लाभला. त्यांनी ’कार्पोरेट लाइफ इन एंशंट इंडिया’ या विषयावर प्रबंध लिहून पीएच्. डी. ही उच्च पदवी संपादन केली. या प्रबंधासाठी त्यांना ग्रिफिथ मेमोरियल हे पारितोषिक मिळाले.

त्यांची ढाक्का विद्यापीठात इतिहास प्रमुख म्हणून नियुक्ती झाली (१९२१). तिथेच पुढे ते १९३७ मध्ये कुलगुरू झाले. १९४२ मध्ये या पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांची बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. १९५८-५९ मध्ये ते अभ्यागत व्याख्याते म्हणून शिकागो व पेनसिल्व्हेनिया विद्यापीठांत व्याख्याने देण्यासाठी गेले होते. या व्यतिरिक्त विविध परदेशी विद्यापीठांतून त्यांनी व्याख्याने दिली.

भारतातील तसेच भारताबाहेरील अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि संशोधनात्मक संस्थांशी सदस्य, पदाधिकारी किंवा अध्यक्ष या नात्याने त्यांचे निकटचे संबंध होते. अखिल भारतीय इतिहास परिषद, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद तसेच इस्तंबूल येथील प्राच्यविद्या परिषदेच्या एका शाखेचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. एशियाटिक सोयायटी, कलकत्ता व मुंबई शाखा आणि रॉयल एशियाटिक सोसायटी ग्रेट ब्रिटन – आयर्लंड या जगन्मान्य संस्थांचे ते सन्मान्य अधिछात्र होते. कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना १९६७–६८ मध्ये मिळाला. त्याच वर्षी ते कलकत्त्याचे शेरीफ झाले. याशिवाय ‘हिस्टरी ऑफ मॅनकाइंड’ या यूनेस्को प्रसृत जागतिक लेखन समितीचे ते उपाध्यक्ष होते. भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था (पुणे), फादर हेरास इन्स्टिट्यूट (मुंबई), बंगीय साहित्य परिषद (कलकत्ता) इ. संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.

अध्यापनाच्या निमित्ताने ते १९२८ मध्ये यूरोपच्या दौऱ्यावर गेले. त्या वेळी त्यांनी यूरोपातील विविध देशांना भेटी दिल्या. याच दौऱ्यात त्यांनी ईजिप्त, सुमात्रा, कंबोडिया, सयाम, मलाया या मध्य पूर्वेकडील व आग्‍नेय आशियातील देशांतील प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रभाव व प्रसार पाहिला. त्यातून त्यांचा बृहत्तर भारतावरील त्रिखंडात्मक एंशंट इंडियन कॉलनीज इन द फार ईस्ट (१९२७) हा अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथ बाहेर पडला. याशिवाय त्यांनी विपुल ग्रंथलेखन केले : ग्रेट विमेन ऑफ इंडिया (१९५३), सिपाय म्युटिनी अँड द रीव्होल्ट ऑफ १८५७  (१९५७), एक्सपांशन ऑफ आर्यन कल्चर अँड ईस्टर्न इंडिया (१९६०), ॲडव्हान्स हिस्टरी ऑफ इंडिया (१९६०), क्लासिकल अकौंट्स ऑफ इंडिया (१९६०), ग्‍लिम्पसिस ऑफ बेंगॉल इन द नाइन्टिन्थ सेंचुरी  (१९६०), हिस्टरी ऑफ द फ्रिडम मुव्हमेन्ट इन इंडिया (तीन खंड – १९६३), इंडियन रिलिजन्स (१९६३), हिस्टॉरिऑग्रफी इन मॉडर्न इंडिया (१९७०), एंशंट बेंगॉल (१९७१), हिंदू कॉलनीज इन द फार ईस्ट (१९७३) इ. ग्रंथ प्रसिद्ध असून अत्यंत लोकप्रिय झालेले आहेत. याशिवाय काही ग्रंथ त्यांनी सहलेखक म्हणून लिहिले आणि काही संपादित केले.

१८५७ वरील उठावाच्या पुस्तकात त्यांनी हा उठाव म्हणजे बंड होते, तो स्वतंत्र संग्राम नव्हता, असा परखड निष्कर्ष काढला आहे. क्लासिकल अकौंट्स ऑफ इंडिया या ग्रंथात त्यांनी प्रचीन पाश्चात्त्य इतिहासकार-प्रवाशांच्या भारताविषयीच्या मतांचे यथायोग्य संकलन केले आहे. प्राचीन इतिहास हे त्यांच्या व्यासंगाचे क्षेत्र होते; तथापि त्यांनी मध्ययुगीन भारत, बृहत्तर भारत आणि आधुनिक भारत यांचाही साक्षेपी अभ्यास व संशोधन केले. त्यांच्या सर्वांगीण अभ्यासामुळेच क. मा. मुनशी यांनी त्यांची भारतीय विद्याभवनच्या इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली व द हिस्टरी अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल (११ खंड) या इतिहास मालिकेचे संपादकत्व त्यांच्याकडे सुपुर्द केले. भवनच्या इतिहासविषयक ग्रंथांना मजुमदारांनी लिहिलेल्या प्रस्तावना विद्वत्तापूर्ण असून त्यांतून त्यांची निःस्पृह व सत्य प्रतिपादन करण्याची निर्भय वृत्ती दिसून येते. त्यांच्या लेखनात याची प्रचिती आढळते. द मुघल एम्पायर या सातव्या खंडाला लिहिलेल्या प्रस्तावनेत ते म्हणतात, “भारतातील मुस्लिम कालखंड हा सर्वांत तेजस्वी कालखंड झाला; स्थिर राजवट, कार्यक्षम प्रशासन, वास्तुकला व चित्रकला यांचा विकास आणि संपत्ती व वैभव यांमुळे तो गाजला. असे वैभव इतर इस्लामी राजवटीत क्वचित आढळते; मात्र या कालखंडात हिंदूंची आधिभौतिक व अध्यात्मिक अधोगती झाली आणि मुस्लिम कायद्याने त्यांना कनिष्ठ प्रतीचा सामाजिक व राजकीय दर्जा प्राप्त झाला”.

मजुमदारांनी विद्या भवन पुरस्कृत भारतीय इतिहासाचे ९,००० पृष्ठांचे अकरा खंड १९४४–७७ दरम्यान संपादून चिकाटीने पूर्ण केले. याशिवाय त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना त्यांच्या लेखन-संशोधनाबद्दल अनेक मानसन्मान आणि पारितोषिके मिळाली. सर जॉर्ज कॅम्बेल, बी. सी. लॉ व सर विल्यम जोन्स यांच्या स्मरणार्थ ठेवलेली सुवर्णपदके त्यांना मिळाली; तर कलकत्ता, जाधवपूर, रवींद्र भारती इ. विद्यापीठांनी त्यांना सन्मान्य डी.लिट्. ही पदवी दिली.

मजुमदारांची वाणी मृदू व लाघवी होती. त्यांचे इंग्रजी भाषेतील वक्तृत्व मंत्रमुग्ध करणारे असे. जदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, गो. स. सरदेसाई, पां. वा. काणे, अ. स. अळतेकर, पी. के गोडे इ. ज्येष्ठ इतिहासकारांच्या परंपरेतील मजुमदार हे एक थोर इतिहासकार होते. भारतीय इतिहास क्षेत्रातील एक मानदंड म्हणून त्यांचे कार्य अक्षर ठरले आहे.

वृद्धापकाळाने त्यांचे कलकत्ता येथे निधन झाले.