महाराष्ट्रातील एक प्राचीन ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. ते भंडारा जिल्ह्यात नागपूर-भंडारा मार्गावर नागपूरच्या आग्नेयेस सु. ८० किमी.वर वैनगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. शुंग-सातवाहन काळातील बौद्ध धर्माचे केंद्र, तसेच वाकाटक काळातील एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणून पौनी प्रसिद्ध आहे.

पौनी येथील पुरावशेष सर्वप्रथम पुरातत्त्वज्ञ हेन्री कझिन्स (१८७९), नंतर भारतीय पुरातत्त्व खात्याचे संचालक सर जॉन मार्शल यांच्या निदर्शनास आले (१९२६). पुरातत्त्वज्ञ एच. हरग्रीव्ह्ज यांनी पौनी येथील किल्ल्याची प्रेक्षणीय तटबंदी, बुरूज व खंदक यांचे वर्णन केल्याचे आढळते (१९२७). येथील पुरावशेषांचे महत्त्व लक्षात घेऊन तत्कालीन शासनाने पौनी येथील किल्ला व आसपासचे पुरावशेष संरक्षित म्हणून घोषित केले. भारतीय पुरातत्त्व विभागाचे मध्य भारतातील साहाय्यक पर्यवेक्षक जे. सी. चंद्रा यांनी पौनी येथे मोठ्या प्रमाणावर पुरावशेष, विशेषत: स्तूपाचे अवशेष, असावेत असे आपल्या पत्रव्यवहारांत नमूद केले (१९३६). पौनीची प्राचीनता तेथे आढळणाऱ्या पुरावशेषांव्यतिरिक्त तेथील क्षत्रप रुपिअम्म याचा लेखयुक्त छायास्तंभ आणि वाकाटक राजवंशातील दुसरा प्रवरसेन याच्या ताम्रपटामुळे अधोरेखित झाली. प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनी छायास्तंभ उजेडात आणला (१९५७), तर ज्येष्ठ साहित्यिक-संशोधक वि. भि. कोलते यांनी ताम्रपट प्रकाशित केला (१९६९).

पौनी येथील स्तंभ.

येथील जगन्नाथ टेकाडाच्या भोवती नांगरटीमध्ये एका प्रचंड यक्षप्रतिमेचा अर्धा भाग, मौर्यकालीन अक्षरवटिकांचा उत्कीर्ण लेख असलेली स्तूपाच्या कठड्याची शीर्षशीला इ. प्राचीन बौद्धस्तूपाचे अवशेष अचानकपणे निदर्शनास आले. भारतीय पुरातत्त्व खाते व नागपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे पुरातत्त्वज्ञ जगतपति जोशी व शांताराम भालचंद्र देव यांच्या मार्गदर्शनाखाली येथे उत्खनन केले (१९६९-७०). उत्खननाकरिता जगन्नाथ मंदिर, चांडकापूर (सुलेमान) व हरदोलाला अशा तीन टेकाडांची निवड करण्यात आली. यांतील पहिल्या दोन ठिकाणी शुंग-सातवाहन काळातील हीनयान पंथातील बौद्ध धर्माशी निगडित स्तूपाचे अवशेष प्राप्त झाले. त्यामुळे उत्तर व दक्षिण भारतामधील बौद्ध धर्माचा व त्या अनुषंगाने भारहूत व सांची येथील बौद्ध कलेचा प्रसार पौनी या केंद्रातून होत होता, हे आढळून आले.

जगन्नाथ मंदिर टेकाडाच्या उत्खननात एका प्रचंड स्तूपाचे अवशेष उपलब्ध झाले. या स्तूपाचा व्यास सु. ४१.२ मी. असून त्याचा घुमट विटांत पेटिकापद्धतीने बांधल्याचे आढळले. या स्तूपाभोवती ६ मी. रुंदीच्या फरश्यांनी आच्छादिलेला प्रदक्षिणापथ होता आणि त्याच्याभोवती सांची-भारहूतपद्धतीचा दगडी कठडा किंवा वेदिका होती, तसेच चार दिशांना प्रवेशद्वारे होती, असे आढळले. शिवाय या स्तूपाचा तीन कालखंडांमध्ये विस्तार झाल्याचे आढळून आले. स्तूपाचे अण्ड, हर्मिका व छत्रावली प्रदक्षिणापथाने वेढली होती. दर्शनी भागी एकपाषाणी ध्वजस्तंभ होता. प्रदक्षिणापथाचीही नव्याने रचना करून त्याची रुंदी ३.५० मी. इतकी केलेली आढळली. येथील अष्टकोनी स्तंभांच्या तीन बाजूंवर बौद्धधर्माची प्रतीके (स्तूप, बोधिवृक्ष, चैत्य व भद्रासन), भक्तगण, नाग मुचुलिंदाची कथा व फुलांची नक्षी कोरलेली शिल्पे असून आडव्या सूचीवर प्रदानलेख आहेत. सांची येथील स्तूपापेक्षा या स्तूपाचा परीघ मोठा असून तोरणावर शुंगकालीन शिल्पे कोरलेली आहेत. या स्तूपाचा काळ शुंगशैली, लेख व शिल्पे यांनुसार इ. स. पू. तिसरे शतक ते इ. स. तिसरे शतक असा ठरतो. या स्थानाला तत्कालीन समाजातील सर्व स्तरांतील समुदायाकडून आश्रय लाभला होता, असे वेदिकेवरील प्राकृत भाषेतील ब्राह्मी लिपीत कोरलेल्या अभिलेखांवरून ज्ञात झाले.

पौनी येथे आणखी एका भव्य हीनयानपंथीय बौद्ध धर्माशी निगडित स्तूपाचे अवशेष चांडकापुर टेकाड येथे केलेल्या उत्खननात सापडले (१९६९-७०). या स्तूपसमूहाचे अवशेष जगन्नाथ टेकाडाच्या दक्षिणेस सु. २ किमी. अंतरावर आढळले. या स्तूपाची बांधणी पायरीपद्धतीची असून त्याचा काळ इ. स. चे पहिले – दुसरे शतक असावा. या स्तूपाचा महत्त्वाचा भाग कालौघात नाहीसा झाला आहे. स्तूपाच्या अंतर्भागात अस्थिकलश होता; पण त्यावर अभिलेख आढळला नाही.

पुरातत्त्वज्ञ अमरेंद्र नाथ यांनी भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे पौनी येथील प्राचीन निवासी वसाहतींचा शोध घेण्यासाठी १९९४ मध्ये उत्खनन केले आणि या उत्खननात आढळलेल्या प्राचीन वसाहतींचा कालानुक्रम पुढीलप्रमाणे ठरविला आहे :

कालखंड १ : मौर्यपूर्व (इ. स. पू. सहावे शतक ते इ. स. पू. चौथे शतक)

कालखंड २ : मौर्य काल (इ. स. पू. चौथे ते इ. स. पू. दुसरे शतक)

कालखंड ३ : शुंग-भद्र (इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. पू. पहिले शतक)

कालखंड ४ : क्षत्रप-सातवाहन (इ. स. पू. पहिल्या शतकाचा उत्तरार्ध ते इ. स. दुसरे शतक)

कालखंड ५ : वाकाटक (इ. स. तिसरे शतक ते इ. स. सहावे शतक)

यातील वाकाटक कालखंडात सातवाहन काळातील बांधकामसाहित्याचा पुनर्वापर करून मोठ्या दगडांची बांधलेली तटबंदी व विहिरीचे अवशेष आढळले. अशा प्रकारची तटबंदी बिहार राज्यातील राजगीर येथे सापडली होती, तर दक्षिणेत पौनी येथे ती प्रथमच निदर्शनास आली. प्रस्तुत तटबंदी व अन्य पुराव्यांच्या आधारे पौनी हे वाकाटक काळातील ‘पुरिकाʼनामक नगर असावे, असा तर्क उत्खनकांनी केला आहे. एकूणच प्राचीन काळी पौनी हे विदर्भातील हीनयान पंथाचे मोठे केंद्र होते आणि या केंद्राद्वारे दक्षिणेत बौद्ध धर्म व कला यांचा प्रसार झाला असावा, असे सूचित होते.

संदर्भ :

  • Deo, S. B. & Joshi, J. P. Pauni Excavation (1969-1970), Nagpur, 1972.
  • Deotare B. C.; Joshi, P. S. & Parchure, C. N. ‘Glimpses of Ancient  Maharashtraʼ, Pune, 2013.
  • Joshi, P. S. ‘Fragements of a Buddhist Pastʼ, Maharashtra Unlimited  (Vidarbha Special), Mumbai, 2016.
  • Nath, A. Further Excavations at Pauni : 1994, New Delhi, 1998.
  • देव, शां. भा. ‘पवनी उत्खननʼ, विदर्भ संशोधन मंडळ, पृ. क्र. १२९-१३८, नागपूर,  १९६९.
  • मिराशी, वा. वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख,  मुंबई, १९७९.

समीक्षक – भास्कर देवतारे

प्रतिक्रिया व्यक्त करा