भारतातील एका प्राचीन राजवंशातील कला. मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर गंगा यमुनेच्या दोआबात शुंग घराण्याची सत्ता उदयास आली, असे पुराणांच्या आधारे समजते. साधारणत: इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. पू. पहिले शतक या काळात या घराण्याचा प्रभाव असावा, असे मानले जाते. या घराण्यासंबंधी वर्तमान माहिती फार विस्कळीत, त्रोटक आणि मोजक्याच साधनांवर आधारित आहे; परंतु कलेतिहासाच्या दृष्टीने हा कालखंड फार महत्त्वाचा मानला जातो. कलेच्या सर्वच प्रकारांत या काळात एक प्रकारचा मोकळेपणा आलेला दिसतो. विषयांचे वैविध्य, विपुल प्रतीके, उपलब्ध साधनांचा योग्य वापर, तंत्रामध्ये झालेला आमुलाग्र बदल, विविध स्थानिक, धार्मिक व सामाजिक प्रथा-परंपरांचा प्रभाव या काळातील विविध कलाप्रकारांवर पडलेला दिसून येतो. हे बदल का घडून येत होते? या बदलांच्या कारणांचा वेध इतर कुठल्याही कला प्रकारांपेक्षा मृण्मयकलेच्या आधारे चांगल्या प्रकारे करता येते. या कालखंडात मृण्मयकलेला अधिक चालना आणि महत्त्व मिळाले होते. याचे मुख्य कारण म्हणजे ‘द्वितीय नागरीकरणाचा’ झालेला विस्तार आणि वाढ. त्यासोबतच या विस्तार पावलेल्या नागरीकरणाच्या प्रक्रियेतून नागरी व ग्रामीण समाजाचा सातत्याने येत असलेला परस्परसंबंध. या सहसंबंधांचे प्रतिबिंब तत्कालीन सामाजिक व धार्मिक अभिरुचीवर पडलेले आढळून येते. यातून जी कलाभिरुची विकसित झाली तिचा प्रभाव तत्कालीन कलेच्या विविध प्रकारांवर विशेषतः मृण्मय कलेवर पडलेला होता, असे संशोधकांनी निदर्शनास आणले आहे. या काळातील मृण्मय प्रतिमा केवळ महत्त्वाच्या नगरांमध्येच न सापडता सर्वदूर आढळून आलेल्या आहेत, असे उपलब्ध प्रकाशित माहितीच्या आधारे सांगता येते.
मौर्य कालखंडाच्या उत्तरार्धात मृण्मय मूर्तींचा चेहरा साचात बनवून नंतर हात, पाय व इतर अवयव जोडले जात असे; परंतु संपूर्ण साच्यात प्रतिमा घडवण्याचा प्रारंभ याच कालखंडात झाला असे, पुरातात्त्विक पुराव्यांच्या आधारे अधोरेखित होते. या विकसित तंत्राने मृण्मय कलेवर मोठा प्रभाव पडला. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रतिमा तयार करण्यासाठी या तंत्रामुळे चालना मिळाली. या बदलत्या तंत्राच्या प्रभावाने उत्तर मध्य, उत्तर पूर्व व पूर्व भारतात मृण्मय प्रतिमांच्या निर्मितीची मोठी केंद्रे या काळात उदयास आली. यांतील काही स्थळे ही उत्कृष्ट मृण्मय वस्तूंच्या निर्मितीसाठी भारतीय इतिहासात ओळखली जातात. उदा., उत्तर प्रदेश मधील कौशांबी, अहिच्छत्र, मथुरा तसेच दिल्लीमधील राजघाट, पश्चिम बंगाल येथील चंद्रकेतूगढ, पंजाबमधील संघोल व बिहार येथील भिटा इत्यादी. विशेषतः भारतीय मृण्मयकलेच्या इतिहासात विपुल प्रमाणात सर्वोत्कृष्ट वैविध्यपूर्ण मृण्मय प्रतिमा ह्या ‘चंद्रकेतूगढ’ या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. या काळात मृण्मय प्रतिमांची जागा मातीचे ‘टाक/पट्ट’ (Plaques) बनविण्याच्या प्रकाराने घेतली. हे टाक एकल साचात (Single Mould) बनवलेल्या असून बऱ्याचवेळा त्याच्या वरच्या बाजूस भिंतीवर लटकवण्यासाठी छिद्र असलेले आढळून येते. या काळातील मातीच्या प्रतिमा आणि दगडी शिल्पे यांच्यात बरेच साधर्म्य आढळते.
या कालखंडातील मृण्मय प्रतिमांची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रकारे नमूद करता येतात : उत्कृष्ट भाजलेल्या, कमी उठावातील अंकन, दृष्यात्मकता, शारीरसौष्ठवापेक्षा दागिने व इतर अलंकरणाला दिलेले प्राधान्य, स्त्री प्रतिमा, युगूल प्रतिमा, शृंगाररत युग्मे इत्यादी प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतात. चेहऱ्यावरील भाव बरेचदा स्थिर आढळतात. त्यामुळे वर दिलेल्या बाबींच्या आधारे या काळातील मृण्मय प्रतिमा ओळखायला सोप्या जातात. या सोबतच महत्त्वाच्या व्यक्तीची प्रतिकृती आणि त्या भोवती इतर पात्रे, अशी रचना केली जात असे. मद्यपान, संगीत आणि नृत्य असे प्रसंग असलेले मृण्मय पट्ट अनेक ठिकाणांहून सापडले आहेत. या काळखंडातल्या मृण्मय प्रतिमा विषयवस्तूंच्या आधारे ढोबळपणे दोन प्रकारांत विभागता येतात : तत्कालीन धार्मिक कल्पना मान्यतांशी संबंधित असलेल्या व नसलेल्या.
धर्म कल्पनांशी निगडित मृण्मय प्रतिमा :
शुंगपूर्व काळात देवतांच्या मृण्मय प्रतिमा निश्चित प्रकारे ओळखता येत नाहीत. मात्र शुंग कालखंडात ‘लक्ष्मी’ या देवतेची अनेक रूपे प्रचलित असावीत, असे उपलब्ध प्रतिमांच्या आधारे साधार सांगता येते. अशा प्रकारच्या प्रतिमा प्रामुख्याने कौशांबी, संकिसा आणि मथुरा या ठिकाणांहून मिळालेल्या आहेत. मथुरा येथे सापडलेल्या एका टाकावर ‘अभिषेक लक्ष्मी’ म्हणजेच ‘गज-लक्ष्मीची’ प्रतिमा आढळली आहे. देवतेच्या हातात कमळाचे फूल असून बाजूला दोन हत्ती असून डोक्यावर पाण्याचा वर्षाव करत दर्शविले आहेत. उर्वरित जागेत फुले आणि वेलींचे नक्षीकाम केलेले दिसून येते. मथुराप्रमाणेच, संकिसा या ठिकाणी सुद्धा अशीच एक खंडित मृण्मय प्रतिमा सापडली आहे.
लक्ष्मी आणि तिच्या सोबत सेविका अशी प्रतिकृती असलेली प्रतिमा कौशांबी येथे मिळाली आहे. या पट्टावर मुख्य प्रतिमेच्या उजव्या बाजूला एक सेविका उभी असून तिच्या हातात चवरी (flywhisk) आहे. कौशांबी येथे सापडलेल्या मृण्मय प्रतिमेत पूर्ण उमललेल्या कमळावर उभी असलेली, दागिने, मेखला आणि बांगड्या परिधान केलेली लक्ष्मीची प्रतिमा दिसते.
कौशांबी येथील उत्खननात सापडलेल्या गोलाकार मृण्मयपट्टावर एक योद्धा रथावर आरूढ होऊन बाण मारत असलेला दर्शविला आहे. त्याने चिलखत परिधान केलेले दाखविले आहे. रथ चालवण्यासाठी सारथी असून त्यानेही चिलखत परिधान केलेले आहे. त्याने चारही घोड्यांचे लगाम आपल्या हातात धरलेले दिसतात. या अंकनाच्या आधारे यात दर्शविलेली मुख्य व्यक्ती ही ‘सूर्यदेवता’ असावी, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. मथुरा येथे मोठ्या प्रमाणात ‘कामदेवाच्या’ मृण्मय प्रतिमा मिळाल्याची नोंद आढळते. कौशांबी येथे सापडलेल्या एका मृण्मयपट्टावर मोरावर स्वार पुरुषाची प्रतिमा आहे. ही प्रतिमा स्कंद/कार्तिकेय या देवतेची असावी, असा कयास केला गेलेला आहे. चंद्रकेतूगढ, राजघाट, मथुरा आणि कौशांबी इत्यादी ठिकाणी मिळालेल्या स्त्री व पुरुष मृण्मय प्रतिमांना विशेष प्रतिमा लक्षणांच्या आधारे व यक्षिणी व यक्ष प्रतिमा म्हणून अभ्यासकांनी ओळखले आहे. या काळात ‘यक्ष’ पूजेचे प्रचलन मोठ्या प्रमाणात होते, हे तत्कालीन इतर दृश्य कलेच्या साधनांवरून सुद्धा निदर्शनास येते.
मुख्य प्रतिमेच्या आजूबाजूला कमळाची फुले असलेले अनेक मृण्मय टाक मिळालेले आहेत; परंतु उत्तर प्रदेश येथील काही ठिकाणांहून फुलांसोबतच प्रतिमेच्या दोन बाजूला सिंह उभे आहेत, अशा मृण्मय प्रतिमा सुद्धा आढळल्या आहेत. या टाकांवर सिंहांच्या उपस्थितीमुळे प्रस्तुत प्रतिमा ‘दुर्गा’ या देवीची असावी, असा अंदाज लावला जातो. सोबतच कौशांबी येथून सापडलेल्या एका मृण्मय प्रतिमेवर एक स्त्री सिंहावर स्वार दर्शविलेली आहे. ही स्त्री प्रतिमा महिषासूरमर्दिनीचे प्राक्क स्वरूप असावे. त्याबरोबरच मथुरा आणि कौशांबी येथे मुकुट घातलेल्या आणि त्यावर मोरपीस असणाऱ्या काही मृण्मय प्रतिमा आढळून आल्या आहेत. या प्रतिमांचा संबंध स्थानिक प्रभावी देवतांशी असावा, असे नमूद करता येते.
धर्म कल्पनांशी निगडित नसलेल्या मृण्मय प्रतिमा :
धर्माशी संबंध नसलेल्या युगूल, मद्यपान करणारे स्त्री-पुरुष अशी दृश्ये अंकित केलेले टाक या काळात मोठ्या प्रमाणात आढळून आले. पुरुष आणि स्त्री दोघेही मद्याचा आस्वाद घेताना दर्शविलेले दिसतात. दुसऱ्या एका मृण्मय प्रतिमेत पुरुषाने स्त्रीला आपल्या मांडीवर बसवून तिच्या कानातील कर्णभूषण व्यवस्थित करीत असल्याचे अंकन केलेले आहे. शृंगारिक दृश्य कोरलेले बरेच टाक कौशांबी, चंद्रकेतूगढ आणि राजघाट येथील उत्खननात सापडले. अहिच्छत्र येथे मिळालेल्या एका टाकावर संन्याशाने हातात फुलाची टोपली धरल्याचे दृश्य चित्रित केलेले आहे. उजव्या हातात कमळाचे फूल आणि डावा हात कमरेवर ठेवून उभ्या स्त्रीची प्रतिमा असलेल्या मृण्मय प्रतिमा कौशांबी, संकिसा आणि मथुरा येथे सापडल्या.
या काळातील लोकांना शृंगाराची विशेष आवड असावी, असे उपलब्ध मृण्मय प्रतिमांवरून ठळकपणे दृष्टीस पडते. केशकलेचे तसेच डोक्यावरील पागोट्यांचे विपुल प्रकार आढळतात. उदा., एका मृण्मय प्रतिमेत एक स्त्री उजव्या हातात आरसा आणि डाव्या हाताने केस सावरत असतानाचे दृश्य असलेला टाक मथुरा येथे मिळाल्याची नोंद आहे. मथुरा, अहिच्छत्र आणि कौशांबी येथे आढळून आलेल्या प्रतिमेत एक स्त्री उभी असून तिच्या समोर तिची सेविका आरसा दाखवत असल्याचे दृश्य आहे. प्रयागराज (अलाहाबाद) वस्तुसंग्रहालयात असलेल्या एका शुंगकालीन प्रतिमेत स्त्री शृंगार करतानाचे दृश्य अंकित केलेले आहे. कौशांबी येथे सापडलेल्या एका मृण्मय पट्टावर पुरुष सिंहाशी लढाई करतानाचे चित्रण असून दुसऱ्या अशाच एका पट्टावर दोन हत्ती आपापसांत लढाई करताना दर्शविलेले आहे. कौशांबी आणि मथुरा येथे सापडलेल्या काही पट्टांवर वनविहार आणि सहभोजनाचे दृश्य अंकित केलेले दिसते. या दृश्यांमध्ये पुरुष आणि स्त्रिया मुक्तपणे आपल्या जीवनाचा आनंद उपभोगत असलेल्या जाणवतात.
इतर महत्त्वाची दृश्ये असलेली मृण्मय शिल्पे :
कौशांबी येथे सापडलेल्या मृण्मयपट्टावर एक व्यक्ती हत्तीच्या सोंडेला बांधलेला दोर खेचत असून हत्ती चाकावर उभा आहे, असे सर्कशीतील दृश्य आहे. तद्वतच मथुरा येथून सापडलेल्या एका प्रतिमेत दोन व्यक्ती सजवलेल्या हत्तींवर स्वार असलेल्या अवस्थेत दर्शविले आहे. या काळातील काही टाकांवर स्त्रिया पक्ष्यांसोबत खेळताना दिसतात. पोपटाला घास भरवणारी स्त्री, बदकांसोबत खेळणारी स्त्री अशीही दृश्ये काही पट्टांवर आढळतात. मथुरा, अहिच्छत्र अशा काही ठिकाणांहून नृत्यरत करणारे पुरुष आणि स्त्रियांची दृश्ये असलेल्या मृण्मय प्रतिमा सापडल्याच्या नोंदी आहेत.
या टाकांवर विविध प्रकारचे अंकन आढळते. जसे, विविध प्रकारची वाद्ये, घरगुती व सामाजिक जीवनातील प्रसंग, स्थानिक कथा, दरबारी व्यक्तींचे अंकन, विविध प्रतीके, पशू पक्षी, फुले, वृक्षवेली, विविध प्रकारचे भौमितिक अलंकरण इत्यादी. उदा., अहिच्छत्र आणि मथुरा येथे सापडलेल्या मृण्मय पट्टावर वीणा, तर कौशांबी येथून सापडलेल्या टाकेवर मृदंगाचे अंकन आढळून येते. प्रसंगोपात्त अंकनात सुपरिचित अशी ‘राजा उदयन आणि वासवदत्ता’ यांच्या कथानकांची दृश्ये अंकित केलेली आढळली आहेत. त्याबरोबरच, काही मृण्मय प्रतिमांत रामायणाशी संबंधित ‘सीताहरण’ प्रसंगाचे चित्रण आढळून आलेले आहे. या अंकनात विशेष असे अंकन म्हणजे ज्यात रावण सीतेला हरण करून नेत असताना सीता आपले अलंकार खूण म्हणून मार्गावर टाकत जाते, याचा उल्लेख करावा लागेल. हातात चवरी आणि नीटनेटका वेश परिधान केलेली स्त्री, हातात फुलांचा गुच्छ असलेली स्त्री, वस्त्रांचे किंवा इतर वस्तूंचे गाठोडे हातातल्या काठीला बांधून चालणारा पुरुष, सोबतीला हातात टोपली घेऊन चालणारी स्त्री असे प्रवास करतानाचे दृश्य, रथावर स्वार राजा, पंख असलेला सिंह, सिंह हत्तीवर हल्ला करत असल्याचे दृश्य इत्यादी चित्रण या मृण्मय पट्टांवर आढळते. या कालखंडातील मृण्मय प्रतिमांकन हे अधिक मुक्त आणि नियंत्रणविरहित दिसते. तसेच अंकनातील दृश्यात तत्कालीन आर्थिक समृद्धीचे प्रतिबिंब दिसून येते. प्रचलित प्रभावी धर्म प्रतीके व प्रतिमांसोबतच तत्कालीन लोकधारणांशी संबंधित प्रतिमा व प्रतीके तुलनेने अधिक आढळतात. म्हणूनच मौर्योत्तर कालखंडाचा धार्मिक व सामाजिक इतिहास समजून घेण्यासाठी मृण्मय प्रतिमा प्रभावी साधन आहे. तत्कालीन समाजातील संपन्न तसेच अभिजन समाजमनाची कल्पना या प्रतिमांच्या आधारे समजून घेता येते.
संकेतशब्द : मृण्मय, टाक, लक्ष्मी, सूर्यदेवता, दुर्गादेवी, संगीत वाद्य.
संदर्भ :
- Dhavalikar, M. K. Masterpieces of Indian Terracottas, Bombay, Taraporevala, 1977.
- Srivastava, S. K. Terracotta Art in Northern India, Delhi, Parimal Publications, 1996.
समीक्षक : गोपाल जोगे